ह्यासोबत
दत्ता आता वयात आला. तो नियमित पूजा सांगायला जात असे. त्याचे लक्ष आता जेवायला वाढणाऱ्या वहिनींकडे जाऊ लागले. एरव्ही खाली मान घालून जेवणारा दत्ता वहिनींच्या बांगड्या, साडी वगैरेंची स्तुती करू लागला. दत्तालाही स्वतःवर ताबा ठेवणे क्ठीण जाऊ लागले.
हळूहळू नानांची कामं कमी होऊ लागली . त्यांना रक्तदाबाच्या विकाराने घेरले. एका ठिकाणी जेवणावरच चक्कर आल्यासारखे वाटल्याने, घाईघाईने
जेवण उरकून नानांना घरी याबे लागले. दत्ता बरोबर होता , म्हणून बरं. हृदयरोगाचा हलकासा झटका असल्याचे डाक्टर म्हणाले. अर्थातच नानांचे बाहेर जाणे बंद झाले. तरीही नानांना भेटायला येणारे येतच असत व काही काही भटजी त्यांची कामे इमानेइतबारे करून त्यांचा भाग त्यांना आणून देऊ लागले.
असो. दत्त्ता आता चोरून चोरून अंत्येष्टीही करू लागला व श्राद्ध पक्षाला जेवायलाही जाऊ लागला. एक दिवस फारच तमाशा झाला. रात्री एक बाजता अंत्येष्टीहून दत्ता परत आला. पैसेही बरेच मिळाले. पण घरात पाऊल टाकले आणि काळोखातच नानांच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. "दत्ता थांब तिथेच, बरेच दिवस मी ऐकून होतो , ते खरं आहे तर. अरे, तुला घरी गिळायला कमी मिळतं का? की तू श्राद्ध पक्षांना जेवायला लागलास. आणी आत्ता तर तू खाडीवरच्या मसणवटीतून आलायस. अरे, पैसे चांगले मिळतात म्हणून तुझ्यासारखे भटजी स्मशानात सुद्धा जेवतील. " दत्ता धीर करून प्रथमच म्हणाला, "पण नाना चौधरीकाकांना मागेपुढे कोणीच नाही म्हणून गेलो. तुम्हीच नाही का म्हणायचे की ज्यांचे कोणी नाही त्यांची अंत्येष्टी केली तर पुंण्य लागते. "
नानांचा देह थरथरू लागला. ते म्हणाले, "नको ते बरोबर लक्षात ठेवलयस. मला जोगभटजी मागेच म्हणाले, हल्ली दत्ताची लक्षणं काही ठीक नाहीत. अरे स्मशानात जाऊन आल्यावर आपल्याला प्रायश्चित्त घेतल्याशिवाय चालत नाही. आणि हि काही तुझी पहिलीच वेळ आहे असे वाटत नाही. दत्ता चांगलाच घाबरला. तरीही तो त्यांना ओलांडून पुढे धावला . नाना किंचाळले, "शिंच्या, बाजूला हो, विटाळ चांडाळाच तुला काहीच नाही आणि आता अंघोळ केल्याशिवाय घरात शिरतोस? बाहेर हो. ' मग बायकोला हाक मारून म्हणाले, 'ठेवा जरा गरम पाणी . स्नान करवून घ्या तुमच्या चिरंजिवांकडून. दिग्विजय करून आल्येत ते. ' दत्ताला चोरट्यासारखे झाले. आतल्या दारात उभ्या असलेल्या आपल्या आईला खुणेने विचारीत तो बाहेर आला. मग त्याला विहिरीवर अंघोळ घालून घरात घेतले.
जवळजवळ तीनचार दिवस झाले. नानांनी दत्ताशी बोलणंच टाकलं. ते आलेल्या माणसांशी बोलत . पण तो जसा काही अस्तित्वातच नाही असे वागत. नंतर मात्र एक दिवस विचित्र बातमी नानांच्या कानावर आली . दत्ता श्राद्धाला जेवायला बसला कि त्याच्या शरिरात म्रुतात्मा शिरतो व नातेवाईकांशी बोलतो. (क्रमशः)