आजनंतर

आणू नको कधीही तसले मनात काही
आहे, तुझाच आहे, सध्या जगात नाही

ताब्यात जन्म नाही, ताब्यात अंत नाही
संपायची कधी ही एकाधिकारशाही?

माझ्या मनात येते की मी तुला म्हणावे
"संबंध काय आहे माझा तुझा तसाही?"

प्रत्येक दु:ख माझे जेव्हा बनेल शाई
होतील शब्द सारे साधेसुधे, प्रवाही

देवा नवीन दे वा मन हे दुरुस्त कर तू
जो भेटतो मला, हे, त्याचाच भार वाही

ते लाभता हवेसे, होते नकोनकोसे
आहे कुणाकुणाचा हा थाट बादशाही?

जा तू खुशाल वेडे, सबबी नकोत आता
होतोच ना असाही? राहीन मी कसाही!

’हातात येत नाही, वाटेत येत नाही"
माझी दिशा नसावी तुमच्या दिशांत दाही

नाही कधीच झाले ते आज होत आहे
नक्कीच आजनंतर येणार श्वास नाही