(अ)यशस्वी,(ना)लायक,(कु)पुत्र-१

बरेच दिवसापासून मनोगतावरचे लेख वाचत आहे... वाटत होते मी सुद्धा लिहावे आपले अनुभव.. मित्रांनो हा पहिला आणि कदाचित शेवटचा लेख आहे... काही चुका झाल्यास पदरात घ्या!

मार्च १९९८ चा एक दिवस (तारीख आठवत नाही)... त्या दिवशी माझे व आई-बाबाचे स्वप्न धुळीस मिळाले. मी 'दादा' चा फक्त आणि फक्त 'राजेश' झालो. बाबांनी लगेच भविष्य वर्तविले की 'राजेश' "गाढव सुद्धा राखू शकत नाही". (अयशस्वी व्यक्तींचा आणि गाढवाचा नक्कीच काहीतरी सबंध असावा)

बाबांना वाटायचे की मी वैद्य व्हावे आणि मला वाटायचे की अभियंता. ह्यामुळे माझी इच्छा नसताना मला जनरल सायन्स घ्यावे लागले आणि इथेच सगळा घोळ झाला. जीवशास्त्राचा पेपर २० प्रयोगाचे + १५ पेपरचे असे गणित जुळवून काढायची वेळ आली. मी परीक्षा देऊन तर आलो पण विश्वास वाटत नव्हता की उत्तीर्ण होईल म्हणून. त्यानंतर गणिताचा पेपर होता. तो सोडवताना मला कळले की आता वैद्य किंवा अभियंता होणे शक्य नाही. पेपर बघून घाम फुटला मला.(तेव्हा ढुंग** घाम फुटणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ कळला  आणि ह्या घामाने नंतर बरेच वर्ष त्रास दिला).

मी एक शिक्षक दांपत्याचा मुलगा. आई-वडील आणि लहान भाऊ असे चौकोनी कुटुंब. भाऊ अभ्यासात तसा हुशार(तो इयत्ता ४ थी ला तालुक्यात प्रथम आला होता) पण मुलुखाचा आळशी! त्यामुळे घरच्यांच्या सगळ्या अपेक्षा 'दादा' कडून(म्हणजे माझ्याकडून). 'दादा' खूप हुशार ४ थी ला बोर्डात आणि शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम. हे यश असेच पुढेही मिळेल अशी सगळ्यांना अपेक्षा. आणि ह्या अपेक्षेला अजून एका प्रसंगाने खत पाणी घातले.

४ थी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालानंतर काही शिक्षकांनी तक्रार केली की मला माझ्या वडिलांनी आणि मुख्याध्यापकांनी प्रश्नपत्रिका सोडवण्यास मदत केली. त्या तक्रारीची चौकशी चालू होती. तक्रारी मध्ये काही तथ्य नाही असे चौकशी अधिकाऱ्याच्या लक्षात आली होते पण राजकीय दबाव असल्यामुळे तो वेळ घेत होता तसे जाहीर करायला. मग थोड्याच दिवसात शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आला आणि मी परत जिल्ह्यात प्रथम.  ह्या प्रसंगा मुळे वडिलांना मी खूप हुशार असल्याची आणि माझ्या यशाची खात्री झाली.. लोकांना पण कळले की कोण खरे आहे ते. बाबांना वाटले की आपला मुलगा आयुष्यात कधी अयशस्वी होऊ(च) शकत नाही. पण म्हणतात ना "अशक्य असे काहीच नाही ह्या जगात"... मग ते यश असो की अपयश  (क्रमशः )