घामघुमीचे काम भोंपुचे
ते घाणीचे बैल म्हणे ।
कोडकळा अन कडबा खाणे
नशिबी त्यांच्या लिहिलेले ॥
देवधर्म अन सहानुभूती
सेवा करणे इतरांची ।
घासामधला घास देउनी
शोधिती भोंपू सुखशांती ॥
आव आणुनी रायाचा
जे मलिदा खाती घामाचा ।
भूक तयांची शमेची ना
ते तर भस्म्याचे रोगी ॥
एकचि चिंता त्यांस सदा
कोणी मजला काय दिले ।
मी कोणाला काय दिले
हा विचार भोंपूसाठींचा ॥
नीती रीती बंधन ज्यांना
ते जरी भोंपू, खरे सुखी ।
गती नसे त्या भस्म्यांना
इहलोकी वा परलोकी ॥