दत्ताराम .... (शेवटचा भाग )

 हळूहळू दत्ता भानावर आला. घामाने चांगलाच डबडबला होता. आता त्याची भारलेली अवस्था कमी झाली. आपण इथे का आलो हेच समजेना. मग रंजनावहिनी ची आठवण झाल्यावर मात्र तो घाबरला. आता त्याला आपण काय पाहिलं आणि आपण त्यावर काय करणार आहोत हा विचार सुचू लागला. कसातरी धडपडत तो मागे चालत आला. त्याला त्याच्या वर्गातल्या डोळे या मित्राची आठवण झाली . तो सांगत असे की भूत पाहिचे असेल तर दुपारी वैराण ठिकाणी वारा वाहतो तिथे जाऊन पाहा. त्या वाड्यात नक्कीच काहीतरी असले पाहिजे. त्याला आपले अंग तापल्यासारखे वाटू लागले आणि जोरात ओरडून कोणाला तरी बोलवावं असं वाटू लागलं. एकूण सगळाच विचार मनात आल्यावर त्याने त्यातून वेड्यासारखी घूम ठोकली. तालुक्याच्या गावाच्या विरुद्ध दिशेला तो धावत सुटला. त्याच्या वाहणा केव्हाच पायातून निघाल्या होत्या. तो खडीच्या रस्त्यावरून ठेचकाळत कसातरी घरी पोचला.त्याला आपल्याला चांगलाच ताप भरल्याची जाणीव झाली. नाना घरी नव्हते. त्याने आईला विचारलेही नाही की ते कुठे गेले. धापा टाकीत दत्ता आहे त्याच अवस्थेत अंथ्रुणावर पडला. आईने एका शब्दानेही विचारले नाही की काय झालं. पण कसातरी का होईना तिनं दत्ताच्या सांगण्यावरून दिनू कडे निरोप पाठवला. आणि डॉक्टरांनाही बोलावले होते.

नाना संध्याकाळी विमनस्क स्थितीत परत आले. त्यांना काहीही सुचत नव्हते. महादेवाच्या मंदिरात बसून त्यांनी दुपार घालवली होती. नानांनी घरात पाय ठेवला. पण त्यांचा कडकपणा ,ताठा नाहीसा झाला होता. रावसाहेबांचं बोलण त्यांनी मनाला फारच लावून घेतलं होतं. दत्ता झोपलेला पाहून त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. एरव्ही त्यांनी शिव्याशाप दिले असते. साधारण दोन तीन तासांनी औषधामुळे दत्ताचा ताप उतरला. रात्र अशीच काळजीत गेली. दत्ताला तर या बिक्षिप्त अनुभवाचा काही छडाच लागेना. रंजना वहिनीचं नक्की काय झालं असावं, हा प्रश्न त्याला सतावीत होता. आपल्याला ती काय दाखवणार होती . यातच त्याला झोप लागली. तेवढ्यात रात्री दरवाज्यावर थाप पडली.. तालुक्याहून माणूस आला होता. दत्ता भटजींना बोलावलय म्हणाला. पण दत्ताच्या आईने तो आजारी असल्याचे सांगितल्याने त्याच जाणे टळले होते.

कशीतरी आळसातच सकाळ उजाडलीं . नानांनी आन्हिकं तशीच सोडली. दत्ता पडूनच होता. थोड्या वेळाने दिनू आला. नानांना नमस्कार केला. पण ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी काल आल्यापासून बोलणं बंद केलं होतं. दिनूला पाहून दत्ताला रडू कोसळले. दिनू म्हणाला, 'मी उद्या जाईन म्हणतो. ' यापेक्षा जास्त रजा मला नाही वाढवता येणार. तो जायला निघाला. तेवढ्यात दाराशी पोलीस हवालदार आला व दत्ताला स्टेशनला बोलावल्याचे सांगितले. दिनू आवाक झाला. तो पण बरोबर आला. काही मदत लागली तर. पो. स्टेशनला त्यांच्या आधीच रावसाहेब बसलेले दिसले. दत्ता घाबरला. काय झालं असावं....? तोच इन्स्पे. साहेब म्हणाले, 'दाखवा त्याला ती बॉडी. दत्ता , केवळ तू नानांचा मुलगा , म्हणून मी तुला बेड्या घालून आणला नाही. , जा घेऊन त्याला. ' हवालदाराने बाजूचाच एका कळकट मळकट खोलीत नेले. तिथे एक म्रुत देह पांढरी चादर घालून ठेवला होता. देहाच्या तोंडावरची चादर काढून विचारले, "ओळखतोस ना यांना? " तिथे , तीच गुलाबी साडी घातलेली रंजनाबहिनी पडलेली होती. तिचा चेहरा काळानिळा पडलेला होता. दत्ताला काल दुपारची आठवण झाली. दत्ता थरथरतच हो म्हणाला.

"रावसाहेबांच्या सुनबाई आहेत ह्या. ह्यानि गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. माहिती आहे कुठे ते ? स्मशाना समोर पडका वाडा आहे ना . तिथे. त्यांच्या हातात ही चिठ्ठी मिळाली. " असे म्हणून ती त्यांनी दत्ताला वाचायला दिली. त्यात लिहिलं होतं , "मी आयुष्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. याला कोणीही जबाबदार नाही. " पण रावसाहेब बोंबलत होते. , "तुम्ही पहिल्यांदा त्याला ताब्यात घ्या. खोटारडा. लोकांना नादी लावतो. " पण रावसाहेब इथे बाईंनी लिहिलेली चिठ्ठी आहे. पुराव्याअभावी मी काहीही करू शकत नाही. " इन्स्पे. म्हणाले. रावसाहेबांना काही पटल नाही. ते दत्ताकडे पाहून तुच्छतेने म्हणाले, " कायद्याच्या कचाट्यातून सुटलास. पण माझ्या कचाट्यातून सुटणार नाहीस. " पण रावसाहेब , माझं ऐकावं आपण, " समजुतीच्या सुरात इन्स्पे. म्हणाले. "तुमच्या पद्धती आणि कायदा तुमच्या जवळच ठेवा. आता मीच पाहून घेईन. बॉडी लवकर ताब्यात द्या. " रावसाहेब चिडून म्हणाले. दत्ताकडे जळजळीत कटाक्ष टाकीत ते निघून गेले. नंतर इन्स्पे. म्हणाले. "जा दत्ता, केवळ तिच्या चिठ्ठीमुळे तू सुटलास. नाहीतर तुला केव्हाच पोचवला असता. " आम्ही दोघेही तेथून निघालो . "मुद्दामच बरोबर होतो. जामीन वगैरे लागला असता. " ते ऐकून दत्ताला हुंदका फुटला आणि म्हणाला, "माझ्यामुळे केवढा त्रास तुला. " दिनू म्हणाला, 'अरे त्रास कसला, आता तू मित्र राहिला नाहिस. माझा पाठचा भाऊच आहेस. आता तू कोणताही विचार न करता माझ्याकडे ये. . पण दत्ताला रावसाहेबांची भीती वाटतच होती. तो दिवस असाच गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी दत्ताचया घरी आणि गावातल्या घरोघरी निरोप आला की महादेवाच्या मंदिरात दत्तारामाबद्दल पंचायत काय ते ठरवणार आहे. सर्वांनी यावं. दुपारी चारच्या सुमारास जोग भटजी आले. ते बोलत होते. पण नानांनी हूं की चूं केलं नाही. भटजी म्हणाले, 'नाना अस मनात ठेवू नका. प्रकृतीवर परिणाम होईल. '. मग दोघेही पंचायतीच्या सभेला गेले. तिथे सदा पाटील , रावसाहेब , मंदिराचे ट्र्स्टी आणि काही गावकरीही होते. दत्ताला रितसर आरोप सांगितले गेले. मग रावसाहेब ओरडले, " याला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा द्यावी. हा लोकांच्या भावनांशी खेळलाय. अंगात म्रुतात्मा येतो काय ? असे म्हणून ते दत्ताला मारायला धावले. पण जोगभटजी मध्ये पडून म्हणाले. " रावसाहेब , पंचायतीला ठरवू द्या काय ते. ". मग रावसाहेब जागेवर बसले. पंचायतीने एकमताने निर्णय दिला , की रावसाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षा करावी. पण जोग भटजी तापून म्हणाले, "बघू , कोण हात लावतोय ते. अरे जरा विचार करा काय बिघडवलय या पोरानं तुमचं. चोरी केली का खून केला ? तुम्ही कोण कायदा हातात घेणारे? आणि दगड मारून तो मेला तर तुमच्यावर खुनाची केस् होईल. . आणखी एक , याला मारायच असेल , तर मला आधी मारावं लागेल. काय समजलात? ह्या रावसाहेबाला काय लागतय ? आणि ते एकदम रडू लागले "लहानपणापासून मी त्याला शिकवलाय रे. तुम्हाला काय लागतय मारून टाकायला ? फार तर तो गाव सोडून जाईल." "मी त्याला घेऊन जाईन पण तुम्हाला कोणालाही त्याच्या अंगाला हात लावू देणार नाही. " दिनू पण म्हणाला. पंचायत संपली. निर्णय फिरला. दत्ताने गाव सोडावे असे ठरले.

दिनू म्हणाला" आता कशाला वाट पाहायची ? आजच रात्रीच्या गाडीने जाऊ. जोग काकांना दत्ताने नमस्कार केला. त्यांनी त्याला मिठी मारली . ते म्हणाले, "दैवयोग असतात एकेकाचे, तुझ्या दैवाने तुला दिनू सारखा तुला मित्र मिळाला. काळजी घे. ". दत्ता घरी गेला. त्याने आईला समजावले व मधून मधून येण्याचे वचन दिले. त्याने जाताना नानांनाही नमस्कार केला. त्यानी कधी नव्हे तो हात वर करून आशीर्वाद दिला. . त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. कदाचित त्यांनी सांगोपांग विचार केला असावा.

आज दत्ता आणि दिनू यांचा ब्रह्मचाऱ्यांचा संसार नीट चालू आहे. दिनूच्या भावाची मुले येतात. त्यांना दत्ता काका फार आवडतात. ते मुलांना गोष्टी सांगतात् पण भुतांच्या नाही. मुले त्यांना दत्ता काका म्हणून खूप मानतात.

(संपूर्ण )