कुमठा नाका २

         औरंगाबादला परत आल्यावर दोनतीन दिवसांनी ट्रकमध्ये सामान भरून निघायचे असे आम्ही ठरवले. बदलीप्रमाणेच सामान हलवण्याचाही आमचा हा पहिलाच अनुभव होता.अरविंद तर औरंगाबादचा म्हणजे मराठवाड्यातीलच होता त्यामुळे अजूनही त्याच्या गावी त्याचे घर होते शेतीवाडी होती.याउलट आमचे म्हणजे आता माझे अगदी विंचवाचे बिऱ्हाडच होते. मी औरंगाबादला प्रथम एकटाच आलो होतो माझ्यापाठोपाठ माझा भाऊ आणि त्यामागोमाग इतर भावंडे आणि आईवडील यांना मी औरंगाबादला घेऊन आलो तेव्हा वडिलांच्या खेड्यातील संसारात अवजड वस्तूचाच भरणा होता.उदाहरणार्थ लाकडी पाट प्रत्येकी अर्धा किलो वजनाचे अर्धाएक डझन,पाटावरवंटा सहज दहाबारा किलोचा, जुना शिसवी देव्हारा असाच पाच सहा किलो वजनाचा.असे सगळे सामान एक ट्रकभर निश्चित झाले असते पण त्या सामानाची त्या काळातली किंमत ट्रकभाड्यापेक्षा थोडी कमीच झाली असती म्हणून ते सगळे सामान येईल त्या दराने विकून जाणेच योग्य ठरल्याने आमचे औरंगाबादला नेण्याजोगे सामान आम्ही बसनेच आमच्याबरोबर घेऊन आलो होतो.थोडक्यात आजची अमेरिकेतील गाव किंवा घर सोडताना सामनासकट सगळे सोडून जायची प्रथाच आम्ही त्याकाळात पाळली  त्यामुळे ट्रकने सामान हलवण्यासाठी आम्ही त्या क्षेत्रातील माहितगार मित्राला ट्रकची तरतूद करण्यास सांगितली आणि त्याने अचानक "ट्रक सांगितलाय दुपारी घरी येईल" असा निरोप दिल्यावर आमची सामान गोळा करण्याची घाई सुरू झाली.
        अरविंदचे दुसरे भाऊ आईवडील औरंगाबादलाच रहाणार असल्याने त्याला त्याच्या संसारापुरतेच सामान सोलापूरला न्यावयाचे होते. मला मात्र शासकीय निवासस्थान सोडायचे होते त्यामुळे सर्वच सामान ट्रकमधे भरणे भाग होते आम्ही सामान सोलापूरला नेताना घरातील माझ्याशिवाय बाकी मंडळी औरंगाबादलाच काही दिवस रहाणार असल्यामुळे त्यांच्यासाठी काही सामान तेवढे सोडून जी वस्तू दिसेल ती ट्रकमध्ये भरण्यास आमचे महाविद्यालयातील काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी  घेऊन येऊन त्यांच्या सहाय्याने मी सुरवात केली. आजच्यासारख्या त्या वेळी पॅकिंग ऍंड फॉरवर्डिंग एजन्सीज नव्हत्या आणि असल्याच तर आम्हाला परडणाऱ्या नव्हत्या त्यामुळे आमच्या घरातील सामान भरून ट्रक अरविंदच्या घरी गेला.तेथे त्याचे सामान भरून आम्ही दोघानी ट्रकबरोबर त्यादिवशी रात्री प्रयाण केले.
        तो जुलैचा पहिला आठवडा असावा. जून महिन्यात तसा बऱ्यापैकी पाऊस पडून गेला होता,त्यामुळे रस्त्यावर चिखल होताच पण त्यादिवशी पाऊस आलेला नव्हता आणि येईल असेही लक्षण नव्हते,अर्थात सगळेच घरगुती सामान बरोबर असल्याने छत्र्याही आमच्याबरोबर होत्याच. आमचा ड्रायव्हर अगदी तरुण उत्साही गडी होता.त्याच्याबरोबर पुढच्या केबिनमध्ये आम्ही बसल्यामुळे आमच्याबरोबर त्याने गप्पा मारण्यास सुरवात केली आणि आपल्या ट्रकचालनातील पराक्रमाचे अनेक किस्से सांगून आमची करमणूक केली त्याचबरोबर एकदा ट्रक चालवताना समोरच्या दोन ट्रकांच्या मधून आपण ट्रक कशी शिताफीन बाहेर काढली हे सांगून आमची मनातल्या मनात भीतीने गाळणही उडवली,तसा पराक्रम आमच्यासोबत गाजवण्याची संधी त्याला मिळाली नाही हे आमचे भाग्य ! पण बीड सोडून जरा पुढे गेल्यावर एकदम जोराचा पाऊस सुरू झाला.आमचे सामान ताडपत्रीने झाकलेले असल्यामुळे त्याची काळजी नव्हती पण केबीनची काचच फुटकी असल्याने सामानाऐवजी आम्हीच भिजू लागलो आणि मग सामानातील छत्र्या बाहेर काढून केबीनमध्ये त्या उघडून आमचा बचाव आम्हाला करावा लागला. 
      आम्ही सामानाचा ट्रक घेऊन कुमठा नाक्यावरील पाटलांच्या घरात पाऊल ठेवले तेव्हांच घरात किंवा बाहेर पाण्याचा नळ नाही हे कळले.व्हरांड्याच्या व बाहेरील दारासही आतून बंद करण्यासाठी कड्या नाहीत ही गोष्टही तेव्हांच आमच्या ध्यानात आली.व्हरांड्याचे दार सहज फोडता येण्यासारखे तकलादू होते त्यामुळे त्या दाराला आतून सामानातील अवजड गोष्टी रचून बाहेरून दोन्ही दारे बंद केली व पाटलांकडे जाऊन अडचणींचा पाढा वाचला.त्यांनी पाण्याची काळजी करू नका असे सांगितले त्यांनी नळाच्या जोडणीसाठी अर्ज केला होता आणि घरात ती जोडणी मिळण्यापूर्वी आमच्या मागील क्षीरसागरांच्या घरातून प्लास्टिक पाइप लावून पाणी घरापर्यंत दिले जाईल असे सांगितले.बाकीच्या गोष्टींची पूर्तता आम्ही औरंगाबादहून परत सहकुटुंब आल्यावर करू असे त्यानी सांगितल्यावर औरंगाबादला परत जाऊन बायकामुलाना घेऊन येण्याचा आम्ही विचार केला पण ऐन वेळी अरविंदच्या घरी काही कामे चालू असल्यामुळे त्याच्या सौभाग्यवती व त्यामुळे मुलीही आल्या नाहीत याउलट आमच्या कुटुंबात माझी आई व धाकटी बहीण या आम्हाला सोबत आल्यामुळे तशी माणसांची बेरीज जवळजवळ तेवढीच झाली.
     आम्ही सामान ट्रकने पाठवले असले तरी घरात काही माणसे आमच्या पाठीमागे राहिल्यामुळे काही अत्यावश्यक सामान शासकीय निवासस्थानात ठेवावे लागले होते ते आता आमच्याबरोबर बसमधून आणावे लागले होते त्यामुळे आम्हाला सामानासाठी रिक्षापेक्षा टांगाच करणे सोयिस्कर वाटले शिवाय गुरु नानक नगरपुढील कच्च्या रस्त्यावरून रिक्षावाले यायला तयारही नसत.त्यानंतर एकदा माझा भाऊ मुंबईहून माझ्याकडे आला तो रात्री एक दीडच्या सुमारास सोलापूरला पोचला तेव्हां रिक्षा त्याला मिळालाच नाही आणि रिक्षावाल्यांच्याच सल्ल्यानुसार ती रात्र स्टेशनवरच काढून सकाळी सहा वाजता कुमठा नाक्याकडे येणाऱ्या बसमधूनच त्याला घरी येणे भाग पडले होते.
      आमचा टांगा घरापर्यंत येईपर्यंत "अजून आले की नाही घर ?"हा प्रश्न आई आणि पत्नीने कमीतकमी तीन चार वेळा तरी विचारला असेल आणि " राहिले दूर घर माझे "या गाण्याचे पालुपद मला बऱ्याच वेळा आळवावे लागले.इतके बसस्टॅंड ते घर हे अंतर जास्त आहे हे आता माझ्या ध्यानात आले.औरंगाबादला राहून आम्हाला इतक्या वर्षात सर्व गोष्टी पायी चालत जाण्याच्या अंतरावरच असल्याने हे अंतर अपेक्षित नव्हते.सुदैवाने तासाभरात आम्ही घरी पोचलो. त्या काळात शेजारच्याच लक्ष्मी विष्णु नगरात दर दोन दिवसाआड चोऱ्या होत होत्या हे वृत्त ऐकले असल्याने आमचे घर व सामान सुरक्षित होते हे पाहून हायसे झाले नाहीतर पाटलांच्या घराच्या सुरक्षिततेचा विचार करता चोरांना आयते एकत्र बांधलेले सामान पळवण्याची चांगली संधी होती आमचे नशीब त्यावेळपुरते तरी इतके चांगले की आम्ही दार उघडताच एक रॉकेलची गाडी दारासमोरून जात असल्यामुळे आमची इंधनाची गरज लगेच भागली कारण गॅसच्या शेगड्या असल्या तरी सिलिंडर मिळणे ही काही लगेच होणारी गोष्ट नव्हती.त्याचपाठोपाठ आजूबाजूच्या घरात दूध घालणारा एक दूधवालाही बरोबर समोरून जात असल्याचे सौ.च्या तीक्ष्ण नजरेने पाहिले आणि तिने लगेच त्याच्याकडून दूधही घेतले.सुदैवाने अंदप्पाच्या नळाला अजून पाण्याची बारीक का होईना धार चालू होती त्यामुळे तेथून पाण्याचीही अडचण भागली.थोडक्यात गृहप्रवेश तरी फारशी विघ्ने न येता पार पडला.
          तंत्रनिकेतनात आम्हाला दररोजच्या नोकरीसाठी जायचे होते आणि त्यासाठीचा रस्ता फारच किचकट होता.म्हणजे बसने जायचे असेल तर बस सरळ तंत्रनिकेतनाला जात नव्हती.एका ठिकाणी बस बदलून जायचे म्हटले तर कमीतकमी एक तास निश्चितच लागणार होता.माझ्याजवळ एक   लुना मोपेड होती पण अरविंदकडे वाहन नव्हते आणि लुनावरून आम्ही दोघे जाणे अशक्य नसले तरी अवघड होते. त्यावेळी आमच्या घरापासून एक शॉर्ट कट अशोक चौकात म्हणजे तंत्रनिकेतनाच्या रस्त्याला मिळणाऱ्या चौकास मिळत होता.हा रस्ता काही फार खास नव्हता.त्या रस्त्यावरून जाताना एक कुष्ठरोग्यांची वसाहत आणि एक डुक्करखाना (पिगरी) लागत होता आणि त्या रस्त्यावरून एक प्रकारचा असह्य दुर्गंधही यायचा तरीही आम्ही दोघांनी त्या रस्त्यावरून दररोज चालत जाण्याचा निर्णय केला.घरातून निघून तंत्रनिकेतनास पोचायला मोजून ४५ मिनिटे लागत होती.त्यामुळे आम्ही घरातून सकाळी पावणे दहाला निघून बरोबर १०-३० वा. तंत्रनिकेतनास पोचायचो.
        पाटलांनी दुसऱ्याच दिवशी आमचा आणि आमचे मागील शेजारी क्षीरसागर यांचा परिचय करून दिला आणि आमच्या घरात महापालिकेकडून नळाची जोडणी होईपर्यंत त्यांच्याकडून पाणी आम्हाला मिळावे अशी व्यवस्था केली,अर्थात ही व्यवस्था कशा प्रकारची होती हे त्या दिवशी रात्री कळले.पाणी त्या भागात रात्री आठ वाजता येत असे त्यानंतर क्षीरसागरांचे जलभरण सुरू व्हायचे ते पूर्ण होऊन त्यांच्या झाडाना पाणी रबरी पाइपने घातल्यावर मग तोच पाइप आमच्या ताब्यात यायचा त्यातून आमच्या दोन कुटुंबांना पुरेसा पाणी साठा करायला रात्रीचे बारा वा कधी कधी एकही वाजायचा.त्यामुळे आम्ही दोघे रात्रीचे जेवण करून फिरायला बाहेर पडत असू ते पाणी भरून होण्याच्या सुमारास घरी परतत असू.तोपर्यंत आणि त्यानंतरही आमच्या बायकांचे जलभरण चालायचे.मुले बहुधा झोपून जात.
       आमच्याच शेजारच्या तमगोंडा नामक कुटुंबाच्या घरातील दोन खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या होत्या आणि ते भाडेकरूही आमच्यासारखेच कुलकर्णीच होते.त्यांनाही दोन मुलगे होते अशा प्रकारे त्या दोन घरात मिळून सहा मुले जवळ जवळ समवयस्क होती. आम्ही सोलापुरास गेलो तेव्हां त्या मुलांपैकी तीन मोठी बालवर्ग पार करून आली होती तर धाकटी तिघे अजून बालवर्गाच्या पायरीवरच होती.सोलापुरात गेल्यावर बरोबर बहीण आली असल्याने तिने माझ्या मोठ्या मुलास शाळेत घालण्याचा मनोदय प्रकट केला आणि मला त्याला विरोध करण्याचे काही कारण नव्हते.तीच त्याला शाळेत घेऊन गेली आणि तो जुलै महिना असल्यामुळे माझ्या मुलाचा जन्म सेप्टेंबरचा असूनही "काही हरकत नाही आपण जुलैमधलाच दाखवू म्हणजे पाच वर्षे  पुरी होतील" असे म्हणून विकासनगरमधीलच चतुरबाई श्राविका विद्यालयात त्याला त्यानी प्रवेश दिला.देणगी वा पालकांची अथवा मुलाची मुलाखत वगैरे काही नाही. .आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांचाही मोठा मुलगा त्याच्याच बरोबर होता आणि नंतर अरविंदचे कुटुंब आल्यावर त्याच्याही मोठ्या मुलीने त्याच शाळेत प्रवेश घेतला अशा प्रकारे कुमठा नाक्यापासून तीन बालके त्या शाळेत जाऊ लागली.
       शेजारच्या मुलाला त्याचे वडील गाडीवरून सोडत असत. आमच्या घरातील दोघांना बसने पाठवणे भाग होते त्यामुळे बहुधा आमच्या दोघांपैकी एकाची बायको त्यांना सोडायला आणि आणायला जात असे कारण इतक्या लहान मुलांना सुरवातीला बसमध्ये योग्य ठिकाणी चढणे उतरणे जमेल की नाही शंका वाटत होती.पण त्या गाडीच्या चालक वाहकांनी काही दिवस या भगिनीवर्गाचे हाल पाहिले आणि त्यानीच त्यांना सांगितले,"बाई तुम्ही कशाला उगीच यातायात करताय,तुमची मुले आम्ही बरोबर शाळेसमोर सोडू आणि ती शाळेत शिरल्यावरच बस हलवू."असा प्रेमळ आधार मिळाल्यावर आमच्या बायकांचे शाळेचे फेरे वाचले.एकूण सोलापुरातील जनता फारच अगत्यशील.जर आपण एकाद्याला पत्ता विचारला तर तो अगदी घरापर्यंत सोडायला येणार असा अनुभव बऱ्याचदा आला.