शाश्वत - ३

काही क्षण तसाच गुडघ्यांवर बसून राहिल्यानंतर तो हळूहळू खाली बसला आणि मागे सरकून खिडकीशेजारी भिंतीला टेकला. आजवर त्याने अनेक प्रयत्न केले, अनेक मार्ग धुंडाळले, कित्येक धोके पत्करले आणि प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला होता. मोठमोठ्या संत महात्म्यांची नावं ऐकून त्यांना भेटायला तो जीव धोक्यात टाकून गेला होता. त्यातले कित्येक लोक भोंदू निघाले, काहीनी पढतपंडितासारखं त्याला तेच तेच आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष वगैरेचं पुराण ऐकवलं, काही तर त्याने आधीच संपादन केलेलं ज्ञान पाहून आणि त्याचे प्रश्न ऐकून उलट त्याचेच शिष्य झाले. पण तो निराश झाला नव्हता. दरवेळी नव्या उत्साहाने तो नवीन पर्याय शोधायला निघायचा. या वेळी मात्र गडद निराशेने त्याचं मन झाकोळून गेलं. या मंदिराचा पत्ता त्याला दुसऱ्या कोणी सांगितला नव्हता तर ध्यान करताना त्याच्या अंतर्मनाला त्या मंदिराचा पत्ता कळाला होता. तो एक दैवी संकेत मानून तिथे आपल्याला यश मिळणारच असा ठाम विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला होता. पण आज त्या विश्वासाच्या ठिकऱ्या उडाल्यासारख्या झाल्या होत्या. कोणीतरी आपल्या आयुष्याबद्दलचं सत्य आपल्यापासून प्राणपणाने लपवून ठेवतं आहे असं वाटून त्याच्या मनात त्या अज्ञात शक्तीबद्दल थोडीशी चीड निर्माण झाली. तो सर्वस्व पणाला लावून जी गोष्ट शोधत आहे ती गोष्ट त्याला मिळू न देण्याचा कोणीतरी कट रचून ठेवला आहे या भावनेने त्याचा जबडा ताठरला आणि त्याने ओठ घट्ट मिटून घेतले. या रागाच्या भावनेने त्याच्या मनातली निराशा मात्र थोडी कमी झाली आणि त्याच्यातल्या दुर्दम्य ज्ञानपिपासेने पुन्हा डोके वर काढून शीणलेल्या त्याच्या शरीरात पुन्हा प्राण फुंकले.
डोकं हलवून त्याने स्वत:ला वर्तमानात आणलं आणि त्याने विष्णुदासाकडे पाहिले. विष्णुदासाला फारसं दु:ख झालेलं दिसत नव्हतं.
"त्या गोसावड्याने चंदन लावलं म्हणायचं. जीवनाचा अर्थ समजलेला माणूस भौतिक लाभासाठी असं ज्ञान दुसऱ्याला कसा देईल हे मला कळायला हवं होतं. " असं आणि अशा अर्थाचं आणखी काही तरी बडबडत विष्णुदासाने भोयांना कामाला लावलं. घटकाभरात सूर्यास्त झाला असता. त्याआधी थोडी साफसफाई करून झोपायची सोय करणे आवश्यक होते. भोई लोक कामाला लागले. जमीन थोडी स्वच्छ करून त्यांनी पथाऱ्या पसरल्या. जास्त वजन होउ नये म्हणून आणलेली थोडीच लाकडे मधल्या धुनीत टाकली. अंधार पडला की थंडी वाढणार होती तेव्हा ती लाकडे कामाला येणार होती.
एवढं सगळं होईपर्यंत सूर्य पश्चिमेला टेकलाच होता. मग त्यांनी बरोबर आणलेली शिदोरी उघडली आणि थोडं थोडं खाउन घेतलं. जेवण झाल्यावर तर तो बराच ताजातवाना झाला आणि मघाशी आलेली निराशा बाहेरच्या संधीप्रकाशासारखीच त्याच्या मनात धूसर झाली. सर्व जण भिंतीला टेकून पाय पसरून बसले आणि मग त्याची आणि विष्णुदासाची पुन्हा चर्चा सुरू झाली.
"मला वाटतं असं दुसऱ्याकडून मला ज्ञानप्राप्ती होणार नाही. त्यासाठी मला स्वत:ला प्रयत्न करावे लागतील. पण काय करावे ते कळत नाही. ", विष्णुदास म्हणाला आणि त्याच्याकडे प्रश्नांकित नजरेने पाहू लागला.
"हम्म, आपण तर पाहतच आहात की मी स्वत: अनेक ग्रंथ अभ्यासले, गुरू केले. सर्व धर्मांचं, तत्वज्ञानाचं अध्ययन केलं पण मला अजून खरं ज्ञान मिळालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला काही सल्ला देण्याचं मी धारिष्ट्य करू शकत नाही. ".
विष्णुदासाने मान डोलावली आणि म्हणाला, " कधी कधी असं वाटतं की आपण उगाचच प्रयत्न करतोय. कित्येक लोक म्हणतात तसं देव खरोखरच असेल आणि त्यानेच आपल्या सर्वाना निर्माण केलं असेल. त्यानेच ही जगण्याशी रीत माणसाना सांगितली, चार वर्ण निर्माण केले, प्रत्येकाला त्याचं काम नेमून दिलं आणि लोकांनी त्या मार्गावरून ढळू नये म्हणून हे सगळं ज्ञान त्यांच्यापासून दूर ठेवलं. "
अगदीच प्राथमिक पायरीवर असलेले विष्णुदासाचे विचार ऐकून तो चिडल्यासारखा झाला. तरीही संयम राखत तो म्हणाला, "असं आहे तर तो देव तरी कुठेतरी असेलच ना. आणि तपश्चर्येने तो प्रसन्न होत असेल तर या ज्ञानासाठी आपण तप केले तर ते ज्ञान नक्कीच आपल्याला मिळेल".  
"बरोबर आहे. आता परत गेलो की मी माझी सर्व संपत्ती या कार्यासाठी खर्च करणार. जगातल्या मोठमोठ्या ज्ञानी लोकांना आणि स्वत:लाही या कार्यात समर्पित करणार. ".
"ह्म्म", तो म्हणाला आणि आता अंधारून गेलेल्या अंतर्भागापासून केवळ राखाडी रंगाच्या एका छटेने आपलं अस्तित्व दाखवणाऱ्या दाराबाहेर पाहत राहिला.
हळू हळू वाऱ्याचा वेग वाढत होता आणि तापमान घटत होतं. आतला आणि बाहेरचा अंधाराचा काळा रंग समान होण्यापुर्वीच एका भोयाने दार आणि खिडकी बंद केली आणि धुनीमध्ये टाकलेली लाकडे चकमकीने पेटवली. धुनीच्या एका बाजूला तो आणि विष्णुदास आणि दुसऱ्या बाजूला भोई असे सगळे त्या ज्वाळांकडे पाहत आपापल्या विचारांत गुंगून गेले. अधूनमधून भोई एकमेकांमध्ये कुजबूजत होते पण तो आणि विष्णुदास मात्र पूर्ण शांत होते. थोड्याच वेळात सगळेच बसल्या जागी लवंडले आणि एक एक करीत हळूहळू निद्रेच्या आहारी गेले. त्याचेही डोळे आता जड झाले. त्याने विष्णुदासाकडे पाहिले तर तो मंद आवाजात घोरू लागला होता आणि त्याचं ते भव्य पोट श्वासाच्या तालावर वरखाली होत होतं. त्यानेही मग स्वत:ला निद्रेच्या अधीन केलं.
       घोंघावणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाने त्याला एकदम जाग आली. वाऱ्याच्या शक्तीने खिडकी सताड उघडली होती आणि त्यातून मोठा आवाज करीत वाऱ्याचे झोत गरागरा फिरत मंदिरात प्रवेश करत होते. दार विरूद्ध बाजूस असल्याने आणि आत उघडत असल्याने बंदच होते आणि आलेले वाऱ्याचे झोत दारावर आपटून गुरगुरल्यासारखा आवाज करत मंदिरात फिरत होते. तापमान इतकं उतरलं होतं की मंदिराचं शीतगृहात रुपांतर झालं होतं. त्याने डोळे उघडले खरे पण त्याला काहीच दिसलं नाही. खिडकी उघडी असूनही बाहेरून प्रकाशाचा एकही कण आत येत नव्हता आणि पिसाळलेल्या वाऱ्याने धुनीत पेटलेल्या आगीच्या लहानात लहान ठिणगीचाही निर्ममपणे जीव घेतला होता. त्याने अंदाजानेच विष्णुदासाच्या दिशेने हात लांबवला. विष्णुदासाला हलवावं म्हणून त्याने त्याच्या पोटावर हात ठेवला आणि तो चरकला. पांघरूण आणि अंगरख्यावरूनही विष्णुदासाचे पोट थंडगार मांसाच्या निर्जीव गोळ्यासारखे वाटत होते. तो चटकन उठून बसला आणि त्याने विष्णुदासाला गदागदा हलवले पण विष्णुदासाने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्याने विष्णुदासाच्या चरबीने झाकलेल्या गळ्यात बोटे रुतवली आणि तो जिवंतपणाची एकतरी खूण मिळतेय का ते पाहू लागला. काही क्षण शोधत राहिल्यावर तो एकदम स्थिर झाला आणि विष्णुदास मेला आहे हे सत्य शरीरात जळजळीत मद्य उतरावे तसे त्याच्या मनात उतरत गेले. दोन क्षण स्तंभित झाल्यासारखा तो बसून राहिला आणि मग एकदम काहीतरी सुचल्यासारखे रांगत रांगत धुनीवरून पलीकडे झोपलेल्या भोयांच्या दिशेने तो गेला. हलवून उठवण्यासाठी पहिल्या भोयाला हात लावला आणि एकदम डंख झाल्यासारखा मागे घेतला. भोयाचं शरीरही विष्णुदासासारखंच थंडगार पडलं होतं, विष्णुदास एक थंडगार मांसाचा गोळा होता आणि हा भोई थंड झालेलं लाकूड एवढाच काय तो फरक. इतर भोयांची परिस्थिती पाहण्याच्या फंदात न पडता तो ताडकन उभा राहिला. त्या थंडगार हवेतही त्याचे तळवे घामेजल्यासारखे झाले आणि काय करावे ते न सुचून तो तसाच उभा राहिला. आयुष्यात त्याने अनेक अनुभव घेतले होते पण अशा दबकत दबकत येउन गुपचूप झडप घालणाऱ्या मृत्युचे रूप त्याने पहिल्यांदाच एवढ्या जवळून पाहिले. क्षणभरच असा उभा राहिल्यावर प्रत्येकात असते त्या त्याच्यातल्या  जगण्याच्या अंत:प्रेरणेने त्याचा ताबा घेतला. काहीही दिसत नसताना तो वळला आणि खिडकी बंद करण्यासाठी वाऱ्याच्या येण्याच्या दिशेविरूद्ध अंदाजाने चालू लागला.
अंदाजानेच खिडकीपाशी जाउन त्याने दोन हातात दोन कवाडे धरली आणि बंद करण्यापुर्वी त्याने बाहेर पाहिले. आश्चर्याने तो तसाच उभा राहिला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे बाहेर काहीच दिसत नव्हतं. त्याला वाटलं तसं समोरचा पर्वत अंधुकही दिसत नव्हता. ना आकाश दिसत होतं ना दरी. बाहेर आणि आतमध्ये इतका सारखाच अंधार होता की केवळ खिडकीची कवाडे हातात आहेत म्हणून तो खिडकीत उभा आहे हे त्याला कळत होतं. त्या दोन पर्वतांनी मिळून त्या मंदिरापुरतं आकाश झाकल्यासारखं झालं होतं आणि काहीच दिसू नये अशा अंधाराचं थारोळं तिथे जमा झालं होतं.
त्या दृष्याने(?! ) तो संमोहित झाल्या सारखा तिथेच खिळून उभा राहिला. हळू हळू त्याचं देहभान हरपलं आणि अंधारात न दिसणाऱ्या एका बिंदूवर त्याची नजर एकाग्र झाली. आजूबाजूच्या जगाचं भान सुटल्यासारखं होउन आपण अधांतरी अंतराळात आहोत की काय असं त्याला वाटू लागलं.
डोळे मिटून ध्यान करतानाही होणार नाही असं त्याचं मन आज डोळे उघडे ठेउन एकाग्र झालं. इतरवेळीसारखं विचारांपासून अलिप्त होण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नव्हते. आता वाऱ्याचा आणि थंडीचा त्रास त्याला होत नव्हता आणि निवळशंख पाण्याचा स्थिर डोह असावा त्या प्रमाणे त्याचं मन निर्लेप झालेलं त्याच्या अंत:चक्षूना दिसत होतं.

क्रमश: