सुलभ शौचालय : आंतरराष्ट्रीय सन्मान

शौचालये बांधून आंतर्राष्ट्रीय पारितोषिक मिळणे ही गोष्ट कधी कुठे शक्य होईल असे कुणाला वाटले असेल का?

मी नेहमीप्रमाणे विज्ञानविश्वातल्या घडामोडी, नवलकथा वगैरे पाहत होतो तेव्हा ह्या बातमीने लक्ष वेधून घेतले.

भारतात सुलभ शौचालये बांधण्याचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्याबद्दल डॉ. बिंदेश्वर पाठक यांना स्वीडिश राजपुत्राच्या हस्ते स्टॉकहोम जल पारितोषिक हे आंतर्राष्टीय पारितोषिक देण्यात आले. ते वाचून आनंद झाला.

फिजऑर्गच्या ह्या पानावर सुलभविषयी खालील माहिती मिळाली. (वरचे चित्रही तेथूनच साभार ओढून येथे लावलेले आहे.)

गेल्या चाळीस वर्षात सुलभद्वारे १२ लक्ष घरांमध्ये सांडपाण्याची सोय करण्यात आली तर ७५०० सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली. (एवढे करूनही जवळ जवळ ७० कोटी लोकांना (सुमारे ७५%) वापरण्यासाठी स्वच्छता गृहे नाहीत. ह्यामुळे दरवर्षी सुमारे ५ लाख लोक मृत्युमुखी पडतात.  ) अनारोग्याचा धोका कमी करण्यासाठी सुलभने दोन खड्ड्यांच्या शौचालयाचे संकल्पन केलेले आहे त्याने दुर्गंधी आणि भूप्रदूषण व्हायचे टळतेच शिवाय खतनिर्मितीही होते. १० लिटरच्या जागी त्यास एक ते दीड लिटर पाणीच पुरेसे होते. (याने दरवर्षी काही हजार अब्ज लिटर पाणी वाचेल म्हणतात!) टोपलीचे संडास साफ करताना कॉलरा होऊन माणसे मृत्युमुखी पडत असल्याने त्यांना फाटा देण्यास प्रोत्साहन दिले जाते.

सुलभ शौचालयाची किंमत ज्या त्या कुटुंबाच्या आर्थिक स्तराप्रमाणे आकारण्यात येते. गरीबांना सात आठशे रुपयांपासून ते अधिक सधनांना ५०००० रु. पर्यंत खर्च आकारला जातो. सुलभ स्वच्छतागृहांचा वापर महिना सुमारे पन्नास रुपये देऊन करता येतो आणि अधिकाधिक गरजू लोक त्याचा लाभ घेत आहेत.

सुलभची निर्यात अफगाणिस्तान आणि भूतानलाही होते. आणखी (मुख्यतः आफ्रिकेतील) १५ देशांना निर्यात होणार आहे.

ह्या कार्यासाठी जागतिक जल सप्ताहात डॉ. बिंदेश्वर पाठकांना स्वीडिश राजपुत्र कार्ल फिलिप ह्यांच्या हस्ते दीड लाख डॉलरचा धनादेश पारितोषिक म्हणून देण्यात आला.