स्पर्श

ना रंग ना आकार
कशालाच अर्थ राहत नाही मग
स्पर्शापुरते जग उरते
धुंदी हवी कशाला
थोडी थरथर
थोडी उष्णता
पोचत्येय मनापर्यंत हळूहळू
अंधाराला सोयरसुतक नाही
या सगळ्या उठाठेवींचं
अंधारातला स्पर्श
चाचपडता अडखळता
हमखास वाट चुकणारा
तरीही भावना मात्र तिच
एकटेपणाची
आधार वाट चुकल्या स्पर्शाचा
स्पर्शापुरते जग उरते
धुंदी हवी कशाला
अनोखाच थाटमाट
बिनरंगी
बिनढंगी
स्पर्शापलीकडून अर्थ येत असतात
ते मात्र कळतात
थोडेसे स्वर
थोडेसे श्वास
पोचतात मनापर्यंत...
स्पर्श, हे एकच ज्ञानेंद्रिय
तापत्या उन्हात हातोडा उचलणारे
पाथरवटाचे हात
धन्याला भाकरी घेऊन
वितळत्या डांबरी रस्त्यावरून
चटचट चालणारी कुणी नववधू
सगळं दिसून
सगळं कळून
अंधार असतो
स्पर्शापलीकडून अर्थच येत नाहीत कारण
येतं ते फक्त
खडीचा टवका उडून, रक्त
स्पर्शापुरते जग उरते
धुंदी हवी कशाला
अंधाराचा अनोखाच थाटमाट
बिनरंगी
बिनढंगी

ग्रामिण मुंबईकर
००.४८ ए. एम
९ ऑक्टो ०९