सर्वदूर निष्प्राण शांतता पसरली होती. बघणाऱ्याचे डोळे काचेसारखे तडकून जावेत अशी रखरखीत उष्णता त्या माळावर अधिराज्य गाजवीत होती. आणि झुडुपा-जाळींच्या त्या बोडक्या गर्दीत तो एकुलता वटवृक्ष उदास उभा होता.
त्याभोवतीचा पार नामशेष व्हायच्या मार्गात बराच पुढे गेला होता. सबंध शरीरावर मृतकळा पसरली होती. होती ती पाने सुकत चालली होती. पारंब्या निर्जीवपणे लोंबत होत्या. पक्ष्यांनी आपापली बिऱ्हाडे हलवून सबंध वृक्ष भकास करून सोडला होता.
दूरवरून एक ठिपका येताना दिसू लागला.
तो ठिपका आभाळातून खाली उतरत होता आणि पुन्हा वर झेपावत होता. त्या ठिपक्यामागोमाग दुसराही एक ठिपका सरकत होता. तो आकाराने जरा मोठा होता आणि सतत जमिनीवरच सरकत होता.
दुखावलेल्या पंखांमधले बळ संपले तशी तो कावळा जमिनीवर उतरला. हाडांची संख्याच नव्हे, तर प्रत्येकाचा घेरदेखील मोजून घ्यावा अशा, जीभ बाहेर काढून धापा टाकणाऱ्या त्या कुत्र्याची आशा पुन्हा पालवली आणि ते एक एक पाऊल पुढे रेटू लागले. कावळा त्याच्या टप्प्यात येतो न येतो तोच बळ एकवटून कावळा पुन्हा उडाला. परंतु कुत्रे पुढेच जात राहिले. कावळा केव्हातरी पुन्हा न उडण्यासाठी खाली कोसळेल या आशेवर ते कुत्रे प्राण देहात कोंडून घालायची धडपड करीत होते. मग त्याला रक्तोष्ण मांसात दात खुपसता येणार होते. उजाड पडलेल्या वस्त्या ओलांडत पुढे जाता येणार होते. तिथे त्याला पोटापुरेसे अन्न आणि अंगापुरेशी सावली असणार होती.
कावळ्याने बळ एकवटून मारलेली उडी त्याला वडाच्या एका बेचक्यात घेऊन गेली. डगडगणाऱ्या पंखांनी आणि पायांनी त्याचे शरीर त्या वीतभर पसरट जागेमध्ये फेकून दिले.
तळपत्या उन्हाच्या भट्टीत कुत्र्याला आता भोवंड येऊ लागली. छातीचा भाता सारी ताकद एकवटली तरी मंद होऊ लागला. त्याही अवस्थेत ते फरपटत जात राहिले.
पाराच्या निखळलेल्या एका दगडावर त्याने मान टाकली. त्याच्या तोंडातून रक्ताचा एक क्षीण ओघळ बाहेर पडला आणि जमिनीवर पोचण्याआधीच त्या दगडावर सुकून गेला. सर्व संवेदना नष्ट झालेले, सर्वांगावरचे केस झडलेले ते लूतभरले शरीर उन्हाला वाकुल्या दाखवत राहिले.
वडाने आपला मृत्युपंथाला लागलेला देह थरथरवला आणि सळसळ करीत दोन पाने ढाळली.
कावळ्याने एक निर्विकार निःश्वास टाकला.
"बिचारा. माझ्या आशेवर धडपडत तो इथवर आला आणि सगळ्यालाच पारखा झाला. त्याचाही नाईलाज होता. मटण नीट शिजलेले नसेल अथवा भाकरी नीट भाजलेली नसेल तर त्याला तोंड न लावणारा हा, आज त्या वस्तीवर मुंगीदेखील नाही.
"वाळत घातलेल्या धान्याची राखण करताना त्याने कित्येकदा मला हुसकून लावले. पण वाळवण उचलल्यावर खाली पडलेले गहू-जोंधळे टिपायला त्याने मला एका झेपेच्या अंतरावरूनही कधी हरकत घेतली नाही.
"त्याच्या मालकाने दारूच्या नशेत त्याच्या पाठीत कुऱ्हाड घातली होती तेव्हा त्या जखमेतले किडे मी हळुवारपणे टिपले होते.
"त्याला दोष देण्यातही अर्थ नाही. मी त्याच्या जागी असतो तर तेच केले असते.
"मी माझ्या जागी आहे म्हणून धडपडत इथे आलो.
"तुला आठवत असेल-नसेल, माझा जन्म तुझ्या खांद्यावर झाला. इथूनच उड्या मारमारून मी उडायला शिकलो. आणि एक दिवस निघून गेलो.
"माणसांच्या वस्तीइतके कडवट धोकादायक अनुभव कुठे दुसरीकडे असतीलसे वाटत नाही. विनाकारण आमच्यावर दगड फेकणारी वाह्यात पोरे गल्लीबोळात होती. त्यांनीच पाळलेली कुत्री आम्ही क्षणभर जमिनीवर उतरलो तरी गुरगुरत झेपा घ्यायची.
"पण माझ्या बायको-मुलांना त्यांनी जे केले त्याची आठवण...... " कावळ्याचा गळा भरून आला.
वडाने सहानुभूतिदर्शक सळसळ केली.
"पिलांना चारा आणायला मी बाहेर गेलो होतो. तेवढ्यात आमच्या घरट्याची फांदी तोडण्याचे काम झाले. कुणा एका पांढरे कपडेवाल्यासाठी रंगीत झेंडे टांगायचे होते त्यात ती आड येत होती.
"कुऱ्हाडीच्या पहिल्याच तडाख्याने आमचे घरटे पिलांसकट खाली पडले. कुत्र्यांच्या तोंडात जाणारी आमची कापूसकोवळी पिल्ले वाचवण्यासाठी माझ्या बायकोने आकांत केला. एका दांडग्या कुत्र्याने तिचा एक घास केला.
"मी परत आलो तेव्हा सगळे संपले होते.
"या कुत्र्यानेच मला थोडाफार सहारा दिला.
"आणि हा रखरखाट सुरू झाला. माणसे बोचकी-बाचकी बांधून जाऊ लागली. उकिरडे आम्ही लख्ख करून टाकले आणि आम्हालाही उपास पडू लागले. आमचा थवा दूर निघून गेला.
"सामानसुमान भरून निघालेल्या बैलगाडीत बसलेल्या एका पोराने तेवढ्यात आपल्या गलोलीने माझे पंख जायबंदी करायचे काम उरकून घेतले.
"मला कसलीच वासना उरली नव्हती. मृत्यू समोर स्वच्छ दिसू लागला तेव्हा आपले जन्मठिकाण पुन्हा पाहावे आणि तिथेच देह लोटावा या भाबड्या इच्छेने मला इथपर्यंत आणले.
"तुझीही दशा फारशी प्रेक्षणीय नाही. या सगळ्या माळावर तू एकुलता होतास म्हणून, नाहीतर मी तुला ओळखलेच नसते.
"झाले ते झाले. आता मी मृत्यूपासून दूर पळणार नाही. "
वटवृक्षाने एक निःश्वास टाकला.
"माझेही आता संपत आले आहे. मी आपोआप जरी मेलो नाही तरी उद्या माणसे येऊन मला तोडून टाकणार आहेत.
"दुष्काळाने बाकीचे धंदे कोसळलेला एक कंत्राटदार माझ्या देहावर जमेल तेवढी चैन करणार आहे. दुष्काळाची पाहणी करायसाठी येऊ घातलेल्या पुढाऱ्याला जाण्यासाठी रस्ताही म्हणे माझ्या छातीवरून होईल.
"माणसांचे खूप नमुने मी बघितले. हा पार म्हणजे तर सार्वजनिक सभेचे ठिकाणच होते.
"त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही एवढेच मी त्यातून शिकलो.
"तुझ्या जन्माआधीची गोष्ट आहे. हा पार बांधण्यासाठी मी ज्याच्या पारंबीतून रुजलो त्या मूळ पुरुषावरही कुऱ्हाड चालवायला त्यांनी कमी केले नाही. आणि पार बांधल्यावर सभेसाठी मोकळे व्यासपीठ हवे म्हणून माझ्या लेकरांवर घाव घालून मला निर्वंश करायलाही मागे पाहिले नाही.
"पण मी त्यांच्या दयेवर जगणार नाही. मी मोठ्या छातीने जन्मभर जगलो, मोठ्या छातीनेच मरेन.
"कुणाला कितीही शिव्या दिल्या तरी धडपडत जगत राहण्याची इच्छा प्रत्येक प्राण्या-पक्ष्यात असते. उन्हे कलू लागली आहेत. उगवतीच्या अंगाला तुझ्या चार पल्ल्यांच्या अंतराला माळाच्या उतरणीवर वस्ती आहे. तिथली माणसे अजून गेली नाहीत. तिथेच तो कंत्राटदार राहतो. तू तिथे पोचायचा प्रयत्न कर.
"माझा मृत्यू ठरलेला आहे, पण तो माणसांच्या हातून नव्हे.
"मला तोडण्यासाठी पाहणी करायला आलेल्या एका माणसाचा विडीचा निखारा मी जपून ठेवून माझी सुकी पाने भरवत वाढवला आहे. ती पाहा, माझ्या मागच्या बाजूने हळूहळू धुराची रेघ उमटते आहे. अजून वाळकी पाने आणि दोनचार सुकट फांद्या त्यावर पाडण्याइतकी शक्ती आहे माझ्यात शिल्लक अजून. माझा देह पेटायला मग उशीर नाही.
"तू एवढी आठवण ठेवून आलास, बरे वाटले. तुला आधार पुरवण्यात मी मरतानाही कमी पडलो नाही हे समाधान मला राहील. क्षुद्र माणसांच्या वाह्यात वल्गना ऐकत आयुष्य घालवल्यानंतर हे समाधान मला पहाडमोलाचे आहे.
"तर तू आता नीघ. खाऊन पिऊन सुधारलास की कधीतरी माझी आठवण काढ. टिपे मात्र गाळू नकोस. तो माझा आणि तुझाही अपमान ठरेल. मी माझी कुणाला कीव करू दिली नाही याचा मला अभिमान आहे, कृपया त्याला धक्का लावू नकोस. "
कावळा जरा हुशारला होता. त्याने मान वर केली.
"मी जाऊ? कुठे? जायचेच असते तर मी आमच्या थव्याबरोबर गेलो असतो. दुसरा घरोबा करण्याचा बाकीच्या कावळ्यांचा सल्ला मानला असता.
"स्वतःची जगण्याची राक्षसी वासना भागवण्यासाठी साऱ्या चराचरावर अत्याचार करीत मोकाट हिंडणाऱ्या मानवाच्या पुन्हा जवळपास जाण्याची माझी इच्छा नाही.
"तुझ्यासारख्या खानदानी जीवाची ही अवस्था केलेल्या मानवाचे नावही मनात आणायला मला लाज वाटेल.
"मला समाधान एवढेच आहे की माझे मरण तुझ्या अखेरच्या प्रकाशात उजळून निघेल. "
वटवृक्षाने सळसळ करीत आपली वाळकी पाने खाली भिरकावली. दोन जीर्ण फांद्याही मागोमाग गेल्या. धुराचा पट्टा अजगराएवढा जाड झाला आणि त्यातून पिवळ्या लाल जिभेची ज्वाळा उसळली. मधून अधून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने वटवृक्षाच्या अंगभर ती ज्वाळा लपेटली.
विझत चाललेली शक्ती गोळा करून कावळ्याने वटवृक्षावरची आपली पकड घट्ट केली.
धडधडाट करीत आग वर झेपावू लागली.
झुडुपा-जाळ्यांत ताठ मानेने उभा असलेला तो जळता वृक्ष आणि त्याच्या निष्पर्ण खांद्यावरच्या दुबेळक्यात असलेला काळा ठिपका याची ते कुत्र्याचे कलेवर सोबत करीत राहिले.
सूर्याने क्षितिजाखाली बुडी मारली.