अविस्मरणीय... !

रोजच्या जवळपास ९-१० तासांच्या कामामुळे दमून जाणारा जीव वीकांताची चातकासारखी वाट बघत असतो.चेन्नईत वीकांत असूनही, इथल्या उष्म्यामुळे जिवाला म्हणावासा आराम मिळत नाहीच. पण समुद्रकिनारी गेलं की मात्र मन प्रफुल्लित होतंच होतं. समुद्राच्या लाटांचा धीर-गंभीर आवाज, रेतीवर कुणाचं तरी नांव लिहायची होणारी इच्छा, पाण्यात पाय बुडवून उभं राहिलं की पायाखालून हळून निसटणारी वाळू, कणीस विकणाऱ्या अण्णाच्या गाडीवरच्या कोळशातून निघणाऱ्या त्या ठिणग्या... आणि ह्याहीपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात कामाचा ताणच नव्हे, तर स्वतःलाही काही क्षण विसरायची मिळणारी संधी...अशी अनेक कारणं आहेत समुद्रकिनारी जायची.

माझं भाग्य हे, की माझ्या कंपनीत १-२ नाही तर चक्क ५ मराठी मित्र-मैत्रिणी मिळाले. माझ्यासारखंच त्यांनाही आवडतं समुद्रकिनारी जाणं. त्यामुळे, समुद्रकिनारी जाऊन, कधी तिथल्या रेतीत किल्ला करणं, कधी पाण्यात पाय बुडवून आठवतील तितकी आवडीची मराठी गाणी म्हणणं हा आमचा प्रत्येक वीकांताचा एक अनिवार्य भाग!

असेच एका शनिवारी, चेन्नईतल्या त्यातल्या त्यात कमी गर्दी असलेल्या थिरुवान्मियूर भागातल्या समुद्रकिनारी आम्ही गेलो होतो. सूर्य नुकताच मावळला होता, आणि आम्ही त्या पश्चिमेच्या लालीचा अनुभव घेत गाणी गुणगुणत पाण्यात पाय बुडवून उभे होतो. समुद्र पूर्वेला आणि किनारा पश्चिमेला.थोड्या वेळाने बाकी सगळीकडे अंधार पसरला आणि पूर्वेकडे (म्हणजे समुद्राच्या दिशेला) सूर्योदयाच्या वेळी दिसतो तसा तांबूस प्रकाश दिसू लागला. हा प्रकाश नक्की कशाचा आहे हे कळायच्या आतच, आमच्यातलच एक ओरडला! अरे चंद्र उगवतोय. आणि आमची गाणी थांबवून आम्ही निसर्गाच्या अनोख्या अनुभवाला सामोरे गेलो?

तो पौर्णिमेचा दिवस होता, आणि साधारण ६-४५ मिनिटांनंतरचा चंद्रोदय होता. आणि आम्ही बरेच आधी, ५-३० च्या दरम्यान समुद्रकिनारी आलो होतो. त्यामुळे चंद्रोदय अगदी सुरुवातीपासून अनुभवू शकलो. आम्ही सगळेच अवाक् होऊन आमच्यासमोरच्या त्या निसर्गाच्या अनेक लीलांपैकी एक असलेल्या लीलेचा भान हरपून अनुभव घेत होतो. पूर्वेच्या दिशेला अगदी हलके हलके असे थोडे ढग होते. (जसे वरच्या चित्रात दिसत आहेत). त्या ढगांमुळे त्या एकूण दृश्याला 'चार चाँद' लागले होते. खरं तर अशा प्रसंगी आपल्या समोरची गोष्ट आपल्या सर्वस्वाचे डोळे करून टिपायची असते, पण मी कॅमेऱ्याच्या डोळ्यांनीही हे दृश्य टिपलं.

चंद्राचा रुपेरी प्रकाश लाटांवर, आणि आमच्या सगळ्यांच्या मनावरही तरंगत होता. आम्ही बराच वेळ शांत, निः शब्द होऊन निसर्गाचा तो अप्रतिम आविष्कार अनुभवत होतो. तिथून निघावं असा विचार तिथे असलेल्या तमाम लोकांपैकी कुणाच्याही मनाला शिवणं शक्यच नव्हतं असं ते वातावरण होतं. सगळेच जण, आपल्याला हे अनुभवायला मिळाल्याबद्दल स्वतःवर खुष झाले होते. मन इतकं प्रसन्न होतं, इतकं प्रसन्न होतं, की ते फक्त प्रसन्नच असू शकतं असं मला वाटलं. अजूनही ही चित्रं पाहिली, किंवा कुणी तरी आज पौर्णिमा आहे असं म्हटलं, तरी माझं मन थिरुवान्मियूरच्या समुद्रकिनारी जातं. पुन्हा पूर्वेकडून येणारी ती लालिमा दिसते, पुन्हा चंद्रोदय होतो. ज्या निसर्गरूपी विराटपुरुषाच्या 'चन्द्रमा मनसो जातः', त्याच्या चरणाशी मी नतमस्तक होतो. लाटंवरचा तो रुपेरी चंद्रप्रकाश मनात प्रसन्नपणे हेलकावे घेऊ लागतो... आणि मी स्वतःच्या ह्या भाग्याबद्दल त्या निसर्गदेवतेचे मनोमन आभार मानतो.