प्यार किये जा

प्रेमाच्या व्याख्या आतापर्यंत खूप खूप केल्या गेल्या असतील. जर एखाद्या शीघ्र कवीला विचारलं तर तो तितक्याच शीघ्रपणे उत्तर देईल, ' प्रेमभंग म्हणजेच प्रेम'. जर कोणा विज्ञान शिक्षकाला विचारलं तर तो प्रेमाचे गुणधर्म, रचना, उपयुक्तता यावर तासाची बेल वाजेपर्यंत व्याख्यान देईल. जर कोणा मध्यमवर्गीय (अर्थातच व्ही आर एस वाल्या) मराठी माणसाला विचारलं तर तो म्हणेल दर साल दर शेकडा ८ टक्के दराने वाढते तेच खरे प्रेम. जर कोणा चित्रपट कलाकाराला विचारलं तर तो म्हणेल ' दर वर्षी जे बदलते (म्हणजे प्रेम, प्रेयसी नव्हे) तेच प्रेम होय'. जर कोणा डॉक्टर किंवा वैद्याला विचारलं तर तो तपासण्या केल्याचा आव आणून म्हणेल, ' हृदयाचे अनियमित आकुंचन आणि प्रसरण आणि नाडीची अनियमितता म्हणजेच प्रेम. (एखादा कुशल गोल्ड मेडलीष्ट, व्यवहारी डॉक्टर ह्यालाच बॉडीली रेस्पीरेटरी डिसॉर्डर असे म्हणून भले मोठे सुबक प्रिस्क्रीपशन लिहून देईल. )

तर थोडक्यात काय तर प्रेमाची वैश्विक मान्यताप्राप्त व्याख्या अजून बनलेली नाहीये. प्रेमा तुझा रंग कसा तर तो ज्याला जसा जाणवेल तसा. त्याच प्रमाणे आपलं ते प्रेम आणि दुसऱ्याचं ते लफडं असही आपल्या तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं या न्यायाने म्हणता येईल. असाच कोणी एक महाभाग (जरी महाभाग असलो तरी तो मी नव्हेच) आपल्या चौकस नयनांनी रस्त्यावरच्या सुबक ठेंगण्या, नव यौवना, रूप गर्विता वगैरे वगैरे न्याहाळत बसी. आणि जर त्यातली एखादी आवडलीच तर तडक जाऊन तिला गाठे आणि विचारे, " माझं आय लव यू आहे, तुझं काय? ". आणि बरेचदा उत्तर ऐकण्यासाठीही थांबत नसे. उगाचच नकार, प्रेमभंग अशी झंजट नको. त्या न्यायाने त्याचा सक्सेस रेट १०० टक्के होता. यथावकाश सालाबाद प्रमाणे त्याचंही (अरेरे त्याचंही ) लग्न झालं. त्याचा लग्नसोहळा (अगदी रजीस्टर्ड मेरेज असलं तरी सोहळाच तो) पार पाडला आणि तोही सुखाने नांदू लागला.

तसे म्हटले तर प्रेमाची लक्षणे अनेक आहेत. झोप उडणे, भूक न लागणे, शेरो-शायरी सुचणे (आणि इतरांची झोप शेरोशायरीने उडवणे) अशी. अगदीच प्रेमभंग झाला तर दुसरं प्रेम शोधता येत की (मार्च परीक्षा जमली नाही तर ऑक्टोबर परीक्षा असतेच की) आणि तेही नाहीच जमलं तर कवितांचं उत्पादन सुरू करता येत.

प्रेमवीर प्रेयसीला, तुझ्यासाठी चांदण्याचा हार करेन येथपासून ते तुझ्यासाठी चंद्रावर दोन बेडरूमचं घर बांधेन अस काहीस सांगत असतो (माझी मध्यम वर्गीय मराठी मानसिकता मला २ बेडरूमच्या पुढे जाऊच देत नाही). किंवा तुझ्यासाठी इंद्रधनुष्याचे रंग आणेन अशी राजकीय आश्वासन देत असतो. कारण चंद्रावर जरी घर बांधलं तरी अजून तरी पृथ्वी ते चंद्र अशी शटल सेवा सुरू झाली नाहीये, त्यामुळे ते बांधलेलं घर बघायला जाणार कोण? त्यापेक्षा, खार घरला २ बेडरूमच (पुन्हा २ बेडरूमच) घर बांधेन तेथे २४ तास नळ असेल (अगदी पाणी नसलं तरी) अशी विधायक आश्वासन तो का बरं देत नाही? किंवा तुझ्यासाठी अमेरिकन डायमंड चा सेट आणेन अस का बरं सांगत नाही. म्हणजेच अव्यवहारी प्रेमात व्यवहार्य असतच की.

त्यातही प्रेम 'सामनेवाले खिडकी' वाल असेल तर अतिउत्तम. प्रेयसीला पाहताच, प्रियकराला अंगावर कोणीतरी चांदण्या शिंपडल्याचा भास होतो (खरं तर छत गळत असत). प्रेयसीच्या कटाक्षाने हृदयी कळा उठत असतात (प्रत्यक्षात दुपारी बेसुमार हादडल्याचा तो परिणाम असतो). प्रेयसी वारंवार खिडकीत येऊन आपल्याला दर्शन देतेय आस त्याला वाटत असत ( खरं तर प्रेयसी धुतलेले कपडे वाळत घालायला किंवा खिडकीत बसलेल्या कावलेल्या कावळ्याला उडवायला आलेली असते). आणि अचानकच एक दिवस प्रेयसीच्या घरी कसली तरी गडबड जाणवते. 'सबसे आगे सबसे तेज' मोलकरणी कडून कळत की, त्या मुलीचं लग्न ठरलंय आणि आज त्यांच्याकडे देवकार्य आहे. मग काय विचारता? आकाशातला तारका उल्का बनून आपल्या मस्तकावर कोसळल्याचा भास प्रियकराला होतो. दुःखी मनाला बरं वाटावं म्हणून उदरात जास्तीच अन्न सामावलं जात. आणि प्रेमाचा एकमेव साक्षीदार तो प्रेयसीच्या खिडकीवरचा तो कावणारा कावळा, प्रियकराच्या खिडकीवर स्थानापन्न झालेला असतो.

खचलेल्या प्रियकराला अचानक जाणवत की पुढच्या महिन्यात आपली परीक्षा का काय ते आहे. पुस्तकं शोधायला हवीयेत. कॉलेज नावाच्या वास्तूत आपल्याला प्रवेश करायला हवाय. आपला अटेंडन्स पूर्ण झालेला नाहीये. आणि जड अंत:करणाने एक दिवस तो कॉलेजमध्ये प्रवेश करतो. कँटीन मध्ये चहा तयार नाही म्हणून नाईलाजाने लेक्चरलाही बसतो. आणि अचानकच त्याच लक्ष समोरच्या वर्गाकडे जात. तेथे तिसऱ्या बाकावर एक सुकुमार, सुकोमल नवयौवना स्थानापन्न झालेली असते. प्रियकराला अंगावर चांदण्या शिंपडल्याचा भास होतो. छातीत कसली तरी कल उठते. इतकंच काय तो कावलेला कावळाही वर्गासमोरच्या झाडाच्या फांदीवर विराजमान झालेला असतो. आणि प्रियकराच वेड मन गुणगुणू लागत 'प्यार किये जा. प्यार किये जा. '