विधानसभाः परिचय आणि कामकाज(अंधारातील अक्षरे-भाग ३)

     महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अबू आझमींसंदर्भात केलेल्या कामगिरीमुळे विधानसभेच्या कामकाजाबद्दल लोकांच्या मनातही उत्सुकता दाटू लागली आहे. नागरिकशास्त्र शाळेत शिकविले जाते पण सभागृहांमध्ये कसे वागायचे, याचे शालांत परीक्षेपर्यंतही दिले जात नाही.

     विधानसभाःपरिचय आणि कामकाज हे पुस्तक माजी आमदार के.टी.गिरमे यांनी १९६६ मध्येच लिहिले आहे. श्री. गिरमे पुणे लष्कर भागातील माजी आमदार होत. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहून दिली आहे. पुस्तकाची दुसरी आवृत्ती १९८३मध्ये प्रकाशित झाली आहे.
     अनुक्रमणिकेतील प्रकरणे पाहिल्यास या पुस्तकाचा अंदाज येईल. हिंदी राज्यघटनेतील घडामोडी, भारतीय राज्यघटना, विधिमंडळ, विधानसभा-रचना व बैठक, विधानसभेतील कामकाजाची पध्दत, प्रश्नोत्तरांचा तास ही काही महत्त्वाची नावे. एकूण १८ प्रकरणे असून प्रत्येक प्रकरण तपशीलवार लिहिलेले आहे. या प्रकरणांतील अठरावे प्रकरण विधिमंडळातील काही प्रसंग असे आहे. 
     राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, हे स्पष्टच आहे. शिवाय, राजकारणावरील चर्चा प्रिय असणाऱ्या चौकस मंडळींनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही. पुणे येथील श्रीविद्या प्रकाशनाच्या नावामुळे दर्जाबाबत शंका राहात नाही. पुस्तकाचा फॉंट (अक्षरशैली) जुन्या काळातील आहे, त्यामुळे सध्या चाळिशीच्या आसपास आणि त्याखाली असणाऱ्या वाचकांना रुचीत बदल झाल्यासारखे वाटेल.   
     वाचनीय मजकुराचे काही मासले असेः
      'खोटा' हा शब्द असंसदीय ठरविण्यात आला असून सदस्यांना 'खरा नाही' हा शब्द वापरावा लागतो. 'चुंबाचुंबी' व 'कचरा' हे शब्द संसदीय ठरले आहेत.- विधानसभेतील' कामकाजाची पध्दत' या प्रकरणात 'असंसदीय शब्द' या भागातील उल्लेख.    
     १९६५-६६ या वर्षी लोकसभेचा एकूण खर्च एक कोटी २६ लाख रुपये झाला.- 'प्रश्नोत्तराचा तास' या प्रकरणातील उल्लेख. 
('मनोगत'वर यासोबत शोधाः अंधारातील अक्षरे-भाग १ व २)