सचिन रमेश तेंडुलकर

२० वर्षे एक असामान्य व्यक्तिमत्त्व पहिल्या
वर्षाच्या पहिल्या दिवसापासून विसाव्या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत*
एकच गोष्ट करत आलय. पण तरीसुद्धा आपल्याला जराही कंटाळा आला नाहीय
किंबहुना हेच तो येती काही वर्षे करत राहो हिच मनोमन प्रार्थना करतोय यातच
त्या व्यक्तीचं मोठेपण सामावलंय. एव्हाना वरचा * म्हणजे Conditions Apply
नसून नाबाद चिन्ह आहे अन मी कोणाबद्दल बोलतोय हे ही चाणाक्ष
क्रिडाप्रेमींच्या लक्षात आलं असेल.

सचिन रमेश तेंडुलकर. बऱ्याच भारतीयांसाठी क्रिकेटमधील देव आणि
इतरांसाठी नंबर वन बॅट्समन. वीस वर्षे सतत खेळून अन करोडो रुपये कमावूनही
ज्याच्या डोक्यात हवा गेली नाही असा माणूस. वीस वर्षात ज्याच्या नावाला
कुठला वाद नावालाही चिकटला नाही असा तुमचा आमचा सचिन. याबाबत मला इच्छा
नसतानाही विनोदचं उदाहरण घ्यावं लागतंय. आचरेकर सरांच्या मते विनोद
गुणवत्तेत सचिनहून थोडा उजवा होता पण तो यश टिकवू शकला नाही. वीस वर्षे
कोणत्याही विवादापासून दूर राहणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नाही. असे खेळाडू
एका हाताच्या बोटावर सोडण्याइतकेच सापडतील.

सचिन तंत्रशुद्ध फलंदाज आहे याबाबत वादच नाही, त्याच बरोबर आक्रमकही
आहे. बचाव आणि आक्रमण यांचा सुरेख मिश्रण त्याच्या खेळात पाहायला मिळतं.
त्याचे चाहते तर अगणित आहेत पण त्याचबरोबर तो स्वत:साठी खेळतो, दबावाखाली
खेळत नाही, तो चांगला finisher नाही असे म्हणणे असणारे देखील अगणित आहेत.
त्याचाच एके काळचा सहकारी संजय मांजरेकर यात आघाडीवर आहे.

या लेखाचा हेतू हा हे मुद्दे खोडून काढणं हा आहे. जी लोकं शतकाच्या जवळ
आल्यावर एकेरी धावा घेऊन शतक पूर्ण करणे याला स्वार्थीपण म्हणतात त्यांना
क्रिकेट कळत नाही असं माझं म्हणणं आहे. भारत सचिन वेगात खेळला तर जिंकला
असता पण सचिनने स्वार्थीपणे हळू खेळून आपले शतक/अर्धशतक पूर्ण केलं अशी
एकही मॅच दाखवा, दाखवणाऱ्याच्या ढेंगांखालून जायला तयार आहे मी. वीस
वर्षांत ८५ हून अधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज स्वार्थी कसा असेल (अन हा
स्ट्राईक रेट तेव्हा पासून आहे जेव्हा ५० षटकांत २२०-२३० धावा पुरेशा असत.
२५० धावा म्हणजे डोक्यावरून पाणी)

दुसरी गोष्ट म्हणजे तो चांगला finisher नाहीय, हा आरोप. तो ५-६ व्या
क्रमांकाचा खेळाडू नाहीय. तो सलामीचा फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक
फळीच्या ठराविक जबाबदाऱ्या असतात. ५-६ व्या क्रमांकाच्या खेळाडूवर फ़िनिशेर
असण्याची जबाबदारी असते. बरं तो जेव्हा जेव्हा बाद झालाय तेव्हा तेव्हा
विजय आवाक्याबाहेर नव्हता अन विकेटही हातात होते (आठवा चेन्नई ची कसोटी,
परवाची १७५ धावांची खेळी), पण इतर फलंदाजांनी नेहमीच कच खाल्लीय, पण हात
धुऊन सगळे सचिनच्याच मागे पडतात.

तो दबावाखाली खेळत नाही या आरोपासाठी हा पुढील लेखाजोखा

सचिनने कमावलेल्या ५४ सामनावीर किताबांपैकी ३१ सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करताना मिळवली आहेत तर २३ पहिल्यांदा.

त्याव्यतिरिक्त भारत हरलेल्या सामन्यात सचिनची कामगिरी खालीलप्रमाणे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध
हरलेल्या ४१ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ९ अर्धशतके आणि २ शतके

इंग्लंडविरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक

न्यूझीलंड विरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना १ अर्धशतक

पाकिस्तानाविरुद्ध
हरलेल्या ३६ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ अर्धशतके, ३ शतके तर
दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ३ अर्धशतके आणि १ शतक. ३ अर्धशतकांपैकी दोनदा
९०+ धावा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
हरलेल्या ३३ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतक, १ शतक तर
दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ३ अर्धशतके. ३ अर्धशतकांपैकी एकदा ९०+ धावा

श्रीलंकेविरुद्ध
हरलेल्या २९ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतके, ३ शतके तर दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ५ अर्धशतके.

वेस्ट इंडीज विरुद्ध
हरलेल्या १५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना २ अर्धशतके तर १ शतक

झिम्बाब्वेविरुद्ध
हरलेल्या ५ सामन्यापैकी पहिल्यांदा फलंदाजी करताना १ शतक

थोडक्यात हरलेल्या सामन्यांतही ३८ अर्धशतके आणि १२ शतके ((बांग्लादेश
केनियासारख्या देशांची आकडेवारी धरलेली नाही). मग हा मांजरेकर आणि तत्सम
टीकाकार कसे म्हणू शकतात की सचिन दडपणाखाली खेळत नाही?

वीस वर्षे खेळणे हाच एक विक्रम आहे पण वीस वर्षे खेळून ४४.५० चा
ऍव्हरेज राखणे हे देखील येरागबाळ्याचे काम नाही. वीस वर्षे खेळलेले इतर
खेळाडूही आहेत पण त्यांच्या काळात दर दिवसाआड सामने होत नसत. कसोटीत
सुटीचा दिवस असे. क्रिकेट इतके थकवणारे नव्हते. यातच सचिनचे वेगळेपण दिसून
येते. पाठदुखी आणि टेनिस एल्बोच्या दुखापतीचा सामना त्यालाही करावा लागला,
पण तरीही वीस वर्षे हा फिटनेस त्याने टिकवला. मला नाही वाटत यापुढे वीस
वर्षांची अजून कुणाची कारकीर्द असेल. अशा क्रिकेटच्या देवाला हा लेख
भक्तिभावे अर्पण.

थोडंसं अवांतर: आई, बघ जरा लहानपणी व्यवस्थित क्रिकेट खेळायला दिलं असतस तर हा लेख दुसऱ्या कुणीतरी माझ्यासाठी लिहिला असता.

वरील सर्व आकडेवारी cricinfo च्या statsguru वरून मिळवली आहे.