ॐ नमस्ते गणपतये......

 आमच्या समोरच्या चाळीत एक जागा गेली सात आठ वर्ष तरी रिकामी होती. आमच्या मनात तीही जागा घरमालकाला भेटून भाड्याने घेण्याचे होते. तिथे पूर्वी कोणी एक एक्कलकोंडं कुटुंब राहात असे, असं आमचे बाबा सांगत. पण मागच्या रविवारी सकाळी एक नवीन कुटुंब राहायला आलं. आई, वडील आणि दोन मुलगे. मोठा आयुर्वेदिक डॉक्टर , लहान बेकार तरूण. बहुतेक पदवी धारक असावा . का कोण जाणे, मला आयुर्वेदिक डॉक्टरांचा फार राग आहे. ( कारण काहीही नाही, एखाद्या मनुष्याचा आपण कसा अनुभव न घेता राग धरून असतो, तसा. ). तसा त्यांनी आमच्याशी फारसा संबंध ठेवला होता असेही नव्हते. डॉक्टर नेहेमी ओळखीचे हासू हासायचे. मी पण हासायचो. पण मला आयु‌ डॉक्टरांचा राग असल्याने(पुन्हा तेच) मी बोलायला जात नसे.

त्यांचा भाऊ मात्र , बाकी कोणाकडेही न जाता , आमच्याकडे क्वचितच पण येत असे. त्याचं नाव किशोर होतं. त्याची दाढी कायम वाढलेली, म्हणजे राखलेली नव्हे. थोडा गोरटेलेसा आणि कोणत्यातरी वेगळ्याच विश्वात जगत असल्याचे दाखवणारे , तारवटलेले डोळे. एका सकाळी दारावरची बेल वाजली . मी ऑफिसला जाण्याच्या घाईत होतो. दार उघडले दारात किशोर. मी , त्याने आत येण्यासाठी थोडा बाजूला झालो. त्याच्या अंगाबर चुरगळलेला झब्बा आणि पायजमा होता. दाढी नेहेमींप्रमाणे वाढलेली. केस अस्ताव्यस्त. मी, रुमाल, घड्याळ , वगैरे शोधत होतो. तो खुर्चीत बसला. टीपॉयवरचा पेपर चाळीत म्हणाला, " काका , काय ह्या बातम्या . बघा ना , भ्रष्टाचाराची एक तरी बातमी असतेच. केवढी लाचलुचपत वाढल्ये. ह्या. लांच घेणाऱ्यांना लाजही वाटत नाही. खर तर साल्यांना ताबडतोब फाशी दिले पाहिजे. "त्याच्या बोलण्याकडे माझे लक्ष असल्याचे दाखवित होतो. तो पुढे म्हणाला, " तुम्हाला नाही वाटत , काहीतरी करायला हवं. " सध्या तरी मला ऑ फिसला लवकर जावेसे वाटत असल्याने जास्त उत्तेजन दिले नाही. आतून बायकोने चहा आणला . एक कप मला दिला , दुसरा त्याला दिला. यात नवीन काही नव्हत. काहीतरी म्हणायचं म्हणून म्हंटले., " अरे आपल्याजवळ काही उपाय आहे का? सहन करण्याखेरीज. "

मोठे डोळे करीत तो म्हणाला, "माझ्याजवळ उपाय आहे. शाळा प्रवेशासाठी सुद्धा केवढे पैसे मागतात . पालकांना देता आले नाही तर जा नगरपालिकेच्या ' नंबरी ' शाळेत. (नंवरी शब्दावर कुत्सित जोर देत तो म्हणाला). मी स्वतः नंवरी शाळेत शिकलेला होतो. पण आत्ता मला वाद नको होता. तो बोलत राहिला. म्हणाला, " प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकाने दोन दोन वर्ष फुकट घालवावीत. आणि ह्या पैसे मागणाऱ्या व पैसे खाणाऱ्या लोकांना गोळ्या घालाव्यात. म्हणजे त्या त्या क्षेत्रातील भ्रष्टाचार नाहीसा होऊन , दहशत बसेल. आणि अशा वर्ष फुकट घालविणाऱ्यांना सरकारने ती वर्ष माफ करावीत. "तो आणखीही बोलला असता. पण चर्चासत्र चालवणारे, तुमच्या सांगण्यात काही तथ्य असेल तर दुर्लक्ष करतात, तसे करून मी उठलो. मग जागेवरून उठत तो म्हणाला, " सॉ री , काका, तुम्ही घाईत आहात, मी निघतो , मी काय बिनकामाचा, निरुद्योगी माणूस " असे म्हणून तो निघून गेला. मी विचार केला . हा मनुष्य काही काम का करीत नाही ? असो. असे काही दिवस गेले. किशोर आता आमच्या कडे अधून मघून येऊ लागला. आम्हालाही त्याची सवय झाली. पण मी कधी त्याच्या निरुद्योगिपणा बद्दल विचारलं नाही, किंवा त्याची शैक्षणिक पात्रताही विचारली नाही. एक दिवस तो म्हणाला की त्याला जॉब पाहिजे. त्याच्या बोलण्यात अजिजी होती. त्याने आमच्याशी बोलताना कधीही त्याचे आई , वडिल , डॉक्टर भाऊ यांचा उल्लेख्ही केला नाही. आम्हीही विचारलं नाही. आयुर्वेदिक डॉक्टरांचा मला राग येतो(पुन्हा तेच. ) म्हणूनही असेल. असो. त्याने एकदा रसायनशास्त्र घेऊन बी. एस‌सी . झाल्याचे सांगितले. मी त्याला आश्वासन दिले त्यालाही काही महिने झाले.

अचानक एक दिवस रात्री मोठयाने रडण्याचा आवाज ऐकून मी जागा झालो. पाहातो तर काय , समोरच्या घरातून किशोरचा गुरासारखा ओरडण्याचा आवाज येत होता. दार बंद होते. किशोरला आत मध्ये जाम बडवी त असावेत . माझ्या मुठी आवळल्या गेल्या. पण त्यांच्या घराची बेल वाजवण्याची माझी हिंमत झाली नाही. त्यात आयुर्वेदिक डॉक्टरांचा मला राग आहे(पुन्हा तेच. ). मी जाईनच कशाला. थोड्यावेळाने त्याचे दार उघडले गेले. किशोरच्या वडिलांनी त्याला बाहेर ढकलले आणि दार लावताना म्हणाले. "जन्माला आलास तेव्हाच मेला असतास तर बरं झालं असतं. दार धाडकन लावून घेतले. रात्रीच्या शांततेत त्याचं विव्हळणं ऐकू येत होतं. पण मी काहीही करू शकत नव्हतो. किंवा मला काही करायचे नसावे. पुढे जाऊन त्याला समजाऊन धीराचे दोन शब्द सांगण्याची गरज होती. पण माझी तयारी नव्हती ‌‌. स्वतःला शहाणा समजणारा मी तसा सामान्यच होतो. सामाजिक बांधिलकी सारखे मोठे शब्द लिहायला आणि कोरड्या चर्चेसाठी चांगले होते. कोठेतरी मनात असावं की याच्यासाठी आपल्याला काही करावं लागलं तर ? किंवा हा आपल्या गळ्यात पडला तर? आयुर्वेदिक डॉक्टरांचा राग हे केवळ एक निमित्त होतं. मनानं नकळत शोधून ठेवलेलं. पण पुढिल काही आठवड्यांत जे घडलं ते मी मदत केली असती तर किंवा त्याच्या वेदनांवर फुंकर घातली असती तरी टळलं असतं. पण नाही मी तयार नव्हतो. पांघरूण घेऊन झोपलो. किशोरचं आमच्याक्डे येणं अनियमित होत होत शेवटी बंद झालं. (क्रमशः)