स्वगत

- एक. दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार. चार पावलेसुद्धा जेमतेमच पडतात. पाच हात लांब-रुंद-उंच कोठडी. जणू कुणी पोकळ वीटच पाडली आहे.

- छे! वीट आयताकृती असते, घनाकृती नव्हे.

- पण असेल समजा कुणी घनाकृती पाडलेली तर?

- नाही, माझे काही म्हणणे नाही. वाटेल तशा विटा पाडा. अगदी वीट येईपर्यंत.

- फालतू विनोद नकोत.

==========

- पुन्हा यात्रा सुरू. एक, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार. जरा हळूहळू चालावे. नाडीचे ठोके किती पडताहेत?

- कुणास ठाऊक? मोजणार कसे?

- कसे? सरळ मोजत सुटायचे. जो आकडा बरा वाटेल तिथे एक मिनिट झाले असे समजू.

- मग मिनीट तरी कशाला हवे? त्यापेक्षा नाडीच्या ठोक्यांवर पावले टाकू.

- पण वळताना एका ठोक्यात गर्रकन वळायचे की अर्ध्या वळणाला एक ठोका आणि उरलेल्या अर्ध्याला एक?

- जाऊ दे. नाडीचा ठोका सोडून द्या.

- सोडून कसा द्या? आता तो बसला.

- मग असे करू. पावले किती?

- चार.

- मग एखादा झपतालातला कायदा चतस्त्र जातीत बसवू. हं धर ठेका. धिं ना धिं धिं ना तिं ना धिं धिं ना. स्वर घे काळी दोन. 'पार करो अरज सुनिये'.

- पूरिया धनाश्री आहे बेटा, झेपत नसेल तर विटंबना करू नकोस.

==========

- अरेच्या! या चार पावलांच्या भानगडीत ही चीज त्रितालात उमटत चालली. आता काय?

- सोड. त्रितालातलीच चीज घे एक. 'घडी ये गिनत जात'.

- कोंबडीच्या, 'न'वर सम आहे ना? मग 'गि'वर खटका कशाला मारतोस? चल, शंभर वेळा घे ते तोंड. शंकरबुवा, तुम्ही घ्या एखादा कायदा. आरामात. शंभर आवर्तनांचा वेळ आहे. शेवटी समेवर येताना जर हा चुकला तर पाहू. दादऱ्याचाच ठेका देईन मग. गाणे शिकताहेत!

==========

- आपण इथून सुटणार कधी?

- तुला असल्या उचापती कशाला हव्यात? वेळ मोजायला आहे काय तुझ्याकडे?

- वा! असे कसे? दुपार-रात्र जेवण सरकते ना आत दाराखालून?

- अरे, पण ते दुपार-रात्रच सरकते हे तुला काय माहीत? या तळघरात प्रकाश काही कुठून येत नाही. मग जेवण देण्याची वेळ त्यांनी रोज दहा दहा मिनिटे पुढे सरकवली तर? महिन्याभरात तुझी दुपार-रात्र भुर्रर्र उडून जाईल. दुपार आणि रात्र नावाचे दोन सांगाडे उरतील. त्यांचे काय करायचे?

- कशाला काय करायचे? राहू देत कोपऱ्यात. कधीकाळी बाहेर पडलोच तर लोकांना आपल्या सांगाड्यांचे संग्रहालय दाखवू. फी म्हणून दोन दोन शब्द घेऊ प्रत्येकाकडून. पोरांकडून एक शब्द. मग आपण जगभर फिरू आणि जगातले सगळे शब्द आपल्या ताब्यात घेऊ. सगळे जग मुके होऊन बसेल.

- फार छान. मग सगळे पुन्हा शब्दखरेदीला येतील. त्यांच्याकडून आपण त्यांच्या आयुष्यातला अत्युच्च सुखाचा क्षण घेऊ आणि एक शब्द देऊ.

==========

- क्षण एक पुरे प्रेमाचा, मग वर्षाव पडो मरणाचा.

- आपण किती क्षण प्रेम अनुभवले? मग मरणाचे किती वर्षाव व्हायला हवेत?

- पण सुचित्रा अशी मध्येच का मरून गेली? सावळ्या रंगाच्या, सतार वाजवणाऱ्या मुलीला मरणाचा हक्क कुणी दिला? भांडायला पाहिजे.

- भांडून काय होणार?

- सूड घ्यायला पाहिजे.

- सूड घेऊन काय होणार?

- अहो विद्वान, सूड न घेऊन तरी काय होणार? काहीतरी करायलाच हवे.

- कशाला?

- मग तू जिवंत कशावरून?

- मी काही करत नाही म्हणूनच मी जिवंत. काय म्हणणे आहे यावर?

- मग तू मेलेला कशावरून नाहीस?

- च! बिनडोक बालका, मरणे ही एक क्रिया आहे. ज्याअर्थी मी ती करतो आहे त्याअर्थी मी जिवंत नाही. समजले?

- नाही. तू फार शब्द पांघरतोस.

- काय करणार? माझा नाईलाज आहे. ऐकू आले नाही तर मी आंधळा होतो.

- अरेरे. मग तुला शब्दांचे सांगाडे कसे दिसणार?

- अरे खरंच, हा मुद्दा लक्षातच नव्हता आला. शब्दसांगाड्यांच्या संग्रहालयाची कल्पना रद्द. उगाच आपण आंधळे झाल्यावर लोक चोऱ्या करतील.

- नाही रे. त्यांचे शब्द आधीच पळवून ठेवले म्हणजे तेच आंधळे होतील ना?

- मग काय झाले? आंधळ्याला चोरी करता येत नाही की काय?

- असो. गुंता वाढला.

==========

- गुंतता हृदय हे, कमलदला...

- अरे, पण हृदय म्हणजे काय?

- ए, तू गप्प हो पाहू. नसत्या शंका काढू नकोस. मला हृदयाचा अर्थ माहीत नाही. आणि तरीही मी सुचित्राची आठवण काढून बसणार आहे. कोण मला अडवतो पाहू.

- तुला कोण अडवणार? तुझ्याखेरीज?

- आचार्यजी, कोड्यात बोलू नका.

- अरे बाबा, कोड्यात कोण बोलतंय? तुला कोणीतरी अडवू शकेल ही कल्पना तुझ्या डोक्यात आली तशी त्या अडवणाऱ्या व्यक्तीला तुझ्या मनाच्या पडद्यावर सावली मिळाली. मग त्या व्यक्तीने अडवले नाही तरी. समजले?

- तूपण अर्कटच आहेस. एक नाट्यगीत म्हणायला गेलो, तर चिखलात पाय अडकवलास.

- शब्दांच्या सांगाड्यांचा चिखल होऊ शकतो हे तरी कळले.

- तू गप्प बस पाहू. मला काय कळते आणि काय नाही हे मलाच कळेल.

==========

- 'गूढ गूढ तव, कळुनी ना कळिले'. कळणे हे एक गूढ. न कळणे हे दुसरे. मग गूढ ते कळेल कसे? आणि हे दोन्ही एकत्र आले तर?

- मला काय माहीत काय होईल ते? प्रकाश आणि अंधार म्हणे एकत्र आले तर काय होईल.

- बोललासच मध्ये पुन्हा. आणि का म्हणून प्रकाश-अंधार एकत्र येऊ शकणार नाहीत? मी आणतो त्यांना एकत्र.

- कसे?

- ते तू माझ्या डोळ्यांनी बघ. आणि बघता येत नसेल तर गप्प बस. टिवटिवत राहू नकोस.

==========

- दोन्ही हात तिच्या उघड्या पाठीवरून लपेटून घेतले की सुचिता डोळे मिटून हनुवटी वर का करायची?

- तिलाच ठाऊक. आणि देवाला.

- छे! हे ठाऊक असते तर ते विचारायला देवाने तिला वर कशाला बोलावून घेतले असते?

- वर म्हणजे कुठे?

- वर म्हणजे खाली. समजले?

- तुला काय माहीत?

- कारण मीच देव आहे. आणि मीच तिला माझ्यापासून दूर बोलावून घेतले आहे. देवा, तू याला एकडाव माफ कर. का की मी देव आहे हे याला समजलेले नाही. तो बोकडदाढी वाढवून पाऊणपानी कविता करणार नाही याची मी हमी देतो.

==========

- पावले का थांबली? नाडीचे ठोके थांबले नाहीत ना? मग ठीक आहे. नाडीचे ठोके थांबले म्हणजे मरण. मेल्यानंतर आफतच आहे. काय करायचे ते कोण सांगणार?

- तूच सांगणार.

- मी तेव्हा मेलेला असेन ना?

- मग मी सांगेन.

- पण मेलेल्या माणसाला जिवंत माणसाचे बोलणे ऐकू येते?

- मग मीपण मरेन आणि सांगेन काय करायचे ते.

- हं. हे ठीक आहे. असे जरा समजेलसे गूढ बोलत जा.

==========

- बाहेर दिवस की रात्र? आपण तळघराच्या पायऱ्या उतरून आलो तेव्हा दिवस होता, पण मावळायला निघाला होता.

- तळघराला पायऱ्या किती होत्या?

- मि. शरलॉक होम्स, असल्या बिया रुजायला तुझ्या डोक्यातलीच भुसभुशीत माती हवी.

- डॉ. वॉटसन, तू डॉ. वॉटसनसारखा बोलत नाहीस.

- कारण मी डॉ. वॉटसन नाही. मी आहे आर्थर कॉनन डॉईल.

==========

बाहेर आत्ता प्रकाशही नाही आणि अंधारही. कारण प्रकाश-अंधार दोघेही माझ्या कोठडीच्या भिंतीत चिणले गेले आहेत. सर्वत्र भिंतीच्या दगडांचे किरण पसरले आहेत. आता मी प्रकाश-अंधाराला आत खेचतो आणि कोठडीची भिंत होऊन बसतो. प्रकाश-अंधाराची उंची किती? जशी असेल त्याप्रमाणे तो फेऱ्या घालील, आड्याचौतालातल्या चिजा म्हणेल आणि त्याच्या नाडीचे ठोके पडतील.

मी बाहेरच्या दगडांपासून त्याचे संरक्षण करीन.