किस्सा

हा साधारण ४०- ५० वर्षांपुर्वीचा किस्सा आहे.

माझे आजोबा सेल्सटॅक्स ऑफिसमध्ये असतानाची गोष्ट आहे. त्यांची धुळ्याजवळील कुठल्याश्या खेड्यात नुकतीच बदली झाली होती म्हणे, त्यानी भाड्याने घर घेतले होते.

जवळपास राहणार्या काही बायकांशी आजीची ओळख झाली. आजीला निरनिराळ्या कुंड्यांचा आणि फुलझाडांचा फार छंद आहे, त्यामुळे तिने आधीच्या ठिकाणाहून कुंभारवाड्यात जाऊन हौसेने दोन सुंदर कुंड्या वगैरे आणल्या होत्या.
त्यात लाल पांढरा गुलाब लावले होते आणि बदली झाल्यावर मिळालेल्या दोन खोल्यांपैकी बैठकीच्या खोलीसमोर दारात पायर्याशी त्या छानपैकी  ठेवून दिल्या होत्या.

जागा कमी होती, पैसे पण बेताचेच मिळायचे. पण म्हणतात ना हौसेला मोल नसते. तिला भरतकाम विणकामाची ही आवड असल्याने खिडकीला स्प्रिंग चे कापडी फुलाफुलांचे पडदे ही तिने शिवलेले होते, दरवाज्यावरच्या पडद्यावर नाजूक मोरांची जोडी पेंट केली होती. दाराबाहेर छोटी पण  मोहक रांगोळी असत असे आणि उंबरठ्यावर सुरेख गोपद्म, स्वस्तिक आणि लक्ष्मीची पाऊले काढलेली असायची.

एकदा संध्याकाळी  सर्व नव्या शेजारणींना तिने आपल्या घरी फराळाला बोलावले होते. शेजार्यापैकी  एक जण कानडी  होते.
नीटनेटक्या आजीचे घरातील ही नाजूक कोरीव सजावट  त्याना फार आवडली, आणि  त्या आजीची भलतीच प्रशंसा करू लागल्या.  अगदी गुलाबांपासून ते रांगोळी, पडदे, टेबल टॉप सर्वच गोष्टी त्यानी टिपल्या. जेवण वगैरे झाल्यावर हळूहळू  या कानडी बाई ही ऊठल्या आणि बाहेर पडताना त्यांचे लक्ष कुंडीकडे गेले. थोडं पुढे गेल्यावर त्यानी  अचानक पणे प्रश्न केला की, 

"अय्यो‌ऽऽऽ राऽऽऽऽऽमऽऽऽ मला तुमचा कुला द्या की होऽऽऽ"

"काऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽय?"  -कोणीही दचकणार

"अहोऽऽ काय बोलताय तुम्ही? " - एक जण म्हणाले.

"तुमचा कुला द्या की म्हणतो ऽऽ मीऽऽऽ"

एक्दम सगळे जोरात हसायलाच लागले. काही कळेचना कुणाला हा काय प्रकार आहे ते?

"वो वहिऽऽनी नाय म्हणू नकाऽऽ येक तरी कुला देऊनच टाका म्हणतो मीऽऽऽ, दोनापैकी येक तरी द्या ऽऽ कीऽऽऽ "
अत्ता मात्र लोक गडबडा लोळायची वेळ आली हसून हसून.. म्हणे दोनापैकी एक कुला तरी द्या

"अहो पण वैनी यांचा कुला , तुम्हाला कशासाठी हवा आहे? " - चेष्टा करायला एक जण पुढे आलीच लगेच.

"अहोऽऽ आकार फारच आवडला बघा मलाऽऽऽ आमच्या कडे असा नाहीच कीऽऽ आकाऽऽर म्हणतो मी"

तेव्हढ्यात कुणीतरी सांगितले की "कुंडी" ला त्यांच्याकडे "कुला" म्हणतात आणि म्हणून दोनापैकी एक तरी कुंडी द्याल काय असे विचारत आहेत कारण त्याना तिचा आकार आवडला आहे.

डोळ्यात पाणी येईपर्यंत खोऽऽखो हसत सगळे मग आपापल्या घरी गेले ....