प्रतिमाद्वंद्व

सर्वत्र नासक्या फळांचा आणि चिखलातल्या कचऱ्याचा गंध दाटून आला होता. बसस्टॉपपर्यंत जायला जेमतेम पाऊलभर रुंदीची वाट कोरडी होती.

रस्त्यावर त्यातल्यात्यात कोरडी जागा पाहून उभ्या असलेल्या माणसांच्या घोळक्यांना ओझरता स्पर्श करीत ड्रायव्हरने बस सुसाटत आणली आणि बसस्टॉपसमोर कचकन ब्रेक दाबून उभी केली. ज्यांच्या अंगावर चिखलराड उडाली अशी माणसेही वेळ न दवडता बसच्या दरवाज्यापाशी चाललेल्या संग्रामात सामील झाली.

बसमध्ये पाऊल ठेवायलाही जागा नव्हती. भिजण्याच्या वेगवेगळ्या अवस्थांतल्या माणसांनी आतली हवा दमटकुंद करून टाकली होती. कुत्रीला पिलांनी झोंबावे तशी बाहेरूनही माणसे बसला लोंबत होती.

सुमित्राला हे सर्व पाहून ढवळून आले.

बस हलली तरी ती उदास मनाने स्टॉपच्या शेडमध्येच उभी राहिली.

शेडमध्ये वरून पागोळ्या गळत होत्या. ठिकठिकाणी खालची फरशी उखडली होती. त्यात चिखलपाणी साचले होते.

त्यातल्या कोरड्या फरशा टिपत एक तरतरीत तरुणी तिच्याजवळ आली. तिचा चेहरा खूपच ओळखीचा वाटत होता, पण याआधी कधीही पाहिलेला नसल्याची खात्रीही देत होता.

ती तरुणी तिच्याकडे पाहून सावरीच्या कापसासारखी हलकेच हसली. त्या हास्यामध्ये प्रौढपणा आणि अल्लडपणा एकमेकांना ढकलीत उभे होते.

निर्जन भव्य देवळामध्ये अचानक घंटा निनादावी आणि त्या खर्जगंभीर आवाजामध्ये आपल्या अस्तित्त्वाची जाणीव विरघळून जावी तसे सुमित्राला झाले.

"तुला..... तुम्हांला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते" सुमित्रा अडखळत म्हणाली.

"हो हो, मी ओळखते ना तुला" भरून आलेले आभाळ बाजूला सारत संध्याकाळचे ऊन चमकून जावे तशा उत्साही आवाजात ती तरुणी उत्तरली.

सुमित्रा गोंधळली. "तुमचे... तुझे नाव नाही आठवत.... "

"जाऊ दे. नावाशी काय करायचे आहे? मला तू सखी म्हण. चल. आता निघू. "

नकळत सुमित्रा तिच्यामागोमाग निघाली.

आजूबाजूच्या जंजाळातून त्या दोघी बाहेर पडल्या.

दीड तास ताटकळून जुजबी ओळखीचा झालेला तो रस्ता सोडून बाजूला जाताना सुमित्रा बावचळली. पर्समधला तो कागद तिला टोचू लागला.

"त्या कागदावर सांगितलेल्या ठिकाणीच जाऊ आपण, पण जरा वेगळ्या आणि सुखावह मार्गाने" सखी मागे वळून न बघता म्हणाली.

सुमित्रा हबकली. ही भूतचेष्टा की काय? बाकी ज्या दिशेने आपण चाललो आहोत तिथे असलेही शक्य आहे. कोण कुठली ती भाजीवाली बाई आपल्याला चुरगळून जीर्णे झालेला कागद देते काय आणि आपण सगळे उद्योग सोडून त्याचा पाठपुरावा करतो काय. म्हणे, रेल्वेस्टेशनच्या समोर असलेल्या मारुतीच्या देवळाच्या दरवाजाच्या उजवीकडच्या भिंतीवर पहा.

तिथे तर एका दाढीवाल्या बुवाचा फोटो होता. त्यावर त्याचा पत्ता 'दक्षिणेश्वर संस्थान' असा होता. चिकाटीने पोचणारच असतील त्यांच्याकरता खाणाखुणा होत्या.

त्या खुणा चापसत मीटरगेज लायनीवरच्या या आडगावी ती येऊन पोचली होती. इथून बसने म्हणे गुंजीहोट आणि मग नदी ओलांडून पुढे.

सखी चिखल चुकवीत चालत होती. सुमित्रा तिच्या पावलावर पाऊल टाकत होती.

मध्येच एक आवळ्याएवढे टेकाड त्यांच्या वाटेत आले. त्या टेकाडावर चढल्यावर खाली क्षीण चमकणारी नदी दिसू लागली. सर्व बाजूंनी लहानमोठ्या टेकड्या नि डोंगर माना वर करून उभे होते. हवेचा दमटपणा अंगात भिनत होता.

समोर दरीच्या अगदी टोकावर एक प्रचंड झाड उभे होते. सखी त्या झाडापाशी पोचली आणि पट्कन वळून तिने त्या झाडाच्या मुळाला बांधलेला गाठी मारलेला दोरखंड पकडला.

हात सोलवटून घेत सुमित्रा त्या दोरावरून खाली एका छोट्या पठारावर उतरली. तिथेही एका शिळेला वेढून तसाच एक दोर निर्जीवपणे लोंबकळत होता.

त्या दुसऱ्या दोराच्या तळाशी पोचल्यावर नदी एक उतारभरच दूर होती. मान ताणत सुमित्राने वर बघितले. आपण एवढे अंतर उतरून आलो हे जाणवल्यावर तिला अभिमान वाटू लागला. तिने कौतुकभरल्या नजरेने सखीकडे बघितले.

"कुणीतरी तिसऱ्याने पुरवलेल्या सोयीमुळे आपण एका जागेहून दुसऱ्या जागेवर पोचलो यात अभिमान वाटण्यासारखे काय आहे?" मिठाच्या पाण्यात भिजवलेला चाबूक फटकारावा तशा आवाजात सखी म्हणाली.

लहान मुलाच्या हातातले खेळणे अचानक काढून घ्यावे तसे सुमित्राला झाले. रडवेल्या चेहऱ्याने ती सखीमागोमाग उतार उतरू लागली.

नदीच्या काठाशी एक मोठा दगड उगाचच जमिनीतून वर आला होता. सखी त्यावर जाऊन बसली आणि सुमित्राला तिने बसण्याची खूण केली.

"आता होडीवाला या बाजूला येईपर्यंत वाट बघायची. "

मग सुमित्राचे लक्ष समोरच्या अफाट पसरलेल्या नदीकडे गेले. दुसऱ्या तीरावर होडी डुचमळत होती.

"पण तुला सगळे सोडून इकडे यायची कशी बुद्धी झाली? "

सुमित्रा थोडी सावरली. म्हणजे सखीला तिच्याबद्दल एकूण फारशी माहिती नव्हती तर.

"तसं 'सगळे' सोडायला माझ्याकडे चारचौघांच्या दृष्टीने 'सगळे' नव्हतेच. हां, आता पैशाची चिंता नव्हती, रहायला ऐसपैस घर होते, पण माणसे कुणी नव्हती. गळ्यातल्या चार काळ्या मण्यांच्या आणि नखभर सोन्याच्या वाटीच्या बदल्यात कुणा पुरुषाला आपले अस्तित्त्व वापरायला द्यायची मला गरज भासली नाही. किंबहुना, मला त्याचा तिटकाराच होता. त्यामुळे तिथे राहिले काय, निघाले काय, मला सारखेच होते. "

सगळीकडे पुन्हा शांततेचा पडदा पसरला.

होडीवाला अजून समोरच्या काठावरून निघाला नव्हता. त्याच्याकडे एकटक पाहताना सुमित्राला डोळ्यांच्या कोपऱ्यातून हालचाल जाणवली.

नदीकाठी असलेली झुडपे बाजूला सारीत चार काळेकभिन्न पुरुष पुढे आले. तिच्याकडे पाहताच त्यांच्या नजरेत वासना चमकत राहिली. 'काय करावे' याबद्दल त्यांचा आपसात खुणासंवाद चालू झाला.

सुमित्रा शहारली. तिने सखीकडे पाहिले. सखी निर्विकारपणे त्यांच्याकडे पाहत होती.

तिला ढकलून ती जिवंत आहे की नाही हे पाहावे असे सुमित्राच्या मनात आले, पण भीतीने थिजून गेलेले तिचे शरीर तिच्या कुठल्याच विचारांना बांधील राहिले नव्हते.

आपापसात इशारे करत ते दैत्य खालीच उभे होते. मग हळूहळू पांढरी धोतरे नेसलेल्या त्यांच्या आकृत्या जवळजवळ सरकू लागल्या. येताना त्यांनी झुडुपातून चार फांदोट्या हिसकावून घेतल्या.

सखी परत समोरच्या पात्राकडे पाहत होती.

ते जवळ आले तशी सुमित्राने डोळे आवळून मिटून घेतले.

पण तिच्या अंगाला कसलाच स्पर्श झाला नाही.

काही क्षणांनंतर तिने डोळे उघडले. कुणीच दिसत नव्हते.

"आदिम असेल, पण स्त्रियांना अत्यंत आदराने वागवणारी त्यांची संस्कृती आहे. मागच्या झाडावर लटकलेले मधपोळे त्यांच्या पोटात वासना पेटवून गेले. मधमाश्या वारण्यासाठी फांदोट्या घेऊन ते झाडावर चढताहेत. "

सुमित्राचा एकदम संताप झाला.

"तू कोण मला माहीत नाही, पण एवढ्या मठ्ठपणे बसून रहायला तुला हे सर्व आधीच माहीत होते? "

सखी खुद्कन हसली.

"आपल्याला आधी माहीत असल्या-नसल्याने होणाऱ्या गोष्टीत काही फरक पडतो? ही नदी अशी वाहते आहे हे मला माहीत आहे. पण उद्या समजा हा प्रवाह थांबला, किंवा उलटा वाहू लागला, तर ते बदलण्याचे सामर्थ्य माझ्यापाशी आहे? मग आपल्या टीचभर डोक्यातल्या स्मरणशक्तीच्या आरशावर एखादी प्रतिमा उमटून गेली आहे-नाही याला काय महत्त्व द्यायचे? "

पाण्यावरच्या किड्यासारखा सरसरत होडीवाला इकडे येऊन पोचला. सखी होडीत जाऊन बसली. अनिश्चित मनाने सुमित्राही बसली.

चिखलात रोवलेला बांबू रेटताना होडीवाल्याच्या दंडाचे स्नायू तटतटले आणि होडी काठापासून विलग झाली.

पाण्यावर डचमळताना सुमित्राच्या कानात दरबारीची सुरावट उतरू लागली. तेल लावलेल्या आरशावरून सरकल्यासारखी पंडितजींची बोटे सारंगीवरून भिरभिरत होती.

"तो एक माणूस मला नवीनच वाट दाखवून गेला. 'तू सुंदर आहेस', पुढे जाऊन 'आकर्षक आहेस', आणि त्याहीपुढे जाऊन 'मला तुझ्याशी लग्न करायचे आहे' असे न म्हणणारा तो पहिलाच पुरुष. संगीताची वाट मी फारशी तुडवली नाही, पण जितकी पावले टाकली तेवढ्याकरता हातात दिवा घेऊन ते उभे राहिले.

"पाशवी वासनांखेरीजही जगात पुरुष असतो हे मला तेव्हा कळले. "

होडी एव्हाना मध्यावर आली होती.

सखीने दगडी नजर तिच्यावर रोखली.

"तुला कळले ते काय, तर त्यांनी शब्दांत वा शारिरीक हालचालीत तसे कधी सांगितले नाही.

"नाहीतरी शब्द वा  शारिरीक हालचाली या कृत्रीमच असतात. बघणाऱ्याच्या चष्म्याप्रमाणे त्यांना अर्थ प्राप्त होत जातो.

"त्यांच्या मनात काय चालले होते हे उमजण्याचा तुला मार्ग नव्हता, आणि तुझ्या सौंदर्याकडे पाहून भुलणारे खरोखरच उथळ होते का हे समजण्याचाही मार्ग नव्हता.

"मग 'तुला तसे वाटते' यापलिकडे त्या कळण्याला अर्थ नाही. शब्दांचे बुरखे चढवत तू स्वतःलाच आरशात निरखण्याचा खटाटोप का करतेस? "

सगळ्या जगातले रंग ओसरून जावेत आणि तरीही रहाटगाडगे सुरळीत चालू राहावे तसे सुमित्राला झाले. वांझ संताप तिच्या मनात दाटून आला. ही कोण? तलम शुभ्र वस्त्रावर काजळमाखली बोटे पुसत जायचा अधिकार हिला कुणी दिला?

होडी पलिकडच्या काठावर लागली.

काठातल्या चिखलातून पाय बरबटत सुमित्रा बांधावर आली.

क्षणभर तिचा नजरेवर विश्वासच बसला नाही.

समोर तिचा थोरला भाऊ नांगर रेटीत होता. शेताच्या टोकाला असलेल्या घराच्या दारात शकू 'ताई आली, ताई आली' असे टाळ्या पिटत नाचत होती. ओसरीतून वडिलांच्या खोकण्याचा क्षयी आवाज खणखणत होता. त्या आवाजाबरोबर विडीचा करपट धूरही तिच्या नाकात रेंगाळला. घराच्या मागल्या बाजूने निळसर धूर कुबट हवेत वर सरकत होता.

बऱ्याच वर्षांनी घरी परतलेल्या मुलीला पहायला आईवडील अंगणात आले. धाकली टाळ्या पिटत गोठ्यात गेली आणि ताईच्या आगमनाची वार्ता आरडाओरडा करीत तांबू गाईला सांगू लागली. भावाने नांगर थांबवला आणि कपाळावरचा घाम निरपत तो त्यांच्याकडे येऊ लागला.

"तुला पत्रिका मिळालेली आहे, आता मागे फिरणे नाही. आणि नाहीतरी हे भ्रम का सत्य कळण्याचा तुला मार्ग नाही" सखीने सुमित्राच्या दंडावर आपली पोलादी पकड बसवली आणि ओढत ओढत तिला मार्गाला लावले.

डोंगराएवढ्या उंचीचे ते देऊळ लख्ख रिकामे होते.

आत पाऊल घातल्याघातल्या सगळ्या आठवणींच्या भूतसाखळीने सुमित्राला बांधून घातले. केव्हापासून खदखदत असलेल्या तिच्या असहाय्यतेचा स्फोट झाला.

"तू कोण? माझ्याबद्दल तुला इतकी कशी माहिती? मला इथे यायचे होते, पण ते आजूबाजूचे अनुभव नाकारीत नव्हे. त्या अनुभवांचे असणे संशयास्पद ठरवीत मला इथपर्यंत रेटत आणण्याचा तुला काय अधिकार?

"मी त्या बसस्टॉपवरच राहिले असते, दुसऱ्याच कुठल्या गावाला गेले असते, तो कागद फाडून टाकला असता, आल्यासरशी माझ्या घराच्या आठवणींमध्ये विसावले असते, या सगळ्यातून मला हाकलत नेणारी तू कोण? "

ढगांचा गडगडाट व्हावा तसे तिचे बोलणे घुमले.

प्रथम भेटल्यावर दिसले होते तसेच स्मितहास्य सखीच्या चेहऱ्यावर रेंगाळत राहिले.

"मी कोण? तुझ्या समोरचा आरसा फोडल्यावर तुला कळेल की प्रतिबिंबाचे अस्तित्त्व बिंबाच्या इच्छेवर अवलंबून असते.

"आतापर्यंत तू हा आरसा फोडला नाहीस. मग मीही माझ्या चौकटीत राहून तुला भुलवत गेले. हा आरसा तू आधीच फोडला असतास तर हे काहीच घडले नसते.

"पण तुला हा आरसा आधीच फोडता आलाच नसता. कारण तुला पत्रिका मिळाली होती.

"आता हा आरसा फोडल्यावर मी मुक्त होईन. पण तू स्वतःच्याच प्रतिमेशी जखडली जाशील.

"मग तू पुढे कुठे गेलीस अथवा नाही, सगळे तसेच घडत राहील. "

सुमित्राने रागारागाने आरसा फोडून टाकला.

पण काचेचे फुटके तुकडे विखुरण्याऐवजी तीच त्या चौकटीत बंदिस्त होऊन गेली.