गंधार

सैरभैर माझं मन, कुठे मिळेना आधार,
आणि श्वासांत तुझ्या गं, कसा रंगला गंधार?

माझे काट्यातले गीत,आणि जखमी अंतरा,
व्यथा मुकीच ही माझी, तुझा जुळे तानपुरा ।

दोन स्वरांच्या मधली फक्त पोकळीच माझी,
तुला ओतप्रोत स्वर, झोळी मोकळीच माझी ।

सखे मैफिलीत गासी गीती प्राण तू ओतून,
'पिया बिरह न आवे कभी' अशा बोलांतून ।

सूर खिळविती लोकां, शब्द भेदती अंतर,
त्यांना काय ठावे, अर्थ तुझे शोधती अंतर !

तुला मैफिलीत टाळ्या आणि वाहवाची दाद,
मला एकलेपणाची एक काळी छाया गर्द ।

तरी उरते आयुष्य, भोग टळले न कोणा,
किती क्षणांची सोबत? कधी कळले न कोणा ।

माझी मुकी ही व्यथाच मला देईल आधार,
तुला मात्र आधाराला ठेव श्वासांत गंधार ।

- चैतन्य दीक्षित