चराचरावर हळूहळू अंधाराचे झाकण बसू लागले. सभागृहाच्या आसपास हळूहळू हालचाल होऊ लागली. एका कोपऱ्यात ढीग करून उभ्या असलेल्या सतरंज्या आणि गाद्या आतमध्ये पसरल्या जाऊ लागल्या. व्यासपीठाच्या मागे फुलांच्या माळांची नक्षी उमटू लागली.
बाहेर तिकीटविक्रीवाल्याने आपली घडीची टेबलखुर्ची मांडली. हातांची कोपरे टेबलावर रोवून त्याने आपला हाडका चेहरा पंजात गोळा केला आणि भावनाशून्य नजरेने तो समोर पाहू लागला.
मामाबरोबर धंद्यावर प्रथमच आलेल्या भाच्याने बोटांनी गल्ल्याची पेटी चाचपली आणि तो नवलाई ओसंडत इकडेतिकडे बघू लागला. त्याच्या मामाने तंबाखूची चिमूट दाढेखाली धरली आणि भिंतीला पाठ लावून तो कॉफी, साखर, दूध यांचा हिशेब करू लागला.
सुंदर तरुणी मैफलीच्या बऱ्याच आधी येऊन जागा पकडतात असे आग्रही मत असलेले काही उपाशी नजरेचे तरुण टेहळणी करत उभे होते.
डबक्याला निवांत बसलेल्या म्हशीने हळूहळू बूड हलवीत उठावे तसा तिकीटविक्रीला वेग आला.
किणकिणाट करीत कॉफीवाल्याने कप टेबलावर रांगेने लावले.
एका सुंदर (म्हणता येऊ शकेल अशा) तरुणीस पाच तरुण या प्रमाणात बाहेरचे तरुण आत शिरले.
त्या जागी करवादल्या नजरेने कुटुंबाची वाट पाहणारे संसारी गृहस्थ उभे राहिले. घड्याळाबरोबर स्वतःलाही किल्ली दिल्यासारखे त्यांनी वरचेवर घड्याळ बघितले आणि इच्छित व्यक्ती येताच ते स्वतःवरच वैतागत आत गेले.
लांब केस राखलेला एक सुरवार-झब्ब्यातला तरुण नाक वर करून आला. त्यामागोमाग दोघे-तिघे भाट आदरपूर्वक आले. त्या टोळक्याला कुणी तिकीट विचारले नाही. त्याबद्दल त्यांना खात्री असूनही समाधान वाटले.
उंदीर मुतल्यासारख्या धारेच्या नळाखाली बादली भरावी तसे सभागृह भरत गेले. संमिश्र बडबडीने आणि अत्तरांच्या, फुलांच्या वासाने आतली हवा कुंद होऊ लागली.
आजूबाजूच्या वातावरणावर आपली कसलीही नाममुद्रा न उमटवता तो अलगद आत येऊन एका खांबाला टेकून बसला.
सुंदर तरुणी उशीर करून येतात या मताच्या तरुणांनी बाहेर मोर्चे बांधायला सुरुवात केली.
व्यासपीठावर तंबोरा, तबला अवतीर्ण झाले. लोकांची उत्कंठा वाढू लागली. मृदू चेहरा असलेल्या त्या देखण्या वादकाने व्यासपीठावर प्रवेश केला. टाळ्या कडाडल्या.
बाहेर ऐसपैस गप्पा छाटणाऱ्या लोकांनी घाईघाईने सिगरेटी विझवल्या आणि गप्पा आवरल्या.
वाद्ये सुरात जुळवून झाली. त्या दरम्यान हारतुरे देण्याची आन्हिके आटोपली गेली.
मारव्याचा पहिला स्वर उमटला तेव्हा नीरव शांतता होती.
त्याची नजर वादकाच्या भुवयांच्या मधील सूक्ष्म अर्धचंद्राकृती आठीवर खिळली होती.
चहूकडे पसरलेल्या चंदेरी समुद्रातून मखमली हिरवे बेट उभवून यावे तसे स्वरचित्र आकारले. त्याच्या मिटल्या पापण्यांसमोर त्यावरील नाजुक नक्षी स्पष्ट होऊ लागली.
त्या बेटाच्या मधोमध एक प्रचंड काळा पाषाण होता. नजर पोचणार नाही एवढ्या अवाढव्य त्या पाषाणावर शुभ्रवस्त्रांकित एक आकृती होती. त्या आकृतीच्या निकट जाण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली.
आजूबाजूच्या सामूहिक कंठांतून मधूनमधून दाद दिली जात होती. त्याला त्याचे सोयरसुतक नव्हते.
नजर रोवावी तिथे काळा पाषाण दिसू लागला. आपण पुढे जात आहोत की जागीच आहोत की मागे जात आहोत हे त्याला समजेना. आधारासाठी त्याने वरच्या आकृतीकडे पाहिले. आकृती अजून तेवढीच दूर होती पण तिचा चेहरा स्पष्ट झाला होता.
हवे-नको वाटणारे सर्व प्रसंग आपल्या पंखांखाली सामावून घेतलेले ते डोळे त्याच्याकडे बघत होते. त्या डोळ्यांवर निरनिराळ्या भावनांचे ढग गजगतीने सरकून जात होते.
त्याच्या धडपडीबद्दल दिलासा देणारी भावना त्या नजरेत उतरली. त्याच्या थकलेल्या मनाला हुशारी आली. तो पुन्हा हालचाल करू लागला.
बघता बघता त्या नजरेत कारुण्य सामावले. क्षितिजापलिकडे पहायची देणगी मिळालेल्या डोळ्यांचे ते कारुण्य होते. आतापर्यंत काबूत ठेवलेल्या त्याच्या मनात संताप उतरला. ताकद एकवटून त्याने स्वतःला रेटायला सुरुवात केली.
ती नजर पाण्यासारखी निर्मळ झाली.
तो त्या आकृतीच्या अगदी जवळ पोचला.
आता मध्ये फक्त एक खडक होता.
तो ओलांडण्यासाठी त्याने पाऊल उचलले तेव्हा खडकानेही मान उंच केली. त्याने पाऊल वर वर उचलले तशी खडकाचीही उंची वाढत गेली. त्या आकृतीभोवती आता खडकाचा तटच उभा राहिला.
त्याला वेढून बसलेल्या स्वरांच्या तंतूंना गच्च आवळीत त्याने खडकावर धडका मारायला सुरुवात केली.
भर दुपारी गर्द अंधाऱ्या डोहात पिकले उंबर टपकावे तसा धीरगंभीर आवाज उमटला.
"तुझ्या सगळ्या जाणीवांचा त्याग केलास, तुझे स्वत्व विरवून टाकलेस, तुझा चेहरा पुसून टाकलास, तरच तुला हा तट ओलांडता येईल".
तापल्या वाळूत पडलेल्या माशासारखी त्याची तगमग झाली.
"पण हे असेच का? मला, माझ्या जाणीवांना, स्वत्वाला, चेहऱ्याला त्या आकृतीचा सहवास भोगायचा आहे. 'माझ्या' नजरेने मला सर्व न्याहाळायचे आहे, 'माझ्या' कानांनी ऐकायचे आहे, 'माझ्या' ओठांनी अनुभवायचे आहे".
सर्वत्र शांतता पसरली होती.
पल्लेदार तिहाई घेऊन वादकाने राग मालवला.
त्याला आधार देणारे स्वरतंतू विदीर्ण झाले. पिकल्या पानासारखा भिरभिरत तो खाली आदळला.
किरवाणीचे अवखळ हळवे सूर त्याला वेढू लागले तेव्हा तो संभ्रमात पडला. काही हालचाल करायची ताकद आपल्यात उरली आहे याची त्याला खात्री पटेना. पण द्वाड वासराने आईला ढुशा देत राहावे तसे सूर त्याला ढुशा देत राहिले.
एक नजर त्याच्यावर रोखली गेली आहे याची त्याला जाणीव झाली. त्याने डोळे उघडले.
निळ्या-पिवळ्या फुलांच्या पसरलेल्या गालिच्यामध्ये ती नजर फुलपाखरासारखी भिरभिरत होती. त्या विरही नजरेत 'तू येणार आहेसच' असा अवखळपणा होता.
त्या गालिच्यात मध्येच तट उभा राहण्याचा धोका त्याला वाटला नाही. ती अवखळ नजर त्याच्यावरून मोरपीस फिरवत होती. दोन्ही हातांनी स्वरांच्या वेली गच्च पकडून त्याने वाटचालीला सुरुवात केली.
नदीतून वाहत जाणाऱ्या लाकडाच्या ढलपीप्रमाणे निष्कष्ट सरकत तो त्या नजरेपाशी पोचला. तो जवळ जवळ गेला तशी ती भिरभिरती नजर जास्त जास्त स्थिरावत गेली. त्या नजरेपासून पावलाच्या अंतरावर तो पोचला तेव्हा ती नजर गोठल्यासारखी स्तब्ध झाली.
त्याच्या डोळ्यांसमोर शुभ्रवस्त्रांकित आकृती क्षणभर तरळून गेली.
शेवटचे पाऊल उचलून त्याने ती नजर कवेत घेतली तेव्हा त्या नजरेचे प्रेत हळूहळू विरून गेले आणि त्याच्या मागेपुढे सर्वत्र पोकळी भरून राहिली.
मगाचाच धीरगंभीर आवाज पुन्हा उमटला. पण आता त्यात थोडा खेद आणि थोडा संताप होता.
"ही नजर तुला उपभोगण्यासाठी नव्हती, तर त्या नजरेला तुझा उपभोग पाहिजे होता. निरर्थक धडपड करीत पुढे सरपटताना तू जसजसा जवळ येत होतास तसतशी ही नजर विझत चालली होती हे तुझ्या ध्यानात आले नाही वा तू आणले नाहीस. बसल्याजागीच तू जर या नजरेला थोडे अभिलाषेचे, थोडे निरिच्छतेचे इशारे दिले असतेस तर ही नजर कायमची तुझी झाली असती, तुझ्यात विलीन झाली असती.
"तू खुनी आहेस.
"तुला दिलेला स्वरमंत्र मी निष्फळ करीत आहे".
विरत चाललेल्या स्वरासक्तीच्या धाग्यांकडे हताशपणे पाहत तो विलाप करू लागला.