दत्तकृपायोग (अभंग) - भाग ३

[एक अध:पतित, दुर्दैवी, नैराश्यग्रस्त आणि आत्मघाताकडे निघालेल्या युवकाला पूर्वसुकृतानुसार योग आल्यावर सद्गुरू भेटतात. दत्तकृपायोगाने त्याच्या वृत्तीमध्ये आणि आयुष्यात स्थित्यंतरे येतात.   एक  कहाणी  अभंग स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न (क्रमश:) ]

स्वामीसान्निध्यात| होती माता पुत्र|
ऐसे भक्तिभावे| रममाण||

दत्त दर्शनाची| गोडी ती अमूप|
विसरती दोघे| देहभान||

सायंकाळ होता| माघारी फिरती|| 
चुके का कोणाला| व्यवहार||

इंधन संपता| एका आडगावी|
थांबे अचानक| चारचाकी||

समीपची होते| शिवालय एक|
पवित्र प्राचीन| शांत रम्य||

स्वामीभक्त पुत्र| मंदिरी पातला|
लीनपणे घाली| दंडवत||

गाभार्या मधोनी| वृद्ध एक व्यक्ती|
दत्त म्हणोनिया| प्रकटली||

कृश देहयष्टी| वर्णाने सावळी|
परी जणू खाण| चैतन्याची||

उभे ठाकती ते|  एकमेकापुढे|
अनायासे होई| दृष्टादृष्ट|| 

जन्मांतरीचीच| पटे खूणगाठ|
अद्भुत तो क्षण| रोमांचक||