दीड तास उलटून गेला तरी अजून सारिकाच्या घरच्यांची ध्यानधारणा काही संपत नाही हे पाहून विशाल अस्वस्थ होत होता. काय चायला माणसं आहेत? कोणी घरी आलेलं असताना असं दीड दीड तास नुसतं बसवून ठेवणं बरोबर आहे का? कसलं डोंबलाचं ध्यान करताहेत कोणाला माहित. एकजण करत असेल तर ठीक आहे. इथे तर सगळेच. साधारण आणखी पंधरा वीस मिनिटानी सगळे समाधीतून बाहेर आले. एखाद्या धार्मिक हिंदी टिवी मालिकेत स्वर्गातील देव काही लोकांचं कल्याण करण्याच्या हेतूनी अचानक जमिनीवर अवतरल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव दिसतात (वत्सा, तुजप्रत कल्याण असो या प्रकारचे) तसे भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. विशालला आपण स्वतः अतिशय उद्धट, उर्मट वगैरे दिसतो आहोत बहुतेक, असं उगाचच वाटायला लागलं. त्यात भरीस भर म्हणून पसरलेला उदबत्तीचा वास आजुबाजूचं वातावरण अधिकच पवित्र, प्रफुल्लीत आणि अजून काही दैवी वगैरे करीत होता.
तेवढ्यात सारिकाचे वडील विशालकडे पाहून म्हणाले, 'काय बाळ काय म्हणतोस? बराच वेळ झाला का रे तुला येऊन? अरे ही आमची दुपारची ध्यानाची वेळ. हे ध्यान संपूर्ण कुटुंबाला फक्त शनिवार आणि रविवारीच करायला जमतं. इतर दिवशी ऑफिसेस आणि बाकिच्या व्यापामुळे दुपारच्या ध्यानाला वेळ मिळत नाही. तरी आम्ही सगळे रात्रिचं ध्यान कधी चुकवत नाही हं. आता तुला हळू हळू कळेलच म्हणा. तुम्ही आता जावई होणार आमचे, काय विशालराव.'
विशालला बाळाच्या जागी 'वत्सा' असं काहीतरी ऐकल्याचा भास झाला. तसंच 'विशालराव' हे त्याला ऐकायला फारसं आवडलं नाही. विशालराव काय? पंजाबराव, हंबीरराव, पतंगराव, विश्वासराव, अगदी रोज कानावर पडणारं विलासराव, या सगळ्या राव कॅटॅगरीत विशालराव अजिबात फिट नाही असं त्याला वाटत होतं. त्यात त्याचं आडनाव कुलकर्णी. मग तर अजिबातच जुळत नाही हे 'विशालराव कुलकर्णी'. सारिकाचे बाबा बाकीचं जे काही सांगत होते त्याकडे त्याचं फारसं लक्षं नव्हतं. त्याला मघापासून एकच प्रश्न छळत होता. या सगळ्या ध्यान करणाऱ्या महंतानी कानटोप्या का चढवल्या आहेत? आता हे विचारायचं म्हणजे विशालला जरा अवघडल्यासारखं होत होतं. धीर करून त्यानी शेवटी विचारलंच, 'बाबा, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? ' 'विचार ना बाळ' बाबा म्हणाले. चायला पुन्हा बाळ. विशाल पुढे म्हणाला, 'या कानटोप्या घालण्यामागे काय उद्देश आहे नेमका? ' हे कळल्यास अखिल जगतावर अनंत उपकार होऊन जगाला स्रुष्टीचे रहस्य उलगडेल, असं तोंडाशी आलेलं वाक्य विशालनी गिळून टाकलं. असा मूर्खपणाचा प्रश्न तुझ्यासारखे अतिसामान्य लोकच विचारू शकतात असे भाव बाबांच्या चेहऱ्यावर दिसले. बाबा उत्तरले, 'अरे बाळ, त्याचं असं आहे कि वातावरणात जी काही नको असलेली उर्जा आहे ती आपल्या नाकात, तोंडात आणि कानात जाऊ नये याची काळजी ध्यान करताना घ्यावी लागते. त्याशिवाय लक्ष केंद्रित होत नाही आणि ध्यानही सफल होत नाही. मनासारखं ध्यान झालं नाही की मग सगळा दिवस वाईट जातो.' विशाल मनात म्हणत होता, 'दुपारनंतर दिवस उरलाच कुठे चांगला किंवा वाईट जायला. पाच वाजले संध्याकाळचे. तरी अजून याना दिवसाची काळजी वाटते. '
लग्न ठरल्यावर पहिल्यांदाच विशाल सारिकाला बाहेर फिरायला घेऊन जायला आला होता. जोशी कुटुंब सगळं पाळणारं आहे, अगदी संस्कृती जपणारं आहे असं विशाल ऐकून होता. पण जोश्यांचं हे रूप त्याला नवीनच होतं. जाऊ दे, आपला काही रोज थोडाच संबंध येणार आहे, असा विचार करून तो पुढची गम्मत बघायला सज्ज झाला. सारिकाच्या मोठा भावानी विशालला विचारलं, 'अरे विचारीन विचारीन म्हणत होतो, ते गोखले रोडवरचे 'कुलकर्णी चष्म्याचे किरकोळ व्यापारी' तुमचे कोणी आहेत का? नाही ते बरेच फेमस आणि जुने आहेत ना शहरात.' विशालनी ते दुकान अनेकदा पाहिलं होतं. अनेकानी त्याला हा प्रश्न आधी विचारला होता. खरं तर त्याला ते दुकान आणि मुख्य म्हणजे त्या दुकानाचं नाव अजिबात आवडायचं नाही. तो नेहमी त्याच्या बाबाना म्हणायचा, 'हे नाव जरा विचित्रच आहे. म्हणजे नीट अर्थ लागत नाही. किरकोळ काय? म्हणजे व्यापारी किरकोळ, चष्मे किरकोळ की मग ओव्हरॉल कुलकर्णीच किरकोळ? छे. काही कळत नाही. सरळ 'ऑप्टिक्स रिटेलर्स' असं काहीतरी सोप्या शब्दात लिहायला हवं.' 'नाही नाही आमचे कोणीच नाहीत ते. फक्त आडनाव बंधू. ' विशाल सारिकाच्या भावाला म्हणाला. त्यावर भाऊ म्हणाला, 'अरे ते चष्मेवाले कुलकर्णी आमच्याकडे बाबांचं प्रवचन ऐकायला येतात दर रविवारी.' च्या मारी तरीच ते किरकोळ आहेत बहुतेक, असा विचार करून विशाल मनातल्या मनात हसत होता. लगेच भानावर येऊन विशाल म्हणाला, 'ओके ओके, बाबांचं प्रवचन असतं का दर रविवारी. छान आहे. पण प्रवचनाचा विषय दर आठवड्याला वेगळा असतो का? ' विशाल या गोष्टीत इंटरेस्ट घेतोय असं वाटून सारिकाचे ज्येष्ठ बंधू उवाच, 'नाही. अरे दोन विषय आहेत. पहिला 'अर्थाकडून परमार्थाकडे' आणि दुसरा 'आत्म्याकडून परमात्म्याकडे'. या सारिकाच्या घरी तिच्या बाबानी 'माझ्याकडून तुझ्याकडे' या तत्वाला धरून घरच्या सगळ्या मंडळीना 'इकडचं तिकडे' करून टाकलेलं दिसतंय, ही सगळी मंडळी अनोखी आहेत यात शंका नाही, आपण पहिल्यांदा अनुभवली अशी माणसं, असे विचार विशालच्या मनात घिरट्या घालत होते.
थोड्या वेळात सारिकाच्या मातोश्रीना आपण आता भावी जावयाला अध्यात्मिक उपदेशाच्या जोडीनि चहा, कॉफी, पोहे काहीतरी खायला द्यायला हरकत नाही याची जाणीव होऊन त्या म्हणाल्या, 'बसा हं मी जरा चहापाण्याचं बघते.' अहो जरा काय? थोडा चहा आणि बरंच काही खाण्याचं बघा. शरीरातली बरीच ऊर्जा अध्यात्मात खर्च झाली आहे (तुमची), हे वाक्य पुन्हा विशालला गिळावं लागलं. 'मग जावईबापू तुमचं काय मत आहे एकंदरीत अध्यात्म, परमार्थ आणि ध्यानधारणेबद्दल? तुम्ही सहभागी होणार का आमच्यात? बघा हं. तसा काही आग्रह नाही. आमच्या विकिला (सारिकाचा मोठा भाऊ) या सगळ्याची फार आवड आहे बरं का. अगदी अमेरिकेत असताना सुद्धा रोजची देवपूजा, संध्याकाळी देवाजवळ दिवा लावणं, सोमवार, गुरुवार आणि शनिवारची पोथी वाचणं, रोजचं ध्यान, नामस्मरण सगळं त्याचं नित्यनेमानी चालू होतं. आपण कुठेही असलो तरी आपली संस्कृती सोडू नये. विकीनी कधीच नॉनवेज खाल्लं नाही, सिगरेट, दारू काहीच नाही. आजुबाजुला सगळं ख्रिश्चन वातावरण. सगळीकडे नुसता बाप्टिझम. मी म्हण्टलं विकिला, तू रामनाम घे म्हणजे सगळं व्यवस्थित होईल.' बाबानी 'रामनाम' म्हण्टल्यावर पटकन 'सत्य है' असं म्हणावंसं विशालला वाटल्याशिवाय राहिलं नाही.
तेवढ्यात सासूबाई आल्या. त्यांच्या हातात ट्रे होता. तो समोरच्या टेबलावर ठेवत त्या म्हणाल्या, 'घ्या जावईबापू चहा घ्या. बिस्किटही घ्या हं. 'विशालला चहाचा वास जरा वेगळा वाटत होता. म्हणजे वास वाईट नव्हता. पण नेहमीचा नव्हता हे नक्की. काही दिवसांपूर्वी त्याला सर्दी झाली होती तेव्हा त्याच्या आईनी अशाच प्रकारचा चहा दिला होता. त्यावेळी फारसा आवडला नसतानाही केवळ औषध म्हणून त्यानी तो घेतला होता. शिवाय बिस्किटही खाल्ल्यावर जरा वेगळीच लागत होती. धड गोड नाहीत, धड खारट नाहीत, अर्धवट बेक झालेली होती का बरेच दिवस पडून राहिल्यानी मऊ झाली होती कोणास ठाऊक. तो याबद्दल काही बोलणार इतक्यात सासुबाई म्हणाल्या, 'काय जावईबापू वेगळं लागतंय ना चहा आणि बिस्किट.'
हे विचारणं म्हणजे तुम्ही खाताय ते चांगलं लागत नसेल तर मी दुसरं आणून देते या अर्थी विचारणं नव्हतं. इतकं चांगलं चहा, बिस्किट या आधी तुमच्याकडे कोणी खाल्लं आहे का कधी, या अर्थी विचारणं होतं. 'अहो, मागे हे गेले होते ना ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यात प्रवचन द्यायला, तेव्हा (अर्धनग्न आणि मराठी न समजणाऱ्या आदिवासी) भाविक मंडळीनी याना बराच गवती चहा भेट दिला. तोच हा चहा आहे. फार चांगला असतो बरं का तब्येतिला. सर्दी पडसं काही होत नाही घेतल्यावर. ही बिस्किट कशाची आहेत ओळखलंत का?' च्यायला इथे माझी मलाच ओळख पटेनाशी झाली आहे, गवती चहा हा सर्दी पडसं झाल्यावर घेतात का ते होऊ नये म्हणून रोजच घेतात हा नवा विषय आहे घरी गेल्यावर बोलायला, असे विचार करीत आणि कमालीचा संयम बाळगत विशाल म्हणाला, 'नाही हो. काही कळत नाही कशाची आहेत बिस्किटं. 'सासुबाई कंटिन्यूड, 'आध्यात्मिक जपणूक नावाचं मंडळ आहे ना यानी स्थापन केलेलं, तिथल्या सभासदांच्या बायकानी नोकरी, मुलंबाळं सांभाळून फावल्या वेळात संपूर्णपणे देशी माल वापरून केलेली आयुर्वेदीक बिस्किटं आहेत ही.'
आपल्या घरी कोणी आयुर्वेदीक औषधं न घेण्यामागे बहुदा असं काहीतरी कारण असावं असं विशालला वाटलं. तो खात असलेली बिस्किटं ही मागच्या गुढी पाडव्याला मराठी नववर्षाची पर्वणी साधून तर केलेली नाहीत ना, असं एकदा सासूबाइना विचारावसं त्याला वाटत होतं. पण काही विचारणं म्हणजे नव्या विषयाला हात घालून स्वतःला उगीचच त्रास करून घेणं आहे हे त्याला उमगलं. एकंदरीत सारिकाच्या घरी काय वातावरण आहे हे विशालला कळत होतं. भावी सासू सासऱ्यानी एवढं भरभरून दिलेलं ज्ञान, मेव्हण्याची तरूण वयातील अध्यात्माविषयीची दांडगी समज हे सगळं पाहून तो थक्कच झाला. मंडळीना थोडा त्रास द्यायला हरकत नाही असं ठरवून तो काहितरी बोलणार इतक्यात सारिकाच्या बाबाना काय आठवलं कोणास ठाऊक. ते विशालला म्हणाले, 'बाळ, मी तुला एक सांगतो ते अगदी आत्ता माझ्यासमोर करून बघ. म्हणजे तुझ्या शरीरात काय काय करण्याची क्षमता आहे याचा तुला साक्षात्कार होईल. आधी खाली बस बघू. हं आता डोळे मीट बरं. अशी कल्पना कर की समोर एक अथांग पोकळी आहे. तुझं शरीर त्या पोकळीत एखाद्या वादळात सापडलेल्या होडीप्रमाणे हेलकावे खातंय. बरोबर दोन मिनिटं असं ध्यान लावलंस की तुला हळू हळू ओंकाराचा नाद ऐकू येइल. मग तुला जाणीव होईल की हेच खरं जीवन. बाकी सगळं व्यर्थ आहे रे बाळ.'
विशालही ते सगळं निमुटपणे करीत होता. दुसरं करणार काय? नाही तरी कसं म्हणायचं. डोळे मिटून बसल्यावर त्याच्या डोळ्यासमोर पूर्वी चोरून पाहिलेले अश्लिल चित्रपट, कॉलेजमधल्या उत्तान कपडे घालणाऱ्या मुली अशी चित्र यायला सुरुवात झाली. तसंच ओंकाराऐवजी क्रिकेट खेळताना मित्रांबरोबर दिलेल्या आयाबहिणिंचा उद्धार करणाऱ्या शिव्या ऐकू येऊ लागल्या. खाडकन त्यानी डोळे उघडले. समोर बाबा होतेच. त्यानी विचारलं, 'काय विशालराव, आली की नाही अनुभूती? शरीर हेलकावे खात होतं ना? ओंकाराचा नाद ऐकू आला ना?' हो म्हणण्याखेरीज दुसरं गत्यंतरच नव्हतं. विशाल म्हणाला, 'आली हो आली. इतकी सुरेख अनुभूती आली की मी सांगूच शकत नाही. ओंकार तर काय विचारता? उत्तमच' सारिकाच्या घरचं सगळं प्रकरण पूर्णपणे हाताबाहेर गेलेलं आहे आणि आपण जर यात गुंतलो तर आपलं पण 'ध्यान' व्हायला अजिबात वेळ लागणार नाही अशी जाणीव होऊन इथून आता कधी एकदा बाहेर पडतो असं विशालला झालं.
या सगळ्या घोळात सारिका मात्र गप्प होती. तिनी हळूच विशालला लवकर उठायचा इशारा केला. विशाल समजला. तो म्हणाला, 'चला आम्ही जातो जरा फिरायला. जवळच जाणार आहोत मॉलमध्ये. आठ वाजेपर्यंत हिला घरी सोडतो.' थोडासा चेहरा पाडून का होईना पण सारिकाच्या आई बाबानी परवानगी दिली. दोघेही बाहेर पडले. एका छानशा हॉटेलमध्ये लॉनवर एक टेबल विशालनी आधीच बुक करून ठेवलं होतं. तिथे बसून त्यानी आधी दोन ग्लास नुसतं पाणी ढोसलं. अक्षरशः त्याला दम लागला. सारिकाच्या सगळं लक्षात आलंच होतं. ती म्हणाली, 'तू रिलॅक्स झालास का विशाल? आर यू ऑल राइट?' विशालला जरा बरं वाटल्यावर तो म्हणाला, 'मी ठीक आहे गं. हे सगळं मला खूपच नवीन होतं. मी असं म्हणत नाही की हे सगळं थोतांड आहे. पण नवीन माणसाला एकदम असं सगळं सांगायचं म्हणजे जरा....' 'मला कळतंय रे विशाल, हे अस्सं चालू आहे घरात. खूप वर्ष झाली. घरच्या या वातावरणामुळे जीव अक्षरशः मेताकुटिला येतो रे. काय करणार पण? आता या वयात आई बाबानी बदलावं ही अपेक्षा मी नाही करू शकत त्यांच्याकडून. तुला पसंत करण्याआधी तुझ्या घरी असा काही प्रकार नाही ना याची खात्री मी करून घेतली होती ओळखीच्या लोकांकडून. मी आता तुला स्पष्टच विचारते. तुला जर नाही म्हणायचं असेल तर नो प्रॉब्लेम. कारण घरी काय प्रकार आहे तू पाहिलसंच. माझं लग्नही जमेना या लोकांच्या असल्या वात्रट प्रकारामुळे. शेवटी मला त्याना स्पष्ट सांगावं लागलं की जर तुम्ही ढवळाढवळ करणार असाल तर मला लग्नच करायचं नाही.' सारिका मनापासून सांगत होती. विशाल म्हणाला, 'मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. पण तू काळजी करू नकोस. एक नक्की की तुझी सहनशक्ती जबरदस्त आहे. या अशा माणसांबरोबर इतकी वर्ष काढूनही तू इतका संयम कसा काय ठेवू शकतेस हे काही समजत नाही.' 'अरे दुसरा काही उपाय होता का बाळ?' बाळ शब्द ऐकून दोघेही मनसोक्त हसले. हसता हसता विशालनी सारिकाचा हात कधी हातात घेतला हे दोघानाही कळलं नाही.