कवीचे गीत

श्री.हरिवंशराय 'बच्चन' ह्यांच्या 'मधुकलश' कवितासंग्रहातील 'कवि का गीत' ह्या कवितेचा अनुवाद. मूळ हिंदी कविता इथे वाचा.

१.
ऊर ते कसले उकलण्या गाठ काही ज्यास नाही ?
जर न इच्छा बोलण्याची, साथ मग सहवास नाही

क्षीण जगण्याने उचलला केव्हढा का भार कळते

जर तराजूतून माझे तोलले उच्छ्‌वास नाही

कालचे उच्छ्‌वास आता राग सुखदायी जगी ह्या
मधुर झाले गान; होते दग्ध-कंठ-प्रलाप माझे

गीत हे नाही, जगा, हे वेदनांचे माप माझे !

२.
उच्चतम मी पर्वताचे शिखर जेव्हा लक्ष्य केले,
मत्त हो‍उन मानवाने शीर मानाने उचलले,

गाठले मी ध्येय, विजयाचा जगी मग नाद घुमला

खूप घुमला, गीत-स्वर कोणीच पण ऐकू न शकले;

आज अणुरेणूतुनी झंकार येइल नूपुरांचा,
खड्‍ग जीवन, कापती पात्यावरी पद आप माझे

गीत हे नाही, जगा, हे वेदनांचे माप माझे !

३.
लागते गायन घुमू विश्वात तेव्हा क्रंदतो मी,
दरवळे सुरभि जगी तेव्हा उसासे टाकतो मी,

हो‍उ लागे सरस जग तेव्हाच अश्रू गाळतो मी,

विश्व-जीवन-ज्योत तेवाया स्वत:ला जाळतो मी !

मागणी स्वर्गाकडे केलीस आवेशात कुठल्या ?-
पुण्य येता ह्या जगी, उदयास यावे पाप माझे !

गीत हे नाही, जगा, हे वेदनांचे माप माझे !

४.
जे हृदी टोचीत होते तीव्रतेने शूल हो‍उन,
ते करी पडले जगाच्या कल्पतरुचे फूल हो‍उन,

शिकत आहे विश्व आता ज्ञान ज्याच्यातून प्रिय ते

प्राप्त मज भीषण चुकीची जाहले चाहूल हो‍उन;

ह्या जगाशी फक्त माझा एव्हढा संबंध होता -
जे जगा वरदान, होते तेच पण अभिशाप माझे !

गीत हे नाही, जगा, हे वेदनांचे माप माझे !

५.
ओवुनी सूत्रात शब्दांच्या फुलांना भावनांच्या,
मी खुशीने ठेवले विस्तीर्ण रस्त्यावर जगाच्या,

माळले केसात कोणी, कोण लाथाडून गेले,

वळुनी क्षणभर पाहिले ना मी उपेक्षेला कुणाच्या;

ठेव होती खूप नाजुक, खूप अन्‌ दायित्व मजवर,
ना अता चिंता फुलांना पोळतिल संताप माझे

गीत हे नाही, जगा, हे वेदनांचे माप माझे !