पश्चिमेचा गार वारा

दिवस किती पटापट निघून जातात! नाही? इथे पिलाणीला येऊन महिना होत आला,
कळलंसुद्धा नाही. सध्याच्या काळात इथे प्रचंड उकडतं. हवामानशास्त्रीय
भाषेत बोलायचं, तर वातावरण उष्ण आहे आणि हवेत आर्द्रता आहे. त्यामुळे
दुपारी अर्ध्या मिनिटासाठी जरी पंखा बंद झाला, तरी "घर्मस्नान" घडतं. आज
मात्र रोजच्यापेक्षा थोडं थंड वाटलं. इथली सवय झाल्यामुळेही असेल कदाचित.
संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्या खिडक्या उघडल्या तेव्हा मस्त गार वारा
अंगावर आला. तसा तो रोजच येतो. पण आज तो जाणवला. अमेरिकेत माझ्या घरातल्या
स्वयंपाकघराचं दार उघडं ठेवल्यावर असाच वारा यायचा पश्चिमेकडून.

दोन महिन्यांपूर्वी मी अमेरिकेच्या घरातच होतो. पॅकिंग सुरू होतं आणि
रिझाइन करूनही झालं होतं. त्यामुळे पाहुणेपणाची जाणीव मनाला सतावत होती.
त्याच्या आधीच्या महिन्यात लॅबमधलं काम संपण्याच्या मार्गावर आलं होतं.
काम पूर्ण होण्याचा आनंद, भारतात परतणार याचा आनंद, इ. इ. त्याच्या
आधी?... असं करत करत अमेरिकेत घालवलेल्या पावणे दोन वर्षांमध्ये मन दोन
मिनिटांत फिरून आलं. आपण जिथे काम करतो, जिथे आपलं वास्तव्य असतं, तिथल्या
आठवणी मनात घर करून जातातच. पण अमेरिकेच्या आठवणींचा थोडा जास्त
नॉस्टॅल्जिया आहे आज. त्याचं कारण, तिथल्या आठवणी आहेत मन भारावणार्‍या,
मनात कोरल्या गेलेल्या.

अमेरिकेतली माझ्या स्मरणात कायम राहील ती गोष्ट म्हणजे ऑगस्ट २००८ मध्ये
लॅबमधल्या सहकार्‍यांबरोबरचं हाईक. शनिवार दि. ९ ऑगस्ट रोजी प्रो. ऍना
क्रिलाव त्यांचा बॉय फ़्रेंड आणि आम्ही सर्व लॅबमेट्स रिव्हरसाईड
काउंटीतल्या मॅरियन् माउंटनपाशी ठरल्याप्रमाणे दुपारी चारच्या सुमारास
पोहोचलो. सगळे जण जेवण करूनच तिथे पोहोचले होते, त्यामुळे थोडे स्नॅक्स
घेऊन आपापले तंबू ठोकले. आसपासच्या परिसरात थोडंसं फिरून संध्याकाळी बार
बी क्यूच्या तयारीला लागलो. ग्रुपबरोबर लॅबच्या बाहेर असं पहिल्यांदाच
गेलो असल्यामुळे गप्पा भरपूर एंजॉय केल्या. त्यात सगळे अमेरिकेबाहेरचे.
त्यामुळे कॅंप फ़ायरच्या वेळी, त्या विस्तवात मार्शमेलोज वितळवून कुकीजवर
लावून खाण्यापासून "हे सप्तर्षी, हा ध्रुवतारा, ही उत्तरदिशा"पर्यंत
सांस्कृतिक गाठोडी उघडून बरीच देवाणघेवाण झाल्यामुळे जास्त मजा आली.
दुसर्‍या दिवशी (दि. १० ऑगस्ट २००८ रोजी) तिथून सव्वापाच मैलांवर व
साडेचार हजार फूट उंच असलेल्या सॅन हॅसिंटो (San Jacinto) या शिखरापाशी
पोहोचायचं असल्यामुळे सकाळी लवकरच हाइकिंगला सुरुवात करायची होती.
त्यामुळे साधारणपणे रात्री साडेदहा-अकरा वाजता आपापल्या तंबूत जाऊन
निद्रादेवीची आराधना केली.

सकाळ झाली. तेव्हा अलार्म न लावताही जाग आली. निसर्गाच्या सान्निध्यात
झोप तर छान होतेच, शिवाय, सकाळी उजाडल्यावरचं वातावरण इतकं प्रसन्न असतं,
की त्यावेळी लोळत पडल्याने खूप काहीतरी मिस करतोय असं वाटतं. एकापाठोपाठ
सगळेजण उठले. प्रातर्विधी उरकून चहा, कॉफ़ी, नाश्ता करण्यासाठी तयारी झाली.
आणि हे सगळं उरकून साधारणपणे सकाळी साडेआठच्या सुमारास सगळेजण हाइकसाठी
सज्ज झाले. नकाशांचं वाटप झालं आणि कुठून कसं जायचं, कुठे हॉल्ट घ्यायचे,
इ. चर्चा करून हाईकला सुरुवात झाली. "सव्वापाच मैल म्हणजे साधारण आठ
किलोमिटर. चार तासात हे अंतर पार करायचं असल्यास अर्ध्या तासात एक
किलोमिटर चालायला हवं. तीस मिनिटांऐवजी चाळीस मिनिटं लागली तर मधले हॉल्ट
वगैरे पकडून सहा तासांत तरी पोहोचू...." अशी कॅल्क्युलेशन्स माझ्या मनात
ताबडतोब सुरू होतात. आणि ते करत करत चाललं, की वेळ पटपट जातो आणि अंतर
सरलेलं कळतही नाही. (अर्ध्यातासात एक किलोमिटर म्हणजे अती हळू चालणं होईल
पण आधीच जास्त वेळ गृहित धरला की लवकर पोहोचल्यावर जास्त आनंद होतो.   )

एक दोन ठिकाणी हॉल्ट झाला तेव्हा मी, कदीर, एलिज़ा, झेनिया, लॉरा,
मेलानिया आणि रेहाना रेंगाळत रेंगाळत २-३ मिनिटं उशीरा पोहोचलो. आम्ही
"पाणी"ग्रहण करतोय न करतोय तोवर प्योटर, लुकाज़, वॅदीम, विताली, स्टॅस,
किरिल आणि प्रो. क्रिलाव आणि जे ह्यांची विश्रांती झालेली असायची.
त्यामुळे पुढल्या हॉल्टांच्यावेळी आम्ही क्रमाक्रमाने मागे पडत गेलो.
रेहाना आणि मेलानिया यांना आपल्याला पाच मैल चालणं जमणार नाही असं
केव्हातरी वाटलं आणि त्या मॅरियन माउंटनपाशी परतल्या. अत्तापर्यंत साधारण
तीन-साडेतीन मैल आणि दोन-तीन हॉल्ट पार पडले होतो. यानंतर दर दहा
मिनिटांनी मी आणि कदीर अंतर किती संपलं याचा अंदाज घेऊ लागलो. आणखी थोडं,
आणखी थोडं करत करत आणखी एक मैल पार पडला.

या काळात पाठीवरील साडेचार लिटर पाण्यापैकी चार-सव्वाचार लिटर संपलं
होतं. पण सोबत घेतलेली सँडविचेस तशीच होती. माझ्याजवळ तर आदल्या दिवशी
"इंडियन डेझर्ट" म्हणून आणलेला आणि अर्ध्याच्या वर उरलेला शिरा होता एका
डब्यात. पण तहान इतकी लागली होती, की काही खाण्याची इच्छाच होत नव्हती.
आता फक्त अर्धा मैल अंतर राहिलं होतं. झेनिया आणि लॉरा थकले होते आणि
त्यांनी तिथेच काहीवेळ थांबून परतण्याचा निर्णय घेतला. खरंतर मी, कदीर आणि
एलिज़ाही खूप थकलो होतो. पण हत्ती गेला, शेपूट राहिलं अशी स्थिती
असल्यामुळे थांबत थांबत का होईना, पण शिखरापर्यंत पोहोचायचंच, असं आम्ही
ठरवलं. मग उरलेलं पाणी संपवून, दर चार-पाच मिनिटांनी एक-दोन मिनिटांची
विश्रांती घेत घेत सॅन हॅसिंटो या साडेचार हजार फूट उंचावर असलेल्या
शिखरावर एकदाचे पोहोचलो. थकलो होतो, पण इतक्या उंचावर पोहोचल्याचा आनंदही
होता.

इतर मंडळी तिथे आधीच पोहोचली होती. आम्ही साधारणपणे शिखरापासून वीस फूट
अंतरावर असताना प्रो. क्रिलाव यांनी आम्हाला फोटोमध्ये टिपले. शिखरापाशी
पोहोचल्यावर पुन्हा एक फोटोसेशन झालं. मग पाणी भरून घेतलं आणि थोडी
विश्रांती घेतली. आधी पोहोचलेल्या मंडळींनी परतायला सुरुवात केली. मी,
कदीर आणि एलिज़ा थोडावेळ थांबलो. पायातला त्राण अगदी गेला होता. पण
चढण्यापेक्षा उतरताना कष्ट कमी लागतात, त्यामुळे साधारणपणे वीसएक
मिनिटांच्या विश्रांतीनंतर आम्हीही खाली उतरणं सुरू केलं.

उतरताना वाटेत बुटांची लेस सुटली. तिथल्या खडकाळ भागात लेसमध्ये पाय
अडकून पडलो असतो तर कपाळमोक्ष व्हायला वेळ लागला नसता. लेस बांधायला
क्षणभर थांबलो. खडकाच्या या बाजूला मी आणि पलिकडे कदीर आणि एलिज़ा होते.
लेस बांधून मी चालायला सुरुवात केली तेव्हा हे दोघं मला दिसले नाहीत
त्यामुळे मी इकडे तिकडे शोधू लागलो. खडक असल्यामुळे इथेच कुठेतरी असतील
असा विचार करून मी हाका मारत मारत पुढे गेलो. मी लेस बांधायला वाकलो होतो
तेव्हा खडकामागे लपल्यामुळे तेही मला शोधत होते आणि हाका मारत होते. पण
एकमेकांना शोधता शोधता एकमेकांचे आवाज ऐकू न येण्याइतकं आमच्यातलं अंतर
वाढलेलं लक्ष्यातच आलं नाही. दरम्यानच्या कालावधीत एलिज़ा रेस्टरूममध्ये
गेली असताना कदाचित मी तिथे पोहोचून पुढे गेलो असेन अशी एक शंका कदीरला
आली त्यामुळे मला शोधत शोधत ते दोघं पुढे जायला लागले. मी त्यांना
खडकामागे शोधत होतो, त्या दरम्यान केव्हातरी माझा रस्ता चुकला. नक्की
केव्हा, ते कळलं नाही. पण वाटेत पाण्याचा झरा लागला तेव्हा मी वाट चुकलोय
हे ध्यानात आलं आणि थोडी चिंता, थोडी भीती वाटली. मागे जाण्याचा प्रयत्न
केला. पण खडकाळ भागात एकसारख्या दिसणार्‍या इतक्या वाटा होत्या, की कुठे
जायचं ते कळेना. मी सेलफोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो, पण
कदीरच्या सेलफोनला रेंज मिळत नव्हती. अधूनमधून माझ्याही सेलफोनची रेंज जात
होती. मग हळूहळू आलो तसंच परत जाण्याचा प्रयत्न करताना एका खडकावरून पाय
निसटला आणि बाजूला असलेल्या झाडीत मी पडलो.

झाडी असल्यामुळे मार लागला नाही, पण हातापायाला बरंच खरचटलं होतं. त्या
झाडीमधून वर कसं पोहोचायचं, हाच मोठा प्रश्न होता. जवळ जवळ दहा फुटांचं ते
अंतर होतं आणि पुढे उंच खडक चढायचा होता. शेवटी झाडीवरूनच कसेबसे पाय टाकत
पंधरा-वीस मिनिटांत त्याच जागेवर पोहोचलो. आता मात्र मी प्रचंड घाबरलो
होतो. रस्ताही माहित नव्हता, कदीर मला शोधत असेल याची जाणीव होती आणि
त्याला फोनवरूनही संपर्क होत नाहीये याची चिंता होती. त्या खडकावरून पुढे
चालून व्यवस्थित उभं राहता येईल अशा ठिकाणी पोहोचलो आणि काय करावं याचा
विचार करू लागलो. पाणी पिण्यासाठी बॅकपॅक पाठीवरून काढल्यावर लक्ष्यात
आलं, की झिप उघडंच होतं! पाणी प्यायलो आणि प्रो. क्रिलाव यांना संपर्क
करण्याचं ठरवलं. सुदैवाने त्यांच्याशी फोनवर संपर्क झाला. झालेल्या
प्रकारातला मला ध्यानात आलेला भाग त्यांना सांगितला. मी नेमका कुठे
पोहोचलोय हे मात्र मला त्यांना सांगता येईना. आता मात्र माझं टेन्शन खूपच
वाढलं होतं. त्यांचंही टेन्शन वाढलं होतं. पुरेसं पाणी आणि खाण्याचं सामान
असेल तर सॅन हॅसिंटो शिखरापाशीच जाण्याचा पर्याय त्यांनी सुचवला. कारण
तिथे इमर्जन्सीमध्ये रात्री थांबण्याची आणि जेवण्याची व्यवस्था असते.

पण संध्याकाळचे चार वाजले होते. पायात त्राण नसल्यामुळे आतापर्यंतचं
अंतर पार करून पीकपर्यंत पोहोचेपर्यंत तीन-चार तास सहज लागले असते आणि
अंधार झाला असता. त्यात शिखर शोधण्यापासून सुरुवात होती. भलतीकडेच पोहोचलो
आणि तिथे सेलफोनची रेंजही मिळाली नाही, तर पंचाईत. त्यांच्याशी चर्चा केली
तेव्हा त्यांनी मला "काळजी करू नकोस. आम्ही तुला शोधण्याची व्यवस्था
करतो." असं सांगितलं. थोडंसं हायसं वाटलं, पण प्रो. क्रिलाव यांना त्रास
दिल्याबद्दल गिल्टी वाटत होतं. ते मला शोधणार तरी कसे? कारण मी कुठे आहे
हे मलाच माहिती नाही. आणि प्रो. क्रिलाव यांना मी केवळ मी टेकडीच्या
पश्चिमेकडे आहे आणि दूरवर एक फ़्रीवे दिसतोय असं मोघम बोललोय, तेव्हा त्या
तरी कोणाला काय सांगू शकणार? असे अनेक प्रश्न चिंता वाढवत होते. मला
शोधायला किती वेळ लागेल, काही सांगता येत नव्हतं. मी स्वतः जरी वाट शोधत
शोधत खाली उतरायचा विचार केला, तरी थकल्यामुळे आणि हातापायांना
खरचटल्यामुळे आज संध्याकाळी ते शक्य नव्हतं. थोडक्यात, एक रात्र तरी इथेच
काढावी लागणार! या दरम्यान लॅबमेट्सचे फोन येऊ लागले. त्यांनी ९११ला
संपर्क करणार असल्याचं सांगितलं.

या दरम्यान सेलफोनची रेंज अधूनमधून कमी होत असल्यामुळे
चोवीस तासांपूर्वी पूर्णपणे चार्ज्ड असलेली बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली.
मला संपर्क साधण्याचं एकमेव साधनही आता बंद पडण्याच्या मार्गावर होतं. पण
मी इथे उभं राहून बोलतोय याचा अर्थ निदान सेलफोन कंपनीला तरी माझं लोकेशन
समजण्याला वाव आहे असं एकदम क्लिक झालं. मग मी सेलफोन सुरूच ठेवला. कॉल कट
झाला, तरी मला संपर्क झाल्याच्या नोंदी होतील आणि मला शोधणं थोडंसं का
होईना, पण सोपं होईल, असं वाटलं.
सूर्य मावळला. देवाचं नाव घेऊन कसाबसा धीर गोळा केला. किंबहुना दुसरा
पर्यायच नव्हता. जवळ पिझ्झा आणि शिरा होता. पण उद्यापर्यंत जर सापडलो
नाही, तर उद्यासाठी काहीतरी जवळ असायला हवं असं वाटलं. शिवाय या
टेन्शनमध्ये भूक मेलीच होती. आज निदान पाणी तरी आहे. उद्या पाण्याचा साठा
शोधेपर्यंत तरी हेच पुरवायचं आहे.

रात्री इतक्या उंचीवर थंडीही खूप असते त्यामुळे झोपायचं तरी कसं हा
प्रश्न होता. थोडा शोध घेतला आणि एका खडकाच्या खाली पोकळ जागा होती तिथे
उताणं आडवं झाल्यास वार्‍याला पूर्ण अडोसा जरी मिळत नसला, तरी निदान
एकाबाजूने तरी प्रोटेक्शन. झोपायची जागा पक्की केल्यावर पिझ्झा आणि शिरा
त्या जागेपासून साधारणपणे वीस-तीस फुटांच्या अंतरावर ठेवून आलो. त्या
झाडीत अस्वल असतात आणि खाद्यपदार्थांचा वास आल्यास ते तिथे पोहोचतात असं
आदल्या दिवशी कळलं होतं.
त्यामुळे अस्वलापासून बचावासाठीचा एक तोकडा प्रयत्न केला. मग काही वेळ
टॉर्च सुरू केला आणि समोर दूरवर दिसणार्‍या फ़्रीवेपाशी, आकाशात फिरवू
लागलो. पण टॉर्चचा प्रकाश तिथपर्यंत पोहोचत नसेल. आणि असला, तरी मी तो
कशासाठी फिरवतोय, हे कसं कळणार लोकांना?

बॅकपॅकमध्ये शोध घेतल्यावर टॉवेल नसल्याचं लक्ष्यात आलं. झाडीमध्ये
पडलो तेव्हा झिप उघडंच होतं! तेव्हा नेमका टॉवेलच पडला की काय? म्हणजे आता
पांघरायलाही काही नाही. शेवटी बॅकपॅकमधल्या कपड्यांनाच "अर्धवट" चढवून
हात, पाय झाकण्याचा प्रयत्न केला. तिथले किडे-मुंग्या त्रास देत होते.
त्यांना अडवायला काहीच नव्हतं. मग बॅगेतलं सनस्क्रीन लोशनच चेहर्‍याला आणि
हातापायांना लावलं. सेलफोन बंद झालेला. इंटरनेटपासून दूर. चारीबाजूला आहे
फक्त निसर्ग. स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं की निसर्गाच्या सान्निध्यात
अशा अवस्थेत कधी रात्र घालवू. असे एक ना अनेक विचार येत होते. झोप येत
नव्हतीच. पण काही करूही शकत नव्हतो. त्यामुळे डोळे मिटून पडून राहिलो.
अस्वल येण्याबद्दल चिंता आणि किडे-मुंग्यांमुळे झोप जागृतच होती. अधुनमधुन
घड्याळ पाहत होतो. साधारणपणे पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास डोळा लागला
असावा.

साडेपाच-सहा वाजता उजाडलं तशी जाग आली. एरवी कमी झोप झाली तर
सुस्तावल्यासारखं होतं, पण आज मात्र फ़्रेश वाटत होतं. कुणास ठाऊक, पण काल
रात्री असलेली अस्वस्थता, टेन्शन नाहीसं झालं होतं, किंवा जाणवेनासं झालं
होतं. आज आपण नक्की घरी पोहोचणार असं कुठेतरी वाटत होतं. आतला आवाज यालाच
म्हणतात का? थोडावेळ तिथेच बसून विचार करत बसलो. "काल हाईक एंजॉय करायला
सगळे आलो होतो, आणि माझ्या अशा हरवण्यामुळे लॅबमधल्या सगळ्यांचा रसभंग
झाला असणार. मी इथे सुखरूप आहे, पण त्यांना हे कळवणार तरी कसं? कदीर
सुखरूप आहे नं? की तोही मला शोधत असेल? ते काही नाही. आता पूर्ण दिवस पडला
आहे. तेव्हा, कसंही करून इथून बाहेर रस्त्यापर्यंत पोहोचायचं. ए.टी.एम
कार्ड आहेच. शिवाय तीस-पस्तीस डॉलर्सची कॅश आहे. लॉस ऍन्जेलिसपर्यंत
पोहोचायला एवढी कॅश सहज पुरेल."

तेवढ्यात आकाशातून एक हेलिकॉप्टर माझ्या जागेच्या भोवती फिरताना दिसलं.
"हे मलाच तर शोधत नसतील?...कसं शक्य आहे? त्यांना काय माहित की मी
हरवलोय?...पण ९११ला फोन केला असेल तर पाठवलं असेलही हेलिकॉप्टर... बाप
रे!..केवढं रामायण घडलंय हे माझ्यामुळे!.." मी टॉर्च सुरू करून
हेलिकॉप्टरचा वेध घेत दिवा दाखवू लागलो. पण काही फरक पडला नव्हता. "मला
उगीचच वाटलं की हे आपल्याला शोधताहेत. कदाचित या माउंटन्सच्या
मेंटेनन्सचाच भाग असेल हा. दररोज अशा फेर्‍या मारत असतीलही. आपल्याला काय
माहित? पण हे इथे फेर्‍या मारताहेत तोवर पाणी मिळतंय का कुठे, ते पाहून
घेऊ पटकन. यांचा वेध घेत घेत पुन्हा या जागेवर येता येईलच." असा विचार
केला आणि जवळपास कुठे पाणी मिळतंय का ते शोधू लागलो. "काल रस्ता चुकलो
तेव्हा एक झरा दिसला होता. कुठल्या बाजूला होता तो?... इथे असेल कदाचित.."
मी झरा शोधण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.

पंधरा-वीस मिनिटं फिरून पुन्हा कालच्या जागेवर जायला निघालो. तेवढ्यात
काही माणसांची चाहूल लागली. मी इकडे तिकडे पाहिलं. "बहुतेक आपण ट्रेलच्या
जवळच आहोत. हे लोकं ट्रेलवर असणार. त्यांना विचारता येईल मॅरियन माउंटनला
परतण्याचा रस्ता." मी त्या चाहुलीचा वेध घेत चालायला लागलो. साधारणपणे
तीस-चाळीस फुटांवर दोन माणसं युनिफ़ॉर्ममध्ये दिसले. मी त्यांना रस्ता
विचारण्यासाठी "हॅलो" केलं, त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं. ते माझ्याकडे
येत होते, मी त्यांच्याकडे चालत होतो. क्षणाचाही विलंब न करता मी बोललो.
"हाय, गुड मॉर्निंग. इज धिस द ट्रेल फ़ॉर सॅन हॅसिंटो पीक? ऍक्च्युली आय
हॅड कम हियर यस्टर्डे, बट लॉस्ट माय वे बॅक टु मॅरियन माउंटन." मी हे
पूर्ण बोलेपर्यंत "हाच तो हरवलेला मनुष्य" असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर
दिसले. त्यांनी माझी चौकशी केली आणि तो मीच असल्याची त्यांना खात्री पटली.
रिव्हरसाईड माउंटन रेस्क्यु युनिटचे सदस्य होते ते. माझी विचारपूस केली.
ट्रेलमिक्स, कुकीज मला ऑफ़र केल्या. मला तहान लागली असल्यामुळे ते काही न
घेता मी पाणी प्यायलो. त्यांचे आभार मानले आणि सांगितलं, की मी फ़्रेश आहे
आणि चालत चालत खालपर्यंत मला जाता येईल, फक्त रस्ता सांगा.

माझ्या हातापायांवर खरचटलेलं पाहून त्यांनी मात्र मला तसं करू दिलं
नाही. एक हेलिकॉप्टर येऊन मला इथून योग्य ठिकाणी घेऊन जाईल असं त्यांनी
मला सांगितलं..."बाप रे! हेलिकॉप्टर!..मला परवडणार नाही.." मी ही समस्या
सांगितली. शिवाय, मी चालण्याच्या स्थितीत आहे हे समजावण्याचा प्रयत्न
केला. पण मला इष्टस्थळी सुखरूप पोहोचवण्याची त्यांची जबाबदारी होती
त्यामुळे त्यांनी ऐकलं नाही. मलाही गिल्टी वाटत असल्यामुळे मी फार ताणलं
नाही. त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये कसं चढायचं, इ. गोष्टी सांगितल्या.
हेलिकॉप्टर आलं, मला त्यात चढवलं आणि ते सुरू झालं. मघाशी आकाशात फेर्‍या
मारणारं हेलिकॉप्टर माझ्या शोधातच होतं असं तेव्हा कळलं. काल माझ्या
सेलफोनवर आलेल्या कॉल्सवरून ते मला ट्रेस करण्याचा प्रयत्न प्रयत्न करत
होते हेही तेव्हा कळलं. हेलिकॉप्टरमध्येही माझ्या तब्येतीची, तहान-भुकेची
आस्थेनं चौकशी केली आणि जवळच्याच शेरिफ़ ऑफ़िसबाहेर हेलिकॉप्टर थांबलं.

तिथे एक शेरिफ़ मला रिसीव्ह करायला सज्ज होता. त्यांनीही माझी विचारपूस
केली, "डु यु वॉंट टु टॉक टु ऍना क्रिलाव?" इति शेरिफ़. मी - "येस श्युअर.
थँक यु सो मच!" प्रो. क्रिलाव यांच्याशी फोनवर बोललो, तेव्हा त्यांनीच
माझी माफ़ी मागितली! मलाच इतकं गिल्टी वाटत होतं. मीसुद्धा त्यांची माफ़ी
मागितली, आणि माझी चिंता करू नका, मी सुखरूप आहे असं सांगितलं. मी हरवलो
होतो म्हणून त्या आणि त्यांचा बॉय फ़्रेंड (ज्ये) जवळच्याच शहरात थांबले
होते रात्रभर. त्यांनी शेरीफ़शी बोलून मला रिसीव्ह करण्याचं ठिकाण ठरवलं.
मग तिथून मुख्य शेरिफ़ कार्यालयात मला नेलं. तिथे प्रो. क्रिलाव येईपर्यंत
मला आराम करायला एका खोलीत बसवलं. "थंडी वाजत असल्यास त्यातलं एक जॅकेट
घाला" असं जॅकेट्सकडे बोट दाखवून तिथल्या ऑफ़िसरने मला सांगितलं. मला ज्यूस
ऑफ़र केला. "भूक लागली आहे का?" अशी चौकशी केली. ज्यूस घेऊन मी बसल्या जागी
झोपी गेलो.

तासाभरात प्रो. क्रिलाव आणि ज्ये तिथे पोहोचले. मला सुखरूप पाहून
त्यांचा जीव भांड्यात पडला. माझ्याही जीवात जीव आला. त्यांनी आल्या आल्या
मला हग केलं आणि माझी माफ़ी मागितली. "खरंतर मीच तुमची माफ़ी मागायला हवी.
माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला, सगळ्यांनाच त्रास झाला." असं मी
त्यांना म्हणालो. "तू सुखरूप आहेस, हेच माझ्यासाठी खूप आहे," - प्रो.
क्रिलाव. तिथल्या ऑफ़िसर्सचे आभार मानून आम्ही तिघं तिथून बाहेर पडलो.

त्यानंतर प्रो. क्रिलाव व ज्ये मला जेवायला घेऊन गेले. मी शाकाहारी
असल्यामुळे एका शाकाहारी रेस्टोरंटमध्ये ते घेऊन गेले. तिथून प्रो.
क्रिलाव यांनी लॅबमध्ये फोन लावला आणि सर्व लॅबमेट्सशी माझ्या गप्पा करून
दिल्या. कदीरशी बोलणं झालं. त्याची माफ़ी मागितली. माझ्यामुळे तो आणि एलिज़ा
किती चिंतित असतील याची कल्पना होती. सगळ्यांशी बोलून हायसं वाटलं.
जेवणानंतर मला घरापर्यंत सोडून नंतर ते घरी गेले. घरी पोहोचल्यावर मी
सेलफोन चार्ज करायला लावला आणि अंघोळीला गेलो. अंघोळीनंतर काल रात्रभर न
जाणवलेल्या जखमा, थकवा आपलं अस्तित्व दाखवू लागले आणि तब्बल चार तास
झोपलो. झोपून उठलो तेव्हा लॅबमेट्स आणि युनिव्हर्सिटीतली मित्रमंडळी यांचे
बरेच व्हॉईस मेसेजेस सेलफोनमध्ये आले होते. त्यांना सर्वांना संपर्क करून
मी परतल्याची बातमी दिली.

माउंटन रेस्क्यु युनिट, शेरीफ़, प्रो. क्रिलाव, माझे लॅबमेट्स आणि
मित्रमंडळी, या सर्वांनी या दोन दिवसांत ज्या आस्थेनं माझ्यासाठी एवढं
सगळं केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. ते नसते, तर
कदाचित आज मी नसतो. "अमेरिकेत काय आवडलं?" असं कुणी विचारलं तर "तिथली
लोकं, त्यांचं प्रेम आणि त्यांच्या वागण्याबोलण्यातली तेहजीब, अदब" हे आणि
हेच उत्तर असेल माझं.

सलाम अमेरिका!

(टीपः मूळ प्रकाशन "लेखणीतली शाई" या माझ्या ब्लॉगवर तीन भागांमध्ये केलंय.)