दत्तकृपायोग (अभंग) - भाग ४

[एक अध:पतित, दुर्दैवी, नैराश्यग्रस्त आणि आत्मघाताकडे निघालेल्या युवकाला पूर्वसुकृतानुसार योग आल्यावर सद्गुरू भेटतात. दत्तकृपायोगाने त्याच्या वृत्तीमध्ये आणि आयुष्यात स्थित्यंतरे येतात.    एक  कहाणी  अभंग स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न (क्रमश:) ]

सद्गुरू भेटीचा| सोहळा सुखाचा|
वर्णाया तोकडी| शब्दशक्ती||

मातेसी बालक| धेनुसी पाडस|
तैसाची संबंध| असे येथे||

मायेचा ओलावा| वात्सल्य जिव्हाळा|
शब्द हे साकार| होती तेथे||

बिंबे प्रतिबिंब| न्याहाळावे तैसे|
शिष्यास पाहती| गुरुदेव||

तयाची दारूण| आत्मघाती स्थिती|
ओळखली त्यांनी| क्षणार्धात||

म्हणे मन त्यांचे| काय हे प्रारब्ध|
देसी तू समर्था| शिष्योत्तमा||

जन्मोजन्मीचा हा| सहचर माझा|
काय त्याची दैना| केली रे तू||

धाव दत्ता आता| उद्धार कराया|
क्षणभर मन| आक्रंदले||  

परी जाणती ते| कर्माचा सिद्धांत|
सदा अंतर्यामी| स्थितप्रज्ञ||

वापरोनी सिद्धी| मांडीला हो त्यांनी|
शिष्य संचिताचा| लेखाजोखा||

ईश्वरी कार्याचा| संकेत घेउनी|
जन्मासी हा आला| योगभ्रष्ट||