कुमठा नाका १

    शासकीय सेवेत प्रवेश करतानाच कधीतरी आपली बदली होणार याची जाणीव ठेवावी लागते. काही खात्यात बदल्या या तीन तीन वर्षाच्या अंतराने होतातच पण ती गोष्ट आमच्या तंत्रशिक्षण विभागास लागू होत नव्हती म्हणजे बदल्या त्यामानाने फारच कमी प्रमाणात होत. त्याचे मुख्य कारण म्हणजे  सगळ्याच तंतनिकेतन अथवा अभियांत्रिकी महाविद्यालयात अगदी कमी प्राध्यापकवर्ग असे आणि त्यात बदल्या केल्यास विद्यार्थ्यांना अनेक वेळा प्राध्यापकावाचूनच राहावे लागे आणि त्याचा परिणाम शैक्षणिक दर्जावर होत असे. (आजकाल विद्यार्थ्यावाचूनच प्राध्यापकाना राहावे लागते आणि त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारतोच असे म्हणतात.)अर्थात इतका दूरवरचा विचार बदल्या न करण्यामागे होता अशातला भाग नाही पण परिस्थिती मात्र तशी होती. त्यामुळे मी औरंगाबादच्या तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळून जवळ जवळ बारा वर्षे काढली तरी बदली या
संकटास मला तोंड द्यावे लागले नव्हते. आणि प्रथम औरंगाबाद हा काय प्रकार आहे याविषयी मनात भीती घेऊन तेथे प्रवेश केल्यावर तेथे एक तप काढल्यावर मी चांगलाच रुळलो होतो.
           पण १९७६ मध्ये आणीबाणी लागू झाली आणि त्याच वेळी कठोर शासनकर्ते  अशी प्रसिद्धी असणारे हेडमास्तर म्हणजे श्री. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यावर्षी मात्र कोठल्याही विभागाची बदल्यांच्या बाबतीत गय करण्यात येणार नाही अशी हवा पसरली होती. मी त्यावेळी शासकीय तंत्रनिकेतनात प्राध्यापक होतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकदोन किरकोळ अपवाद वगळता जवळजवळ सर्व प्राध्यापकांच्या बदल्या झाल्या. म्हणजे भूकंपाने एकादे गाव हलून तेथे दुसरेच गाव यावे तसे एक महाविद्यालय हालून त्याची जागा दुसऱ्या महाविद्यालयाने घ्यावी असाच प्रकार जणू झाला. आता आपल्याही बदल्यांचा शासकीय फतवा लगेचच येणार याची कलपना असल्याने आपली कुठे कुठे बदली होऊ शकते याविषयी आम्हा दोघां नवराबायकोत चर्चा होऊ लागली. पुणे, कराड. अमरावती अशा सर्व ठिकाणांची यादी चाळून कुठे गेल्यास कोण माहितीचे आहे यावर चर्चासत्रे झडली. शेवटी आपण ज्यावर चर्चा केली नाही असे एकादे ठिकाणच आपल्या वाटणीस येईल असे मी तिला म्हणालो आणि दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश आला त्यात खरोखरच ज्या ठिकाणाचा आम्ही अजिबात विचार केला नव्हता ते म्हणजे सोलापूर आमच्या वाटणीस आले होते.
          यावेळी बदल्या झालेल्या प्राध्यापकांना वा इतरही कर्मचाऱ्यांना आठ ते दहा दिवसाच्या आत पदमुक्त करावे अशा प्राचार्यांना सूचनाच होत्या त्यामुळे नेहमी बदली झाली की ती रद्द करण्यासाठी अर्ज करणे आणि त्यावर पुढील आदेश येईपर्यंत आपल्याच जागेवर ठाण देऊन बसणे आणि मध्यंतरीच्या काळात कोणा मंत्र्याबिंत्र्याला गळ घालून ती रद्द करून घेणे असे प्रकार होण्याची मुळीच शक्यता नव्हती. त्यामुळे जे काही चारदोन प्राध्यापक नुकतेच रुजू झाल्यामुळे अथवा काही दुसऱ्या कारणामुळे या तडाक्यातून वाचले होते त्यांच्यावर एकदम मोठ्या प्राध्यापकवृंदास निरोप देण्याचा प्रसंग आला होता त्यामुळे अशावेळी करावयाची भाषणे आणि हारतुरे यां गोष्टी अगदी काटकसरीनेच प्रत्येक बदलून जाणाऱ्या प्राध्यापकाच्या वाट्यास आल्या.
       सुदैवाने माझ्याच बरोबर माझ्याच विभागाचे  एक आणखी प्राध्यापक मित्रही सोलापुरातच बदलून येणार होते.  बदलीचा आदेश आल्यावर आठच दिवसात मी माझ्या मित्रासह सोलापूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. त्यावेळी सोलापूरला जाण्यासाठी रात्री औरंगाबाद-विजापूर अशी म. रा. वि. प. आणि क. (कर्नाटक)रा. वि. प. ची आंतर्प्रांतीय बस असे. अजूनही त्या चालू आहेतच पण आता त्याला बरेच खाजगी बसचे पर्याय आहेत ते तेव्हा नव्हते. आम्ही दोघेही प्रथमच सोलापूरला जाणार होतो
त्यामुळे प्रथम दोघांनीच जाऊन रुजू होऊन जागा वगैरे पाहून मग कुटुंबियांना घेऊन जावे अशी आमची योजना होती.
    रात्री साडेनऊस निघणारी बस वेळेवर निघून आम्ही सोलापूर बसस्थानकावर पहाटे पाच वाजता पोचली. सोलापुरात आमच्या परिचयाचे कोणी असेल अशी शक्यता नव्हती आणि जे होते त्यांच्याही आमच्यासारख्याच बदल्या झाल्या होत्या शिवाय आम्ही तेथे कायम राहण्याच्याच उद्देशानेजात असल्यामुळे घर शोधण्याचाही आमचा विचार होता. त्यामुळे बसस्थानकाजवळ एकादे
चांगले हॉटेल असेल तर तेथे उतरावे असा आम्ही बेत केला आणि त्याप्रमाणे अजंटा लॉज अशी पाटी पाहिल्यावर आणि औरंगाबादमध्ये राहिल्यामुळे हे नाव तरी चांगल्याच परिचयाचे असल्याने तेथेच शिरून आम्ही एकादी खोली मिळेल का अशी चौकशी केली  तो जून महिना असा काही फार प्रवासानुकूल नसल्यामुळे आणि तसेही सोलापूरला पर्यटनाच्या
नकाशावर फारसे मानाचे स्थान नसल्यामुळे आम्हाला सहज एक डबल रूम मिळाली.
       लॉजची रचना मजेशीर होती, पण आम्हाला हॉटेलमध्ये राहण्याचा फारच कमी अनुभव असल्यामुळे आणि आम्ही फारफारतर दोनतीन दिवसच राहून नोकरीवर रुजू होऊन आणि जागा पाहून परत औरंगाबादला जाणार असल्याने शिवाय आमच्या खिशालाही परवडणे आवश्यक असल्याने फारशी चिकित्सा न करता तेथेच रहायचे ठरवून जी काय अनामत रक्कम भरायची होती ती भरून आमची खोली ताब्यात घेतली. आम्ही खोलीत सामान टाकून जरा ताजेतवाने होण्याचा प्रयत्न करून समोरच्याच जरा बऱ्याशा दिसणाऱ्या भारतभुवन नावाच्या उपहारगृहात शिरलो. तेथून परत येऊन अजंटामध्ये प्रवेश करताना समोरून येणाऱ्या व्यक्तीचा चेहरा परिचयाचा वाटला आणि तो नागपूरहून बदलून आलेला माझा मित्रच निघाला, आणि अजंटामध्ये आज प्रवेश करून वास्तव्य करणारे सगळे पाहुणे आमच्या तंत्रशिक्षणमंडळाच्या कृपेनेच आलेले होते असे त्याच्याकडून कळले.
      आमचे एक अमरावतीहून आलेले मित्र तर त्यांच्या सामानाचा ट्रक बरोबर घेऊनच आले होते असे कळले आणि त्यांचे कौतुक वाटले. नागपूर अमरावतीला त्यावेळी अशी परिस्थिती होती की तुम्ही सामनाच्या ट्रकसह आलात तर लगेच जागा मिळून सामनासह त्या जागेत प्रवेश करता येत असे त्याच अंदाजाने ते आले होते. सुदैवाने त्यांचे एक मित्र शहरात होते आणि त्यांची बदली झालेली नव्हती. त्यामुळे सामानाचा ट्रक त्यांच्या घरासमोर लावून बायकामुलांना त्यांच्या घरात राहणे शक्य झाले. पण पुढे जागा मिळायला त्याना बराच काळ लागला आणि त्यांचे सामान कोठे ठेवायचे या मोठ्या कठिण प्रश्नास त्यांना तोंड द्यावे लागले.  
       आम्ही दोघे सकाळचे कार्यक्रम आटोपून बसने पॉलिटेक्निकला जायला निघालो. त्यादृष्टीने हे लॉज सोयिस्कर होते म्हणजे बसथांबाही अगदी दारात होता. पॉलिटेक्निकमध्ये जाऊन आम्ही आल्याचा अहवाल कार्यालयास सादर केला. त्यावेळी
प्राचार्य काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.प्रभारी प्राचार्य आम्हा दोघांच्याही परिचयाचे होते कारण काही वर्षे ते
औरंगाबादच्या तंत्रनिकेतनात होते आणि त्याकाळात आम्हीही तेथे होतो. त्यामुळे जरा बरे वाटले.   बदली होऊन येणाऱ्या व्यक्तीस  जागा पाहणे वगैरे सव्यापसव्यास तोंड द्यावे लागत असल्याने सुरवातीस काही दिवस प्रत्यक्ष काम अगदी जरुरीपुरतेच केले तरी चालते त्यामुळे आम्ही आमच्या विभागात एक चक्कर मारली. त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन या दोन्ही शिक्षणसंस्थांमध्ये सहाय्यक अधिव्याखाता अशी एक श्रेणी होती आणि हे पद तृतीय श्रेणीतील असून राजपत्रित नव्हते त्यामुळे त्या पदाचा एक फायदा म्हणजे त्यांच्या बदल्या होत नसत. आमच्या विभागात असे थोडेथोडके नाही तर जवळजवळ
दहा बारा सह-अ. व्या. होते आणि ते मात्र आपापल्या जागीच होते, त्यामुळे सोलापूरवासियांचा मोठाच ताफा आम्हाला पहायला मिळाला आणि सर्वात ज्येष्ठ म्हणून मला विभागप्रमुखाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आमचे इतक्या मानाने स्वागत झाले की येथेही अगदी आणीबाणी लागू असून मी मुख्यमंत्री असल्यासारखे वाटले. आम्हाला जागा शोधणे, शिधापत्रिका मिळवणे याशिवाय इतरही दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी हरप्रकारचे सहाय्य देऊ करण्यात आले. तंत्रनिकेतनाजवळ असलेल्या जागा पण आम्हाला
दाखवण्यात आल्या. दुर्दैवाने त्या आम्हाला पसंत पडल्या नाहीत.
       औरंगाबादला शासकीय निवासस्थानात मी राहत होतो तर अरविंद म्हणजे माझ्याबरोबर बदली झालेला माझा सहकारी मित्र स्वत:च्या घरात त्यामुळे घराचा शोध घेण्याचा अनुभव आम्हाला फारच थोडा किंवा नव्हताच म्हटले तरी चालेल. औरंगाबादला त्यावेळी भाड्याने जागा चांगल्या नाही तरी बऱ्यापैकी उपलब्ध होत असत, पण सोलापूरमध्ये मात्र घरबांधणीचे नवे प्रकल्प फारसे नव्हतेच आणि होते ते शहरापासून बरेच दूर होते. शिवाय हे शहर एके काळी गिरण्यांचे शहर होते. जाम. नरसिंग गिरजी, लक्ष्मी विष्णू अशा बऱ्याच कापडगिरण्या तेथे पूर्वी जोरात चालू पण आता जरा त्यांना पडता काळ आल्यासारखा वाटत होता त्यामुळे गावात कामगार वस्ती बरीच! त्यामुळे जागांची भाडी कमी पण पागडी हा प्रकार मात्र बराच मोठ्या प्रमाणत होता. गावातील
जागा चाळवजा आणि कमी सोयी असलेल्या अशा होत्या.
     आमचे एक मित्र गावापासून जरा दूर असणाऱ्या पोस्टल कॉलनीत तर दुसरे त्याच जवळच्या लकी कॉलनीत राहत होते त्याच बाजूस विकास नगर या नावाची वसाहत होती. विकासनगरला लागून असलेल्या रस्त्यावर संचार या सोलापुरातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकाचे कार्यालय होते. त्या बाजूस आणखीएक वसाहत होती आणि त्याच रस्त्यावर काही छोटे उद्योग होते. त्याच रस्त्यावर भाउसाहेब वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाची एक बाजू होती.
      सात रस्ता या मोठ्या चौकापासून एक मोठा रस्ता विकास नगरकडे जाणारा असून मध्ये विकासनगरकडे जाण्यासाठी न वळता तेथून आणखी पुढे जाऊ लागल्यास प्रथम सिटी क्लब लागे नंतर गुरू नानकनगर ही सिंधी लोकांची वसाहत
होती. गावातील लोक त्याना निर्वासितांची कॉलनी म्हणत पण ती येथील मूळ भारतीय नागरिकांच्या घरांपेक्षा कितीतरी पटीने चांगली घरे असलेली वसाहत होती पण तेथे फक्त सिंधी किंवा सरदारजींनाच जागा मिळे. त्यालाच समांतर सीरत नगर ही वसाहत होती ती सर्व मुस्लिम नागरिकांची होती तेथे आम्हाला भाड्याने घर देण्याची तयारी काहीजणानी दाखवली पण आम्हाला मात्र ते धाडस करावे वाटले नाही. गुरू नानकनगरपासून पुढील रस्ता इतका कच्चा होता की पावसाळ्यात त्यावरून चालणे मुष्किलच होत असे, सुदैवाने सोलापुरात पाउस पडण्याचे प्रमाण बरेच कमी असल्याने ही अडचण आणखी बिकट होण्याची परिस्थिती फार काळ सोसावी लागली नसती. गुरू नानक नगर ओलांडून थोडे पुढे गेल्यावर मोकळा माळ आणि त्याच्यापुढे गेल्यावर लक्ष्मी विष्णू वसाहत होती ही बहुधा त्या गिरणीतील कर्मचाऱ्यांनी जागा घेऊन घरे बांधण्यासाठी केली असावी ती बरीच मोठी होती. आणि त्याच्याही पुढे गेल्यावर गुमास्ता वसाहत होती. ही गुमास्ता मंडळी सर्व लिंगायत होती आणि अगदी कमी भावात जमीन मिळाल्यावर त्यांनी तेथे एकमजली जोडघरे बांधली होती. या घरात दोन घरांना जिना
सामायिक आणि मागील भिंती पुढील व मागील दोन घरांना समाईक म्हणजे एकूण चार घरे एकमेकास जोडलेली अशी रचना होती. बऱ्याच घरांचे बांधकाम अंतीम टप्प्यात होते काही प्लॉटस अजूनही रिकामेच होते. आम्हाला पोस्टल कॉलनी, विकासनगर, लक्ष्मीविष्णू नगर असे काही पर्याय होते. त्यावेळच्या आमच्या आर्थिक स्थितीचा आणि आम्ही औरंगाबाद
मधून ज्या परिस्थितीशी परिचित होतो तिचा विचार करता जागेचे भाडे किंवा पागडी या गोष्टी चांगल्या जागेसाठी देणे ही गोष्ट आमच्या बरीच आवाक्याबाहेरची होती. शेवटी गुमास्ता वसाहतीत एक घर अगदी मोकळे दिसले आणि ते नुकतेच बांधून पुरे झालेले दिसत होते इतके की घराच्या खिडक्यांना काचा, आणि दरवाजे आतून बंद करण्यासाठी कड्या सुद्धा लावलेल्या
नव्हत्या इतकेच काय बाहेर जावयासाठी ठेवलेले दोन दरवाजे आणि संडास आणि बाथरूम चे असे एकूण चार दरवाजेच घराला होते. घरात प्रवेश करताच एक खोली ऊर्फ हॉल, तेथून आत गेल्यावर स्वयंपाकघर. तेथून उजवीकडील दरवाजातून गेल्यावर एक पॅसेज असून तेथे संडास आणि बाथरूम होते सुदैवाने त्यांना दारे होती. बाहेरील खोलीतून उजव्याबाजूस जाणारे
दार एका व्हरांड्यात उघडत होते, त्या व्हरांड्यातून बाहेर जाणारे दार जिन्यापाशी उघडत होते. व्हरांड्यातून आत जाणारे एक दार असून तेथे शयनगृह होते आणि त्याची मागील बाजू संडास बाथरूमकडे जाणाऱ्या पॅसेजमध्ये उघडत
होती. अर्थात तेथेही दार नव्हतेच.
        या वसाहतीतील प्लॉटस  वर्तुळाकार पद्धतीने पाडल्यामुळे  आतील बाजूच्या घरांच्या समोर बरीच मोठी वर्तुळाकार मोकळी जागा होती. त्यात मध्ये एक झोपडी होती त्याजवळ एक पाण्याचा नळ होता. त्या झोपडीजवळ   डोक्याला एक कळकट फडके बांधलेला काळा काटकोळा माणूस बसून बिडी ओढत होता बहुधा तो वसाहतीचा राखणदार असावा कारण  त्याच्याजवळच एक त्याच्याइतकेच हडकुळे कुत्रेही दिसत होते आणि चौकशी करण्यासाठी आम्ही त्याच्याकडे जाऊ लागताच उठून  ते आमच्या अंगावर धावून आले. "सुम माडरी "म्हणून अंदप्पा (हे त्या रखवालदाराचे नाव)ने कानडीत त्याला धमकावल्यावर ते गप्प बसले. आणि आमच्याकडे पाहून "येन री "म्हणून त्याने सुरवात केली. ही गुमास्ता मंडळी मूळ कानडी भाषिक जरी सोलापुरात राहून मराठी बोलत असली तरी त्यांचे हेल लगेच ओळखून येत. आम्हाला कानडी येत नाही म्हटल्यावर "काय पाहिजे? " असे त्याने विचारले. आम्ही त्या घराकडे बोट दाखवत मालक कोठे भेटतील ते विचारले. त्या घराचे मालक पाटील सिद्धेश्वर प्रशाळेत शिक्षक होते. त्यांच्या घराचा पत्ता अंदप्पाकडून आम्हाला मिळाला. पाटील शहरातील मध्यवस्तीत राहत होते. आणि आमच्या अजंठा लॉजपासून ते बरेच जवळ होते त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे जाणे सोयिस्कर होते. आणि आम्हाला गरज असल्यामुळे आम्ही लगेचच त्यांच्या घरी गेलो. नमस्कार चमत्कार झाल्यावर पाटलांनी घराचे नाव काढताच सौभाग्यवतीकडे बोट दाखवले. म्हणजे अगदी आम्हीच बायकोच्या आज्ञेत असणारे नवरे नव्हतो हे समजून  आम्हा दोघांनाही समाधान वाटले.
              सौ. पाटील अगदी वाटाघाटीला गेल्यावर काढतात तश्या सुरात म्हणाल्या, "भाडे दरमहा २५०/- रुपये आणि दहा महिन्यांचे भाडे ऍडव्हान्स बघा विचार करून"लगेचच होकार देण्याचे कारण नव्हते आणि शक्यही नव्हते कारण मी शासकीय
सदनिकेत दरमहा अडतीस रु. भाडे भरत होतो तर अरविंद स्वत:च्या घरातच भाडे न भरता राहत होता, त्यामुळे दोघापैकी कोणाही एकाला या अटी पेलण्यासारख्या नव्हत्या. बाहेर पडल्यावर मी आणि अरविंद विचार करतच बाहेर पडलो. पण इतक्यात त्याने मला विचारले, "श्यामराव असे केले तर ?" 
  "कसे? मला तर काही ही जागा परवडण्यासारखी वाटत नाही. अगोदरच इतक्या दूर म्हणजे आपल्या बायका नाराज होणार शिवाय भाड्याच्या या अटी छे जमणार नाही "
"अरे ऐक तरी, मी काय म्हणतो ते"आपले बोलणे पुढे चालू करत तो म्हणाला, "आपण दोघांनी मिळून ती जागा घेतली तर? म्हणजे बघ विचार कर जरा आग्रह केला तर पाटील भाडे थोडे कमी करतील आणि प्रत्येकी शंभर दीडशे रु. भाड्यासाठी दरमहा घालणे अशक्य नाही. हां आता ऍडव्हान्सचे कसे जमेल ते मात्र बघ कारण माझ्याकडे जी काही शिल्लक होती ती मी आमच्या घराच्या बांधकामात घातलीय. "
          मी त्याचे बोलणे ऐकून घेतले. सुदैवाने मी बदलीच्यावेळी पगाराची आगाऊ घेतलेली आणि फंडामधून उचललेली रक्कम
माझ्याकडे होती आणि त्यात दहा महिन्याचे भाडे आगाऊ भरणे अशक्य नव्हते. सोलापुरात घरे मिळणे इतके अवघड असेल असे वाटले नव्हते.त्यामुळे दोघांनी मिळून घर घेण्याची कल्पना फारशी पटत नसली तरी त्याचा विचार करणे मला भाग पडले.
     बऱ्याच विचारांती दुसऱ्या दिवशी पाटलांना भेटावयाचा आम्ही निर्णय घेतला आणि संध्याकाळी परत त्यांच्या घरात डोकावलो. पाटील शाळेतून आले नव्हते पण ज्यांच्याशी वाटाघाटी करायच्या त्या सौ. पाटील मात्र आलेल्या होत्या. त्याही शिक्षिकाच होत्या.
"दहा महिन्याचे भाडे ऍडव्हान्स म्हणून दिल्यावर भाडे जरा कमी नाही का होणार? "
असे मी सुतोवाच केले.
"भाडे महिन्याच्या महिन्याला द्यायचे असेल तर अडीचशे द्यायला हरकत नाही पण ऍडव्हान्स हवा असेल तर दोनशे रु. करा म्हणजे सरळ दोन हजार होतील आम्ही येत्या एक तारखेपासून जागा घ्यायला देऊ. "अरविंदरावानी तुकडा तोडावा
तसे म्हटले
"तुमचेही बरोबर आहे पण--"
 "काहीतरी कमी कराच"या आमच्या आग्रहावर सौ. पाटील यांनी तोड काढून २२५/- रु. भाडे आणि दहा महिन्याचा अडव्हान्स असा विचार पुढे करून त्या म्हणाल्या बघा तुम्हाला योग्य वाटत असेल तर पाटील तुम्हाला माझ्या वडिलांकडॅ घेऊन जातील त्यांनी हो म्हटले तर तुम्हाला जागा देऊ"
        हा पाटील यांच्या सासऱ्यांचा अडथळा आणखी उभा करून बाईंनी आम्हाला एक धक्का दिला, पण त्याच पुढे म्हणाल्या, "तुम्ही प्राध्यापक म्हटल्यावर तशी काही अडचण  नाही पण मी सगळे निर्णय त्यांच्या कानावर घालून घेते, म्हणूनच फक्त त्यांच्या कानावरच घालायचे. "
तेवढ्यात श्री.पाटीलही आले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या सासऱ्यांकडे नेले.           
  मजा म्हणजे पाटलांचे आम्ही घेणार असलेले घर सोडून बाकी सगळ्या गोष्टी आमच्या लॉजपासून हाकेच्या अंतरावर होत्या. पाटलांच्या सासऱ्यांचे कसले तरी किरकोळ सामानाचे दुकानही असेच पाच मिनिटांच्या अंतरावर होते. आम्ही तेथे गेलो तेव्हां एक म्हातारेसे गोरटेले गृहस्थ दुकान या नावाच्या लाकडी कप्प्यात उभे होते. आम्हाला आत कसाबसा प्रवेश करण्यापुरती जागा होती. नमस्कार चामत्कार झाल्यावर सहज त्यांचे नाव विचारल्यावर  जरा लाजत लाजत शेवटी आपले आडनाव अंडगे अस त्यानी सांगितल्यावर त्यांच्या लाजण्याचे कारण कळले पण ते आम्ही मनावर न घेता  मी सहज बोलताबोलता माझ्या सोलापूरमधील मित्राचा उल्लेख केला आणि तो माझ्याबरोबर पुण्यात शिकत होता असे म्हटल्यावर तो त्यांचाही जवळचा मित्र निघाल्यामुळे आमचे काम सोपे झाले आणि "बंडूचे (माझ्या मित्राचे घरगुती नाव) मित्र म्हटल्यावर काय विचार करायचाय? " असे म्हणून त्यानी आम्हाला घर द्यायला संमती दर्शवली आणि आम्ही बाहेर पडलो.
         घराच्या खिडक्यांना काचा नव्हत्या, आतील दरवाजे नव्हते या गोष्टी  अगाऊ मिळणाऱ्या रकमेत करून देऊ असा पाटलांनी शब्द दिला आणि त्यांच्या हातावर पैसे देऊन घराची किल्ली आम्ही ताब्यात घेतली. त्यानंतर औरंगाबादला परत जाऊन
सामान आणि कुटुंबियांना आणणे हे आमचे पुढचे काम होते
       आम्ही परत औरंगाबादला गेल्यावर आमच्या सोलापूरमधील हालचाली आमच्या कुटुंबियांच्या कानावर घातल्या.दोघांनी एकाच घरात रहायचे ठरवल्याचे ऐकून माझ्या बायकोने मान डोलावली. नाहीतरी तिला बऱ्याच मोठ्या कुटुंबात रहायची आत्तापर्यंत सवय होती. लग्न झाल्यापासून माझ्या भावंडांची तीच आई बनली होती. लग्नाच्यावेळी माझी आई, भाऊ बहिणी आणि आम्ही असे आठजण एकत्र राहत होतो आता केवळ आम्ही दोघे आणि आमची मुले असे चारजणच फारतर कधी कधी माझी आई असे पाचजणच राहणार होतो त्यामुळे तिला जरा एकटेच पडल्यासारखे वाटणार होते. आता अरविंद, त्याची बायको आणि दोन मुली यांसह माणसांची संख्या अगदी जशीच्यातशी राहणार होती. अरविंदच्या घरचीही परिस्थिती तशीच होती.मात्र अजून त्या दोघींनी एकमेकींना पाहिलेही नव्हते. त्याच वेळी अरविंदकडे सत्यनारायणाची पूजा होती त्यासाठी मी त्यांच्याकडे तिला घेऊन गेलो आणि त्यावेळी त्यांनी प्रथम एकमेकींना पाहिले. पण त्यानी घराविषयी जी चौकशी केली त्याला मात्र आमच्याकडे कमीच उत्तरे होती. अगदी शेवटी घरात पाणी तरी येते की नाही हा प्रश्न त्यांनी विचारल्यावर उत्तरादाखल आम्ही एकमेकाकडे पाहतच
राहिलो इतके आम्ही घराविषयी माहितगार होतो.  दोन तीन दिवसातच सामानाचा ट्रक घेऊन ट्रकबरोबर आम्ही जायचे आणि सामान सोलापुरात सोडून परत येऊन कुटुंबकबिला घेऊन जायचे असे ठरले.