डोंट लूज युवर माईंड लूज युवर वेट : पुस्तक परिचय

     खा अन वजन कमी करा असं कोणी म्हटलं तर एखादं शेंबडं पोरही आपल्याला वेड्यात काढेल पण असं  ऋजुता दिवेकर सांगत असेल तर तिला वेड्यात काढू शकणार नाही कारण ती आहे २००५ वैयक्तिक प्रशिक्षक पुरस्कार विजेती. ऋजुता आहारतज्ञ, खेळ व योग तज्ञ तर आहेच पण लेखिका म्हणून आपल्या समोर येतेय, नाही, आलीये ' डोंट लूज युवर माईंड लूज युवर वेट' ह्या पुस्तकाद्वारे. सध्या विकम्री खपाच्या यादीत ह्या पुस्तकाचे नाव आहे. टशन मधील बिकीनीतील करीना कपूर डोळ्यासमोर आणा तिचा हा शून्य बांधा करण्यात ऋजुताचा सिंहाचा वाटा आहे.   ती करीना कपूरशिवाय इतरही चित्रपटसृष्टीतील तार-तारकांची, अनिल अंबानी व कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या बड्या-बड्या मंडळींचीही मार्गदर्शक व प्रशिक्षक आहे.

     'योग्य वेळी योग्य प्रमाणात खा' तसेच  'इट लोकल थिंक ग्लोबल' असे दोन तत्त्व सांगितले आहेत ज्यावर आधारीत आपला आहार असायला हवा.'अति सर्वत्र वर्जयते'  कमी खाणे किंवा अति कमी खाणे, नुसतंच एखादं धान्य किंवा फळ खाणं किंवा फळांचे रस (त्यापेक्षा अख्ख फळ खावे) असे नसते खूळ (फॅड) आहे. शरीराला आहारात असलेल्या  सगळ्या जीवनपोषक द्रव्यांची आवश्यकता असते. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर आहार असायला हवा. ज्याप्रमाणे गाडीला जास्त दूर जायचं असेल तर जास्त इंधन टाकावे लागते त्याप्रमाणेच ज्यादिवशी खूप धावपळ/दगदग/काम त्यादिवशी भरपूर खा.   शुगरफ्री सारख्या पदार्थ गोड करणाऱ्या  गोळ्यांच्या नियमित सेवनाने अनेक रोग उद्भवू शकतात.बेकरी पदार्थ शक्यतो टाळा. नुसतेच पदार्थातले उष्मांक मोजण्यापेक्षा त्यातील पोषक द्रव्ये मोजा. पनीर पराठा व पिझ्झा मध्ये सारखेच उष्मांक आहेत पण पनीर पराठा जास्त पौष्टिक आहे.   पार्टीत डायट आहे हे तर सांगू नकाच शिवाय पार्टीचा व जेवणाचा आस्वाद मनसोक्त घ्या अपराधी भावनेने जेवू नका.   आपल्यावर अन्न संस्कार गर्भात असतानाच होत असतात म्हणून तुम्ही महाराष्ट्रीय असाल तर महाराष्ट्रीय पद्धतीच पंजाबी असाल तर पंजाबी पद्धतीच दोन वेळच्या जेवणापैकी एकवेळेला घ्यायला हवं. दक्षिणेत गेलात तर एक वेळच जेवण तिथल्या पद्धतीच करा.   टीव्ही समोर बसून जेवू नका, मांडी घालून जेवा, हे सगळं घ्यानात घेऊन आपली दिनचर्या व आहार ठेवला तर वजन नक्की कमी होतं. ही  तत्त्व  हे सगळं सांभाळायचं, पाळायचं कसं ते सांगितलंय पाच प्रकरणामध्ये.

     डाएट म्हणजे काय? आहाराबद्दलचे समज गैरसमज कोणते?   सगळंच लो फॅट/लो कॅलरी, भाजलेलं किंवा हर्बल योग्य असतंच असं नाही. सगळेच खाद्यपदार्थ चांगलेच असतात कदाचित तुमच्या प्रकृतीसाठी एखादा पदार्थ चांगला किंवा वाईट असू शकतो. व्यायामाला पर्याय नाही. किती, केव्हा, कसा व्यायाम करायला पाहिजे?   आहाराची व व्यायामाची योग्य सांगड घातल्या गेली तर नक्की वजन कमी होतं का? इत्यादी प्रश्नांची उकल वैज्ञानिक दृष्टिकोनातून केली आहे.

     काय खायचं हे तर कळलं पण कसं खायचं हे नव्याने शिका. मांडी घालून जेवल्यामुळे रक्त पुरवठा पोटाकडे जातो त्यामुळे अन्नपचन चांगलं होतं. पाचही ज्ञानेंद्रियाने आस्वाद घेत शांत चित्ताने जेवा. थोडं शिजवा म्हणजे कमी खाल्ल्या जाईल शिवाय ताजंही मिळेल. शितपेटीत ठेवलेलं अन्न निकृष्ट होत जातं. सकाळी सात ते दहा ह्या वेळेत खाल्लेल्या अन्नाच पचन उत्तम प्रकारे होतं.

     तिसऱ्या प्रकरणात कर्बोदके, प्रथिने, खनिजे, चरबी व पाणी ह्यांचं महत्त्व व त्यांचे कार्य हे छान समजावून सांगितलं आहे. ही सगळी जीवनसत्त्व योग्य प्रमाणात न मिळाल्यास रोगांना आमंत्रणच आहे.

     सगळ्यात महत्त्वाचं चवथं प्रकरण आहे ज्यात आहाराची चार मूलभूत तत्त्वे सांगितली आहे आणि ह्या तत्त्वांचे फायदे तर सांगितलेच आहेत त्याचबरोबर अमलात कसे आणायचे हेही सांगितले आहे.   पहिलंच तत्त्व बहुतेकांना अमलात आणण्यास नक्कीच अवघड वाटेल असं आहे, ते म्हणजे सकाळी उठल्याबरोबर चहा कॉफी पिऊ नका त्याऐवजी अन्नपदार्थ खा. दुसरं  तत्त्व आहे दर दोन तासांनी खा. कोणते पदार्थ किती व केव्हा खायचे कसे खायचे त्यासाठी अनेक पर्याय दिले आहे. आपल्या दिनचर्येनुसार आहार ठरवावा. शेवटचे तत्त्व आहे जेवल्यानंतर दोन तासांनी झोपा. रात्रीच्या जेवणाची उत्तम वेळ आहे सहा ते साडेसहाच्या दरम्यान.

     पाचव्या प्रकाणात तंदुरुस्त राहण्यासाठी सहा नियम दिले आहे. लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य मिळे, उठल्याबरोबर दहा मिनिटात काहीतरी पौष्टिक खा, सूर्यास्तानंतर दोन तासाच्या आत जेवा,   ताजं घरंच अन्न खा. दर दोन तासांनी जेवा. आपल्या पोटाची क्षमता कमी असते म्हणून कमी खावं जेणेकरून कमी खाल्लेल्या अन्नाचं पचन पुर्णपणे होऊन चरबी साठणार नाही.

     करीना कपूरची प्रस्तावना असलेलं हे पुस्तक खास मराठमोळ्या इंग्रजीत, हिंदी भुरभुरलेलं. पुस्तक वाचताना असं वाटतं की आपण एखाद्या आध्यात्मिक मैत्रिणीशी गप्पाच मारतोय. पुस्तक वाचण्याची सुरुवात कुठूनही करता येते. मी तर  शेवटची पुरवणीच आधी वाचली कारण ह्या पुरवणीत करीनाच्या झीरो फिगरचं रहस्य उलगडलंय आणि तेही पिझ्झा व मोमोज खाऊन. वर्तमानपत्रात आधी जाड, नंतर बारीक असे एखाद्या ग्राहकाचे छायाचित्रे देऊन अनेक कंपन्यांच्या जाहिराती बघायला मिळतात त्याला लोकं भुलून स्वतःचे कसे नुकसान करून घेतात हा अनुभव डोळे उघडणारा आहे. मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक एकदा तरी वाचायलाच आणि संग्रही असायला हरकत नाही.