ॐ नमस्ते गणपतये...... (शेवटचा भाग)

 एक दिवस बातमी आली की किशोरला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलय. आयुर्वेदिक डॉक्टर रोज भेटायचे. ओळखीचं हासू हासायचे, मी पण हासायचो. पण एक प्रकारची आढी धरूनच. नंतर कळलं , त्या कुटुंबाची बरीच इस्टेट आहे. ती मोठ्या भावाला एकट्याला मिळावी म्हणून त्याने धाट्या भावाला वेडा ठरवून मेंटल मध्ये ठेवला होता. मला हे कारण फारसे पटलेलं नव्हतं. गणपतीचे दिवस होते. आईने उकडीचे मोदक केले होते. मला म्हणाली, "बध रे जरा किशोर मेंटलमध्ये खरच आहे कां थोडे मोदकही त्याच्यासाठी घेऊन जा. " मी म्हंटलं , "हा काय आगाऊपणा? त्यावर आई म्हणाली, "अरे तोच म्हणाला होता की त्याला उकडीचे मोदक खूप आवडतात. .

मी दुपारी डबा घेऊन मेंटल मध्ये रिक्षाने गेलो. स्वागत कक्षात विचारल्यावर एका पुरुष नर्सने किशोरच्या खोली समोर नेले. दरवाजा बाहेरून बंद होता. एक मोठी खिडकी खोलीला होती. त्यात किशोर भुस्कारलेले केस घेऊन पाठमोरा उभा होता. मी त्याला हाक मारली . किशोर वळला. खिडकी जवळ येऊन म्हणाला, "काका , तुम्ही? " फार बरं वाटलं हो. मला कोणीच भेटायला येत नाही. मला इथे विनाकारण डांवलेलं आहे. मी .. मी वेडा नाही हो. इथे मला रोज गुंगीची इंजक्शनं देतात आणि झोपवतात. त्यांना वाटतं मी व्हॉयलंट होईन. मी डॉक्टरांना पण ओरडून सागितलं . मी वेडा नाही. पण माझ्यावर कोणी विश्वासच ठेवीत नाहीत. काका मला, अथर्वशीर्ष , पुरुषसूक्त, मारुती स्तोत्र पण म्हणता येत हो. अथर्वशीर्ष म्हणणारा माणूस वेडा असू शकतो का ? तुम्हीच सांगा. पाहिजे तर मी अथर्वशीर्ष म्हणून दाखवतो. ". तो दीनवाणेपणाने बोलत होता. मी हो नाही म्हणण्याच्या आतच त्याने सुरुवातही केली." ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वं असी....... वगैरे. थोडे थांबून म्हणाला. आत्ता गणपतीचे दिवस आहेत. गावात गणपती असतील ना? तुमच्याकडे पण आहे का हो? मला बोलवा , आपण सहस्त्रावर्तन करु. " मी एकही शब्द बोलत नव्हतो. त्याला भेटायला कोणीच येत नसल्याने मी ऐकत होतो. मला गप्प पाहून तो म्हणाला, " काका मी वेडा नाही हो. मी वेडा वाटतो का तुम्हाला? मी सगळी स्तोत्र म्हणू शकतो , बघा हं.... " माझ्या होकाराची वाट न पाहता म्हणू लागला....." भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान ...... मध्येच थांबून , डोळ्यात पाणी आणून म्हणाला, काका तुम्ही मला घरी न्या हो. आणि मोठ्याने गळा काढून रडू लागला.... मला सोडवा हो इथून. मी कोणालाही त्रास देणार नाही. मी काहीतरी जॉब करीन. मी सगळ्यांच ऐकीन... तुम्ही डॉक्टरांना सांगा हो , की मी वेडा नाही. मी बी. एस्सी . वुइथ केमीस्ट्री आहे. असा शिकलेला माणूस वेडा असेल का ? तुम्ही मला सोडवा. मी तुमचे पाय धरतो. असे म्हणून तो खाली वाकला.

माझे डोळे डबडबले. मी काहीही करू शकत नव्हतो. मी माझी पाठ वळवली. त्याने पाहिलं असावं. तो म्हणाला ," काका , जाऊ नका हो. मी त्रास देणार नाही. मी कोणालाच त्रास देणार नाही. पण घरी घेऊन चला हो...... "मी पाठ केव्हाच वळवली होती. हॉस्पिटलच्या पायऱ्यांवरून मी धूम ठोकली. मागे वळुनही पाहिले नाही. तो मात्र जिवाच्या आकांताने ओरडत होता.

"अहो काका .. ‍. ‍.. ‍जाऊ नका. मला वाचवा हो. मला बाहेर काढा. काका बघा , मला अथर्वशीर्ष येतं. ...... ॐ नमस्ते गणपतये..... मग त्याचा जोरात हसण्याचा आवाज आला..हाहाहा.....हाहाहा..... ". मी विचारही न करता , एका रिक्षात जाऊन बसलो. रिक्षावाल्याने तीन चार वेळा विचारलं असावं , "कुठे जायचयं? " भानावर येऊन मी पत्ता सांगितला. मोदकांचा डबा पिशवीत तसाच होता. किशोरची केविलवाणी अवस्था माझ्या डोळ्यासमोरून जाईना. रिक्षावाला म्हणाला, " काय साहेब भाऊ आहे का मेंटलमध्ये ? वेड्यांच जगच वेगळं असतं बघा. " माझ्या कानात अथर्वशीर्ष आणि किशोरचे शब्द घुमत होते. मी म्हंटले. " बाबारे, कोण वेडा काय सांगणार. आपण काय कमी वेडे आहोत ? "

थोड्या वेळाने माझे घर आलं. संध्याकाळ होत आली. आईलाही सगळं ऐकून वाईट वाटतच होतं. मी गणपती पुढे कापूर लावून अथर्वशीर्ष म्हणणार होतो. माझ्या तोंडून शब्दच फुटेनात. मी गणपतीला फक्त नमस्कार केला आणि म्हंटले. " बाप्पा, आजतरी मला अथर्वशीर्ष म्हणणे शक्य नाही. क्षमा कर. आईलाही फार वाईट वाटल. मी ठरवूनच टाकलं . उद्या सकाळी उठून त्या आयुर्वेदिक दॉक्टरांकडे जायच (त्यांचा कितीही राग आला तरी. ) आणि त्यांना जाब विचारायचा.

पण मला उशीर झाला असावा. सकाळी सकाळी बायकोने घाईघाईने उठवलं. "अहो , उठा लवकर. ते समोरचे डॉक्टर जागा सोडून चालल्येत. ट्र्कमधे सामान भरलयं बघा. "मी फक्त बघत राहिलो. डॉक्टर खालच्या मानेने कोणाकडेही न बघता निघून गेले. परत समोरच्या जागेला कुलुप लागलं. असे. बरेच दिवस गेले. किशोरची आठवण येत राहिली. पण हॉस्पिटालात जाण्याचा धीर होत नव्हता. आणि एक दिवस मला फोन आला. "मि. सबनीस का? " मी हो म्हंटलं." तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये याल तर बरं होईल." मि. किशोर पुष्कराज तासापूर्वीच गेले आहेत. मी डॉक्टर माठे बोलतोय. " मग माझ आईशी बोलणं झालं. तिचही मत पडलं की मी जाऊन यावं. मी लगेचच निघालो. होस्पिटल मध्ये डॉक्टर माझी वाटच पाहात होते. ते म्हणाले. " मि . सबनीस . किशोरला इथे ठेवणारे त्याचे मोठे बंधू परत कधी आलेच नाहीत.त्यांचा फोन नंबरही चुकीचा आहे. आम्ही फार प्रयत्न केले. किशोरचे अंत्यसंस्कार तुम्ही कराल तर बरं होईल. त्याच्या व्हिजिट वही मध्ये फक्त तुम्ही भेटायला आल्याचीच नोंद आहे. पाहा, तुम्ही नाही म्हणालात तरी हरकत नाही . तसं ही आम्ही बेवारशी समजून त्याचे अंत्यसंस्कार करूच. . " मी पाचच मिनिट विचार केला. किशोर बेवारशी ? मला कसतरीच वाटू लागलं. मी डॉक्टरांना माझा होकार कळ्वला. हॉस्पिटलातल्या स्टाफ्च्या मदतीने जवळच्याच विद्द्युत दाहिनीत त्याचा अंत्यसंस्कार केला. मी जड अंतःकरणाने घरी आलो.

मग असेच काही दिवस गेले. एक दिवस एक कोट टोपी व धोतर घातलेले म्हातारेसे ग्रुहस्थ आले. त्यांच्या हातात एक छोटी ब्रीफ्केस होती. त्यांनी माझ नाव विचारलं. म्हणाले, " डॉक्टर पुष्क्रराज समोर राहात होते ते गेले का? मला चाळितल्या इतर लोकानी तुम्हाला माहिती असेल असे सांगितले म्हणून आलो. मी माझी ओळख करून देतो. डॉक्टरांचा मामा. मी जवळ जवळ वर्षभर सिंगापोरला असल्याने मला यायला जमले नाही. पण पत्र व्यवहार असल्याने माझ्याजवळ त्यांचा पत्ता होता. म्हणून आलो. तर. किशोर गेल्याचे समजले. तुम्ही किशोरचं सगळ केलत. फार आभारी आहे. " मग मी त्यांना त्या कुटुंबाची सर्व माहिती विचारली . तेव्हा अस कळलं की किशोर हा डॉक्टरांच्या वडिलांनी ठेवलेल्या बाईचा मुलगा . ती बाई केव्हाच मरून गेली. पण किशोरला घेऊन आले. जरी अनौरस मुलगा असला तरी इस्टेटीत वाटेकरी होईल म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला वेडा ठरवला. होता. तसाही तो नको असलेला असल्याने त्यांना त्याला दूर ठेवायचा असावा. मामा परत एकदा आभार मानून निघून गेले. मला आश्चर्य करण्याशिवाय मार्ग उरला नाही.

(संपूर्ण )