पक्याचे लग्न-- ? -- २

("खर आहे बाबा !" नी हताश होत म्हणालो
"आम्हाला काय एकदा जोरदार पार्टी मिळण्याशी कर्तव्य,नाहीतरी तुझ्या पहिल्या लग्नाची पार्टी अजून मिळायचीच आहे."
मी आपली शरणागती जाहीर केली.)

" बरोब्बर आता कस अगदी शहाण्यासारख बोललास ? खर तर मी गावी गेलो होतो तेव्हाच दोनतीन जण त्यांच्या ऑफर्स घेऊन  माझ्याकडे येऊनही गेले." पक्याबरोबर मला त्या लोकांचही कौतुक करावस वाटल.हे काय त्याची बायको मरण्याचीच वाट पहात होते की काय ? मढ्याच्या टाळूवरच लोणी चाटण म्हणजे काय हे आता मला समजत होते.
"पण माझ पक्क ठरल आहे " पक्याच पुन्हा बोलू लागला.मला वाटल की हा आता धोंडो केशव कर्व्यांप्रमाणे एकाद्या गरीब विधवेचा उद्धार करणार की काय ? तसे असेल तर आतापर्यंत त्याला मनात दिलेल्या शिव्यांचा मला पश्चाताप वाटू लागला पण त्याची काही जरुरी नव्हती हे त्याच्या पुढील उद्गारामुळे सिद्ध झाले,
" मी ठरवले आहे की काळ्या मुलीशी लग्न करायचे नाही." हा माणूस स्वत:ला काय समजतो तरी कोण ? तरी बर एक बायलो मेलली आहे याची.
" काय रे पहिली बायको गोरी होती की काळी ?" खरे तर दुसऱ्या बायकोच्या बाबतीत इतके नखरे करणाऱ्या आणि पहिली बायको पहाताक्षणी आवडलेल्या पक्याला हा प्रश्न विचारणे हा मूर्खपणा होता. आणि ते लगेचच सिद्ध झाले कारण पक्याने उत्तर दिले,
" अरे ती अगदी अमेरिकन बाई असावी तितकी गोरी होती,चांगलीच व्हाइट स्किन होती तिची."
" अरे पण काळी मुलगीही स्मार्ट असू शकते." मी उगीचच बोललो,खर म्हणजे काळ्या पोरींची कड घ्यायचे मला मुळीच कारण नव्हते.
" पण माझी आपली आवडच अशी आहे.काळी मुलगी बायको म्हणून काही बरी वाटत नाही " चप्पल किंवा बुटाच्या रंगाविषयी चर्चा चालली असावी अशा सुरात पक्या म्हणाला.
" आज एक पोरगी पाहिली ,बरी आहे पण तेवढी व्हाइट नाही."
थोडा वेळ पुन्हा स्तब्धता.कारण गाडे माझ्या दृष्टीने अगदीच अनिष्ट वळणावर चालले होते त्यामुळे अशा संभाषणात नेमकी कुठली भूमिका घ्यावयाची हे मला कळतच नव्हते. अर्थात स्तब्धता फार टिकणार नाही याची काळजी पक्याच घेत होता मग पुढे तोच म्हणाला,
" तरी बर " आता हा काय तारे तोडतोय याकडे मी उत्सुकतेने लक्ष दिले.
" तरी बर पहिल्या बायकोपासून काही पोरबाळ नाही नाहीतर ती एक मोठीच वैतागवाडी झाली असती.कारण हल्लीच्या पोरींना अगोदरच जबाबदारी नको असते आणि त्यात हे पहिल्या बायकोच पोर मग तर काही विचारायलाच नको."
" म्हणजे तुझ लग्न व्हायच्या मार्गातली मोठी धोंडच टळली नाही का ?" मी उपरोधाने उद्गारलो.
" नाहीतर काय " माझ्या उपरोधाकडे दुर्लक्ष करीत पक्या पुढे म्हणाला.
" अशा लग्नानंतर त्या पहिल्या पोराचे हाल काही विचारता सोय नाही.या नव्या बायकोच्या हातन त्या पोराच सगळ नीट व्हायला नको का ?"
" शिवाय त्याची तुमच्या नवविवाहित जोडीच्या प्रेमचेष्टातही अडचण व्हायची " मी मुद्दामच टोचून बोललो.
" तेही खरच म्हणा.इकड आम्ही मारे रंगात आलेले असायचे आणि तिकडे ते पोर किंचाळायला लागायचे की सगळा रंगाचा बेरंग व्हायचा " माझ्या उपरोधाचा पक्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नव्हता. मग त्यानेच पुढे विचारले,
" बर पोरीच वय काय असाव तुझ्या मते?"
" ते आता तुझ काय वय आहे यावर अवलंबून आहे.तुझ्यासारख्याला फार चोखंद्ळपणा दाखवणे योग्य नाही त्यामुळे तुझ्यापेक्षा एक दोन वर्षाने लहान किंवा अगदी तुझ्या बरोबरीची -- "
" हो हो " मला मधेच थांबवत पक्या उद्गारला.
"एकूण सत्तावीस अठ्ठावीसच्या घोडनवरीशी माझ लग्न लावून देणार की काय ?ती मुलगी कसली बाईच की ! छट्‍ आपण नाही अस करणार.अठरा वर्षाची किंवा जास्तीत जास्त वीस वर्षाची मुलगी चालेल आपल्याला. पण त्यापेक्षा जास्त मुळीच नाही "
   पक्याचे निरर्गल प्रलाप मला क्षणोक्षणी शारदा नाटकातील भुजंगनाथाचीच आठवण करून देत होते.त्याच्या निर्लज्ज बडबडीचा मला इतका राग आला होता की मी कंपनीत नसतो तर त्याच्या दोन तोंडात देऊनच माझा निषेध मी व्यक्त केला असता आणि तेवढा अधिकार मला होता पण तितक्यात एम.डी.ने मला बोलावल्यामुळे तो अतिप्रसंग टळला.पण त्यामुळे पक्याविषयीचा माझा तिटकारा कोंडून ठेवलेल्या वाफेसारखा आणखीनच वाढला.त्यानंतर त्याचे तोंडही पहाण्याची इच्छा मला उरली नाही आणि तशी वेळच मी येऊ दिली नाही. दिवसभर पक्यासारख्या क्रूर माणसाची होणारी बायको लांडग्यासमोर मान खाली घालून उभ्या राहिलेल्या कोकरासारखी माझ्या नजरेसमोर नाचत होती.कोणती शेळी  या वाघाच्या तावडीत सापडणार होती कुणास ठाऊक ?
पण ते समजणेसुद्धा माझ्याच नशिबात लिहिलेले होते .

क्रमश :