३ मूर्ख आणि उत्कृष्ट विक्रेत्याच्या निमित्ताने

नुकतेच दोन्ही चित्रपट बघितले, "थ्री इडियट्स" आणि "रॉकेटसिंग, सेल्समॅन ऑफ द इअर".

थ्री इडियट्स इंजिनीअरिंग कॉलेज, नोकरी आणि गुण मिळवण्याची स्पर्धा, आणि खरं शिक्षण म्हणजे काय याबद्दलच्या मजेदार प्रसंगातून पुढे जातो. आमिर खान, माधवन आणि शर्मण जोशी तिघांचीही भूमिका खूपच छान वाटली तर बोमन इराणी पुन्हा एकदा मस्त ! ओम वैद्य (चतुर) सुद्धा भूमिकेत एकदम फिट.

गुणांच्या स्पर्धेत शिकणे राहूनच जाते, हे आपण बोलतो पण अंमलात आणत नाही. आजकाल "काँपिटिशन" आहे म्हणत रेसच्या घोड्यासारखे धावत राहतो, कशाला ? मर्सिडिज, सिलिकॉन व्हॅलीतली नोकरी, बंगला.... पण खरा आनंद ज्यात मिळतो अश्या गोष्टी बाजूला टाकतो... कधी थांबणार हे? चित्रपटाच्या निमित्याने पुन्हा एकदा यावर विचार व्हायला हवा आणि असे चित्रपट येत आहेत, ही आनंदाची बाब आहे.

"रॉकेटसिंग" व्यवसायातील गळेकाटू स्पर्धेवर एक वेगळा दृष्टिकोन देणारा चित्रपट आहे. आजकाल "बिझिनेस" म्हणजे रग्गड पैसा कमावणे, आणि त्यासाठी वाट्टेल ते करायचे, अशी एक समजूत झाली आहे. वस्तू विकली गेली म्हणजे झालं, विक्रीनंतरची सेवा फक्त बोलण्यापुरती असते, हे सगळ्यांनाच वाटायला लागलंय, मग ती छोटी कंपनी असो किंवा बँक, फोन किंवा क्रेडिट-कार्ड. या धर्तीवर "रॉकेटसिंग" बघण्यासारखा आणि बरंच काही घेण्यासारखा चित्रपट आहे. रणवीर कपुर लाजवाब वाटला. तो कुठेही रणवीर न वाटता "हरप्रीतसिंग" वाटला हे वैशिष्ट्य. आमीर, माधवन आणि शर्मण जोशी सारखाच....

चित्रपटात कुठेही अवास्तवता वाटत नाही. आणि हरप्रीतचा साधेपणा, प्रामाणिकपणा भावतो. चित्रपटात "हिरॉईन" आवश्यक तेव्हडीच आहे. उगाच लांबणदोरी नाही .

दोन्ही चित्रपटातून मूल्यांवर विश्वास दाखवणारी मानसिकता प्रकट होते हे खूप छान....

"आपल्या मुलाला/ मुलीला काय बनायचं आहे" हे कळूनही पालक जबरदस्ती का करतात हा न कळणारा प्रश्न आहे. माधवनच्या भाषेत म्हणायचं तर, " अब्बा, अगर मै वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनुंगा तो क्या होगा? पैसे कम मिलेंगे, गाडी छोटी होगी, घर छोटा होगा लेकीन मै खूश तो रहुंगा ना".

आवडलेले संवाद :-

"रिस्क तो स्पायडरमॅन को भी लेना पडता है, मै तो फिर भी सेल्समॅन हूं. "

"पचास साल के बाद सोचेगा ..........  लेटर हाथ मे था, टॅक्सी गेट पे थी, जरासी हिंमत कर लेता तो जिंदगी कुछ और हो सकती थी"