शं. रा. भागवत यांचे निधन (बातमी-दै. सकाळ, ८ जून १९६९)

संदर्भ : रविवार सकाळ, ८ जून १९६९    वर्ष :३० वे    (मुखपृष्ठ)

बातमी मथळा - शंकर रामचंद्र भागवत वयाचे ८७व्या वर्षी निधन

पुणे, ता-७ - पूर्वीच्या पुणे नगरपालिकेचे माजी चीफ ऑफिसर श्री. एस. आर. उर्फ अप्पासाहेब भागवत आज सायंकाळी सात वाजता पेरू गेटाजवळील त्यांच्या राहते घरी वार्धक्यामुळे वयाच्या ८७व्या वर्षी निधन पावले. ......

असा आदर्श अधिकारी झाला नाही
कै. आप्पासाहेब भागवत यांच्या निधनानिमित्त पुण कॉर्पोरेशनचे सध्याचे असि. म्युनिसिपल कमिशनर श्री. अनंतराव जाधव सकाळ बातमीदाराजवळ म्हणाले, श्री. आप्पासाहेबांच्या निधनामुळे एक फार मोठा आदर्श अधिकारी व सल्लागार आपणातून काळाने ओढून नेला आहे. आप्पासाहेब १९२० पासून १९३६ पर्यंत पुणे नगरपालिकेचे चीफ ऑफिसर होते. त्यांची वेशभूषा, व्यक्तिमत्व, चारित्र्य, विचार व कार्याची हातोटी पाहिल्यानंतर त्यांच्यासारखा आदर्श अधिकारी झाला नाही असे म्हणावे लागेल. त्यांचा दरारा त्या वेळचे पालिकेचे सभासद अधिकारी, सेवक व नागरीक यांना शेवटपर्यंत वाटत होता. सहकार दरबारातही त्यांना मोठा मान असे. नगरपालिकेच्या त्यावेळच्या कायद्याप्रमाणे फारसे अधिकार नसतानासुद्धा त्यांनी आदर्श कारकीर्द करून दाखविली व नगर पालिकेचा कारभार चोख ठेवला. त्यांनी पालिकेच्या कारभारात कधीही राजकारण आणू दिले नाही. त्यामुळे कारभाराचे पावित्र्य आणि उंची कायम राहिली.
कॉर्पोरेशन कायदा येण्यापूर्वी भट कमिशन पुढे साक्ष देताना ते म्हणाले होते कायदा कितीही आदर्श आणि चांगला केला तरी त्याचे यशापयश तो राबविणाऱ्या माणसावरच अवलंबून असते.
(पान २)
मोठी धरणे न बांधता थोड्या खर्चात पाण्याचा संचय करण्याचा मार्ग त्यांनी दाखविला. पण सरकारी यंत्रणेने त्यांच्या गुणांचे चीज केले नाही. वेळेच्या बाबतीत मिनिटाची चूक झालेली त्यांना सहन होत नसे. नगरपालिकेत नोकरीस असताना दरमहा २००रूपये घरखर्चास देऊन बाकीची सर्व रक्कम सार्वजनिक कार्यात ते खर्च करीत.
स्वल्प खर्चाच्या योजना तयार करून त्या स्वावलंबनाने पार पाडण्याची त्यांची जिद्द विलक्षण होती. पुणे शहराच्या विस्ताराची योजना ४० वर्षांपूर्वी (अंदाजे १९२९ साली) त्यांनी हाती घेतली. लक्ष्मीरोड, टिळकरोड अशी कामे करणे त्यावेळी नवीन वाटत असे. सकाळी ७ ते ९ असे नगराच्या निरनिराळ्या भागात संबंधी अधिकाऱ्यास घेऊन ते पायी हिंडत, गावाची पाहणी करीत. त्यामुळे त्यांचा नोकरवर्गावर मोठा धाक व दबदबा होता.

टीप : इमेज जोडण्याची सुविधा दिसत नसल्याने फोटो देऊ शकत नाही.

कै. शं. रा. भागवत ही कोणी लहानसहान व्यक्ती नव्हती हे समजण्यासाठी ही बातमी दिलेली आहे. म्हणून त्यांच्याबद्दल बोलताना आदराने बोलावे.
अजय जोशी,
पुणे, महाराष्ट्र, भारत.