(रेडा...)

आमची प्रेरणा भूषण कटककरांची सुंदर रचना रेडा...

कशाला ही अदाकारी? कशाला ही कलाकारी?
कुणाच्या रंजनासाठी कवन हा फाडतो सारी?

तुम्ही जे काय समजावे, कसे हा बोलतो आहे!
"कुराणे, बायबल, गीता, विनोदी पुस्तके सारी"

"जराशी घे, जगाला हलव,  अथवा हाल तू देवा"
"नशा मद्यातली तुजला , कशी कळणार देव्हारी"

यमाच्या सारखा, ज्ञानेश्वरांचा ही असे रेडा
तसा गातोस तू मित्रा हुबेहुब राग दरबारी

घरी मी टाकुनी जावे,  कडी हलकेच  काढावी
जराशा  खुट्ट आवाजे उठावी आणि म्हातारी

बरे झाले कधीही तू न माझी पाहिली खोली
तुला येईल बघ घेरी,  तुला येईल ओकारी

इथे आलोच आहे तर जिवाची मुंबई व्हावी
कशाला आठवावे मी कधी होतो सदाचारी!

सकाळी जाग आल्यावर नको मज फारसे काही 
मिळावा गरम थोडासा चहा अन बुडवण्या खारी

दुटप्पी धोरणांची इंद्रिये मजला मिळाली ही
जिमेला रोज मी जातो तरी माझे वजन भारी

तुला का वाटते कविता चुक्याची सांग रे भाजी
कशाला कापतो "केश्या" अरे ही काव्य तरकारी