वाजवा टाळी !

      उत्स्फूर्तपणे दाद देण्यासाठी एकतर प्रेक्षकाच्या मनाची तार कलावंताच्या अदाकारीमुळे अशी छेडली गेली पाहिजे की अभावित पणे त्याच्या तोंडून ’वा ’ असा उद्गार वा टाळी आणि विनोद असेल तर हास्य बाहेर पडायला हवे.पण बरेच वेळा असे घडत नाही.
     आमच्या  लहानपणी  गावात करमणुकीची साधने फारच थोडी असायची.त्यात श्रावण मासात होणारी कीर्तने हा एक आमच्या दृष्टीने मोठाच करमणुकीचा प्रकार असे. कीर्तनात पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात.पूर्वरंगात थोडे अध्यात्मिक प्रवचन  तर उत्तररंगात त्याच विचारावर आधारित पौराणिक ऐतिहासिक वा सामाजिक कथानक असते. दोन्ही भाग गद्यपद्यमय आणि संगीतमय असत त्यामुळे आमच्यासारख्या शाळकरी मुलांनाही तो प्रकार आवडे.पूर्वरंगानंतर उत्तररंग सुरू होण्यापूर्वी बहुतेक कीर्तनकार हरदास "रघुपतिराघव राजाराम" हे भजन म्हणत. त्यात ते  शेवटी लय वाढवीत आणि त्यापूर्वी एकदम "टाळीमहाराज" असा इशारा करत मग त्या लयीत बुवांच्याबरोबर टाळ्या वाजवून भजनात श्रोतेही भाग घेत आणि टाळ्यांचा मोठा दणका उडायचा.हा भाग आम्हाला फारच आवडायचा कारण त्यात आम्हालाही भाग घेऊन मनसोक्त गिल्ला करता  यायचा.
    कधीकधी आमच्या शाळेत फिरते जादुगार यायचे आणि मुख्याध्यापकाना आपले प्रयोग शाळेत मुलांच्यासाठी आयोजित करण्याची विनंती करायचे.मुख्याध्यापकानाही मुलांच्यासाठी काहीतरी कार्यक्रम करण्याची इच्छा असायचीच त्यामुळे वर्षातून एकदा तरी असे प्रयोग आम्हाला बघायला मिळायचे.या जादुगारांचे जादूचे प्रयोग ठराविकच असत पण प्रत्येक जादू झाल्यावर "बच्चे लोग ताली बजाव" असा रस्त्यावरील माकडवाल्याप्रमाणे जादुगाराने हुकूम केल्यावर आम्ही इमानेइतबारे टाळ्या वाजवायचो.
       कीर्तनात टाळ्या वाजवणे फक्त भजनातच आवश्यक असे,बाकी कीर्तनकाराची टाळ्यांची अपेक्षा जवळ जवळ नसेच.जादुगाराला मात्र प्रत्येक जादूनंतर श्रोत्यांकडून टाळ्यांची दाद हवी असे आणि ती तो अगदी हुकूमवजा आज्ञा करून वसूल करी. सारेगामापाची निवेदिका त्याच्याच वंशातली असावी.    
      मराठी सारेगामापा हा एक बहुतांश रसिकजनाना आवडणारा कार्यक्रम आहे ( टी.व्ही.बघण्याची ज्यांना अलर्जी आहे त्यांचा यात समावेश होत नाही).पण या कार्यक्रमाच्या निवेदिकेला हा कार्यक्रम गाण्याचा नसून टाळ्या वाजवण्याचाच असे वाटते की काय कोण जाणे.खरेतर गायकाच्या गाण्यानंतर या कार्यक्रमाचे  रसिक श्रोते टाळ्या वाजवून दाद देतातच पण  निवेदिकेचे तेवढ्याने समाधान होत नाही. तिला कार्यक्रमातील तिच्या निवेदनात  निदान मिनिटाला कमीतकमी दहादा तरी प्रेक्षकांनी नुसत्याच टाळ्या नाही तर अगदी जोरदार टाळ्या वाजवायला हव्या असतात.त्यामुळे तिला मध्येच एकदम कुणा संगीत दिग्दर्शकाच्या किंवा गीतकाराच्या  जन्मदिवस वा पुण्यस्मरणाची आठवण येते आणि त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या असे आवाहन ती प्रेक्षकांना करते आणि ते बिचारे कधीकधी उत्स्फूर्तपणे पण बऱ्याच वेळा नाइलाजाने टाळ्या वाजवतात.
          मराठी माणसे दाद देण्याच्या बाबतीत जरा कंजूषच असतात असा त्यांचा लौकिक असल्यामुळे निवेदिकेला निवेदनापेक्षाही टाळ्यांचीच अधिक काळजी असावी शिवाय तिच्या निवेदनात टाळी मिळवण्यासारखे चमकदार काही नसल्यामुळे अशी मारूनमुटकून टाळ्या मिळवण्याची पाळी तिच्यावर येत असावी पण प्रेक्षकांच्यावर दाद देण्याची अशी सक्ती केल्यामुळे त्यांचा उत्स्फूर्तपणा आणखीनच कमी होण्याची शक्यता वाटते.
           दूरदर्शनवरील बऱ्याच इंग्रजी मालिका (उदा:सैनफील्ड) अशा हश्या आणि टाळ्या पेरलेल्याच असतात त्यामुळे प्रेक्षकांवरचे ते संकट टळते.पण अशा मालिका पहाताना बऱ्याच वेळा लोक का हसताहेत याचाच विचार पडतो.  काही काही हिंदी दूरदर्शन मालिकां मध्येही असे हशा आणि टाळ्या पेरण्याचे प्रयोग केले आहेत आणि त्यातही त्याचा बऱ्याच वेळा इतका अतिरेक झालेला दिसतो की तेथे हशा कशासाठी याचाच विचार करत बसावे लागते. 
      याचे कारणही तसेच असते दूरदर्शन मालिकामध्ये हशा आणि टाळ्या कोठे द्यायच्या यासाठी काही संकेत ठरवलेले असतात त्यानुसार ठराविक दिवा लागला की हशा आणि दुसरा दिवा लागला की टाळ्या असे या भाडोत्री प्रेक्षकांना सांगितलेले असते  कारण त्या प्रेक्षकांची कुवत हसावे कोठे आणि टाळ्या कोठे द्याव्यात हे समजण्याची नसते.काही वेळी हे दिवासंकेत दाखवणारे तंत्रज्ञही झोपेत असल्याने  भलत्याच ठिकाणी दिवे लावतात (की पाजळतात ?) आणि नको तेथे टाळ्या आणि हशा पडतात आणि खऱ्या प्रेक्षकांना हा काय प्रकार आहे समजत नाही.
       आपल्याकडे क्वचितच येणाऱ्या  रशियन वा चिनी पुढाऱ्यांना इंग्रजीत भाषण करणे जमत नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणासोबतच त्याचा इंगजीत ( आता हीच खरी भारतीय भाषा आहे ना?) अनुवाद सांगितला जातो.एका रशियन पुढाऱ्याच्या भारतातील दौऱ्यावर त्याच्या रशियन भाषेत केलेल्या भाषणात अगदी योग्य ठिकाणी लोक मनापासून हसत आणि टाळ्या वाजवत होते हे पाहून त्याला मोठेच आश्चर्य वाटले आणि त्याच्या भाषणाचे भाषांतर करणाऱ्या दुभाषाचे फारच कौतुक वाटले त्याबद्दल त्याने त्याला धन्यवादही दिले. पण त्या बिचाऱ्याला हे माहीत नव्हते की दुभाषा त्याच्या भाषणाचे भाषांतर करतच नव्हता तर फक्त  योग्य ठिकाणी लोकांना हसण्याची आणि टाळ्या वाजवण्याची सूचनाच काय ती देत होता.एकूण त्याने सारेगमपाच्या निवेदिकेच्याही  दोन पावले पुढेच मजल मारली होती. इति टाळीपुराण !