गेल्या वर्षीची गोष्ट. मित्राने फोनवरून सांगितलं, की 'जसराज यंदा दुपारी गाणारेत'. त्यात 'दुपारी' वर जोर होता. आणि मित्रानं आग्रह केला यायचा. तसा मला जायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण लगेच दुसऱ्या दिवशी चेन्नईला जायला निघायचं होतं, त्यामुळे थोडंसं अनिश्चित असल्याचं मी त्याला सांगितलं. पण तो म्हणाला, ' अरे लेका, त्यांचा दुपारचा एखादा राग लाईव्ह ऐकून जाशील की. बघ, जमव यायचं.' मी विचार केला, आणि साताऱ्याहून शनिवारी पुण्यात आलो.
दिनांक १४-१२०२००८ रविवार, स्थळ- रमणबाग शाळेचे मैदान, पुणे. वेळ : दुपारी साधारणपणे १२ ची.
पांढरे कुरळे केस, पानामुळे लाल झालेले ओठ, गळ्यात मोती-पोवळ्याची एक माळ, रेशमी धोतर, वर रेशमी सदरा, जॅकिट. दोन्ही हात वर जातात, 'जय हो' चा घोष होतो आणि श्रोतृवृंदाचा टाळ्यांचा कडकडाट!!
गेल्या अनेक वर्षांत हे वरील चित्र संध्याकाळी किंबहुना रात्रीच्या वेळीच दिसत आलंय सगळ्या शास्त्रीय संगीतप्रेमींना. पण ह्या वेळी भर दुपारी हे चित्र असल्याने, एखादा दुपारचा खासा राग ऐकायला मिळणार ह्या कल्पनेनंच सगळे खुष.
सुरुवात झाली. "जय हो, जय हो. पंचों में परमेश्वर, जनता मे जनार्दन! आप सब में वो विराजमान है, जिसे हम आत्मा कहते है. 'उस' की परमात्मा है, 'हमारी' आत्मा है. आप सब में, जो भी नाम से आप याद करते हो, वो परमात्मा बिराजमान है, हमारे स्टेज की ओर से आप सबों को प्रणाम. (टाळ्या). राग शुद्ध सारंग से शुरुवात करता हूं. " पुनश्च टाळ्या, आणि रागाचे नांव ऐकल्या ऐकल्या 'वा वा' असे सहजोद्गार. (इथे मला पु. लं. च्या मी आणि माझा शत्रुपक्षाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. कलाकाराने शुद्ध सारंग च्या ऐवजी भटियार, ब्रिंदाबनी सारंग किंवा कुठल्याही रागाचं नाव घेतलं तरी सगळे वाह वाह असंच म्हणणार) असो. पण त्या वाह वाह मध्ये 'गेल्या ३ वर्षात,२ वेळा दरबारी कानडा ऐकून झालाय, आणि गेल्या वर्षी जयजयवंती, त्यामुळे ह्या वेळी दुपारचा राग आणि मग त्याच रागाच्या आलापींमध्ये येणारे खर्जातले टिपिकल स्वर ऐकायला मिळणार' हा आनंद माझ्या नजरेतून (सॉरी कानातून) सुटला नाही.
गायन सुरू झालं. "मङ्गलं भगवान विष्णुः...... मङ्गलायतनो हरिः" शुद्ध सारंगच्या स्वरांत ही पेटंट प्रार्थना (जिला 'सिग्नेचर प्रेअर' असंही म्हणतात) आळवली गेली, आणि मग विलंबित बंदिशीचे सूर ऐकू येऊ लागले. जसराजांचा घनगंभीर आवाज, तितकेच घनगंभीर झालेलं वातावरण, आणि मग मेघगर्जना व्हावी तसा तबल्यावर पडलेला पहिल्या समेचा 'धा'!! ननंतर जवळपास अर्धा-पाऊण तास सगळ्यांचे कान शुद्ध सारंगाच्या विलंबित बंदिशीतील सुरांनी तृप्त झाले आणि मग मध्यलय तीनतालात, ''जावो जी जावो श्याम छलिया, मोरे मन की न जाने, औरन सो रंगरलिया'' ही बंदिश सुरू झाली. ह्यातही 'छलिया' म्हणताना 'छऽलिऽयाऽ' आणि 'रंगरलिया' मध्ये 'र' वरच्या अनुस्वाराने सहज उपलब्ध करून दिलेल्या जागेवरची तान ठळकपणे जाणवत होती. पुढे 'मोरे मन की न जाने' मधील 'तिची' तक्रार आणि 'औरन सो रंगरलिया' मध्ये स्वर चढा लागल्याने जाणवणारा 'तिचा' राग खूपच अप्रतिम व्यक्त होत होता. आणि पुन्हा मुखड्याची 'जावो जी जावो श्याम छलिया' ही ओळ आली, की त्यातल्या 'छलिया' ह्या शब्दालाही ती वेगळी छटा जाणवत होती. मध्यलयीतल्या बंदिशीत सरगम सुरू झाली आणि अनेकदा उत्स्फूर्तपणे टाळ्या आल्या. हा संगीतमार्तंड भर दुपारच्या रागातल्या स्वरांनी प्रखर झाला होता. पण ती प्रखरता तृप्त करणारी होती. आणि त्या तृप्तीलाही कुठेतरी 'आता हा राग थोड्याच वेळात संपेल' ह्या अतृप्तीचं गालबोट होतं. अंतरा सुरू झाला तशी लय हळू हळू वाढली. एकामागून एक ताना सुरू झाल्या, वातावरण अजूनच भारून गेलं होतं. (लाईव्ह ऐकण्यात हीच मजा असते. ते वातावरणच भन्नाट असतं एकूण). 'जावो जी जावो श्याम' अशी तिहाई झाली आणि तो राग वातावरणात बराच वेळ आपलं अस्तित्व मागे ठेवत संपला.
दुपारचं सत्र असल्याने वेळेचं बंधन अजिबातच नव्हतं. आणि ह्याननंतर कुणाचंही गायन/वादन नव्हतं त्यामुळे तर दुधात साखरच.
खरं तर एखादा राग ऐकून झाला, की त्याच्या स्वर-लयीतून लवकर बाहेर येताच येत नाही. त्यामुळे पुढचं काहीही ऐकायचं म्हणजे मन थोडंसं नाखुषीनंच तयार होतं. ही जर ऐकणाऱ्याची गत, तर गाणाऱ्याचं काय होत असेल? पण शास्त्रीय संगीत ही अशी एक जादू आहे, की जिचा कधीच कंटाळा येत नाही. त्यामुळे सगळेच कान पुन्हा पुढच्या श्रवणासाठी सरसावले. पुढे राग (बहुतेक) भैरव मधील भजन होतं. 'शिवं शङ्करं शम्भुमीशानमीडे' असे त्याचे बोल होते. जवळपास वीसेक मिनिटे हे भजन झालं, मग श्रीकांतराव देशपांडे कुठे आहेत हा शोध झाला, ते नाहीत ह्याचा अर्थ 'चालू द्या' असा सगळ्यांनीच घेतला, आणि पुन्हा सगळे कान सिद्ध झाले. 'गोविन्दं गोकुलानन्दं'' अशी सुरुवात झाल्याबरोबर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ! गेली कित्येक वर्षं हे भजन, 'गोविन्द दामोदर माधवेति', अनेकांच्या कानी-मनी विराजमान आहे. जितकी अप्रतिम ह्यातली भक्तिभावना आहे, त्याच तोडीची चाल आणि सूर ह्या भजनाला मिळालेत. एखादी कलाकृतीच अशी असते की जिथं सगळ्याच बाजू 'जमून आलेल्या' असतात. गोविन्द दामोदर हे भजन त्याचंच एक उदाहरण. बहुतेक ते दरवर्षी सादर होतं. पण खरोखरीच, दर वर्षी एक वेगळाच अनुभव देणारं असतं. अगदी पहिल्यांदा जेव्हा मी हे भजन लाईव्ह ऐकलं होतं, तेव्हाची आठवण आहे- दरबारी कानड्यात 'अजब तेरी दुनिया' गाऊन झाल्यावर जसराजांनी ह्या भजनानं कार्यक्रमाची सांगता केली. आम्ही गर्दीत घुसून त्यांना भेटायला गेलो, आणि त्यांना भेटू शकलोही. पण बोलणार काय? आम्ही फक्त त्यांना नमस्कार केला. पण ते दोन क्षण मात्र अविस्मरणीयच. त्याननंतर मी हे भजन सलग तीन वर्षें ऐकलं आहे, पण का कुणास ठाऊक 'ते' पहिल्या वेळचं ऐकलेलं भजन आणि त्याचे सूर मनात पक्के आहेत. त्यामुळे कधीही हे भजन ऐकलं की तो दिवस, तो प्रसंग आठवतो.
ह्याही वेळी 'गोविन्द दामोदर' ने मैफिलीची सांगता झाली. मला दुसऱ्या दिवशी माझ्या नव्या नोकरीत हजर होण्यासाठी चेन्नईला जायला निघायचं होतं. त्यामुळे हा शुद्ध सारंग माझ्यासाठी अविस्मरणीयच ठरला. ते सूर कानात साठवून घेऊनच, पुण्याला यायचा आग्रह करणाऱ्या मित्राला मनोमन धन्यवाद देतच मी निघालो.
आज हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे, तोच शुद्ध सारंग मी आज ऐकला. त्यावेळी आम्ही तो रेकॉर्ड केला होता, त्यानंतर एक-दोनदाच तो ऐकला होता, पण पुन्हा तो ऐकणं काही झालं नव्हतं. ते आज ऑफिसमध्ये काम कमी असल्याने होऊ शकलं . हातातलं चालू असलेलं काम मी काही वेळ थांबवलंच. मग आमच्या ओडीसीबाहेर जाऊन, राग पूर्ण ऐकून मगच आलो. आत्ता सप्टेंबर चालू आहे, अजून दोनच महिने बाकी आहेत ह्या वर्षीच्या 'सवाई' साठी.तसा २ महिने हा काळ खूप मोठा आहे, पण आज हा राग ऐकला म्हणून त्याचे वेध लागलेत. ह्या वेळी डिसेंबर मध्ये सुटी मिळेल की नाही हेही ठाऊक नाहीच. पण शनि-रवी सुटी असतेच, तेव्हा अगदीच पुण्याला येणं अशक्य नाही होणार. आणि येईलच एखाद्या मित्राचा आग्रहाचा फोन.