कोणी गावी मंजुळ गाणी
कोणी ल्यावी सुवर्णलेणी
कोणी मोजावी नुसती नाणी
देतच राहावी कोणी देणी
मात्र, कविता काय -- कोणीही करावी ।
कर्तव्यनिष्ट कोणी असे
भाग्य दुजाचे कोणा दिसे
जग मिथ्या कोणा भासे
द्यावी तयांपुढे शरणांगती
मात्र, कविता काय -- कोणीही करावी ।
आधार असे कोणी जनांचा
कर्दनकाळ कोणी सकलांचा
तारणहार कोणी जगाचा
पायधूळ त्यांची घ्यावी भाळी
मात्र, कविता काय -- कोणीही करावी ।
नसे जाच बंधन ही कसले
नसती नियम नीतीचे फसवे
मती, गतीचे भय न उरले
मनमुक्त गावी आर्त विराणी
अशी, कविता -- कोणीही करावी ।
कवी एक तो अजाणमती
सुवर्ण सोडूनी चुंबी माती
शब्द तयाचे माणिकमोती
कल्पनेचीच उंच भरारी
नील नभी ती विहरावी
कविता, --- 'कवी' ने करावी ।
शब्द जोडूनी बांधू इमले
शब्दाविना धन न रुचले
शब्दासरसे भय ते सरले
शब्दानेच भवसागर तरले
शब्दाचीच याचना करावी
आणि...
कविता, - कोणीही करावी ।