पक्याचे लग्न-- ? --३

पण ते मला माहीत होणे दुर्दैवाने माझ्याच नशिबात होते किंवा ते तात्या शहाणेच सुदैवच म्हणावे लागेल कारण त्याच दिवशी संध्याकाळी मी ठाण्याला गेलो तेव्हां तात्यानी मला एकदम विचारले,
" वसंता हा प्रकाश जोशी कसा काय माणूस आहे ?"
" कसा काय म्हणजे ?कशा दृष्टीन विचारताय तुम्ही हे तात्या मला ?"मी गोंधळून विचारले.
" म्हणजे आमच्या मालीला नवरा म्हणून.तसा मला मिळालेल्या माहितीवरून तो चांगलाच आहे म्हणा,पण तुझा तो बऱ्यापैकी
जवळचा दोस्त आहे असे समजल्यावरून म्हटल फायनल करण्यापूर्वी एकदा तुला विचाराव."
" मग कशाला विचारताय तात्या मला?तुम्ही अगोदरच जर सगळ ठरवलच असेल तर ?" तात्यांची तीक्ष्ण नजर चुकवण्याचा
प्रयत्न करत मी म्हणालो
" हे बघ  काहीतरी सांगायचे तुझ्या मनात आहे मग उगाच कशाला लपवाछपवी ?जे काय सांगायचे ते सांगून टाक."
" मग खर सांगू तात्या,"मी म्हणालो
" तुम्ही हे लग्न करण्याच्या फंदात पडू नका."
" का ? काय झाल तो प्रकाश म्हणजे काय चोर दरोडेखोर आहे ?"
" त्याच्याहून भयंकर ! तात्या चोर दरोडेखोरांना सुद्धा जरा काळीज असेल पण हा माणूस,माणूस कसला राक्षसच !" मी रागाने थरथर
 कापत म्हणालो.सकाळपासून पक्याविषयी वाटणारा सगळा संताप माझ्या तोंडून जणु बाहेर पडत होता.
" अरे पण काय झाल तरी काय बाबा ?" काळजीयुक्त स्वरात तात्या उद्गारले.
" तात्या मालीच नशीबच बलवत्तर म्हणूनच मला अगोदर विचारण्याची बुद्धी झाली तुम्हाला.तुम्हास माहीत आहे का त्या राक्षसाचे
एक लग्न झाले आहे आणि---- "
"काय सांगतोस काय ?’ कपाळावर हात मारत तात्या
 " आणि अरे ती कारटी तर त्याच्याशीच लग्न करायचा हट्ट धरून बसलीय "
"अगदी खर तेच सांगतोय तात्या.त्याचे लग्न तीन वर्षापूर्वीच झाले . ती त्याची बायको नुकतीच वारली आणि आता तो
दुसरीच्या शोधात आहे.‍ अशा माणसाला तुम्ही तुमची माली देणार ?"
" नाव घेऊ नकोस त्या हलकटाच-- आत्ताच्या आत्ता मालीला जाऊन सांगतो हे लग्न होणार नाही.त्या माणसान आपल लग्नच झाल नाही अशा थापा मारल्या तिला अन‍ कार्टी फसली.प्रेम करतेय सटवी त्याच्यावर " असे म्हणून तात्या तरातरा बाहेर पडले.
    तात्यांना सोडून परत दादरला परतण्यासाठी स्टेशनवर पोचलो अन तेथे अचानक सुऱ्या कर्णिक दिसला.सुरया आमच्याच कंपनीत होता पण नुकतीच त्यान इंफोटेक जॉइन केली होती.स्टेशनवर मला पाहून त्याने चक्क मिठीच मारली.
"किती दिवसांनी भेटतोय रे वश्या आपण ?"
" हो हो जरा हळू गृहस्था " मी पडतापडता स्वत:ला सावरत म्हणालो.
" पुन्हा परत कधी गाठ पडायची असेल तर मला आणखी काही काळ जिवंत राहूदे "
   इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.चहापान ,मसालापान झाले व सिगरेटीही शिलगावल्या गेल्या. अन अचानक सुऱ्याने विचारले
"काय रे पक्या काय म्हणतोय ? आला का जर्मनीहून परत ?"
’ नाव काढू नकोस त्या चोराच माझ्यासमोर " मी रागाने म्हणालो.
" का रे एवढा का वैतागला आहेस त्या बिचाऱ्यावर ?"
" बिचारा ? सुऱ्या तुला माहीत नाही वाटत या पक्याची बायको बिचारी परवाच वारली "
" खोट साफ खोट " मला पुढे बोलूही न देता सुऱ्याने म्हटले.
" खोट काय खोट ?"
" पक्याची बायको मुळी मेलीच नाही "
"  छान पक्याची बायको मेली नाही,मग काय जिवंत आहे ? अन तिकडे पक्या रडतोय बायको मेली म्हणून अन दुसऱ्या लग्नासाठी धडपडतोय ते काय उगीच ? उद्या तू म्हणशील पक्याचे लग्नच झाले नाही म्हणून कमाल आहे बाबा तुझी "मी त्याच्यासमोर हात जोडीत म्हणालो.
" खर आहे अगदी तसच आहे. " मला आणखीच गोंधळात टाकत खो खो हसत सुऱ्या म्हणाला.
" पक्याचे लग्न खरोखरच झाले नाही."
" मग तीन वर्षापूर्वी त्याने जे काय सांगितले "
" ती निव्वळ थाप .त्यावेळी लगेचच त्याला जर्मनीला जाव लागल त्यामुळे ती तुमची समजूत तशीच राहिली. "
" आणि आता बायको मेल्याचे सांगतोय-"
" तीही दुसरी थाप पक्याला काय तू आजच ओळखतोस का? त्यावेळी त्याला लग्न कर म्हणून कुणाची भुणभुण नको होती म्हणून आणि आता त्याला खरेच लग्न करायचे आहे "
" कुणाशी ?"
" तात्या शहाणेच्या मालीशी ."
आता मात्र मी कपाळावर हात मारून घेतला.पक्यावरचा माझा राग केव्हाच गायब झाला पण त्या शहाण्याने मलाही शेंडी लावली  याचा मात्र राग आला  आणि आता तात्या शहाणे आणि त्याच्या होणाऱ्या खडाजंगीचे चित्र माझ्या नजरेसमोर उभ राहून मी पोट धरधरून हसू लागलो.