कुठलेही व्यंजन - यमक वगैरे न घेता अनुष्टुप ( की 'भ'? ) छंदाप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. 'मन वढाय वढाय' प्रमाणे वाचता यावे असा अंदाज आहे. या छंदाबाबत ( ३-१ ३-१ या व्यतिरिक्त ) मला काहीही माहीत नाही. रामरक्षेत हाच छंद आहे असे ऐकले आहे. मात्र, अर्थातच, हा मुक्तछंद नाही. हा एक प्रयत्न आहे, कृपया असेल तसा गोड मानून घ्यावात. आभारी आहे. ( बाकी दिर्घ लिखाणाचा सर्व दोष घ्यायला मी तयार आहेच. )
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एक शरीर घेत हे, इथे येणे जाणे तुझे
शरीरच समजणे, एकसारखे स्वतःला
तुझा जन्म झाला आणि कुणी साखर वाटली
तुझा जन्म झाला आणि कुणी रस्त्यात सोडले
तुझा जन्म झाला आणि आठी कपाळावरती
तुझा जन्म झाला आणि साऱ्या सुखांना भरती
नैतिकाने जन्म होणे, अनैतिक जन्म होणे
नको तेव्हा जन्म होणे, याच्यावर ठरते ते
तुझा जन्म नैसर्गीक, शरीरातुनी शरीर
इतिहास प्रत्येकास, सारा निसर्ग निसर्ग
हवा होतास तू ज्याला, त्याने घातले जन्माला
नको होतास तू ज्याला, त्याने रस्त्यात सोडले
तुला कुठे हवा होता जन्म भूतलावरी या?
आला आहेसच आता, तर पुढचेही ऐक
एक गोळा शरीराचा, लाल रक्तानि
आणि चरबीचा साठा हाडांवरी पेललेला
सारी इंद्रिये मिळाली, इथे सुरुवात झाली
आणि वासना जन्मली, सारे शरीर शरीर
तुला आई नाही कळे, तुला बापही न कळे
तुझी भूक जिथे भागे, तेथलाच शोध घेशी
एक शरीर शरीर, तुला सारे शिकवील
आणि पुढे घालवेल, निरागसता आताची
आई जवळ घेउनी, भागवते भुक तुझी
तिला पाझर फुटती, तिच्या शरीराचा भाग
सारा निसर्ग निसर्ग, आई माध्यम माध्यम
आई शरीर शरीर, तू ही शरीर शरीर
ज्याला जन्म देता देता, आई सोडते जीवाला
कोणी जगवते त्याला, नाही मरत तो कधी
कोणी खोटी आई होते, त्याला गाय दूध देते
सारे जग जगवते, एक शरीर शरीर
माकडाची कथा आहे, जसे पाणी वर आले
पिल्लू आईने मारले, आई शरीर शरीर
तुला विचारले कोणी, जीव सोड आईसाठी
तुही नकारच देशी, तूही शरीर शरीर
प्रेम आईचे असते, प्रेम तुझेही असते
पण शरीराहुनी ते, कधी मोठे होत नाही
दवाखान्यातली आया, करे तुझ्यावरी माया
तिला मिळतो रुपाया, तिला प्रेम नसते रे
तुझे बारसे सोहळा, सारे सारे लोक गोळा
तुझा पाळणा हालला, एक नावही मिळते
आजवरती जे होते, एक शरीर ते होते
नाव त्यास कुठे होते, आता नावही लाभले
कोणी जोजवते तुला, कोणी थोपटते तुला
कोणी कडे घेई तुला, कोणी तुझी पापी घेई
किती गोंडस आकार, किती गोरे गोरे बाळ
लाल चुटुकसे गाल, डोळे लुकलुकणारे
ज्याचे रडणे आवए, ज्याचे पाहणे आवडे,
ज्याचे हासणे आवडे, त्याला काही भान नाही
ज्याला भूक फक्त कळे आणि वेदना जाणवे
त्याला एक क्रिया येते, फक्त रडणे रडणे
हासण्याची वेळ येते आणि झटक्यात जाते
एक रडणेच खरे, साथ देते जन्मभर
बाळ सराव करते रडण्याचाच त्यामुळे
इथे शरीर लाभणे हेच रडण्याचे मूळ
किती झबली टोपडी, आत सारीच नागडी
सजवायला बागडी एक शरीर शरीर
कुणी चिमणाळे आणे, कुणी पाळणा हालवे
काय उत्सव, सोहळे, "आले शरीर शरीर"
तुला दात नाही एक, तुझ्या येण्याचा आनंद
गोडधोड खात खात, सारे साजरा करती
तुझे डोळे जरी बंद, तुझ्या येण्याचा आनंद
तुझे छायाचित्र घेत, सारे साजरा करती
पुरुषाचे हे शरीर, किंवा बाईचे शरीर
याच्यावरती ठरील किती आनंदा मानावा
तुला कुणी विचारले, मग कसे हे ठरले?
इथे जगात ठरले, की तू पुरुष की बाई
बाप देहधर्म पाळे, आई कालचक्र पाळे
तरी दैवाचेच चाळे, कुणी काय व्ह्यायचे ते
तुझे हागणे, मुतणे, दुपट्यांना बदलणे
तुझे नखरे सोसणे तुला भानसुद्धा नाही
जन्म जाहल्यापासुनी, मुठी वळवून घेशी
जुनी इच्छा माणसाची, ताबा पाहिजे सुखाचा
तुझ्या अंगठ्याच्या चवी, तुला स्वतःला माहिती
तू जे हात पाय झाडी, सारे बिनकारणाचे
तुझे नखरे हजार सोसतात आईबाप
त्यांना पाहिजे आधार, म्हातारपणीच्यासाठी
त्यांचा वंश वाढण्याला तुझा उपयोग झाला
पुढे सारा त्रास झाला, तुला दुज्याच्या इच्छेने
एक गोळा घे आकार, ताकदीची होता वाढ
अब्बा अब्बा हे उच्चार, किंवा आई आई बोले
आईबापाला वाटते, हाक आपल्याला मारे
दोघे भरून पावले, सारा निसर्ग निसर्ग
चारजणांना बोलले, बाळ थोडेसे बोलले
चारजण आनंदले, सारी नाटके नाटके
जिथे मुळात जन्म, एक निसर्गाचे नाट्य
तिथे सारी नाटकेच जन्मभर चालणार
तुझा जन्म तुझ्यासाठी, असे सारे सारे काही
तुझ्यासारखेच कोटी इथे आले आणि गेले
तुझा आकार केवढा आणि विश्वाचा केवढा
काही कळेना कळेना, काय नाटक म्हणावे
तुझे कुशीस वळणे, आहे निष्ठा बदलणे
तुझे उठून बसणे, एक दुराभिमान तो
तुझे आई ओळखणे, किंवा बाप ओळखणे
सहवासाचे दिवाणे, रक्तबिक्त काही नाही
आज आहे सहवास, उद्या ठाउक कोणास?
जसा आजचा दिवस, तसा उद्या होत नाही
पालकांचा प्राण जाता कुठे पोरगा संपला?
कुणी नाहीच संपला, कुणी नाहीच थांबला
तुझे रांगणे पाहून, सारे जाती सुखावून
पुढे जगात जाऊन, वाकावेच लागते रे
गुडघ्यांना टेकुनीच मिळे जगाचा आश्रय
मान वर करण्यात इथे मानहानी आहे
तुझे रांगता पडणे आणि साऱ्यांनी हासणे
सध्या प्रेमात हासणे, पुढे खरेच हासती
तुझे उभे राहणे हे टाळ्या घेणारे ठरते
उभे जगात राहणे तुला सोसायचे नाही
तुझ्या उभे राहण्याची बघ झालीच बातमी
सारे कौतुके करती, सारी नाटके नाटके
चालताना पडणे तू, पडताना चालणे तू
सवयीस बाणणे तू, पुढे उपयोग होतो
तुझा भाऊ मोठा मोठी बहीणही मित्रा
आज कौतुके करता पुढे खूप बदलती
तुला दात थोडे येणे, काऊचिऊच्या साक्षीने
तुला घास भरवणे, मागे मागे धावाधाव
सध्या मागे धावतात, ठेव बघून तू त्यांस
पुढे त्याच माणसांस, साधे चालणे न जमे
तुला गोड आवडणे, आंबटाचा राग येणे
तिखटाने रडू येणे, सारे शरीर शरीर
कडू काय, गोड काय, खारे, जहालही काय
मान स्वतःला तू भिन्न, सारे शरीर शरीर
तुला बुवाची धमकी, सारे देतात खमकी
त्यांच्यावेळी त्यांना भीती, बुवाचीच वाटायची
कोणी बुवा बिवा नाही, त्यात काही खरे नाही
धावतात इथे सारी , ताबा घ्यायला दुज्याचा
भीती आपली वाटता, लांब जाईल पोरगा
म्हणुनीच बुवा बिवा, खोटे सांगतात सारे
आता चालणे आवडे, कडेवरी न बसणे
तुला जमावे चालणे, याच्यासाठी जन्म दिला
तुला चालणे जमावे, जुने सारे आठवावे
पालकांना सांभाळावे याच्यासाठी जन्म दिला
आता परीघ रुंदावे, घराबाहेर धावावे
कुणी पकडून द्यावे, घरातले संतोषती
आता बागेमध्ये जावे, भेळ, पाणीपुरी खावे
जीभ, मेंदू तोषवावे, सारे शरीर शरीर
वाघ, हरीण, माकड, हत्ती, मगर, तरस
सारे वेगळे भासत, सारा निसर्ग निसर्ग
मगरीला भूमीवरी, माणसाला पाण्यावरी
जमे जगणे न खरी, सारा निसर्ग निसर्ग
माणसाच्याहुनी सारे, किती वेगळे नजारे
कसे नवल पाहा रे, सारा निसर्ग निसर्ग
दातांमध्ये मगरीच्या, चक्काचूर या देहाचा
तिला डांबून ठेवता, वाचलास वाचलास
वाघ पिंजऱ्यामधील, पाहण्यालायक जीव
कसा बाहेर येईल? वाचलास वाचलास
हत्ती दोरखंडामुळे, खाई ऊस, पान, फुले
बंधनातले ते सुळे, वाचलास वाचलास
साप पिवळा, हिरवा, बाहेरुनच मिरवा
पिंजऱ्यातच फिरवा, वाचलास वाचलास
साळिंदराचे ते काटे, तुला नवलच वाटे
त्याच्या स्वातंत्र्याला फाटे, वाचलास वाचलास
सारा बुद्धीचा प्रकार, मोठा मेंदूचा आकार
धंदे सुचती चुकार, माणसाला माणसाला
काटे, सुळे, नख, शिंग, याच्याविना तुझे अंग
होई अभिमान भंग, सुट्टा सोडता प्राण्यात
पुरुषार्थ गाजवावा, कुणी तोडीचा मिळावा
तुझा गर्व होत जावा, नष्ट एकदाचा इथे
कुणी पिंजऱ्यात गेला, अन्न वाघाला द्यायला
त्याचा कोथळा निघाला, अभिमान सारा खोटा
ऊस हत्तीला द्यायला, एक माहूत पोचला
पायानेच उडवला, अभिमान सारा खोटा
तुझ्या बुद्धीमुळे सारे, आज जाहले बिचारे
इतरांचा जन्म कारे, बनवतोस नरक?
कडेवरून आईच्या, प्राणी पाहतोस तेव्हा
आई म्हणते बाळाला, काही नवे दाखवले
हरिणीचे बाळ एक, दुडुदुडू धाव घेत
त्याच्या पिंजऱ्यामधून तुला पाहते रुसून
तुझ्या वाढदिवसाला, काय काय भेटी आल्या
एक वर्ष पार होता, नाही किंमत कशाची
तुझ्या वाढदिवसाला, केला गोडधोड शिरा
यश साजरे कराया, एक वर्ष काढल्याचे
तुला वाढदिवसाचे नवे कपडे घेतले
पहिल्यांदा नवे होते, दुसऱ्यांदा जुने झाले
तुझ्या वाढदिवसाला, केक कापलास मोठा
एक वर्षावर गेला काळ सुरी फिरवून
काळ मोजण्यासाठीची, येथे परिमाणे सारी
काळ मोजण्यास अंती, येथे अपुरी पडली
काळ कधीपासूनचा, काळ कधीपर्यंतचा
शोध लावणार याचा, कधी नाहीच माणूस
तुझे एक वर्ष होई, एक घिरटी पृथ्वीची
अशा करोडोत पृथ्वी घेते घिरट्या कधीच्या
तुझी आकाशगंगेला पुरूनही उरलेल्या
लाखो आकाशगंगांना सारे विश्व सामावते
काय वाढदिवस रे, काय एक वर्ष तुझे
काय येण्यात फारसे, काय जाण्यातही तुझ्या?
तुझ्या असण्याने येथे काय होणार वेगळे?
तुझ्या नसण्याने येथे काय थांबणार आहे?
तुझा आनंदही खोटा, खोटे दुःख, राग खोटा
तुझ्यापरी जन्म घेण्या अब्ज आले, अब्ज गेले
आली दिवाळी पहिली, नवी कापडे घेतली
काय सजलास तूही, काय दिसतोस मित्रा
जो जो येतो तुझ्या घरी, तुझी कौतुकेच करी
कर दिवाळी साजरी, ऐक कशी असते ते
घरी कामवाली येते, काम करूनही जाते
तुझे कौतूक करते, शिळे पाके घरी नेते
घरी कामवाली येते, तिची दिवाळी असते
मन लावून करते, तुझ्या घरचा फराळ
घरी कामवाली येते, तिची मुलगीही येते
तिला काय रे कळते, दोन वर्षांनीच मोठी
तुझे कपडे बघते आणि आईला बोलते
"आई मला का न घेते असे कपडे नवीन?"
एक धपाटा मिळतो, तिला फरक कळतो
बिचारा हळहळतो, जीव आईचाही तेव्हा
नाही रडली बिचारी, बात समजली सारी
तिच्या गरीबीत झाली तिच्या दिवाळीची व्याख्या
पोर तीन वर्षाची ती, करे कौतुके तुझी ती
आईचीच तिला भीती, तिची आई मूक रडे
पोर तीन वर्षांची ती, तिला कळे रीत सारी
काय इच्छा करायची, काय नाही मागायचे
तुझी आई दिवाळीचे, तिला देतसे कपडे
तुझ्या ताईने कधी जे, जुने टाकलेले होते
तिला त्याचाच आनंद, कामवालीला आनंद
भेद गरीब, श्रीमंत, फार बालपणी कळे
कामवालीचाही सण, चार घरचा फराळ
आणि नवऱ्याची लाथ, रात होता दारूसाठी
कामवालीला लाभले, चार जुनेसे कपडे
उद्धारही माहेरचे, खास नवऱ्याकडून
कामवालीच्या मुलांचे, चार फुसके फटाके
पुन्हा लावून पाहणे, काही ओल्या आसवांनी
कामवालीचा तो सण, आला काय गेला काय
शिळा करणे फराळ, शिळ्या भाताच्याऐवजी
वर तुझे चिडवणे, छोट्या मुलीला हासणे
"तुला नवीन कपडे माझ्यासारखे नाहीत"
तुझ्या आनंदात तिने, स्वतः आनंद मानणे
दाखवून आनंदणे, तुझ्या ताईचे कपडे
"हा फ्रॉक तर जुना माझ्या ताईचाच खरा
माझा सफारी बघ हा, काल नवा घेतलेला"
तिने ऐकून म्हणणे, नवे तिलाही कपडे
पण घरीच ठेवले, आज नाहीच घातले
तुझा आनंद कधीही, दुःख दुजाला न देई
तुझ्या आनंदात कोणी, मानो आनंदच मित्रा
उडविता फटाकडे, तुला आनंद मिळाले
रोजगारही मिळाले, कुणा फटाकड्यामुळे
थोडे घेतले गंधक, त्याला घातले वेष्टण
वर लावलीसे वात, झाला फटाका तयार
मनातील गंधकाला कधी वेष्टणे न घाला
बिनवातीचे मनाला स्फोट करण्याची शक्ती
जे जे मनामधे आले, शांतपणे उकलावे
तुला सांगत आहे ते, कधी मीही न पाळले
बाप कमवतो पैसे, धूर केलेस तू ऐसे
जणू फटाकेच जैसे, सारे जीवन असावे
पैसा नावाचे काही, निसर्गाने दिले नाही
केले फक्त पैशासाठी, जे जे माणसाने केले
चार रोपटी लावली, त्याची फळे फुले येती
चार पैसे जोडले की, त्याला अभिमान येतो
फळे, रोपटी, देहाची, सारी भूक भागवती
अभिमान माणसाची, भूक भागवे मनाची
मन नावाचे काहीही, मुळी अस्तित्वात नाही
मेंदू विचार प्रसवी, मन समजती सारे
मेंदू शरीराचा भाग, रोप शरीराचा भाग
रोप, पैसे सारे डाग, एका शरीराचसाठी
एक शरीर फटाके, घेते विकत पैशाने
एक शरीर फटाके, वाजवते आनंदाने
आपल्याच मुलावर कारे बसावे हे प्रेम?
सहवास सहवास, रक्तबिक्त काही नाही
दोन दशके कुणाही, ठेव परक्या ठिकाणी
त्याला ओढ तिथल्यांची, रक्ताहून जास्त वाटे
तुझी बालवाडी आज, सुरू जाहली हळूच
तुझे जाताना भोकाड, बिलगून आईदेह
आई हसत हसत, तुला खोटेच कथत
"तिथे खेळणी अनेक, तिथे दोस्त भरपूर"
चार पाच दिवसात, होते सारीच सवय
आणि वाटू लागे प्रेम, तुला बालवाडीचेही
आता परीघ रुंदावे, घर, अंगणाच्या पुढे
आली नवीन शरीरे, तुझ्या संपर्कात आता
कुणी उंच, कुणी गोरा, कुणी श्रीमंत घरचा
कुणी गाडीतून आला, कुणी चालत पोचतो
कुणी बारीक, बुटका, कुणी जाड सुटलेला
कुणी हसरा, रडका, कुणी आपला, परका
तुझे 'हार्दिक स्वागत' जग नावाच्या शाळेत
हळूहळू घर जात, विस्मृतीच्या कप्प्यामध्ये
तुझ्याकडे काय काय, तिझी किती रे ताकद
आता लागणार कस, तुझे 'हार्दिक स्वागत'
तुला रडू किती येते, तुला आई आठवते
इथे सारे समजते, तुझे 'हार्दिक स्वागत'
किती मजा खेळण्याची, सुट्टी सारखी सारखी
काय थट्टा जीवनाची, एक बालवाडी करे
कुणी मधल्या सुट्टीत, साधी पोळी भाजी खातो
कुणी डब्यामध्ये त्याच्या, केक, समोसे आणतो
फार बालपणी मित्रा, भिंती पडतात साऱ्या
साऱ्या सवयी मनाला, याच्यामुळे लागतात
मन मेंदूच आहे रे, मन बाकी न काहीरे
मेंदू वासना सुचवे, मेंदू आठवण देतो
कसे फटके द्यायचे, कसे खरे भांडायचे
इथे येत शिकायचे, तुझे 'हार्दिक स्वागत'
कशी तक्रार करावी, कशी भांडणे करावी
कशी कारणे काढावी, बालवाडीत कळते
तुझा डबा सांडणारा, जर देई डबा त्याचा
माणूस त्यालाच म्हणा, ते न शरीर शरीर
तुझ्यामुळे डबा सांडे, त्याला तुझा डबा देणे
याचे नाव माणूस हे, हे न शरीर शरीर
तुझ्यामुळे डबा सांडे, त्याने तुझाही सांडणे
तुला माहीत असावे, त्याचे नावच शरीर
सांडतो जो तुझा डबा, त्याचा सांडणे तू डबा
नाही माणुसकी तुला, तूही शरीर शरीर
मोठी बालवाडी येते पुढे तुझ्यासाठी येथे
छोटी बालवाडी घेणे तूही अंगात बाणून
आता पहिलीत जारे, शिक अ ब क ड थोडे
जे जे बोलाया जमले, आता लिहायचे सारे