वाद - संवाद ६ - यजमानांची मृत्यूकथा

एका मध्यमवयीन गृहिणीच्या पतीचे दुर्दैवाने ( त्याच्या ) वयाच्या पन्नाशीत निधन होते. पाच वर्षांनंतर भेटलेल्या तिच्या जुन्या मैत्रिणीला हे ठाउकच नसते. त्यांचा संवाद! पतीचे निधन झालेल्या गृहिणीचे अक्षर अ व मैत्रिणीचे ब!

ब - तुझे यजमान कसे आहेत?
अ - यजमान? अग ते गेले ना..
ब - ऑ! कधी? काही बोललीच नाहीस?
अ - ५ वर्षे झाली.
ब - कसे काय?
अ - ऑफीसमधून यायला निघाले
ब - ऍक्सीडेंट?
अ - नाही. यायला निघाले .. तर नेहमीच्या ठिकाणी माझ्यासाठी गजरा घ्यायला थांबले.
ब - मग?
अ - तर ती गजरेवाली नव्हतीच, तिचा मुलगा होता
ब - मग?
अ - पण तो त्यांना ओळखायचा, त्याने दिला गजरा!
ब - मग?
अ - मग हे निघाले स्कुटरवरून
ब - हं!
अ - मध्ये पाऊस आला म्हणून डिकीतून रेनकोट काढायला थांबले
ब - हार्ट ऍटॅक?
अ - नाही.. मग रेनकोट घालून निघाले
ब - मग?
अ - त्यांची नेहमीची येण्याची वेळ म्हणून मी इकडे चहा टाकायला उठणार...
ब - तितक्यात?
अ - शेजारची बाई म्हणाली "बसा हो, करा चहा जरा वेळाने"
ब - आई गं! मग?
अ - म्हंटले जरा बसावे... तेवढ्यात
ब - काय?
अ - तिचा मुलगा घसरून पडला अन ती धावली.
ब - मग?
अ - मीही मदतीला धावणार... इतक्यात...
ब - गेले?
अ - छे! आलेच नव्हते ना? तितक्यात म्हंटले आधी आधण टाकावे अन मग मदत करावी
ब - मग?
अ - आधण टाकायला म्हणून घरात आले तर काय?
ब - काय? आले होते?
अ - नाही... छप्पर हे गळत होते.
ब - मग?
अ - म्हंटले यांना आवडायचे नाही, म्हणून फरशी पुसून घेतली अन चुलीकडे वळणार तोच...
ब - आले?
अ - नाही, लाकुड ओले..
ब - बापरे... मग?
अ - म्हणून परत शेजारणीकडे गेले तर ती मुलाला हळद लावत होती पाहून मला आठवले...
ब - काय?
अ - की यांना वरणात हळद चालत नाही... हे मी इकडे म्हणतीय अन..
ब - अन काय?
अ - तिने लाकूड दिले... ते घेऊन घरी येऊन चूल पेटवली अन आधण टाकले अन म्हंटले आता हे येतीलच
ब - मग?
अ - तर आले कुठे?
ब - म्हणजे? रस्त्यातच...?
अ - नाही गं! भजी घ्यायला जाणार होते हे मला तेवढ्यात आठवले.
ब - मग?
अ - म्हणून मग मी मिरच्या तळायला घेणार तितक्यात...
ब - तेल संपले?
अ - नाही...
ब - मग?
अ - हे आले
ब - आले?
अ - हो
ब - मग गेले कसे?
अ - तेच सांगते ना... मला म्हणाले "मिरचीची पण चार सहा भजी कर"
ब - आई गं! किती बिच्चारे नाही?
अ - मी म्हंटले मिरची जरा कमी खा
ब - हो ना?
अ - तर म्हणे तुझ्याबरोबर राहिल्यावर मिरची गोड वाटते.
ब - आई गं!
अ - असं म्हणतायत अन..
ब - पडले?
अ - जरा पलंगावर पडले.
ब - मग तिथेच?
अ - मग तिथेच भजी खाल्ली. चहा वगैरे घेतला... म्हणाले मी जरा पडतो आता
ब - म्हणजे झोपेतच झाले सगळे?
अ - नाही. चांगले चार तासांनी उठले
ब - काय सांगतेस? म्हणजे काही तरी त्रास होतच असणार नाही?
अ - हो ना! मला वाटलच होते चेहऱ्यावरून!
ब - मग?
अ - म्हंटलं जेवताय ना? असे मी म्हणून त्यांच्याकडे पाहतीय तर...
ब - गेले?
अ - नाही, मला म्हणाले उद्या पिक्चरला जाऊ
ब - तो उद्या कधी आलाच नाही ना गं?
अ - उद्या आला! पण....
ब - तेच नव्हते ना?
अ - तेही होते..
ब - अग मग गेले कधी?
अ - पिक्चरला निघताना मी विचारले बाबांनी दिलेली नवी हिरवी साडी नेसू का?
ब - मग हो म्हणाले?
अ - नाही
ब - मग दुसरी नेस म्हणाले?
अ - नाही
ब - मग?
अ - गेले.... ( हंबरडा - दोघींचा )

वाद - संवाद समाप्त!