डॉ. आंबेडकरांस..

माझे काका डॉ. द. वि. जोग औरंगाबादला इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी चांगला परिचय होता.

त्यांनी (माझ्या काकांनी) आंबेडकरांवर लिहिलेली कविता खालीलप्रमाणेः

                                                     डॉ. आंबेडकरांस..

बाल्यापासुनी तू छळास गिळिले त्या कालकूटासम
त्या दुःखे जळतां गळा सहजचि तू क्रुद्ध रुद्रोपम
त्रैवर्ण्य-त्रिपुरांतका यश तुझे गातील भावी जन
त्वत्क्रोधाग्निबळेच की निरसले अस्पृश्यता-लांछन - १

सर्व ब्रह्म कुणी कथेत कथिती, कोणी दया प्रार्थिती
कोणी अर्थप्रधान ऐक्य वदती, संघात शक्ती कुणी
भीष्माच्या सम मुग्ध कोणी बसती वा सांगती सांत्वन
मांडी फोडुनी तूच एक वधिला वैषम्य-दुर्योधन - २

जाळुनी स्मृतिला तुवा उजळिली मानव्य-धर्मस्मृती
धर्मी धारण हेच तत्त्व पहिले तू आग्रहे सांगशी
दक्षाचा मख नाशुनीही ठरला तो शंभू यज्ञेश्वर
हिंदू धर्म निखंदिताही ठरशी तू धर्मसंरक्षक - ३