ह्यासोबत
दत्ताराम आता माझ्याकडे राहतो. आमचं चांगाल जमतं. आम्ही दोघेही अविवाहित. तो माझ्याकडे येऊन पाचएक वर्ष झाली. तो चाळिशीच्या आसपास असेल. शिक्षण आठवी नापास. आमच्या गावाकडील नानासाहेब पुरोहितांचं एकमेव अपत्य. परमेश्वराला प्रसिद्ध लोकांच्या पोटी धोंडे जन्माला घालण्याचा छंदच असतो की काय , कोण जाणे. सध्या आपण दत्तारामला "दत्ता" म्हणू. आम्ही गावी राहायचो दत्ता नानांबरोबर आमच्या घरी यायचा . शरीराने पहिल्यापासून बलिष्ठ. त्याच्यापुढे आम्ही म्हणजे अगदी पाप्याची पितरंच..
नाना आमचे आणि सबंध गावाचेही आवडते उपाध्याय. आजच्या भाषेत गावातील 'सेलिब्रिटी' . ते विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न याज्ञिक ब्राह्मण होते. त्यांना अगदी उत्तर हिंदुस्थानातूनही यज्ञयागाची निमंत्रणे येत असत. ते लाल रंगाचं सोवळ नेसून , हातात झारी, अंगावर शाल घेऊन , एका हातात दर्भाची जुडी घेऊन , भाळी शिवगंध लावलेले नाना रस्त्याने जाताना, साक्षात ब्रुहस्पती वाटत. पाहणाऱ्याचे हात नकळत जोडले जात. मला तरी ते पंचावन्न साठीचे पाहिलेले आठवतात. थोडे लालसर भेदक टपोरे डोळे जरा उग्रच वाटत. त्यांचा आवाजही चांगलाच कणखर होता.
दत्ता नानांच्या हाताखाली जुजबी भिक्षुकी , म्हणजे पुरुषसूक्त, अथर्वशीर्ष, रुद्राभिषेक, आणी सर्व प्रकारच्या पुजा, वगॅरे शिकला. पण नानांइतका त्याचा अभ्यास व व्यासंग नसल्याने बऱ्याच गोष्टी त्याला येत नसतं. नानांच्या बैठकीतले भिक्षुक त्याच्याकडे अपेक्षेने पाहात. पण नानांच्या भाषेत सांगायचे तर 'शिंच्याला डोकं अजिबातच नाही' . शाळेतल्या विषयांमध्ये गती नाहीच पण भिक्षुकीतही फारशी गती नव्हती. त्यामुळे नानांकडून अवहेलना होणे अपरिहार्यच होतं. ते चार लोकांमध्ये बोलूनही दाखवीत. त्यामुळे दत्ताराम अगदी निराश होत असे. दत्ता आमच्या घरी जेवायला असला म्हणजे माझे वडील त्याला शाळेतल्या अभ्यासाबद्दल माहीत असूनही विचारायचे आणि बिचारा निराश व्हायचा. त्याच्याजवळ बोलण्यासारखे नव्हतेच. वडील आणखीन आमचे गोडवे गायचे. मी आणि माझ्या भावाबद्दल म्हणायचे, ' हा बघ, गणितात व विज्ञानात पहिला असतो . तुझं काय ? तू पास झालास कां? '. तो उत्तर देत नसे. खालच्या मानेने जेवत राही.
मला फार वाईट वाटे. एखाद्याला नाही जमला अभ्यास तर तो फुकट गेला का? उद्या त्यानी तुम्हाला विचारलं की तुम्हाला रुद्र येतो का , तर तुम्हालाही तो हासू शकेल. हा विचार करुनच की काय आई हस्तक्षेप करी व म्हणे, 'वाटेल ते काय विचारता त्याला , जेऊन द्या की नीट. मग वडील गप्प बसायचे. दत्ता खालच्या मानेने जेवण करून दक्षिणा घेऊन जायचा. अशी काही वर्ष गेली. दत्त्ताही मोठा झाला. वयात आला. आधीच सुद्रुढ असलेले शरीर व्यायामामुळे चांगले दिसू लागले. मीही माझ्या पुढील शिक्षणात गर्क झालो. आपण सगळे खायला पाहिजे , म्हणजे तब्बेत चांगली राहते, खाण्यात आवड निवड ठेवू नये असे तो मला म्हणायचा. तो मला दिन्या म्हणत असे. तो माझ्याशिवाय फारसा कोणाशीही बोलत नसे.
पुढे पुढे नाना थकत गेले. त्यांच्याच बैठकीतले ब्राह्मण त्यांचीच कामे लुबाडू लागले. पण काही खास यजमानाना मात्र नानाच लागत असत. नंतर नानांनी दत्ताला जोगभटजींच्या पाठशाळेत घातला. इतर मंत्र विधींची माहिती व्हावी म्हणून दत्ता पण जाऊ लागला. पण त्याच्या बुद्धीने त्याला दगा दिला. पाठ केलेले त्याला आठवतच नसे. तरीही जोगभटजी मनापासून प्रयत्न करीत. पुढे पुढे दत्ता दांड्या मारू लागला. भटजी प्रथम प्रथम बोलत. नंतर नंतर लक्ष देई नासे झाले. मग दांड्या नियमीत आणि दत्ता अनियमीत असा प्रकार होऊ लागला. (क्रमशः)