भरली मिरची

  • सहा मोठ्या मिरच्या
  • तीन मोठे चमचे बेसन खमंग भाजून
  • दोन मोठे चमचे कोरडे खोबरे भाजून पूड करून
  • एक मोठा चमचा बडीशोप भाजून पूड करून
  • एक चमचा धणेजिरे पूड, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला व हिंग
  • चवीपुरते मीठ, एक चमचा साखर,
  • एक मोठी लसूण पाकळी, तीन मोठे चमचे लिंबाचा रस. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
  • चार चमचे तेल
३० मिनिटे
तीन माणसांकरीता.

गडद हिरव्या रंगाच्या थोड्या जाडसर व जास्त तिखट असलेल्या  मिरच्या घ्याव्यात.  देठ तसेच ठेवून मध्ये चीर देऊन सगळ्या बिया काढून टाकाव्यात. ( तिखटपणा कमी हवा असेल तर पोपटी- हिरवा रंग असलेल्या मिरच्या घ्याव्यात. ) नंतर अर्धा चमचा तेलात चिमूटभर मीठ व अर्धा चमचा लिंबाचा रस खलून ते या मिरच्यांना चोळून ठेवावे. मध्यम आचेवर बेसन कोरडेच  खमंग भाजावे. कोरडे खोबरे, बडीशोप भाजून घेऊन त्यात लसणाची पाकळी  घालून दोन-तीन चमचे पाणी घालून वाटून घ्यावे. एका भांड्यात बेसन, खोबरे- बडीशोप-लसूण पाकळीचे वाटण, धणेजिरे पूड, साखर, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला, हिंग, साखर व चवीनुसार मीठ व मावेल इतपतच पाणी घालून ( फार सैल नाही परंतु घट्टही नाही ) कालवून घ्यावे. हलक्या हाताने मिरच्यांमध्ये नीट भरावे. ( पोकळ/कमी भरू नये ) एका नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तेल घालून सगळ्या मिरच्या सहज उलटता येतील अश्या लावाव्यात. बाजूने व वरून थोडे तेल सोडून झाकण ठेवावे. सात-आठ मिनिटांनी उलटवाव्यात मात्र झाकण ठेवू नये. पुन्हा पाच मिनिटांनी कुशीवर वळवून ठेवून थोडे तेल सोडावे. दोन्ही बाजूने किंचित लागल्या की लगेच उतराव्यात.
भरली मिरची

तोंडीलावणे म्हणून चांगलेच आहे परंतु एखादेवेळी भाजी कमी असेल किंवा अजिबात नसेलच तर या मिरच्या उणीव भरून काढतील.