शेरास सव्वाशेर - सत्यकथा ४

अकबर बादशहाच्या पदरी नवरत्न दरबार होता. ही नवरत्ने आपापल्या क्षेत्रात हुशार होती. त्यात बिरबल हा अत्यंत हजरजवाबी व तल्लख बुद्धीचा सरदार होता. राजाला कधीही कांहीही अडचण आली की तो आपल्या अक्कलहुशारीने त्यातून मार्ग काढावयाचा व राजाला

संकटातून सोडवावयाचा.त्यामुळे कितीही अट्टल चोर असला तरी बिरबलाच्या हातून कधीच सुटत नसे. माणूस स्वतःला  कितीही  हुशार  समजत असला तरी त्यावर मात करणारा कोणीतरी असतोच. अशाच एका अट्टल चोराची ही सत्यकथा आपले मन चक्रावून टाकेल.

धनंजय थिटे आपल्या पत्नीबरोबर पुण्यात सुखाने राहत होते. त्यांचा पुण्यात बंगला डेक्कन जिमखान्यावर आहे. त्यांचा व्यवसाय झेरॉक्स मशिन्स विकण्याचा आहे. ते एका नामांकित झेरॉक्स कंपनीचे पुण्यातील डिलर आहेत. त्याना व्यवसाय निमित्त खूप प्रवास करावा  लागत असे. जसा व्यवसाय वाढू लागला तसा त्यानी आपल्या धंद्यात बंगलोर येथील एक श्री. के. रमेश नावाचा पार्टनर घेतला. तो बंगलोर येथील व्यवसाय सांभाळीत होता. त्या निमित्ताने धनंजयच्या बंगलोर येथे अनेक चकरा होत असत.

असेच एकदा ते २६ जून १९९९ ला बंगलोरला गेले असता रमेश व धनंजय यांची भेट श्री. अनिल मुकर्जी, अमल बसू आणि जयस्वाल यांच्याशीझाली. या भेटीला विशेष कारण होते. वरील तिघेजण झेरॉक्स मशिनरीचे सामान व मशीन सवलतीच्या दरात विकणारे व्यापारी होते. धनंजय थिटे याना अशी सामग्री मोठ्या प्रमाणात घ्यावयाची असल्याने ती खरेदी करताना जर सवलत मिळत असेल तर ती त्याना हवी होतीच.  म्हणूनच त्यानी त्या तिघाबरोबर व्यवहार करण्यात रुची दाखवली होती.

श्री. थिटे यानी या व्यवहारात विशेष रुची दाखवल्याने ते तिघे मनांत खूप खूष झाले होते. हा व्यवहार बंगलोरला व्हावा असा त्या तिघांचा आग्रह होता. पण थिटे व रमेश यांनी हा व्यवहार पुण्यातच व्हावा म्हणून आग्रह धरला. त्यामुळे शेवटी ते तिघे पुण्यात  व्यवहार  करण्यास तयार झाले.पुण्यात आल्यावर थिटे याना फोन करतो असे त्यानी सांगितले. ८ जुलै ९९ ला तिघे पुण्यात आले व पुण्यातील ला मेरिडियन  या पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरले. मग तेथूनच थिटे याना फोन करून आपण पुण्यात आलो आहोत असे कळवले. त्याच बरोबर आर्थिक व्यवहाराचे  त्यांचे बोलणे झाले. त्यावेळी थिटे यांच्याबरोबर थिटे यांचा मित्र रमेशही होता.

झेरॉक्स यंत्राचे सुटे भाग विक्री खरेदी संदर्भातील हा व्यवहार थिटे यानी हॉटेलच्या रूममध्येच करावयाचा असे ठरवले होते. तशी कल्पना त्या  तिघांना दिली होती. ज्या दिवशी हा व्यवहार ठरला होता त्या दिवशी जयस्वाल व रमेश यांची व्यवहाराची बोलणी थिटे यांच्या घरीच झाली. या व्यवहारात श्री. थिटे व रमेश त्या तिघाकडून झेरॉक्स मशिनचे सुटे भाग घेणार होते. त्याची किंमत होती १६.५० लाख रुपये.  ही रक्कम सर्व पाचशेच्या नोटात एका विशिष्ट कंपनीच्या काळ्या रंगाच्या बॅगेत भरून द्यावयाची असे ठरले. ही किंमत थिटे यानी रोख पैशात  त्या तिघाना माल मिळाल्यावर हॉटेलमध्ये द्यावयाची होती. त्याप्रमाणे ९ जुलै रोजी हा व्यवहार करण्याचे ठरले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे थिटे हे  अनुभविक व्यवसायिक होते. त्यानी आत्तापर्यंत लाखो रुपयांचे व्यवहार केले असल्याने त्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी होता.  अशा  व्यवहारात परस्परावर विश्वास ठेवूनच वागावे लागते याची त्याना जाणीव होती. म्हणून माल मिळाल्याची खात्री करून रमेश थिटेना  हॉटेल मध्ये फोन करणार होता. त्यानंतर थिटे त्यांचे पेमेंट करणार होते. ९ जुलै रोजीसकाळी दहा वाजण्याच्या सुमारास थिटे पैशाची बॅग  घेऊन अनिल मुकर्जी यांच्या हॉटेलमधील खोलीत गेले. त्यावेळी त्या तिघापैकी फक्त मुकर्जी एकटाच त्या रुममध्ये होता.

अशा प्रकारचा आर्थिक व्यवहार थिटे यानी अनेकदा केलेला असल्याने एवढी मोठी रक्कम बरोबर बाळगण्यात त्याना कांहीच गैर वाटल नाही.या व्यवहारात आपली फसवणूक होणार आहे याचा जराही संशय त्यांच्या मनांत आला नाही. थिटे यानी आपण पैसे बरोबर आणले आहेत असे मुकर्जीला सांगितले. मात्र माल मिळाल्यावरच तुम्हाला पैसे देण्यात येतील असेही सुनावले. माल मिळाल्यावर त्यांचा पार्टनर रमेश फोन करणार होता. त्यावेळी मुकर्जीने थिटेना सांगितले की रमेशचा फोन येईपर्यंत मी पैसे मोजून घेतो. थिटे यानी पैशाची बॅग मुकर्जीकडे दिली.  मुकर्जीने पैसे मोजून बघितले. पैसे बरोबर होते. ते पैसे त्या बॅगेत भरुन थिटे याना रमेशला एकदा फोन करून बघा असे सांगितले.  थिटे  फोनमध्ये बिझी आहेत तोपर्यंत मुकर्जीने ती पैशाची बॅग हातचलाखीने बदलली. थिटेनी आणलेल्या बॅगेसारखीच दुसरी बॅग त्या  पैशाच्या  बॅगेच्या जागी ठेवली.थिटेनी जेंव्हा अजून मालाचा ट्रक आला नाही असे सांगितले तेंव्हा मुकर्जी म्हणाला, कदाचित ट्रॅफिकमध्ये अडकला

असेल. मी पैसे मोजले असून ते बरोबर आहेत. मी या बॅगेला कुलुप लावतो कारण एवढे पैसे असे उघड्यावर नेणे चांगले नाही. तुम्ही असे करा, हे पैसे घेऊन घरी जा व माल मिळाल्यावर जयस्वालकडे द्या व व्यवहार पूर्ण करा. असे सांगितल्यावर थिटे मग घरी जाण्यासाठी निघाले. जाताना आपली पैशाची बॅग घेऊन गेले. आपली बॅग बदलली असल्याचे थिटेंच्या लक्षात आले नाही.

आजच्या आज व्यवहार पूर्ण करावयाचाच या निश्चयाने मुकर्जीने हातात दिलेली बॅग घेऊन थिटे घरी आले. तेंव्हा जयस्वाल घरी आलाच नसल्याचे त्याना समजले. त्यांचा मित्र रमेश हा रस्त्यावर जयस्वालची वाट पाहत थांबला होता. जवळपास चार पाच तास वाट पाहून ही जयस्वाल घरी न आल्याने हा सर्व प्रकारच संशयास्पद आहे की काय अशी शंका थिटे याना वाटू लागली. मग पुढच्या कांही मिनिटांतच  ही त्यांची भिती खरी ठरली. त्यानी बॅग उघडून पाहण्याचा प्रयत्न केला. पण बॅगेला मुकर्जीने कुलुप लावले असल्याने ती उघडण्यास त्याना वेळ लागला. बराच प्रयत्न केल्यावर त्या बॅगेचे कुलुप उघडण्यात त्याना यश आले. बॅगेतील पैसे बघताना त्याना असे आढळून आले की नोटांच्या

वरील थप्पीमध्ये फक्त वरच एक पाचशेची नोट असून त्याखाली नोटेच्या आकाराचे कागदाचे तुकडे आहेत. हे सर्व पाहून थिटे चक्रावूनच गेले. आपली चक्क फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

त्यानंतरही एक छोटासा प्रयत्न म्हणून थिटे यानी मुकर्जी ज्या हॉटेलमध्ये उतरला होता, त्या हॉटेलवर फोन केला. मुकर्जी व त्याच्या दोन साथीदारांनी ते हॉटेल सोडल्याचे हॉटेलच्या मॅनेजरने सांगितले. आपल्याला मुकर्जी व त्याच्या दोन साथीदारांनी बेमालूम रित्या गंडवले असल्याचे लक्षात आल्यावर व तशी खात्री पटल्यावर धनंजय थिटे व त्यांचा मित्र रमेश यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात जाऊन तशी रितसर लेखी तक्रार दाखल केली.

सोळा लाखाला टोपी बसल्याने थिटे फारच व्यथित झाले होते. आजपर्यंत त्यानी लाखो रुपयांचे व्यवहार केले होते. पण इतकी घोर फसवणूक प्रथमच झाली होती. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे पोलिस इन्स्पेक्टर विश्वास पाटील यानी फिर्यादी थिटे याना सहानुभूती दाखवत संशयित आरोपींना गजाआड करण्याचे आश्वासन दिले व ते तपासाला लागले. थिटे यानी तिन्ही आरोपींची सविस्तर वर्णने बंडगार्डन पोलिसांना दिली होती. आता पोलिस त्यांच्या पद्धतीने तपासास लागले होते. तर धनंजय व त्यांचा मेव्हणा डॉ. शशांक सामक हे आपल्या परीने आरोपींना हुडकण्याचा प्रयत्न करीत होते. एवढ्या मोठ्या रकमेचा टोला म्हणजे वेड लागायची पाळी थिटे यांच्यावर आली होती. पण त्यांच्यामागे सावलीप्रमाणे उभा असलेला मेव्हणा त्याना धीर व हिंमत देत असे.

वास्तविक पाहता थिटे याना कामानिमित्त नेहमीच बाहेरच्या राज्यात फिरावे लागे. त्यामुळे समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरून त्याच्या एकूण वृत्तीचा व स्वभावाचा अंदाज बांधणं त्याना तस कांहीच अवघड नव्हतं. कारण या व्यवसायाच्या निमित्ताने विविध स्वभावाच्या व्यक्तींशी संपर्क आल्याने एक प्रकारचा परिपक्वपणा थीटे यांच्यात आला होताऽस असतानाही या तिघांनी त्यांची फसवणूक केली याचच दुःख त्याना सलत होत. त्या चोरांनी कांहीच पुरावा मागे न ठेवल्याने त्यांचा माग काढणं मोठ कठीण काम होऊन बसले होते. मग शशांक सामकांनी थिटेना पहिला तपासाचा धागा दिला. त्यानी थिटेना त्या तिघांची प्रथम भेट झाली त्या हॉटेलच्या टेलिफोन कॉलवरून चौकशी करण्यास सांगितले. कारण त्यांच्या बोलण्यात आले होते की व्यवहाराची बोलणी चालू असताना ते पुष्कळ वेळा कलकत्याशी संपर्क साधत होते.

बंडगार्डन पोलिसांनी मुकर्जी, बसू व जयस्वाल या तिघांचाही शोध घेण्या अगोदर त्यांच्या विषयीची बारिकसारीक माहिती मिळवण्यास सुरवात केली. बंगळूर येथे ज्या ठिकाणी तिघांची भेट झाली होती तिथ मुकर्जी, बसू व जयस्वाल याना ओळखणारं किंवा ठावठिकाणा माहित असणार कोणी आहे का याचा शोध घेतला. तसेच हॉटेलच्या रजिष्टर मध्ये काय पत्ता दिला आहे याचा शोध घेतला. त्यावरून ते तिघे कलकत्ता येथे राहणारे आहेत एवढे नक्की कळाले. या कामात थिटे यानी पोलिसाना वेळोवेळी मोलाची मदत केली. त्यानी त्याना फोनचा संदर्भ दिला.

मग बंडगार्डन पोलिसांनी बंगलोर येथे कसून तपासणी करण्याचे ठरविले. त्यानी त्या हॉटेलजवळील सर्व पब्लिक कॉल बूथ जावून तपासली.

जवळ जवळ पंचवीस असे बूथ तपासल्यावर त्यातील आठ टेलिफोन बूथवरून कलकत्याला कॉल केल्याचे आढळून आले. सर्व कॉल एकाच नंबराला केले असल्याने पोलिसांनी मग कलकत्याला जायचे ठरवले. कलकत्याला गेल्यावर पोलिसांनी कलकत्ता पोलिसांची मदत घेतली. त्यावेळी त्याना आढळून आले की मुकर्जी याचे खरे नाव मुकर्जी नसून अमीर -उल- इस्लाम महंमद अहमद शहीद असून त्याचा पार्टनर अशोककुमार जयस्वाल हा आहे. या अमीरला ओळखण्यासाठी थिटे व रमेश पोलिसाबरोबर कलकत्त्याला गेले होते. फोन डिरेक्टरीवरून अमीरचा पत्ता पोलिसांना कळला होता. ते त्या पत्यावर घरी चौकशीसाठी गेले असता तो घरी नव्हता. त्याच्या पत्नीने दार उघडले. पण पोलिसांनी घराचे सर्च वॉरंट आणले असल्याने त्यानी घर तपासून पाहिले. घरात जयललिता सारखे कपाटात अनेक साड्यांचे , पादत्राणांचे सेट पाहवयास मिळाले. तसेच पाचशे रुपयांच्या नोटेच्या आकाराचे कागदाचे गठ्ठे आढळून आले. पण आरोपी घरी नसल्याने पंचाईत झाली. अशोक जयस्वाल हा कलकत्यातील मोठा कापड व्यापारी असून त्याची कलकत्यात तीन मोठी कापड दुकाने होती. त्या दिवशी ते कलकत्याहून दिल्लीला जाण्यास निघणार होते. पोलिस व थिटे अमीरच्या घराजवळ दबा धरून बसले होते. जयस्वाल टॅक्सी घेऊन त्याच्या घराजवळामीरला नेण्यासाठी आला असता पोलिसांनी शिताफीने त्याना जागेवरच पकडले. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याना म्हणजे अशोक जयस्वाल व मुकर्जी याना पोलिसांनी कलकत्ता येथे अटक करून त्यांच्याकडून १० लाख ७० हजार रुपये वसूल केले. धनंजय थिटे यांची फसवणूक करणाऱ्या या दोघांना जेरबंद करून आणल्यावर न्यायालयाने त्याना चौदा दिवसांचा पोलिस रिमांड दिला. या दोघाकडे अधिक चौकशी करता अशाप्रकारे फसवणुकीचे अनेक गुन्हे केल्याची जयस्वाल याने कबुली दिली. या दोघा आरोपींनी यापूर्वी अर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे करून लाखो रुपये कमावले असल्याचे उघडकीस आले.

आपण कितीही हुशार स्वतःला समजत असलो व तसे कांही गुन्हे जरी पचले असले तरी त्याना मात देणारा धनंजय सारखा सव्वाशेर भेटतोच.