मै पतिया लिख भेजू...!

खूप महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राचं पत्र आलं होतं.  दिवसभर ऑफिसमध्ये काम करून दमून भागून गेलेल्या मनात कुठून एवढी एनर्जी आली कोण जाणे, पण वॉचमनकाकांकडून ते पत्र घेतो न घेतो तोच (ते वाचलंही नसताना) प्रसन्न वाटू लागलं होतं. नेहमीसारखा लिफ्टने न जाता मी चक्क जिन्याने वर गेलो होतो. मी आणि माझा मित्र प्रसाद, पक्के पत्राळू. एखाद्या महिन्यात कुणाचं पत्र आलं नाही, तर चुटपुट लागून राहायची. आणि पत्र लिहायचे तेही अंतर्देशीय पत्रावरच. कुरियर वगैरेंनी पत्र लवकर पोहोचत असेलही, पण  चिठ्ठी लिहून, ती पाकिटात घालून कुरियर करणे हे आमच्या तत्त्वातच बसत नाही. त्या निळ्या पत्रावरचं माझं नांव आणि प्रेषकाच्या रकान्यातलं प्रसादचं नांव वाचलं नुसतं, आणि मनात अनेक विचारांनी एकच कल्लोळ केला होता... मी आधीच्या पत्रात त्याला काय लिहिलं होतं? त्याला ह्या पत्रात त्याच्याकडून काय उत्तर आलं असेल? ह्याची एक खूप वेगळीच, सुखद अशी उत्सुकता मनात निर्माण झाली होती. ही मजा ई-मेल मध्ये वगैरे अजिबातच नाहीये. त्या अंतर्देशीय पत्राची, 'यहाँ काँटकर खोले' ही बाजू हातात धरून, आतले शब्द जाणार नाहीत ह्याची काळजी घेत मी अलगद ते पत्र उघडायला सुरुवात केली. ह्या एवढ्याशा वेळात मन कितीतरी वर्षं मागे फिरून आलं होतं. एखादी वळिवाची सर आल्यावर वाटतं तसं मस्त, प्रसन्न वाटत होतं. कारण वळिवाचा पाऊस आणि मित्राचं पत्र, दोघेही येतात ते अचानकच!

शालेय वयात पत्र-बित्र फार काही कळत नव्हतं मला. पत्रलिखाणाला सुरुवात झाली, ती कॉलेजला असताना. आम्ही एकाच शहरात असूनसुद्धा एकमेकांना १-२ पत्रं लिहिली होती. नंतर मी शिक्षणासाठी पुण्याला आलो, आणि मग महिन्याला किमान एक, अशा स्वरूपात पत्रं लिहिली जायची. आम्ही दोघेही सातारचे, समर्थांवर उदंड श्रद्धा... त्यामुळे, पत्राच्या सुरुवातीला मनाच्या श्लोकातला एखादा श्लोक किंवा दासबोधातली एखादी ओवी लिहिणं, हा एक अलिखित नियमच होता. त्या निमित्तानं सद्ध्या दासबोधातला कुठला समास वाचला जातोय हे कळायचं एकमेकांना. तशी आमची पत्रं ही तात्त्विक भाषेतलीच असायची सगळी. ती लिहीत असताना असं वाटायचं, की 'शिवाजीमहाराजांचे व्यंकोजीस पत्र' हे जसं प्रसिद्ध झालं (हे आम्हाला शालेय अभ्यासक्रमात होतं म्हणून तेवढंच माहिती) तशीच आमची ही पत्रंही उद्याच्या काळात प्रसिद्ध होतील. आत्ता हसू येतं हा सगळा विचार केला की, पण ते दिवस मात्र होते भन्नाट. कधी आम्ही मुद्दाम शिवकालीन भाषा वापर, कधी ओवीबद्ध पत्र लिही, असं करीत पत्रं लिहायचो. संस्कृतचा अभ्यास जसा जसा होत गेला, तसतसे पत्रात संकृत श्लोकही येऊ लागले.समर्थांबरोबर कालिदास, जयदेव, भर्तृहरी हेदेखील असत पत्रांमध्ये. मग गीताही आलीच. काही उपनिषदांमधले श्लोक येऊ लागले. त्यामुळे, ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही 'एकमेकांच्या दृष्टीतून' वाचत होतो. महिन्याकाठी येणारं ते एक पत्र म्हणजे खूप मोठा आधार असायचा. माणसाजवळ काहीच नसलं ना, की अगदी लहान-सहान गोष्टीसुद्धा त्याला खूप काही देतात असं जे म्हणतात ते अगदी खरंय. कारण आत्ता पैसा आहे, घरी इंटरनेट आहे, मोबाईल आहेच, पण सगळं असूनसुद्धा अजून काहीतरी कमी आहे असंच सारखं वाटत राहतं.......

आताशा पत्र लिहिणं होत नाही; पत्र लिहिलं जात नाही. प्रायोरिटी बदलल्या, त्यामुळे 'वेळ नसतो' ह्या एका कुठेही खपेल अशा कारणाचा जन्म झाला. आणि मग सगळंच कुठे तरी हरवून गेल्यासारखं झालंय. इतकं, की आधीच्या काळात महिन्याच्या महिन्याला पत्र आलं नाही तर कासावीस होणारे आम्ही, आणि आताचे आम्ही हे सारखेच का? असा प्रश्न पडतो. आमच्या अशाच एका पत्रात मी प्रसादला वसंतरावांच्या 'मै पतिया लिख भेजू' ह्या बंदिशीबद्दल लिहिलं होतं. तशीच एक पूरिया कल्याण मधली बंदिश आहे, 'दिन रैन कछू ना सुहावे, उनको देखे बिन. लिख लिख पतियाऽ मनरंग भेजू , आवन करो अब मेरे सजना' ह्या बद्दलही लिहिलं होतं त्या पत्रात. त्याचं उत्तर म्हणून मला प्रसादने मीराबाईचा अभंग पाठवला होता. 'कोई कहियो रे प्रभू आवन की, आवन की मनभावन की' त्यातलं पहिलंच कडवं होतं, ''आप न आवे, लिख नही भेजे, बाढ पडी ललचावन की'' तो स्वतः ही येत नाही, आणि पत्रसुद्धा पाठवत नाही... अशी अगतिकता आहे त्या अभंगात.खरंच, माणूस प्रत्यक्ष भेटू शकत नसेल, तर त्याचं पत्र ही किती मोलाची गोष्ट असते नाही? तो माणूस जणू पत्रातूनच भेटत असतो आपल्याला. पत्र लिहिताना, त्या पत्राला आलेलं उत्तर वाचताना, त्या व्यक्तीबरोबरचे क्षण आपण पुन्हा जगून घेत असतो. तो थोडा वेळ, आपल्याही नकळत आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देतो, बळ देतो.

म्हणूनच मी ठरवलंय, की पुन्हा सुरुवात करायची पत्रलेखनाला. फक्त प्रसादलाच नाही, तर इतरही मित्र-मैत्रिणींना पत्रं लिहायची. मला प्रसादला आरती प्रभूंची 'सूचना' ही कविता लिहून पाठवायचीये; "या टपोऱ्या अक्षरांच्या पाकळी पत्रातली, फूल आहे द्यावयाचे सूचना ही पोचली". एखाद्या खास जवळच्या मैत्रिणीला इंदिरा संतांची 'पत्र लिही पण नको पाठवू शाईमधुनी काजळ गहिरे' ही कविता पाठवायचीये. पुन्हा एकदा कॉलेजच्या मस्त हिरव्यागार दिवसांत जाऊन यायचंय. पत्राने केवळ खुशाली न कळवता-विचारता, 'शब्दांच्या पलिकडले' असं काहीतरी अनुभवायचंय.

 शुभस्य शीघ्रं म्हणतात ना.....

" प्रिय प्रसाद यास,
स. न. वि. वि.
सदा सर्वदा पत्र तूझे मिळावे । जया वाचता भान माझे हरावे ।
तया उत्तरी, पत्र मीही लिहावे ।  रघूनायका, हेच रे भाग्य द्यावे ॥"
...................................