कुमठा नाका ३

पाटलांच्या घराच्या सुधारणा हळू हळू चालू होत्या. पहिले काही दिवस दारे आतून बंद करण्याची सोय नसल्यामुळे आम्हाला दाराला कपाट लावूनच झोपण्याची पाळी आली. त्यामुळे प्रथम ती सुधारणा म्हणजे दारे आतल्या बाजूने बंद करण्याची सोय झाली. नंतर खिडक्यांच्या काचा बसल्या, त्या बसेपर्यंत घर अगदी माळरानावर असल्यामुळे भण भण वारा घरात शिरत होता त्यामुळे बरोबर आणलेले पंखे अजून आम्ही बसवले नव्हते. काचा बसवल्यावरही आम्ही खिडक्या सताड उघड्याच ठेवत होतो पण तेवढ्यात एक चमत्कारिक प्रसंग घडला आणि पंखे लगेच बसवण्याची वेळ आमच्यावर आली.
शहरातून आमच्या घराकडे येणाऱ्या वाटेवरच विकास नगर, पोस्टल कॉलनी, लकी सोसायटी अशी ज्या वसाहती लागत होत्या त्यातच आमचे काही मित्र राहत होते. त्यातील एका मित्राचा पोस्टल कॉलनीत स्वत:चा स्वतंत्र बंगला होता. त्या कॉलनीच्या पाठीमागूनच रेलवे लाइन जात होती आणि सोलापूर तसे महत्वाचे स्थानक असल्यामुळे रात्री बऱ्याच वेळा आगगाड्या त्यावरून जात आणि त्यांच्या आवाजात इतर कोणताही आवाज ऐकू येत नसे. त्याचा फायदा घेऊन एका दिवशी चोरट्यांनी पोस्टल कॉलनीतील या मित्राच्या घराशेजारच्या घरात खिडकीचे गज कापून प्रवेश मिळवला आणि त्या घरातील लोक बाहेरगावी गेलेले असल्यामुळे शांतपणे त्या घरातील कपाट पालथे घालून मागून त्याचा पत्रा कापून त्या कपाटातील वस्तू काढण्याचा प्रयत्न केला होता आणि तो तडीसही नेला होता..
पण तेवढ्यावर समाधान न झाल्याने त्याच पद्ध्तीने म्हणजे रेल्वे मागून जात असताना त्या आवाजाचा फायदा घेऊन खिडकीचे गज कापून त्यांनी आमच्या मित्राच्या घरातही प्रवेश केला. त्यासाठी त्यानी लहान मुलाचा वापर केला होता. लहान मुलाला कापलेल्या खिडकीच्या भागातून आत सोडून पुढील दार उघडून राजरोसपणे त्यानी दारातूनच प्रवेश केला. आमचा मित्र कपाटाच्या किल्ल्या उशीखाली ठेवून झोपत असे हे त्यांना कसे माहीत कोणास ठाऊक की तो त्यांचा अंदाज होता आणि तो अगदी बरोबर निघाला असावा. ती किल्ली काढण्यासाठी त्यांनी त्याच्या उशीखाली हात घातला आणि आमच्या मित्राला जाग आली. तसा हा मित्र जरा धाडसी असल्यामुळे घाबरून न जाता त्याने चोरालाच पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्या चोराने त्याच्या पोटात सुरा खुपसला. सुदैव त्या मित्राचे की सुरा त्याला निसटताच लागला आणि शेजारी पाजारी जमा झाले आणि चोरटे पळाले.
दुसऱ्या दिवशी जिकडेतिकडे ही बातमी पसरलीआणी आम्ही मित्राकडे त्याची विचारपूस करायला गेल्यावर हा सर्व प्रकार आम्हाला कळला. सोलापुरातल्या घरांना खिडक्यांना आडवे गजच लावण्याची तोपर्यंत प्रथा होती अर्थातच पाटलांनीही त्याच प्रथेचे पालन केले होते. त्यामुळे निदान त्या दिवशी तरी खिडक्या उघड्या ठेवून आम्हाला झोप येणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही खिडक्या बंद करून झोपलो आणि मग मात्र आता काचा बसवलेल्या असल्यामुळे घरात उकाड्याने आमचा अगदी जीव जाण्याची पाळी आली त्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी आम्ही बरोबर आणलेले पंखे बाहेर काढण्य़ाची आवश्यकता भासली. तरीही नंतरसुद्धा बरेच गुमास्तानगरवासी उकाड्यामुळे घराबाहेरच घोंगडी टाकून झोपत असलेले आम्ही पाहिले आणि त्यामुळे की आमच्याकडे काहीच न मिळण्याची खात्री असल्यामुळेच की काय पण आजूबाजूला चोरांचा एवढा वावर असूनही गुमास्ता नगरची हद्द मात्र त्यांनी ओलांडली नाही तरीही काही दिवस खिडक्या बंद करून झोपण्याचा उपक्रम आम्ही जारीच ठेवला.
आम्ही दोघे म्हणजे मी आणि अरविंद एकदमच सोलापुरात आल्यामुळे आणि आडनावेही एकच असल्यामुळे आम्ही भाऊभाऊच आहोत असेच बऱ्याच जणाना वाटत होते. आणि आता आम्ही एकत्रच राहतो म्हटल्यावर तो त्यांचा समज आणखीच दृढ झाला.
एकत्र कुटुंबपद्धती सगळीकडे लयास जात असताना आम्ही हा प्रयोग करावा याचे आम्हाला ओळखणाऱ्या सगळ्यांनाच नवल वाटायचे. हा प्रयोग करण्याचे धाडस परिस्थितीच्या रेट्याने आम्ही केले खरे पण तो यशस्वी किंवा अयशस्वी करण्याची जबाबदारी मात्र खरी होती ती आमच्या बायकांची! आणि ती त्यांनी अगदी शंभर टक्के पेलली असे म्हणावे लागेल. त्या दोघींनी कधीच एकमेकींविषयी तक्रार केली नाही उलट भांडणे झालीच तर त्या दोघींचा एक पक्ष व आमच्या दोघांचा विरुद्ध पक्ष अशीच झाली. माझ्या आईलाही या दोघी आपल्या लेकी असेच वाटत असे.
अचानक एक दिवस पाटलांनी महापालिकेच्या पाणी खात्यास कसे काय प्रसन्न केले कोण जाणे आणि त्यांच्या म्हणजे आता आमच्या घरात नळराजाने प्रवेश केला. त्यांनी एक नळ न्हाणीघरात आणि एक बाहेर दाराजवळ बसवला. आणि येणारे पाणी पाहून आमच्या डोळ्यातही आनंदाने पाणी आले. पण ते काही फार टिकाऊ स्वरुपाचे नव्हते याची प्रचिती लवकरच येणार होती.
गुमास्ता नगरीत पाण्याचा नळ असणे ही अपूर्वाईच होती आणि ती क्षीरसागरांसारख्या काहींच्याच घरात उपलब्ध होती. आता तशा भाग्यवंतांत आम्ही जमा झालो होतो आणि त्यामुळे घरातील नळावर आमचा हक्क असला तरी बाहेरच्या नळावर मात्र इतर शेजाऱ्यांचा होता. मात्र बाहेरील नळ चालू असला तर आत पाणी येत नसे त्यामुळे पाटलांचा नळ म्हणजे अंदप्पाच्या सार्वजनिक नळाचीच सुधारित आवृत्ती ठरला. अर्थातच पाटलांना सांगूनच आम्हाला बाहेरील नळ कायमचा बंद करून घ्यावा लागला.
काही दिवस आमची पाणी विवंचना बऱ्याच अंशी कमी झाली. पण त्याचवेळी सोलापुरात अनेक गोष्टी मिळेनाशा झाल्या होत्या. तो आणीबाणीचा काळ असल्यामुळे सगळेच जण हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते. तेल, साखर या वस्तू मिळेनाशा झाल्या होत्या. अगदी दिवाळीसुद्धा आम्ही अर्धा किलो डालडा, अर्धा किलो साखर आणि अर्धा लिटर गोडे तेल यावर साजरी केली. अशा परिस्थितीतही आम्ही संगीतानंद भरपूर लुटला. रत्नागिरीहून सोलापूर तंत्रनिकेतनात बदलून आलेले प्राध्यापक पुरोहित हे उत्तम सतार वाजवत आणि ते जवळच विकासनगरमध्ये राहत त्यामुळे कधी ते सतार घेऊन माझ्याकडे किंवा आम्ही त्यांच्याकडे जात असू. मी त्यांना तबल्याची साथ करत असे. आणि त्यामुळे खाण्यापेक्षा गाण्यावरच आम्ही दिवाळीत अधिक भर दिला.
सोलापुरात संगीताचा एकूणच आनंद आम्हाला भरपूर लुटता आला. पूर्वी तंत्रनिकेतनातच प्राध्यापक असलेले वसंतराव जोशी यांनी निवृत्ती घेऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता. तेही उत्तम व्हायोलीन वाजवत आणि त्यांच्या घरात दर गुरुवारी दत्तदरबार भरे आणि त्यात सोलापुरातील सर्व हौशी संगीतप्रेमी हजेरी लावत. त्यात बरेच वेळा आम्हालाही सहभागी होता आले.
त्यावेळी आमचे प्राचार्यही संगीताची गोडी असणारे होते आणि तेही व्हायोलीन उत्तम वाजवत. पुढे तर सोलापुरातून इतरत्र बदलून गेलेले प्राध्यापक पिंपळे हे पुन्हा बदलून सोलापुरास आले आणि तेही उत्तम सतार वाजवत. त्याच वेळी पुण्याहून श्री. गजानन वाटवे यांचे भक्त आणि उत्तम आवाज असणारे श्री. राम पेठेही सोलापुरातच बदलून आले. आज ते दोघेही (वाटवे आणि पेठे) नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्येही एक फार चांगला गायक मला सापडला. एकदा मी वसतीगृह प्रमुख असताना वसतीगृहाची चक्कर मारत असताना एका खोलीतून मला अतिशय सुरेल स्वरात वसंतराव देशपांडे यांचे " कुणी जाल का सांगाल का" या गाण्याचे सूर ऐकू आले. माझे पाय अर्थातच लगेच त्या दिशेने वळलेच. आणि नरेंद्र कुलकर्णी या नावाचा तो विद्यार्थी असल्याचे समजले. हा आकाशवाणीवरही गात असे, आणि पुढे नवीन मराठी वाहिन्या सुरू झाल्यावर सूरतालमध्येही त्याने आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले होते. अशा प्रकारे फारच मोठा संगीतप्रेमी मेळावा तेथे जमला आणि बरेच वेळा आम्ही एकत्र येऊन संगीताचा आनंद लुटला.
रिक्षा मात्र सोलापुरात मीटरप्रमाणे चालत असल्या तरी कसे काय कोण जाणे पण मीटर अतिशय जलद चालत. रिक्षात बसतो न बसतो तोच पहिला फ्लॅग पडायचा त्यामुळे रिक्षाचा वापर आम्ही फारच क्वचित करायचे. सुदैवाने सोमपा (सोलापुर महानगरपालिका)बस बहुतेक प्रत्येक भागात जात. ही सुविधा औरंगाबादमध्ये तेव्हां नव्हती, कारण औरंगाबादमध्ये मरामाप(महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ) च्याच बसेस शहरवाहतुकीसाठी वापरल्या जात होत्या आणि मी सेवानिवृत्त होऊन आम्ही पुण्यात स्थलांतर करेपर्यंत तीच परिस्थिती होती. सोलापुरात बसेस चालतही इतक्या सावकाश की त्यापुढे बार्शी लाइट रेल्वे फिकीच पडावी. कधी कधी शहरात मुलांना घेऊन त्यांना वाचण्यासाठी पुस्तके विकत घेऊन बसमधून घरी येईपर्यंत माझ्या मुलाने पुस्तक वाचून संपवलेले असायचे. बसेस गजगतीने चालत पण सर्व ठिकाणी त्यांचा वावर होता त्यामुळे एकाद्या ठिकाणी बस नाही म्हणून जाता येत नाही असे क्वचितच घडे पण बस आहे म्हणूबच तिच्यावर विसंबल्याने जाणे रद्दच करण्याची पाळी मात्र अनेकदा येत असे. त्यामुळे चालण्याची संवय मात्र आम्हाला भरपूर झाली.
पाटलांच्या घरातील पाण्याचे सुख आम्हाला फार दिवस लाभले नाही. हळूहळू पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले. आता क्षीरसागरांकडूनही पाणी मिळणे शक्य नव्हते. मुख्य म्हणजे नळाने येणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त कुठलाच पाणीसाठा त्याभागात उपलब्ध नव्हता. पाटलांचा दहा महिन्याचा कालावधी संपत आल्यावर आम्हा दोघानाही आता काहीतरी वेगळी राहण्याची व्यवस्था करायला हवी असे वाटू लागले. त्यामुळे त्याच वसाहतीत जरा छोटी असणारी आणि कमी भाड्याची जागा घ्यायचा विचार अरविंदने केला. मुख्य म्हणजे तेथे पाणी बऱ्यापैकी उपलब्ध होत होते.
आता आमच्या घरात आतील नळाला पाणी येईनासे झाले त्यामुळे पुन्हा एकदा बाहेरील नळ आम्हाला उघडून घ्यावा लागला तरी येणारे पाणी आमच्या चौघांच्या म्हणजे मी. माझी पत्नी आणि मुले यांच्या कुटुंबालादेखील कसेबसेच पुरू लागले. आता अरविंद आणि त्याचे कुटुंब समोरच्या घरात राहू लागले होते. आणि माझी आई मुंबईस भावाकडे आणि बहीण औरंगाबादला परत गेली होती. पण हळू हळू आम्हा चौघानाही पाणी कमी पडू लागले. एकदोनदा तर पाण्या अभावी आम्हाला सोलापुरातील उपहारगृहाचा आधार घ्यावा लागला. तेव्हां दाराजवळील नळाची उंची कमी करण्याचा प्रयोग आम्ही करून पाहिला. तो कमी करत करत शेवटी दारासमोर खड्डा खणून त्या खड्ड्यात बादली ठेवून जेवढे मिळेल तेवढे पाणी मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मी विभागप्रमुख असल्याने यंत्रविभागातील माझ्या हाताखालील कर्मचारी नळातील अशा सुधारणा करण्याच्या बाबतीत मला मदतीस सदैव तयार असायचे. परंतु कुमठा नाका हा शहरातील सर्वात उंच भाग असल्याने पाण्याचा दाबच इतका कमी होता की हळूहळू पाणी बादलीऐवजी पातेल्याने आणि शेवटी अगदी फुलपात्रानेच भरण्याची पाळी आली.
शेवटी तर पाण्याचा पाइप तोडत तोडत आम्ही अगदी थेट ज्या ठिकाणाहून नळाची जोडणी मुख्य जलस्रोताच्या मोठ्या नळावरून घेतली होती तेथपर्यंत जाऊन पोचलो आणि त्याच्यापुढे म्हणजे ज्या उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा होत असे तिकडे जाणे तेवढेच बाकी राहिले होते. दिवाळीच्या आदल्या दिवशी पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही आणि मग नाइलाजाने मी सर्व कुटुंबियांना घेऊन दिवाळीसाठी सरळ मुंबईस माझ्या भावाकडे जाण्याचा निर्णय घेतला.
त्या काळातच वसतीगृहप्रमुखाची जागा रिकामी झाली आणि प्राचार्यांनी मला वसतीगृहप्रमुख म्हणून याल का अशी विचारणा केली. होती त्यामुळे केवळ पाण्याच्या प्रश्नावर तोडगा म्हणूनच परत सोलापूरला आल्यावर वसतीगृहप्रमुख म्हणून काम करण्यास तयार आहे असे प्राचार्यांना सांगण्याचे ठरवले.
सोलापूरला परत आल्यावर लगेचच आम्ही वसतीगृह प्रमुखाच्या बंगल्यावर राहवयास गेलो आणि कुमठा नाक्याचा आमचा संबंध संपला. त्यावेळी तो सोलापूर शहराचे त्या बाजूचे शेवटचे टोकच होता. रात्री शिवशाहीचे दिवे तेथून दिसत. नंतर बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा सोलापूरला जायचा योग आला आणि तो भाग बराच शहरात आलेला दिसला आता त्याच्याहीपुढे वस्ती झाली आहे. त्यावेळीचा कुमठा नाका मात्र अशा काही कारणांमुळे विसरणे शक्य नाही.