पुनश्च पारपत्र -- घी देखा !

       पहिल्यांदा पासपोर्ट अगदी सहजासहजी मिळाला अशी बढाई मारत होतो.त्यावेळी दहा वर्षाचा पासपोर्ट मिळाल्यावर वाटले झाली आता जन्माची बेगमी.पण जरी "चार दिवस सासूचे" पाच हजार झाले तरी संपतच नाहीत तरी आमच्या पासपोर्टच्या दहा वर्षाचे  ३६५०  दिवस मात्र बघता बघता संपले आणि आली की हो पुन्हा पासपोर्ट काढण्याची वेळ !

      आमचे पासपोर्ट संपत आल्याचे वृत्त सौ.च्या आकाशवाणीवरून बऱ्याच ठिकाणी प्रसृत झाले आणि बऱ्याच लोकांनी आता ते काम तितके अवघड राहिले नाही असा दिलासाही दिला.आमच्या एका मित्राने तर त्याचे घर पासपोर्ट ऑफिसजवळ असल्यामुळे तुम्ही पासपोर्टचे अर्ज ऑफिसात देऊन आमचा घरी या चहा घ्या आणि परत जाताना पासपोर्ट तयार असेल तो घेऊनच जा असा प्रेमळ आग्रहही केला.अर्थात त्याच्या म्हणण्याप्रमाणे इतके विनाविलंब पासपोर्ट मिळणार असतीलच तर त्याच्याकडे चहा घेण्याऐवजी त्यालाच पार्टी देण्याचीही माझी तयारी होती.माझ्या मोठ्या मुलाच्या पासपोर्टची मुदत तो अमेरिकेत असतानाच संपल्यामुळे  नूतनीकरणासाठी तेथीलच न्यूयॉर्कच्या भारतीय पासपोर्ट ऑफिसात जावे लागले होते पण त्यालाही इतक्या  लवकर  पासपोर्ट मिळाला नव्हता आणि त्याला दोन तीन दिवसांनी येण्याचाच सल्ला मिळाला होता  पण ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर अमेरिकन व्हिसा मिळणे अवघड करून ठेवल्याने निदान भारतीय नागरिकांना पारपत्र तरी विनासायास व विनाविलंब देऊन अमेरिकेवर कुरघोडी करण्याचे भारतीय पारपत्र अधिकाऱ्यांनी ठरवले की काय असा मनाला आनंदित करणारा संशय मनात येऊन गेला.

          शेवटी आमच्या पारपत्रांची मुदत संपायला दोन महिने बाकी राहिल्यावर मी नूतनीकरणाचा विचार सुरू केला आणि तो अंमलात आणेपर्यंत पारपत्र मुदत संपण्यास दहा पंधरा दिवसच काय ते उरले होते.अर्थात पारपत्र संपल्यानंतरही अगदी एक वर्षभर नूतनीकरण करण्यात काही विशेष अडचण नव्हती त्यामुळे परत लवकर जाण्याची इच्छा व कारण नसते तर मी तेवढा काळ हे प्रकरण सहजच लांबवू शकलो असतो पण अमेरिकेतील मुलांनीच तगादा लावल्यामुळे एकदाचा मी संगणकाच्या कच्छपी लागून पारपत्राची माहिती जालावर शोधली व आता अर्ज ऑन लाइनच भरून पाठवल्यावर पारपत्र कचेरीकडून बुलावा ( चलो बुलावा आयाची आठवण झाली) येईल त्यावेळी कागदपत्रे घेऊन जायचे असा आदेश वाचून जालावरील अर्ज भरण्यास सुरवात केली.आमच्या दोघात संगणक साक्षर मीच असल्याचा सौ.चा दावा (कीआदेश?) असल्यामुळे आणि असा दावा माझ्या कुठल्याही क्षेत्रातील तज्ञतेविषयी ती करत नसल्यामुळे या एकुलत्या एक शहाणपणाचा स्वीकार करण्याचा सूज्ञपणा मला दाखवणे भाग होते.

       अमेरिकेत जाताना किंवा परत येताना विमानातून उतरताना देशांतराचे (इमिग्रेशन) जे कागदपत्र भरायचे असतात तेही एकूण माझी साक्षरता जास्त असल्याने मलाच भरावे लागतात.पण ते दोघांचे एकदम भरताभरता मी इतके उलटसुलट करतो की (कधी नाव माझे जन्मतारीख सौ.ची किंवा पासपोर्टचा क्रमांक बरोबर उलटा अशी उलटापालट) त्यासाठी लागणारे फॉर्म्स   हवाईसुंदरी वा जवानाकडून  मागून मागून (हे काम मात्र सौवर सोपवल्यामुळे) ती आणि विमानकर्मचारीही इतके वैतागतात की आता हा शेवटचाच फॉर्म असे सांगायची पाळी त्यांच्यावर येते.त्यामुळे यावेळी तसे न होण्यासाठी  पारपत्र मूतनीकरणासाठी भरावयाच्या फॉर्मच्या कोऱ्या प्रती काढून आपापल्या प्रती प्रथम स्वत: भराव्या असा तोडगा मी काढला म्हणजे उलटसुलट होण्याचा संभव टळावा.त्या तशा भरल्यावर आम्ही आता ऑनलाइन फॉर्म भरायला हरकत नाही असा निर्णय घेतला.

       संगणकावर ऑन लाइन पारपत्र नूतनीकरण असा आदेश देताच पुणे पारपत्र कचेरीने लगेचच दोन दिवसांनी दुपारी बारा वाजता कचेरीत हजर रहाण्याचे फर्मान काढल्याचे पटलावर दिसू लागले. तरी अजून आम्हाला फॉर्म भरायचेच होते.ती तारीख व वेळ आम्हाला सोयिस्कर असल्याने भराभरा फॉर्म्स भरायला लागलो कारण दोन्ही फॉर्म भरेपर्यंत तीच तारीख तरी टिकायला हवी नाहीतर दोघांना दोन वेगवेगळ्या दिवशी जावे लागायचे सुदैवाने पहिला फॉर्म भरेपर्यंत तारीख बदलली नाही वेळ अर्ध्या तासाने बदलली म्हणजे (आमच्यापैकी एकाला बारा वाजता आणि दुसऱ्याला साडेबारा वाजता) पण त्यामुळे फारसा फरक पडत नव्हता.अशा प्रकारे २००९ च्या ३सेप्टेंबरला पुणे पारपत्र कचेरीत जायचे निश्चित झाले.भरलेल्या फॉर्म्सच्या प्रती काढून घेतल्या पण त्या नीट वाचून पहाव्या असे मात्र काही वाटले नाही.आपणच भरले आहे तर त्यात काय चूक असणार हा आमचा अति आत्मविश्वास !(अतिशहाणा त्याचा बैल रिकामा )

        तीन सेप्टेबरला पारपत्र कचेरीत जायचे या कल्पनेने मला रात्रभर नीट झोप लागली नाही.खर तर त्या कचेरीत जायचे म्हणजे काही युद्धावर जायचे नव्हते.पण आपल्याकडे कोणत्याही शासकीय कचेरीत युद्धासाठी नाही तरी युद्धाच्या तयारीनेच जावे लागते.  कोणते मूळ कागदपत्र कोणत्या कागदपत्राच्या सत्यप्रती याविषयी आम्हा दोघांच्या वादविवादामुळे जाण्यापूर्वीच आमच्या घरालाच युद्धभूमीचे स्वरूप आले होते.खरे तर आमची पारपत्रे अस्तित्वात असल्यामुळे व त्यात असलेल्या आमच्या माहितीत एक पत्ता सोडून काहीच बदल झालेला नसल्याने  प्रत्येकाचा वास्तव्याचा पुरावा म्हणून टेलिफोनचे बिल किंवा बॅंकेचे मासिक स्टेटमेंट अशा स्वरूपाचे एक कागदपत्र एवढेच काय ते आवश्यक होते.पहिल्या पारपत्रातील पहिल्या चार व शेवटया चार पानांच्या छायाप्रतीही लागत होत्या.पण तरीही आयत्या वेळी मागितले तर काय करायचे म्हणून  पहिले पारपत्र तयार करण्यासाठी दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ व छायाप्रती आम्ही घेतल्याच.विशेष म्हणजे त्यांचे साक्षांकनही स्वतःच करायचे होते त्यासाठी राजपत्रित अधिकारी किंवा नोटरी हुडकण्याची आवश्यकता नव्हती.

       तो दिवस  अनंतचतुर्दशीचा होता पण तरी आमच्या निघण्याच्या वेळी सुदैवाने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालू होती त्यामुळे अगदी वेळेवर सिम्बॉयसिस कॉलेजसमोरील पारपत्र कचेरीसमोर रिक्षातून उतरलो. ती एकादी सुसज्ज इमारत असेल असे वाटत होते पण अगदीच बेंगरूळ इमारत निघाली.प्रवेशद्वारातून आत गेल्यावर इमारतीचा प्रवेश मागील बाजूने होता आणि तेथे अपेक्षेप्रमाणे झुंबड गर्दी होती.इमारतीच्या त्या बाजूच्या प्रवेशद्वारासमोर एक टेबल व खुर्ची घेऊन एक अधिकारी वाटणारा गृहस्थ बसला होता व प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून त्या व्यक्तीस प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवत होता.मग आमच्याजवळील कागदपत्रावर कोणत्या खिडकीकडे जायचे तिचा क्रमांक टाकून सही करून देत होता.विशेष म्हणजे त्याला मराठी बोलता येत नव्हते (ही गोष्ट राज साहेबांना कळलेली दिसत नाही) पण आम्हाला हिंदी बोलता येत असल्याने आत प्रवेश मिळाला.

       आत शिरल्यावर ज्या खिडकीचा क्रमांक सांगितला होता तेथे गेल्यावर तिच्या शेजारील खिडकीवर ज्येष्ठ नागरिक व पारपत्र नूतनीकरण असे लिहिलेले दिसले त्यामुळे क्षणभर घोटाळा झालाच. पण चौकशीच्या खिडकीवरील गृहस्थाने त्याचे निराकरण करून त्याच क्रमांकावर जाण्यास सांगितले.तेथे एका लांबलचक बाकावर आमच्यासारख्याच पारपत्र इच्छुकानी बसकण मारल्याचे दिसले व आम्हीही त्यांचाच कित्ता गिरवला.पण प्रत्येक खिडकीसमोर बसायला बाक ठेवले होते हे तरी काय कमी झाले ?

     अर्ध्या पाउण तासात आमचा क्रमांक आला.सुदैवाने येथील सर्व खिडक्यांवरील व्यक्ती अस्खलित मराठी बोलत होत्या.व एकूण त्यांची येणाऱ्या व्यक्तीशी वागणूक अद्बबशीर होती किंवा प्रत्येकाची अडचण समजून घेण्याकडे त्यांचा कल दिसला.थोडक्यात शासकीय कचेरीच्या प्रथेला त्यानी अपवाद करण्याचे ठरवलेले दिसले.आमची कागदपत्रे व्यवस्थित होती  पण हवी तशी लवकर सापडत नव्हती तरीही आपल्या मुद्रेवर त्रासिक भाव न आणता तेथील कर्मचारी शांतपणे आमच्या गुंडाळ्यातून योग्य ते कागदपत्र बाहेर पडण्याची वाट पहात होते त्यामुळे आम्हीही फारसा गोंधळ न घालता सर्व कागदपत्र सादर केले आणि त्यांनी ते योग्य असल्याचे मान्य करून आम्हाला ५ क्रमांकाच्या खिडकीवर शुल्क भरण्यासाठी जाण्यास सांगितले.माझे कागदपत्र अगोदर पाहिल्यामुळे मी त्या खिडकीजवळ अगोदर पोचलो व तेथे गेल्यावर पैसे मात्र नेहमीप्रमाणे सौ.कडे तिच्या पर्समध्ये असल्याचे लक्षात आले.पण तेथेही खिडकीवरील गृहस्थाने विशेष मनावर घेतले नाही व यथावकाश दोघांचेही शुल्क प्रत्येकी रु.१०००/- फक्त स्वीकारून छापील पावत्या दिल्या आणि आता जा घरी आणि पहा वाट पासपोर्टची असा प्रेमळ सल्ला दिला.

      अशा तऱ्हेने आम्ही तासादीडतासातच मोकळे झालो आणि वाघ मारायच्या तयारीने जावे आणि तो निघावा मात्र ससा अशी आमची अवस्था झाली.अर्थात त्याचा आम्हाला मुळीच खेद झाला नाही.

     यानंतर पोलिस तपासास तोंड द्यावे लागेल अशा दडपणाखाली आम्ही होतो.यापूर्वी पोलिस घरी चौकशीला येतात असा अनुभव होता त्यामुळे त्यांच्या चौकशीस कसे तोंड द्यायचे याचा विचार सुरू झाला अर्थात त्याविषयी फारसा विचार न करता काही दिवस तरी आनंदात पार पाडावे असे आम्ही ठरवले. तरीही उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नसल्याने दोन दिवसातच मी पुणे पारपत्र कार्यालयाच्या संकेतस्थळावर आमच्या पारपत्राच्या संदर्भात काही माहिती येतेय का पाहू लागलो.आम्हाला मिळालेले विशिष्ट क्रमांक नोंफ़वल्यावर त्यावर "निदान चार दिवस तरी वाट पहा " असा संदेश दिसू लागला.त्यानंतर मी पारपत्र हा विषय विसरूनच गेलो आणि वीसच दिवसांनी पोस्टमन एक रजिस्टर घेऊन दारात उभा.!इतक्यात पारपत्र येईल तावर विश्वासच बसत नव्हता पण खरोखरच माझे पारपत्र त्याने हातात ठेवले.त्यामुळे खूष होऊन त्याला काहीतरी बक्षिसी द्यावी असा विचार करत होतो पण त्याने मात्र मॅडमचाही पासपोर्ट आला की मगच घेईन असे म्हणून आमचा निरोप घेतला. पहिल्यावेळीही आम्ही दोघांनी एकदमच अर्ज भरूनही आमची पारपत्रे दोन तीन दिवसांच्या अंतराने आली होती त्यामुळे आताही तसेच होईल  अशा समजुतीत व आनंदात आम्ही मशगूल राहिलो.