(... कोण जाणे)

श्री प्रदीप कुलकर्णी यांच्या 'कोण जाणे' या कवितेवरून....

----------------
(... कोण जाणे)
----------------

गोड शब्दांचा इथे का त्रास आहे... कोण जाणे !
बोलणेही का विनाअभ्यास आहे... कोण जाणे !

मारती गप्पाच मोठ्या, 'ही गजल नाही' तरीही ...
गजलचा अर्थाविना सहवास आहे... कोण जाणे !

बैसले हे भोजनाला 'नोट' घेउन 'वोट'साठी
हा कुणाच्या तोंडचा रे घास आहे कोण जाणे !

'या जगाचे रूपही बदलेल रे माझ्या मताने'
... हा कुणाच्या कल्पनांचा रास आहे कोण जाणे !

दाट काळोखात आता वाहिल्या लाखांत पेट्या...
का मतांची खिन्नशी आरास आहे.. कोण जाणे !

नेहमी फसवून तुजला पाच वर्षे राज्य केले
का तरी माझ्यावरी विश्वास आहे? कोण जाणे !

'मित्र' साऱ्यांचाच व्हावे... हे खरे आहे परंतू ...
'आम' जनतेचाच मी का 'खास' आहे... कोण जाणे !

अट्टहासाने कशाचीही न केली मागणी, पण...
का 'प्रधानी'चा मला हव्यास आहे... कोण जाणे !

चेहरे सारेच धुतल्या तांदळाचे सोंग घेती
'दाखला' केला कुणी लंपास आहे? ...कोण जाणे !

मी जरी 'पन्नास' टक्के मिळविले नाही तरीही...
मी परीक्षेला 'तिथे' का पास आहे... कोण जाणे !

'कोणता केला गुन्हा मी? कोणत्या गावात केला ?
हा विरोधी पक्षियांचा भास आहे'... कोण जाणे ?

एक आहे 'जीव' दोघांचा असे वाटे जगाला...
की उभी खुर्चीच त्यांचा 'श्वास' आहे... कोण जाणे !

  - राजे वि. श्री. उर्फ राजे विडंबनश्री

------------------------------
 चिरफाडकाल : १३ एप्रिल २००९
------------------------------