कधी करावी सकाळ हा कारभार सूर्याकडे नसावा
दिलाच चंद्रास हक्क तो तर प्रकाश चंद्राकडे नसावा
अरुंद वाटेवरून गाडी पुढे पुढे रेट जीवनाची
अजातशत्रू बनायचा राजमार्ग दैवाकडे नसावा
सकाळ होताच वाटते की असा कसा काल वागलो मी
('असेनही मी उद्या' असा दृष्टिकोन माझ्याकडे नसावा)
जगात मंदी असूनही तू नफ्यात येणे अशक्य नाही
तुझ्याकडे मी जसा, तसा मांडलीक कोणाकडे नसावा
ठरेल तेव्हा ठरेल माझे तुझ्या सुगंधी मिठीत येणे
सदैव माझ्याकडेच संयम... तुझ्या सुगंधाकडे नसावा?
हिशोब झाले मनाप्रमाणे, जुनेच नाते सजीव केले
नवीन नातेच शोधणे हा उपाय अपुल्याकडे नसावा
कधी तरी साजरे करा 'बेफिकीर'सुद्धा जगात आहे
असे न होवो.. सुचेल तुम्हास आणि तुमच्याकडे नसावा
-सविनय
'बेफिकीर'!