पुनश्च पारपत्र -- आता बडगाही --- !

            माझे पारपत्र आल्यावर तीन चारच काय पंध्रा दिवस गेले तरी सौ.च्या पारपत्राचा पत्ता नव्हता.मग पुन्हा एकदा जालावर तो हुडकण्याचा प्रयत्न केला आणि छातीत धडकी भरणारा संदेश दिसू लागला तो म्हणजे "पोलिस तपासणी अहवाल आला नाही तरी त्याला वेग आणण्यासाठी प्रयत्न करावा."पोलिस तपासणी अहवालात गती आणण्यात आम्ही काय करणार होतो हे आमच्या लक्षात येईना.तरीही आपल्या संगणक साक्षरतेचा फायदा घेण्यासाठी मी पारपत्र कार्यालयास ई-पत्र पाठवून आमच्या दोघांचा पत्ता एकच असून दोघांनी एकाच वेळी पारपत्रासाठी अर्ज भरलेले असून माझ्रे पारपत्र मला मिळाले आणि माझ्या पत्नीचे मात्र कसे पाठवण्यात आले नाही अशी विचारणा केली.दोन महिन्यांनी आम्हाला पत्र आले "सौ.कुलकर्णींचा पोलिस तपास अहवाल अजून या कार्यालयास प्राप्त झाला नाही तरी तो लवकर गतिशील करावा नाहीतर आपली फाइल बंद करण्यात येईल." पोलिस तपास हा पोलिसांनी करावयाचा असतो ही आमची गैरसमजूत होती  पारपत्र कार्यालयास मात्र आम्हीच पोलिसांच्या पुढे जाऊन आमची चौकशी करा अशी विनंती करायला हवी असे वाटत असावे.माझ्या बाबतीत मात्र पोलिस तपासाची वाट न पहाता पारपत्र देण्याचा निर्णय कसा झाला होता हे एक आश्चर्यच ! त्यामुळे सौ.ला चिडवायला एक कारण मला मिळाले की पहा माझ्याविषयी पोलिसाना काही शंका नाही  तुझ्या बाबतीत मात्र पोलिसांना शंका आहे. तरी तिच्या  पोलिस तपासाची शिक्षा उभयतांनाही होणार असल्याने त्यात काही आनंद मिळवण्यासारखा भाग नव्हता.पारपत्र कार्यालयाला  पोलिस तपास करवून घेणे ही जबाबदारी आमची आहे असे वाटत असते तर अर्ज दाखल करताच लगेचच त्यानी अमुक एका पोलिस स्टेशनवर जाऊन आपली चौकशी करून घ्यावी असे आम्हाला सांगायला हरकत नव्हती. अर्थात अशा युक्तिवादाने आम्हाला पारपत्र मिळायला मदत होणार नव्हती त्यामुळे "सुसरबाई तुझी पाठ मऊ" म्हणत पारपत्र कार्यालयासच फोन करून आम्ही आमची पोलिस चौकशी करून घेत आहोत तेव्हा फाइल बंद करू नका असे सांगितले.

       आता आमच्या भागात असणाऱ्या पोलिस ठाण्यावर जावे असा विचार केला पण  आम्ही रहात असलेल्या भागातील नागरिकांची चौकशी आमच्या सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे पोलिस करत नाहीत तर त्यासाठी आमच्या विभागापासून चांगले पाच सहा किलोमीटर अंतरावरील खडक पोलिस चौकीतील पोलिस करतात म्हणजे त्यांच्यापुढे आम्हाला सादर व्हावे लागते अशी भर आमच्या ज्ञानात पडली. पाच वर्षापूर्वी आमच्या सूनबाईच्या पारपत्राच्या कामाच्या वेळी तिला त्या कार्यालयात चकरा माराव्या लागल्या होत्या याची आठवण मला तेव्हां झाली.पण या माहितीचा आपल्याला उपयोग करावा लागेल असे त्या वेळी वाटले नव्हते सुदैवाने आंतरजालावर सगळ्या पोलिस चौक्यांचे दूरध्वनी क्रमांक होते.आणि आश्चर्य म्हणजे खडक पोलिस ठाण्यावरील दूरध्वनी लगेच लागला.नाहीतर असे दूरध्वनी बहुधा आपल्याला हवे असतात तेव्हा हटकून एंगेज्ड असतात.अर्थात त्यामुळे माझे काम फार सुकर झाले अशातला भाग नाही मात्र तेथील उपलब्ध पोलिस आदबशीर स्वरात बोलल्यामुळे ठाण्यावर गेल्याचा भास झाला नाही.  त्या व्यक्तीने आमच्या म्हणजे पारपत्राच्या पोलिस तपासणीचे काम करणारे पोलिस अमुक अमुक आहेत आणि ते अकरा वाजता येतात असे सांगितले इतकेच नाही तर त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांकही त्यानी दिला.

          आता पारपत्र कार्यालयाने फाइल बंद करण्याची धमकी दिल्याने आम्हाला काम लवकर उरकण्याची घाई होती.त्यामुळे लगेचच त्या भ्रमणध्वनीवर श्री.** यांच्याशी संपर्क साधला  व त्यांनीही आपण अकरा वाजता कार्यालयात येतो या वृत्तास दुजोरा दिला. घाईघाईने पारपत्र कार्यालयात नेलेले कागदपत्र गोळा केले शिवाय त्या कार्यालयाने दिलेली १००० रु.भरल्याची पावतीही घेण्याची बुद्धी सौ.ला झाली म्हणून बरे झाले कारण आमची फाइल सापडायला ती महत्वाची खूण होती नाहीतर आमची अवस्था दुष्यंताकडे अंगठी न घेता गेलेल्या शकुंतलेसारखीच झाली असती.खडक पोलिस चौकी शिवाजी रस्ता ही पुण्यातील सर्वात जुनी ( आणि जुनाटही) पोलिस चौकी असावी.पण आमच्या रिक्षाचालकाने अगदी बरोबर तेथे नेऊन सोडले.आत शिरताना रस्त्यावर दोन्ही बाजूस बरेच छोटे स्टॉल्स दिसले त्यात बरेच नोटरी होते बहुधा पोलिस चौकीत कागदपत्र साक्षांकित करण्यासाठी असतील. आम्हालाही त्याच्याकडे धाव घ्यावी लागेल असे वाटले नव्हते.

        शेवटी खडक पोलिस चौकी अशी पाटी लावलेले प्रवेशद्वार दिसले.आत शिरताच डाव्या बाजूस एका कक्षात एक दोन पोलिस अधिकारी दिसले आणि उजव्या बाजूस त्या कार्यालयाचे प्रमुख अधिकारी अशी पाटी लावलेली दिसली.डावीकडेच श्री.** असतील म्हणून विचारल्यावर ते आतील खोलीत आहेत अशी माहिती मिळाली.चला निदान हवे असलेले पोलिस अधिकारी आले आहेत एवढा दिलासा मिळाला.आता ते आपल्याकडे कशी कृपादृष्टी टाकतात हे पहाभे आले.आत शिरल्यावर अगदी छोट्या हॉलमध्ये चार टेबले आणि काही खुर्च्या आणि बरीच माणसे दृष्टोत्पत्तीस पडली.एका टेबलावर मधमाशासारखे माणसांचे मोहोळ आणि आत पोळे असावे तसे एक पोलिस अधिकारी दिसले.उजवीकडील टेबलवरही एक पोलिस अधिकारी पण माणसांनी वेढले गेलेले नव्हते त्यामुळे आम्हाला हवे असलेले श्री ** कोठे आहेत ही विचारणा त्यांच्याकडे केल्यावर मला जी भीती वाटत होती ती खरी ठरून मधमाशांच्या मोहोळात जी व्यक्ती होती तीच आमचे साध्य होते.सुदैवाने ते मोहोळ जरा विरळ झाले आणि मध्ये असणाऱ्या श्री ** यांचे लक्ष वेधून घेण्यात आम्हाला यश आले.

          त्याचवेळी उजवीकडील टेबलाकडे एक युवती आमच्यासारखीच पोलिस तपास करून घेण्यासाठी आली होती आणि त्या टेबलवरील पोलिसानी श्री.** यांना तिची फाइल सापडते का हे पहायला सांगितले आणि तिने दिलेली माहिती कानावर पडून आम्ही धन्य झालो कारण तिने आपल्या मुलीसह पारपत्रासाठी अर्ज दाखल केला होता आणि तिच्या मुलीचे पारपत्र मिळाले आणि तिचे मात्र अजून आले नव्हते म्हणजे अगदी आमच्यासारखाच मामला होता फक्त माझे पारपत्र मिळून दीड महिना झाल्यावर आम्ही पत्नीच्या पोलिस तपासासाठी आलो होतो तर तिच्या मुलीचे पारपत्र मिळून चक्क दीड वर्षे झाल्यावर ती तिच्या पोलिस तपासासाठी आली होती.म्हणजे सौ.ची फाइल बंद करण्याची पारपत्र कार्यालयाने दिलेली धमकी ही निव्वळ थाप होती असा त्याचा अर्थ .ही आमच्या ज्ञानात भर पडल्यावर जरा बरे वाटले.त्या युवतीला कोणत्या पोलिस कार्यालयात जायचे याचे कोणीच मार्गदर्शन केले नव्हते.ती सिंहगड रस्त्यावरील पोलिस चौकीत जाऊन आली तेथेही तिला कोणी सांगितले नव्हते असा तिचा दावा होता त्या तपासातच तिने दीड वर्षे घालवली होती.

        कोणी किती काळ वाया घालवला याचा विचार करण्यापेक्षा आता आपले काम लवकर कसे होईल याचा विचार आम्ही करत होतो त्यामुळे श्री ** यांच्याभोवतीची गर्दी थोडी कमी होताच आम्ही त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.आमच्या सौ.ने पारपत्र कार्यालयाने दिलेली पावती आणल्यामुळे आमची फाइल शोधायला तरी अडचण आली नाही.मग आमच्या जुन्या पारपत्राच्या व इतर कागदपत्रांच्या प्रती दाखवण्याचा प्रश्न उपस्थित झाला.आम्ही पारपत्र कार्यालयात छायांकित प्रती आमच्या आम्हीच साक्षांकित (self attested) केल्या होत्या पण इथे मात्र तसे चालणार नव्हते.खरे तर पारपत्र कार्यालयास जे चालत होते ते पोलिसांना का चालत नव्हते हा मोठाच गूढ प्रश्न होता  आणि त्यावेळी बाहेर नोटरीची रांग का होती याचा उलगडा झाला.तेथे एक कागदपत्र साक्षांकित करण्याचा दर एका प्रतीस दहा रु.असा होता अर्थात आमच्या सात कागदपत्रांच्या साक्षांकनाचे सत्तर रु.बाहेर येऊन आम्हाला एका नोटरीला दान करावे लागले.एक फॉर्म सौ.ला भरायला सांगण्यात आला.आणि त्याच्या छायाप्रतीही आणायला सांगण्यात आले कारण आमच्या नंतर येणाऱ्या व्यक्तींना वापरता याव्यात म्हणजे अगदी जनाधारित कार्यपद्धतीच म्हणाना ! त्यात तिच्या अगदी बालपणापासूनचा इतिहास भरावयाचा होता.पोलिस खाते इतके दक्ष असून अनधिकृत व्यक्तींना पारपत्र कसे मिळते हा मोठाच गहन प्रश्न.

        सत्तर रुपयांची दक्षिणा देऊन व जेवढा जमेल तेवढा फॉर्म भरून आत शिरलो.परत ** भोवतीचा घोळका कमी होण्याची वाट पहात बसलो.तो थोडा कमी होताच आम्ही पुढे सरकलो व ते कागद **यांच्या ताब्यात देऊन त्यांच्या पुढच्या आज्ञेची वाट पहात बसलो.त्यांची कृपादृष्टी सौ.कडे वळल्यावर त्यांनी पुन्हा तिच्या तोंडून तिचा इतिहास वदवून घेतला जो मलाही प्रथमच कळत होता  कारण तिच्या शालेय जीवनाचा तपशील इतका सखोल जाणून घ्यावे असे मला कधी वाटले नव्हते.आणि ते सगळे कागदपत्र तयार करून त्यावर चिकटवण्यासाठी छायाचित्राची मागणी आमच्याकडे केली अर्थातच ते आम्ही नेलेले नव्हते,शेवटी बाहेरील रस्त्यावर एक फोटो स्टुडिओ आहे अशी माहिती मिळवून तेथे जाऊन तात्काळ फोटो मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला आम्ही बाहेर पडलो.

        बाहेरचा रस्ता म्हणजे शिवाजी रस्ता ही माझ्या पुण्याच्या ज्ञानात भर पडली.रस्त्यावर अगदीच टुकार फोटोस्टुडिओ दिसला पण अडला नारायण काय करणार.त्याच्याकडे येणारे पहिलेच गिऱ्हाईक आम्ही होतो आणि तात्काळ म्हटले तरी क्मीतकमी ३० ते ४५ मिनिटे लागतील असे त्याने प्रामाणिकपणे सांगून टाकले.अर्थातच आम्हाला दुसरा पर्यायच नव्हता त्यामुळे आम्ही सौ.चा तशाच मूडमध्ये खरोखरच फोटो काढण्यासारखा चेहरा झाला असताना फोटो काढून घेतला आणि नुसतेच वाट पहाण्या ऐवजी शेजारच्याच तशाच टुकार रेस्टॉरंटात जाऊन थोडा पोटाला सहारा देण्याचा विचार केला.घरातून निघताना इतका वेळ लागेल अशी कल्पना नसल्याने आम्ही जवळ जवळ रिकाम्या पोटानेच निघालो होतो त्यामुळे आता थोडीसी पोटपूजा आवश्यकच होती.

          अनेक वर्षानंतर हॉटेलात काही खाण्याची संवयच मोडल्यासारखी झाली होती त्यामुळे आणि एकूणच तेथील वातावरणामुळे व मानसिक अवस्थेमुळे फारसे खाण्यात मन नव्हतेच पण खाण्यापेक्षा वेळ्च घालवणे महत्वाचे होते त्यामुळे बराचसा वेळ याप्रकारे व्यतीत केला आणि परत स्टुडिओत गेलो तेव्हां तेथे कोणीच नव्हते फोटोग्राफर  स्टुडिओ जणु आमच्याच भरवश्यावर सोडून गेला होता अर्थातच र्त्याच्या दुकानाचे रक्षण करण्यात रस नसला तरी इलाजही नसल्यामुळे बसून राहिलो.त्याच्याकडे फोटोच्या प्रती काढण्याची सोय नसल्याने तो ते काम कोठूनतरी करून आणण्यास गेला होता.तो बरोबर तासाभराने उगवला आणि ते दिव्य फोटो ताब्यात घेऊन आम्ही एकाच दिवसात तिसऱ्यांदा पोलिस चौकीची पायरी चढलो.आता फक्त फॉटो देण्याचेच काम उरलेले असल्याने श्री ** यांना ते दिल्यावर त्यानी नाराजीचा उद्गार काढत इतक्या लहान आकाराचे फोटो कसे काय आणले असे म्हटले,त्यावर "तुम्ही तसे काहीच सांगितले नव्हते"असा बचाव आम्ही केला त्यावर "तुम्ही पारपत्र भरल्यामुळे तुम्हाला पारपत्रासाठी कसे लागतात माहीत असायला पाहिजे" असे मला निरुत्तर करणारे उत्तर दिले.

      मोठ्या मिनतवारीने तेच फोटो ठेऊन घेण्यास आम्ही त्याला राजी करू शकलो  आणि सौ.च्या अर्जावर हवे तेथे चिकटवून   ते त्यानी   आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवले अर्थात मग आम्हाला केवळ वाट पहाण्याशिवाय काहीच करता येत नव्हते.बऱ्याच वेळानंतर त्या वरिष्ठानी सौ.ला आत बोलावून काही प्रश्न विचारले आणि जवळ जवळ तीन चार तास पोलिस स्टेशनमध्ये काढल्यावर आमची सुटका झाली आणि आता रिपोर्ट पुढे पाठवण्यात येतील असे आम्हाला सांगण्यात आले.

     त्यानंतर पारपत्र कार्यालयास फोन करून व ईपत्राद्वारे मी पोलीस तपासासाठी पोलिस ठाण्यात जाऊन आलो हे कळवले हो नाहीतर लगेच ते फाइल बंद केल्याचे कळवून आपण त्याबाबतीत किती तत्पर आहोत याचा आम्हाला प्रत्यय आणून द्यायचे अर्थात दीड वर्षे वाट पहाणारी महिला आम्हाला भेटलेली असल्यामुळे त्यांचा तो सुका दमच होता याची आम्हाला खात्री पटलेली होती. आणि आता वाट पहाणे एवढेच काम आम्हास उरले होते.

    मधल्या काळात माझ्या नव्या पारपत्राची तपासणी करत असताना वेगळीच गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे माझ्या आडनावाचे स्पेलिंग चुकले होते त्यामुळे ही गोष्ट पारपत्र कार्यालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी त्यांना ईमेल करून कळवले पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद नव्हता.त्यांच्या वेबसाइटवर पाहिल्यावर दोन गोष्टी कळल्या.एक म्हणजे चूक पारपत्र कार्यालयाची असेल तर परत कार्यालयात जाऊन दुरुस्ती अर्ज द्यायचा व त्याबरोबर दुरुस्तीसाठी पारपत्रही द्यायचे पण चूक आपल्याकडून झाली असेल तर मात्र दुरुस्ती अर्जाबरोबर पुन्हा पारपत्रासाठी भरावयाची पूर्ण फी भरावी लागेल,पण मला खात्री होती की अशी चूक आपल्या हातून होणार नाही म्हणून पुन्हा मध्ये आम्ही पारपत्र कार्यालयाची चक्कर मारली.यावेळी मात्र कार्यालयात आम्हाला प्रवेश न देता दारातच अडवण्यात आले आणि मी कारण सांगताच तेथील कर्मचाऱ्याने चूक माझीच आहे म्हणून मला परत ऒन्लाइन अर्ज करावा लागेल असेच सांगितले. तरी पण एकदा प्रय्त्न करावा म्हणून " पारपत्र अधिकाऱ्यास मी भेटू शकतो का ?" असे विचारल्यावर त्याने तसा अर्ज कोऱ्या कागदावर द्या असे सांगितले.अर्थातच असा कोरा कागद आमच्याकडे नव्हता आणि बाहेर उभ्या असणाऱ्या मंडळींपैकी पण कोणाकडे नव्हता पण त्यातल्या एकाने छायाप्रती काढायच्या दुकानात मिळेल आणि ते जवळच आहे"अशी सूचना केल्यावर आमचा मोर्चा इकडे वळला आणि घरात कागदंचे रिम पडले असताना तेथे एक कागद विकत घ्यावा लागला मुक्य म्हणजे त्यासाठी बरीच धावपळ करावी लागली हा भाग महत्वाचा ! असो कसाबसा अर्ज खरडून तो प्रवेशद्वाराजवळील कर्मचाऱ्यास दाखवल्यावर त्याने खिडकीचा क्रमांक लिहून आत जाण्याची परवानगी दिली.आत त्या खिडकीजवळ गेल्यावर माझा अर्ज व पारपत्र पाहून पुन्हा पैसे भरण्याच्या खिडकीवर पाठवले तेथील कर्मचाऱ्याने तो अर्ज व पारप्त्र ठेवून घेत छापील पावती एक पैसाही न घेता दिली व चुकीची दुरुस्ती करून पारपत्र घरी येईल असे हास्यवदनाने सांगितले. प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्याच्या दमास घाबरलो असतो तर परत घरी जाऊन ऒन लाइन अर्ज भरून पुन्हा एक हजार रु.भरावे लागले असते त्यामुळे कसे पैसे वाचवले असे मनाशी म्हणत व आमच्या व्यवहारचातुर्यावर खूष होत घरी परतलो.

      चारपाच दिवसातच पुन्हा तोच पोस्टमन रजिस्टर घेऊन आला आणि आता आमच्या दोघांपैकी एकाचे म्हणजे माझेच पारपत्र असणार असे वाटले कारण सौ.वतीच्या नावापुढे जालावर अजूनही पोलिस तपासाचा संदेश नाचतच होता.कोणाचा का असेना म्हणून मोठ्या आनंदाने तो ठराविक आकाराचा आणि रंगाचा लिफाफा घेऊन सही करून पोस्टमनला रजिस्टरची पावती दिली आणि तो गेल्यावर अत्यानंदाने तो उघडला आणि हाय रे दैवा आमच्या व्यवहरचातुर्यावर पारपत्र कचेरीने बोळाफिरवला होता.माझे चुकीच्या माहितीचेच पारपात्र परत आले होते आणि सोबत दटावणीयुक्त पत्र ," आपल्या अर्जावर विचार करून पूर्ण तपासा अंती पारपत्रातील चूक आपणच केली आहे असे निदर्शनास आल्यामुळे आपल्याला पारपत्र हवे असेल तर पुन्हा ऒनलाइन अर्ज करण्यास सांगण्यात येत आहे " त्याबरोबर मी केलेल्या अर्जाच्या पहिल्या पानाची छायाप्रत जोडून माझी चूक माझ्या पदरात पुराव्यानिशी घालण्याची दक्षताही पारपत्र कचेरीने घेतली होती थोडक्यात सापशिडीच्या खेळातल्यासारखे पारपत्र कार्यालयाने आमची परिस्थिती करून टाकली होती.प्रथम एकदम शिडीवरून मला पारप्त्र मिळण्याच्या शेवटच्या पायरीवर नेऊन तेथून माझ्याच चुकीमुळे सापाच्या तोंडात सापडून मी पुन्हा आरंभ बिंदूवर आलो होतो तर सौ.वती मध्येच कोठेतरी लोंबकाळत होती.अशा तऱ्हेने पारपत्र कार्यालयाच्या पहिल्या  भेटीनंतर तीन महिन्यानंतर  आमची परिस्थिती जवळपास त्या भेटीपूर्वी होती तशीच म्हणजे दोघांनाही पारपत्र नाही अशीच राहिली होती.