शिपाई

सूर्य उगवल्यानंतर काही काळाने एक असा क्षण येतो की तो साऱ्या दिवसाचे भवितव्य ठरवतो. त्या क्षणी जर आळस भरला असला तर दिवसभर काही काम होण्याची आशाच नको.

अशा एका धुकाळलेल्या क्षणी कर्नल आपले चकचकीत बूट चमकावत पांडबाच्या अंगणात प्रवेशला. पांडबा अंगणाच्या कडेला उन्हाला पाठ देऊन शांतपणे विडी ओढीत होता. हवा अजिबात हलत नव्हती. त्याच्या विडीचा धूर निष्क्रिय विचारांसारखा डोक्याभोवतीच रेंगाळत होता.

'कर्नल' हे काही त्याचे खरे नाव वा हुद्दा नव्हता. महायुद्धात एक जमादार म्हणून कामगिरी करून तो स्वेच्छेने निवृत्त झाला होता. तो सैन्यात होता एवढीच गोष्ट त्याच्या 'कर्नल' या नामकरणविधीला पुरेशी होती. वास्तविक पाहता गावातल्या टारगट लोकांचा खवचटपणा एवढा नंबरी होता की त्याला किमान 'फिल्डमार्शल'चा किताब मिळायला हरकत नव्हती. भातकापणीचे विळे जर त्या लोकांच्या जिभांइतके वाकडे आणि धारदार असते तर भातकापणी केल्यावर शेत दाढी केल्यासारखे तुळतुळीत झाले असते असे कर्नल नेहमी म्हणत असे.

पांडबा सर्वांकडे सतत संशयाने पाहत असे. तो कोण, कुठला, त्याचे संपूर्ण नाव काय, याची कोणालाच कल्पना नव्हती. तो तबला वाजवतो एवढ्यावरून 'तबलापंडित' असे त्याचे बारसे करण्याचा काही लोकांनी अयशस्वी प्रयत्न केला होता, पण ते धेडगुजरी नाव ऐकताच पांडबाने आपल्या लठ्ठ पंजाने बोलणाऱ्याच्या गळ्याचे पैस माप घेतले होते.

'काय करावे?' हा प्रश्न पांडबाभोवती फेर धरून नाचत होता. कर्नलला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर उत्साह उजळला. अख्ख्या गावात तो कर्नलशीच काय ते संबंध बाळगून होता.

त्याचा तबला आणि कर्नलच्या युद्धाच्या कथा यांच्याभोवतीचे वलय अतिपरिचयामुळे निघून गेले होते. दोघांपैकी कुणीही आपल्या विषयात काही बोलला तर दुसरा ते स्थितप्रज्ञासारखे ऐकून घेई. आपल्या मनातले विचार शब्दांच्या आरशात पाहिले की शिंक येऊन गेल्यासारखे स्वच्छ वाटते, त्याचा समोरच्या व्यक्तीशी काही संबंध नसतो हे दोघांनाही उमगले होते.

त्या दोघांना जोडणारा एक चोख धागा दारूचा होता. कुठूनतरी आवश्यक माहिती आणि सामग्री गोळा करून कर्नलने आपल्या पडवीत एक छोटीशी भट्टी लावली होती. संध्याकाळ रात्रीच्या सीमारेषेवर ते न चुकता बैठक जमवीत.

"या" पांडबाने कर्नलचे भरघोस स्वागत केले आणि तो उकिडव्याचा बसता झाला. कर्नलला कर्नल म्हणणे वा त्याचे खरे नाव विचारणे दोन्हीही पांडबाला अपमानास्पद वाटे. त्यामुळे तो एकवचनी वा बहुवचनी संबोधनावरच काम भागवे.

कपड्यांची घडी मोडणार नाही याची काळजी घेत पायावर पाय टाकून कर्नल बांधाच्या दगडावर पुतळ्यासारखा निश्चल बसला. आपल्या पाठीत लाथ बसेल काय याचा अंदाज घेत एक कुत्रे त्याचे बूट हुंगून गेले.

"चहा घेणार?" पांडबाने विचारले, आणि उत्तराची अपेक्षा न धरता तो हाताचा रेटा देऊन उभा राहिला. चुलीतील लाकडे पुढे सरकवून फुंकणीने फुंकर मारताना गूळ संपला आहे हे त्याच्या ध्यानात आले. लाकडे पुन्हा मागे ओढून त्याने पैशाचा कसा कमरेला खोचला आणि तो पांदीतील वाट तुडवू लागला.

दुकानात रिकामटेकड्या लोकांचा अड्डा नेहमीप्रमाणेच जमला होता. दुकानदाराने कुठलीतरी जुनी मोटार कशी स्वस्तात मिळवली याचे रसभरित चर्वण चालू होते.

'मोटार' हा शब्द कानी पडताच पांडबाच्या नजरेसमोर कारंजे उसळले. शिवपूरचा दरबार त्याच्याभोवती उभा राहिला. पडत्या पावसात नबाबांनी सकीनाबीचे गाणे ऐकायची इच्छा प्रकट केली होती तेव्हा सकीनाबी त्याच्या केहरव्याच्या तालावर डोलत बसली होती. "नबाबांना सांगा की आज बाई गाणार नाहीत. आज तबल्याचे राज्य आहे. जर नबाबांना तबला ऐकायचा असेल तर आमचे दरवाजे खुले आहेत" तिने दिवाणजींना परस्पर वाटेला लावले होते.

कडाडणाऱ्या विजेची चमक सकीनाबीच्या काळ्याशार डोळ्यांवर पसरली आणि नबाबांनी प्रवेश केला.

बैठक जमवून सकीनाबीने दिलेला विडा त्यांनी तोंडात सोडला आणि उघड उघड नाराजीने तबल्याकडे पाहिले. पांडबाला एकदम निखारे उधळल्यासारखे वाटले. अब्दुलमियां सारंगियाला नजरेनेच गप्प करून त्याने साडेअकरा मात्रांच्या तालाचा पेशकार भरायला सुरुवात केली. दोन आवर्तनांतच नबाबांच्या नाराजीची जागा बेचैनीने घेतली आणि ते चुकत चाललेला मात्रांचा हिशेब जमवायची खटपट करू लागले.

हुलकावण्या देत तो समेवर आला तेव्हा नबाबांचे तोंड वासले होते आणि त्यातून लाल रस मलमलीच्या अंगरख्यावर ओघळत होता.

जाताना आपले सगळे दागिने, चढाव आणि मोटार पांडबाला अर्पण करून विड्याने रंगलेला अंगरखा घातलेली नबाबांची आकृती अनवाणी वाड्यावर गेली.

लाकडासारखा ताठलेला त्याचा देह गडग्याजवळ उभा पाहताच दुकानातल्या टो़ळक्याच्या गप्पा बंद पडल्या. पांडबाला दुखावण्यासारखे आपण काही बोललो का याची प्रत्येकजण धास्तावल्या मनाने आठवण करू लागला.

एक कावळा शांततेवर ओरखडे उमटवत झेपावला तेव्हा पांडबा भानावर आला.

तो गूळ घेऊन परतला तेव्हा कर्नलने आंगण झाडून स्वच्छ केले होते आणि तो दिमाखात आपल्या कर्तबगारीकडे बघत उभा होता.

झोपेत चालत असल्यासारखा सरसरत पांडबा तबल्यापाशी गेला आणि कापूस सांडत असलेली त्यावरील मखमली गादी त्याने हळुवार हाताने बाजूला सारली.

धेतधेत               तिरकिटधेत              तिरकिटतिरकिट              तिरकिटधेत

तिरकिटधेत        तधेत्त                         धाकिट                             धा

तिरकिटधेत        तधेत्त                         धाकिट                             धा

तिरकिटधेत        तधेत्त                         धाकिट                             तिरकिटधेत

तधेत्त                 धाकिट                        धा                                   तिरकिटधेत

तधेत्त                 धाकिट                        धा                                   तिरकिटधेत

तधेत्त                 धाकिट                       तिरकिटधेत                      तधेत्त

धाकिट              धा                               तिरकिटधेत                      तधेत्त

धाकिट              धा                               तिरकिटधेत                     तधेत्त

धाकिट             तिरकिटधेत                 तिरकिटधेत्त                     धा

तिरकिटधेत     तिरकिटधेत्त                 धा                                   तिरकिटधेत

तिरकिटधेत्त     धा (१/२)            (१/२) धा                          (१)

धा

विष उतरल्यासारखा पांडबा रिता झाला. हाताचे पंजे तबल्यावर पसरून तो आपल्या रासवट बोटांकडे पाहू लागला.

कर्नलने चहाचा कप पुढे केला तेव्हा पांडबाच्या चेहऱ्यावर गंभीर मिष्किलपणा पसरला. "शेवटच्या चार मात्रा दोन मात्रांत बसवल्या तर अमीरतालाच्या चार आवर्तनांत बसतो. आहे असाच घेतला तर त्रितालाची तीन नाहीतर एकतालाची चार. शेवटच्या चार मात्रा उडवल्या तर झपतालाच्या कालातूनही घेता येतो. तुकडा एक, ताल अनेक".

कर्नल त्याचे बोलणे संपायची वाट बघत चहा भुरकत होता.

"काय पांडबा, मीट खाणार काय आज?" कर्नलला शिकारीला जायची लहर आली आहे हे पांडबाने ओळखले. कर्नलची जुनी बंदूक केव्हातरी म्यानातून बाहेर पडे आणि एखाद्या बगळ्याच्या किंवा रानकोंबड्याच्या आयुष्याला पूर्णविराम देऊन शांत होई.

आज पांडबाला भिरभिरल्यासारखे वाटत होते. मोकळ्या हवेवर फिरल्याने जरा तरी हुशारी येईल या विचाराने तो तयार झाला.

तबल्याला गवसणी घालताना मात्र त्याला अचानक असहाय्य वाटू लागले. आपण संगीतकलेला गवसणी घातली की संगीतकलेने आपल्याला कायमचे गुलाम केले? सकीनाबीचे गाणे ऐकताना, त्याचा ठेका अलगदपणे मिरवताना कुठल्यातरी माहीत नसलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यासारखे वाटे. पण आपल्या या जगण्याचा, खाण्यापिण्याचा, झोपण्याउठण्याचा त्याच्याशी काय संबंध? आपण किती श्वास घ्यायचे हे कुठे ठरते? आणि त्या हिशेबात हे गाणे वाजवणे कुठल्या रकान्यात भरले जाते? सकीनाबीच्या गाण्यातून दर वेळी एका वेगळ्याच सत्याचा जन्म होई. मग कुठल्या त्या खबदाडीतल्या जौनपूरमध्ये दंगल का उसळावी? आणि एका अंधाऱ्या गल्लीत शिवपूरच्या नबाबांनी दिलेल्या मोटारीसकट तिची होळी का पेटावी?

पांडबाचे मन एकदम काजळल्यासारखे झाले. निश्चयाने पाऊल रेटत तो अंगणाच्या कडेला आला. शिकारीचा सगळा जामानिमा करून कर्नल त्याची वाटच पाहत होता.

वाळल्या पातेऱ्याचा आवाज करीत ते पांदीतून चालू लागले. दुकानावर बसलेल्या रघूअण्णांनी पेपरातून मान वर काढली. "काय कर्नल, लढाई-बिढाईवर जातांय कांय? जरा जपून हो, नाहीतर तुम्हांस मिळायचे परमवीर चक्र, नि आमच्या डोसक्यात पडायचा अणुबाँब".

नेहमीइतकी या खवट वाक्याला टोळक्याकडून दाद मिळाली नाही कारण आज कर्नलबरोबर पांडबा होता.

"बाकी हा पांडबा खरा तबलजी, काय समजलेत?" ते दोघेही दिसेनासे झाल्यावर रघूअण्णांनी पुन्हा तोंड उचकटले. "कसा चारदोन तबलाजोड्या पचवून बसल्यासारखा देह आहे". दुकानातून खिंकाळण्याचा आवाज घुमला आणि रघूअण्णांची तंबाखूची चंची हलकी झाली.

जंगलात जाणारी पायवाट पकडून ते माळमाथ्यावर आले तेव्हा दुपार टळली होती. एवढ्या वेळात कर्नल काहीच कसा बोलला नाही म्हणून पांडबाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. कर्नलचा काळा रापट चेहरा तापल्या तव्यासारखा तांबडाभडक झाला होता. लोखंडाच्या लाल रसातून बुडबुडे यावेत तसे त्याच्या ओठातून शब्द बाहेर पडण्यासाठी धडपडत होते आणि बाहेर पडल्यापडल्या विरून जात होते.

कड्याचाच एक भाग विभक्त झाल्यासारख्या दिसणाऱ्या प्रचंड दगडाच्या बुडाशी त्यांनी आश्रय घेतला.

समोर दूर अंतरावर असलेला एक डोंगर, त्यापर्यंतची सर्व जागा व्यापून बसलेले हिरवेगर्द जंगल, आणि डावीकडून त्या शांततेला रुद्रघोष पुरवणारी समुद्राची गाज यात शिरल्यावर पांडबाला पिसे फुटल्यासारखे हलके वाटू लागले.

नजर जाईल तिथपर्यंत ढगांच्या पायघड्या अंथरल्या होत्या आणि प्रत्येक ढगातून एक इंद्रधनुष्य आपल्या स्वतंत्र दिमाखात उभे होते.

"म्हणे युद्ध करायला निघालेत" कर्नलच्या संतापाला वाचा फुटली. "अरे, स्वतःच्या चड्ड्या संभाळता येत नाहीत अजून अन म्हणे हे शिपाई. चार तास रपेट करायला लावली तर हाडांचा शेंबूड होईल यांच्या. पण रपेट करायला हवीच आहे कशाला यांना? गार पंख्याखाली नरम खुर्चीवर बूड टेकवून हे कुठली तरी भिकारडी बटणे दाबणार आणि दुसरीकडे, यांच्या बुडाहून खूप दूर आग पेटणार. अरे दगडांनो, मग तुम्ही कशाला हवेत तिथे? शेळीने चार लेंड्या जरी त्या बटणावर टाकल्या तरी काम होईल.

"अरे, युद्ध म्हणजे किती जास्तीत जास्त हानी करता येईल याचा ताळेबंद नव्हे, तर तुम्ही शिकारीला बाहेर पडला असताना कुणीतरी तुमच्या शिकारीवर आहे हा अनुभव घेणे. तुमच्या काय कुणी उपटून सूळ खांद्यावर दिलाय का, की जाऊन लढा म्हणून? ती तुमची कामे नव्हेत. आपल जीव तळहातावर घेऊन तो दुसऱ्या कुणाच्या नजरेस पडण्याआत त्या दुसऱ्याचा जीव हस्तगत करणे म्हणजे युद्ध. असे भाल्याच्या टोकावर आराम बसायला शिकले म्हणजे मग डोळ्यांनी वास येऊ लागतो नि नाकाने चव कळते.

"अरे, एका सैनिकामागे मारे इतके लाख रुपये शस्त्रांसाठी खर्च होतात म्हणून अभिमानाने कोकलता, तुमच्या माना लाजेने मोडून का पडत नाहीत? एक बंदूक, एक पाण्याची बाटली, खिसेभरून काडतुसे एवढेच खऱ्या सैनिकाला बास होते. तुमच्या त्या लाखो रुपयांच्या बुजगावण्यांचे काय होते? आणखी एकाद्या शेणकट बुजगावण्याने त्याच्याकडचे बटण दाबले की अणुबाँब पडून सगळ्यांचीच पाटी कोरी होते. "

पांडबाचे कशातच लक्ष नव्हते. समोरच्या ढगात एके ठिकाणी सकीनाबीची बैठक जमली होती. तंबोरे छेडले जात होते. पण त्या स्वरपडद्यावर कशिदा भरायच्याऐवजी त्यावर ती आपल्या अस्वस्थतेची मुद्रा उमटवून बसली होती. एका इंद्रधनुष्याच्या खांबाआडून डोकावताना त्याच्या लक्षात आअले की ती वारंवार तबलजीच्या रिकाम्या जागेकडे पाहत होती. तबल्यावरच्या मखमलीच्या गाद्या कधीच उसवणार नव्हत्या. दंगली, टवाळगप्पा असले माकडचाळे कुणीही करणार नव्हते. सर्वांवर फक्त सुरांचे राज्य चालणार होते, आणि त्यातून मिळणाऱ्या उत्तरांसाठी प्रश्न तयार करताना त्याची काळाची जाणीव विरून जाणार होती.

कर्नलचा चेहरा हिंस्त्र झाला आणि बंदुकीवरची त्याची पकड घट्ट झाली. समोरच्या जंगलाकडे त्याने संशयाने रोखून पाहिले आणि जात्याच्या घरघरीसारख्या भरड आवाजात तो शब्दांचे पीठ पाडू लागला.

"नाही बेट्यांनो, मी अजून जिवंत आहे इथे. मी, जमादार हरी नामा सुर्वे. मी तुम्हांला धडा शिकवेन बोकडवीरांनो. तुमची ती पुचाट बटणे सोडा हिंमत असेल तर आणि या असे समोरासमोर. मग पाहू कोणात किती जिगर आहे ते."

अंधार झाला. काळोखाच्या पडद्याला भोके पडल्यासारख्या चांदण्या चमकू लागल्या. त्या दोघांच्या देहांभोवती चहूबाजूंनी अविरत काळाचा निर्विकार प्रवाह सोशिकपणे वाहत राहिला.