पक्याचे लग्न ?----१

               पक्या जोशीचे कंपनीतले अस्तित्व अगदी मॅनेजरपासून ते  एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फायली नेणाऱ्या हणम्यालाही हवेहवेसे असायचे.प्रत्येकाच्या फिरक्या घेण्याचा त्याचा स्वभाव असला तरी त्यात कधीच उगीचच टवाळी नसायची.कुणालाही काहीही मदत लागली तरी त्याचा हात सदैव पुढे असायचा त्यामुळे त्याने केलेल्या टिंगलीमुळे कोणाला वाईट वाटत नसे.तो असला की धमाल करायचा.त्याने सांगितलेल्यापैकी किती गोष्टींवर विश्वास ठेवायचा ही मात्र मोठी संशोधनाचीच बाब असायची.मात्र त्यामुळे लोकांची थोडी करमणूकच होत असल्यामुळे त्याच्या सत्यासत्यतेची फारशी पर्वा न करता आम्ही ते ऐकून घ्यायचो आणि नंतर ती गोष्ट विसरूनही जायचो.
     पण त्या दिवशी त्यानं एकदम आपल्या लग्नाचीच बातमी देऊन आमच्यावर बॉंबच टाकला.
" उगीच शेंड्या लावू नको पक्या " मी न राहवून बोललोच.
"अरे वश्या अगदी खरं सांगतोय आता कशाची शप्पत घेऊ ? झाला प्रकारच इतका अनपेक्षितपणे घडला की माझाही विश्वास बसत नाही आपले लग्न झाले आहे यावर "
" असा काय प्रकार घडला सांग तरी आम्हाला ?"
"अगदी खरं सांगू का वश्या ?परवाच मी पुण्याला गेलो होतो ना,त्यावेळी अचानक ही मुलगी एका मॉलमध्ये दिसली."
" आणि तू तिला मागणी घातलीस, "
" करेक्ट !  हे पहा वश्या आणि लोकहो,मला खरोखरच ती मुलगी आवडली अगदी काय ते म्हणतात ना ती पाहताच बाला कलिजा खलास झाला अशी आपली स्थिती झाली. तिथल्या तिथ त्या बालेशी मी ओळख काढली आणि तिच्याच बरोबर तिच्या घरी जाऊन  हे बघा मी असा असा तरुण अमुक एकांचा मुलगा आहे.अशा अशा कंपनीत काम करतो,दोघांच्या पोटापुरते किंवा जरा जास्तच मिळवतो,तुमची मुलगी मला आवडली आहे आणि तिची हरकात नसेल तर तिच्याशी लग्न करायची माझी इच्छा आहे अशी तिच्या आईकडे चक्क मागणी घातली."
" आणि लगेच घरातच देव्हारातल्या देवासमोर त्यानी तुमच्या दोघांचे लग्न लावले असेच ना?"
" अगदी असेच नाही पण त्या मुलीच्या आईलाही काय करावे सुचेचना. कारण ती बिचारी एकटीच तिला या मुलीशिवाय कोणीच नातेवाईक नाही. एक भाऊ आहे मराठवाड्यातील खेड्यात त्याला लगेच येता येईल की नाही शंका होती त्यामुळे तिने सगळा भार माझ्यावरच टाकला "
" आन म्हनून तू आम्हा सगल्यांना पत्ताही लागू न देता लगीन लावलास ? अरे डिकरा  काय केलेस हे?"
स्टेनो टायपिस्ट केटी पाववालालाही हे सगळे ऐकून रहावले नाही.तिच्या पोरीसाठी तिचा पक्यावर डोळा होता असे ऐकून होतो.
" लोकहो क्षमस्व पण आता या अपराधाची भरपाई तुम्हा सर्वांना मोठी पार्टी देऊन करणार आहे.मग तर झाल ?"
   पण या वचनाची पूर्तता करण्याची पाळी पक्यावर आलीच नाही कारण दुसऱ्याच दिवशी त्याला कंपनीच्या जर्मनीतल्या शाखेत पाठवण्याचे ठरल्याचे दिल्लीच्या ऑफिसचे पत्र आले आणि सगळ्या आवश्यक बाबी पुऱ्या करून पक्या आठ दिवसातच जर्मनीला गेलासुद्धा !
     आता तीन वर्षानंतर तो येणार म्हणून त्याला भेटायला आम्ही सगळेच आतुर झालो होतो.मला तर त्याच्या भेटण्याची फारच आतुरता होती. त्याला आणि त्याच्या न पाहिलेल्या स्वप्नसुंदरी बायकोला. पण तेवढेही भाग्य माझ्या नशिबात नसावे.
       पक्याची येण्याची तारीख उलटली तरी त्याचा पत्ता नव्हता.कुणाकडून तरी तो जर्मनीहून अमेरिकेत गेला आणि परत येताना स्वाइन फ्ल्यूने त्याला गाठले त्यामुळे विमानतळावर त्याची तपासणी होऊन त्याला दोन दिवसासाठी हॉस्पिटलमध्येच दाखल करावे लागले असे उडत उडत ऐकायला मिळाले.
      त्याला कसे गाठायचे काही कळेना.कारण जाण्यापूर्वी त्याचा मोबाइल त्याने बंद करून ठेवला होता तो अजूनही त्याच स्थितीत होता आणि लॅंड लाइन लागायला तो घरी तरी असायला हवा.शेवटी तो येईलच कंपनीत तेव्हां भेटेल अशी मनाची समजूत घालत गप्प बसलो. तेवढ्यात  फायनान्स मॅनेजर यारगुप यांच्याकडे काही नव्या विभागांच्या आर्थिक तरतुदींविषयी चर्चा करायला जाण्याची आठवण आली अणि त्यांच्याकडे गेलो.
चर्चा झाल्यावर उठता उठता सहज विचारावे तसे त्यानी विचारले,"जोशी भेटले का ?"
" काय सांगताय पक्या आय मीन प्रकाश जोशी आले आहेत ?" मी आश्चर्याने विचारले.
" आणि मला कसा भेटला नाही ? आश्चर्यच आहे."
" कदाचित त्यांच्या दु:खामुळे असेल---"
" कसले दु:ख ?" मी चमकून विचारले
"म्हणजे तुम्हाला काहीच माहीत नाही ?"
"खरच नाही." मी
" मिसेस जोशी स्वाइन फ्ल्यू ने गेल्या "
"मिसेस जोशी म्हणजे प्रकाशच्या मातोश्री ?" मी विचारले
"नाही नाही,जोशींचीच  पत्नी "
 मग मात्र  केव्हा एकदा पक्याला भेटतोय असे मला झाले. ते माझे कर्तव्यच होते.अशा वेळी त्याला धीर द्यायला हवा होता.पण त्यासाठी त्याची गाठ तरी पडायला हवी ना.  तेवढ्यात हणम्या माझ्याकडे आला.आता याला काय हवे आहे याचा मी अंदाज घेण्यापूर्वीच तो म्हणाला,
"यारगुप साहेब म्हणालेत जोशीसाहेब आलेत आणि आपल्या केबिनमध्ये बसलेत" तसाच तडक उठून त्याच्या केबिनमध्ये शिरलो.
        आणि खरेच पक्या त्याच्याच टेबलासमोर बसला होता आणि लॅपटॉप उघडून काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करत होता असे वाटले कारण अशा परिस्थितीत काम करणे कसे शक्य आहे ? इतर वेळी त्याचे स्वागत’काय रे गाढवा कुठे दडी मारून बसला होतास ’असे म्हणून त्याच्या पाठीत दणका देऊन केले असते पण आजची परिस्थिती वेगळी होती.त्यामुळे काहीच न बोलता त्याच्यासमोर जाऊन बसलो.त्याच
सांत्वन कोणत्या शब्दात करावे कळत नव्हते.अशावेळी मला तरी शब्दच सुचत नाहीत
"तुझी फार मोठी हानी झाली आहे,तुझ्या दु:खाने मीही फार दु:खी झालो आहे." अशी वाक्य उच्चारणे म्हणजे नाटकातले पाठ केलेले संवाद म्हटल्यासारखे वाटते. " चालायचच.जग हे असच आहे.जीवन हे पाण्यावरच्या बुडबुड्यासारख क्षणभंगूर आहे.मृत्यू कुणाला चुकला आहे?माती अससी मातीस मिळसी याचा प्रत्येकालाच प्रत्यय येणारच असतो"
ही व अशाच अर्थाची बरीच वाक्ये मला आठवत होती.पण अशा वाक्यांनी  त्याचे सांत्वन करणे म्हणजे गुलाबदाणीच्या शिडकाव्याने आग विझवण्यातलाच प्रकार होता शिवाय असे उद्गार वय होऊन गेलेल्या व्यक्तीच्या संदर्भात योग्य होते. इथे तर याची वयात आलेली तरुण बायको गेली होती. अजून सगळा संसार पार पडायचा होता.शेवटी पक्यानच या संकटातून माझी सुटका केली आणि लॅपटॉपमधून डोके वर काढत आणि हातातल्या सिगरेटचा झुरका घेत तो म्हणाला,
" हं काय वश्या,काय म्हणतेय आपली कंपनी ?"
त्याचा सुर नेहमीचाच होता.त्यात दु:खाचा लवलेशही नव्हता. मी आश्चर्यचकित झालो पण मग मनाशी म्हटल चालायचच,सारख दु:खी राहून कस भागायच बिचाऱ्याच ! मग मलाही धीर आला.म्हटल यालाही फारस वाईट वाटत नाही अस दिसतेय मग मीच कशाला उगीच आंबट चेहरा करून त्याच्याकडे पाहू?मग मी त्याला विचारल,
" कंपनी जाऊ दे खड्ड्यात,पण हे अस कस झाल अचानक ? तू एकटाच गेला होतास ना जर्मनीला की वहिनींना पण नेले होतेस ? मधल्या काळात काहीच खबरबात नाही फोन नाही की साधा मेलही नाही "
" अरे आपल्या कंपनीचा खाक्या माहीतच आहे तुला,लग्नानंतर साधे हनीमूनलाही जायला मिळाले नाही मला. मध्ये एकदा कशीबशी पंध्रा दिवसाची रजा मिळाली त्या काळात धावत पळत इकडे येऊन तिला घेऊन कश्मीरला जाऊन आलो.मध्ये तिला एक वर्षासाठी जर्मनीत
नेण्याची परवानगी मिळाली बस तेवढाच तिचा आणि माझा सहवास.येण्यापूर्वी तिला फोन केला त्यावेळी सगळ ठीक आहे असा निरोप तिच्या गावाकडून आला होता.आणि मी इथे येतो तो तिचा मामेभाऊ माझीच वाट पहात होता सांगायला की त्याची ताई विहिरीत बुडून मेली"
 " विहिरीत बुडून ?"मी आश्चर्याने जवळ जवळ ओरडलोच.
" यारगुप तर सांगत होते की ती स्वाइन फ्ल्यू ने गेली म्हणून "
" अरे मीडियाने त्या स्वाइनफ्ल्यूचा इतका ओरडा केलाय की कोणीही मेला की तो स्वाइन फ्ल्यूनेच गेला अस धरूबच चालतात सगळे"
" पण मग तिला पोहता येत नव्हत का ?"आता मलाही प्रश्न विचारायला धीर येऊ लागला.
" नव्हत ना  रे मागसुद्धा एकदा असे झाले होते पण त्यावेळी तिच्याबरोबर तिच्या दोन मैत्रिणी होत्या त्यांनी तिला वाचवले होते पण यावेळी --- "
" पक्या,ही तुला इतकी आवडलेली मुलगी खेड्यात कशाला गेली धडपडायला,तू तर तिला मॉलमध्ये पाहून तिच्यावर भाळला होतास ना ?"
" अरे तिच्या मामाकडे तो मराठवाड्यात एका खेडेगावात रहातो म्हणून तिन जाऊ नये का ?" त्याच्या स्वरात जरा चीड जाणवली.
" चिडू नकोस मित्रा मी आपली सहज शंका व्यक्त केली."
" जाऊदे.पण मामाकडे गेल्यावर उगीचच काम करायला धडपडली.शहरात कामाची संवय कुठली आणि लग्नानंतर तर इकडली काडी तिकड करावी लागत नव्हती.सगळी काम मोलकरीणच करायची.जर्मनीत सगळी काम स्वत:ला करायला लागत होती तेव्हां छान सडपातळ होती पण
परत पाठवल्यावर पुन्हा आरामच करत बसल्यावर काय होणार ? जिमला जा म्हटले तर कंटाळा येतो म्हणे त्यामुळे चांगलीच फुगत चालली होती.भलतीच लठ्ठ झाली होती अशात !"
" लठ्ठ ?" मी चकित होऊन उद्गारलो. एके काळी जिला पाहून कलिजा खलास झाला म्हणत होता तिच्याविषयीच त्याच आजच हे मत ऐकायला मला फारस बर वाटल नाही.
" हां टेरिबल लठ्ठ ! लग्न झाल तेव्हां कशी चवळीच्या शेंगेसारखी होती आणि आता अगदी लाल भोपळा.मला तर आश्चर्य वाटते ही बुडालीच कशी ?"
    आपल्याला पहाताक्षणी आवडलेल्या आणि आता गेलेल्या मृत पत्नीच्या नुकत्याच आटोपलेल्या और्ध्वदेहिकानंतर परत आलेला हा निर्लज्ज माणूस तिच्या मृत्यूवर असे क्रूर विनोद करत होता.मला ते ऐकवेना.पुन्हा थोडा वेळ विचित्र स्तब्धता पसरली.पुन्हा पक्याच म्हणाला,
" हं ss झाल ते बरच झाल म्हणायच "
मी चमकून त्याच्याकडे पाहिले.काय म्हणतोय हा ? बायको मेली अन‍  ते याला बर वाटतेय.अगदी राक्षसी काळजाचाच दिसतोय हा पक्या.याला मित्र तरी कशाला म्हणायच अस मला तीव्रतेन वाटायला लागल.त्यानं पुन्हा एक सिगरेटचा झुरका घेतला आणि एक सुस्कारा सोडला.बायको लठ्ठ झाली अन‍ तिचा कंटाळा आला म्हणून यानेच तिला विहिरीत ढकलून मारलेसुद्धा असेल असही माझ्या मनात आल.
"पण ती गेल्यापासून अगदी करमेनास झालय रे.अगदी काही सुचत नाही " पक्यानच पुन्हा सुरू केल
आहे,या माणसाच्या हृदयात थोडीशी माणुसकी आहे म्हणायची.थोडा तरी कृतज्ञ आहे म्हणायचा. त्यामुळे मला बर वाटल व मी म्हणालो,
" सहाजिकच आहे.काही झाल तरी वर्षभर का होईना एकत्र राहिला होतात तुम्ही.गृहिणीसहधर्मचारिणी म्हणतात ते उगीच नाही.तिची आठवण येण आणि त्यामुळे करमेनास होण अगदी स्वाभाविक आहे."
" त्यामुळे मी ठरवलय " पक्या पुढ म्हणाला
"काय ठरवलय?" आपल्या प्रिय पत्नीचे स्मारक म्हणून एकाद्या संस्थेला देणगी देणे किंवा असाच काही प्रकल्प पक्याने करायचे ठरवले असेल असा अंदाज करीत मी विचारले अन्‍ पक्यान उत्तार देऊन जणु बॉंबगोळा टाकून ते स्मारकच उध्वस्त केल,
" मी ठरवलेय की दुसर लग्न करायच !"
आता मात्र माझ्या सहनशक्तीची तार तुटली.बायको मरून पंधरा दिवसही लोटले नाहीत,तेवढ्यात हा माणूस,माणूस कसला राक्षसच,दुसऱ्या लग्नाच्या बाता करतोय.
"पक्या तू माणूस् आहेस की राक्षस ?" मी न रहावून म्हणालो.
" का काय झाल बुवा ?" मी अगदी विनाकारणच त्याला बोल लावतोय अशा आविर्भावात पक्याने विचारले.
" गाढवा तुला ती बघताक्षणी फार फार आवडलेली बायको मरून दहाबारा दिवस होतात न होतात तोच तू दुसऱ्या लग्नाच्या गोष्टी करायलाही लागलास.काय वाटत असेल तिच्या आत्म्याला ?"
" का बुवा बायको मेल्यावर किती दिवसानी दुसरे लग्न करायचे याविषयी काही नियम वगैरे आहे काय ?आणि आत्मा वगैरे कसल्या बुरसट कल्पना सांगतो आहेस वश्या तू या २१ व्या शतकात ?एक गोष्ट मला सांग तिच्या अस्तित्वात आहे की नाही अशा आत्म्याची तुला काळजी आहे की तुझ्यापुढे जिवंत उभ्या असणाऱ्या मित्राची ?"
     पक्याच्या या युक्तिवादासमोर माझा इलाजच खुंटला.भावनात्मक गोष्टी काळीज असणाऱ्यालाच पटणार , इतरांस नाही.
"खरं आहे बाबा !" नी हताश होत म्हणालो
"आम्हाला काय एकदा जोरदार पार्टी मिळण्याशी कर्तव्य,नाहीतरी तुझ्या पहिल्या लग्नाची पार्टी अजून मिळायचीच आहे."
मी आपली शरणागती जाहीर केली.
क्रमश: